

नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.
संसाराची जशी दोन चाके ,तशी नटाच्या अभिनयाची दोन धारदार शस्त्रे आहेत. एक शरीर आणि दुसरे शब्द. दोघेही एकमेकावर अवलंबून. व्यसन या दोन्हीवर संकट आणते आणि नटाचा बनतो खुळखुळा. (शब्द कुठला वापरावा असे लक्षात घेउनच थोडा शांत शब्द घेतलाय) चांगल्या व्यसनातून कीर्ती मिळते तशी यापासूनही मिळते. पण ही होते अभद्र कीर्ती. यातून तो तर संपतोच पण त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबही विखुरले जाते. (या कुटुंबात नाट्यक्षेत्रात काम करणारे कलावंत, पडद्यामागे काम करणारे साथीदारही आले)
हा विषय आला तो सतीश तारे या कलावंताबाबतीत नाट्य निर्माते संघाने घातलेल्या बहिष्कारावरून. दारू पिऊन काम करणे, संवादात स्वतःची भर घालून नाटक बदलणे यातून सतीश तारेला कुणीही नाटकात काम न देण्याचा निर्णय घेतला गेला.
मुळात हा नट पुण्याचा. हरहुन्नरी, कलंदर. वडील जयंत तारे यांच्या फुलराणी रंगभूमिवरच्या नाटुकल्यात. बालनाट्यात काम करताना त्याचे कलागुण विकसीत झाले. ते व्यवसायाने ओळखले. आधी मालीकेत आणि मग व्यावसायीक नाटकात ता-यांचे विश्व निर्माण झाले. नाटके मिळाली पण का कोण चाणे हा तारा चमकता चमकला त्यातले तेज नाहीसे होत गेले. चेह-यावरची चमक काळवंडली. अखेरीस कीतीही ओरडून सांगितले ... तो मी नवहेच... तरी तो बाद ठरला. ठपका आला. कदाचित मालिकेतील कामे मिळण्यावर त्यांचा परिणाम होईल.
कारे बाबा सतीश... असे कसे झाले....
सांगून समजावयाचे दिवस गेले. तशी माहेरी म्हणजे पुण्यात फुलराणीचे प्रयोग आजही घडताहेत. आई अजून उभी आहे. भाउ कामे करतोय.
प्रश्न कामाचा नाही. बदनामीचा आहे.
सतीश तारे वाचून वाईट वाटले... पण तसा तु एकचटाच नाही. या व्यसनाने अनेकांना हादरा दिलाय. कांही तरले तर कांही उरले.
सहज आठवले. सतीश ...
कांही वर्षापूर्वी मोहन वाघांच्या चंद्रलेखा संस्थेचा प्रयोग. पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात. हाउसफुल्ल्च्या बेतात. पण अरूण सरनाईकांचा पत्ता कुठाय. पावणे दहा वाजता. पत्ता सापडला. महाशय संभाजी बागेसमोरच्या एका उपहारगृहात पिऊन पडल्याचे कानी आले.
झाले वाघच ते . आणि नाटकाचे नावही गाठ आहे माझ्याशी... मोहन वाघांनी व्यवस्थापका सप्रे यांना जाहिर करायला लावले की प्रयोग तर रद्द. पण यापुढे अरूण सरनाईक यांची चंद्रलेखातून उचलबांगडी....
याच्या साक्षादारपैकी मी एक...
नटाचे शस्त्र ते शरीर. त्याची निगराणी करणे आणि ते धडधाकट राखणे ही त्याची जबाबदारी. पण ते पाळते कोण.? यश डोक्यात जाते की नकळे, पण हा व्यसन हा रंगभूमिला शाप आहे... एक बरे.. की मालिकांचे वरदान सध्या या नटांना मिळाले आहे.
पण बेटेहो... सांभाळा... स्वतःला आणि या संकटकाळात तग धरून जिवंत असलेलल्या नाट्यवसायाला.
आपला नाटकवाला,
सुभाष इनामदार पुणे.
subhashinamdar@gmail.com
9552596276