Saturday, March 31, 2012

सूर सांगती...


सूर सांगती रोज गाती
साधनेतून दिसती..
कोण कुणाच्या नंतर येतो
जुळवून सूर सांगाती...
कधी कुणाच्या घुमतो कानी
एकच तो तराणा..
रियाजातून सिध्दी मिळते
जुळतो नाद पुराना...
ध्यास घेतला आज कुणी का
सुरेल व्हावे गाणे..
विरह वेदना दूर होती
स्वरात भिजूनी गाणे...
कधी कुणाचे ध्यान लागते
सुरेल होते जीवन..
धानीमधली सूर छेडिता
धुंदीत होते मन...




सुभाष इनामदार, पुणे

Thursday, March 29, 2012

व्हायोलीनच्या सूरातून जंगली महाराज परिसर सुरावला

मार्चच्या २८ तारखेला व्हायोलिन गाते तेव्हा...चा दुसरा कार्यक्रम सदगुरु जंगली महाराजांच्या १२२ व्या पुण्यातिथी निमित्ताने रुजू केला. त्याचे निवेदन मी लिहले..ते तुम्हासमोर सादर करीत आहे..यात * अशी खूण केल्या ठिकाणी गाणे आहे...ते नंतर सांगेन....आत्ता एवढेच पुरे...



ज्याच्यामुळे प्रकाश येतो त्या तेजोमय सूर्याला उद्देशून किती तरी कवी लेखकांनी आपली प्रतिभा साहित्य़ातून व्य़क्त केली आहे. शेवटी सारे काही केले तरीही कुणाला तरी समर्पण करणे हेच प्रत्येकाचे साध्य रहाते.. सप्तरंगातून जसे आकाश खेळते तसेच ते संगीताच्या सात सुरातून. गायन वादन आणि संगीताची सेवा करणारा प्रत्येक कलाकार यातूनच स्वतः घडतो. आणि तेच घडणे जेव्हा आपल्यासमोर मांडतो तेव्हा त्याच्याही साधनेतील ते सप्तसूर झंकारू लागतात.
आज `उंबरठा` या चित्रपटातल्या `गगन सदन तेजोमय` या गीताने सौ. चारुशीला गोसावी आपल्या `व्हायोलीन गाते तेव्हा...` या कार्यक्रमाची सुरवात करताहेत. शब्दावीना संगीत ऐकताना तुम्हीच नक्कीच ते शब्दही तुमच्या मनात आळवाल याची खात्री आहे. वसंत बापट यांनी लिहलेल्या या गीताला संगीतबध्द केले आहे पं. हदय़नाथ मंगेशकरांनी तर ते गायले आहे भारतरत्न स्वरकीर्ती लता मंगेशकर यांनी...
गगन सदन तेजोमय,
तिमिर हरुन करुणाकर,
दे प्रकाश, देई अभय...

व्हायोलीन गाते तेव्हा...हा १२ फेब्रुवारी १२ला पुण्यातच पहिला कार्यक्रम झाला. सौ. चारुशीला गोसावी यांनी कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता आपली कलासेवा हेमलकसातल्या आदिवासींच्यासाठी काम करणा-या डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या कार्याला निधी गोळा करण्यासाठी केला. सांस्कृतिक पुणेनी आयोजित केलेल्या यातून कर्च वजा जाता ५८ हजारांचा निधी आम्ही उभा करु शकलो. आजही आपल्यापैकी कोणाला त्यांच्या कार्यासाठी आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्यांनी
भेटावे...धन्यवाद.

*सुधीर फडके हे नावच पुरेसे आहे. बाबूजी या नावाने ते तुम्हा आम्हा मराठी रसिकांना ठाउक आहेत. संगीतकार, स्वातंत्र्यसेनानी, आणि एक जिद्दी, निष्ठावान कलावंत. एके काळ मराठी मनावर अधिराज्य गाजविणा-या या गायकाच्या म्हणजे सुधीर फडके यांच्या आवाजात गाजलेले `वरदक्षिणा` या चित्रपटातले वसंत पवार यांनी स्वरबध्द केलेले गीत आता सादर करीत आहोत... गीत अर्थातच गदिमाडगूळकरांचे.

वसंत पवार हे ही अवलिया संगीतकार. ते श्रेष्ठ ठरले ते त्यांच्या रचनेमधून. अतिशय गरीब आणि तेवढेचे उत्तम कलावंत. त्यांची आठवण नुकतीच सुलोचना चव्हाण यांनी सांगितली. एके दुपारी पत्ता शोधत वसंत पवार त्यांच्या घरी गेले. एका कागदावर गीत होते. ते त्यांना त्यांच्याकडूनच गाऊन घ्यायचे होते. पेटी काढली. गीत शिकविले. आणि जायला निघाले. तेव्हा सुलोचनाबाईंनी विचारले..जेऊनच जा. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. ते म्हणाले सगळे जण मला दारु पाहिजे का म्हणून विचारतात. तुम्ही मला जेवायचे विचारले. त्यांचे ते बोलणे त्यांच्या मनात टोचले तसे तुमच्याही बोचले ना...कलावंत दिसतो पण पत्यक्षात त्यातल्या माणसाला ओळखायला शिका.....प्रथम तो माणूस असतो आणि मग कलावंत...
त्याच वसंत पवारांनी संगीत दिलेले हे गीत..

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - सुधीर फडके (कलाकार : रमेश देव)
चित्रपट - वरदक्षिणा (१९६२)


*साधे आणि सरळ तरीही कुठेही साहित्याचा दर्प न येणारे असेच एक गीत. `ह्दयी प्रित जागते जाणता अजाणता.`
आशा भोसले यांचा निर्मळ स्वर. त्याला चाल दिली आहे सुधीर फडके उर्फ बाबुजी यांनी. `सुवासिनी` या चित्रपटातले हे घराघरात, मना -मनात गुणगुणले जाणारे गाणे आता याच सुरेल व्हायोलिनमधून चारुशीला गोसावी ऐकवत आहेत..आपण तो आनंद घेऊया...अतिशय कमी वाद्यांच्या साथीतुन शब्द जिथे सा-या प्रितीच्या भावना सांगताहेत...आजच्या गोंगाटी संगीताच्या काळात आजही ही गाणी तुम्हा आम्हाला आळवावीशी वाटतात. हेच या संस्कृतीचे मातीचे मोठेपण आणि गंध..
आपल्या वादनातून तुम्हाला आनंद देणा-या सौ. चारुशीला गोसावी यांच्या मनातही बरेच बोलणं चालू असतं. त्या वाद्यातून स्वर काढतात त्या आधी त्या मनातून स्वतःला व्यक्त करतात. त्या सांगताहेत....खरच आज मी खूप समाधानी आणि अतृप्त आहे. समाधान याचसाठी की मला माझे स्वतंत्र अस्तित्व एक व्हायोलीन वादक म्हणून सिध्द करण्याची संधी मिळाली. माझ्या साधनेत कीती बळ आहे आणि माझे गुरु व पिता पं. भालचंद्र देव यांनी माझ्यात जी व्हायोलीनची कला रुजविली त्याचेही उतराई होण्याची संधी दिली.... आणि अतृप्त यासाठी कलेची सेवा हा प्रचंड महासागर आहे. त्यात आपण कितीही कलेचे पाणी ओतले तरी कमीच. मी एक छोटी कलावंत आहे. त्या सागरात अनेकांनी घागरीने पाणी ओतले. मी त्यातच एक थेंब टाकतेय याची जाणीव आहे. आता हवे आहे ते एकच.... तुमचा आशीर्वाद आणि कार्यक्रम करण्यासाठी तुमचा पाठिंबा.
हाच कार्यक्रम ८ एप्रिलला कोल्हापूरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे. असे महाराष्ठ्रात विविघ शहरात याचे प्रयोग करणार आहोत. कलेतून सामाजिक मदत करण्यासाठी हा वसा आम्ही घेतला आहे. त्यालाही तुमचा आणि त्या अधिष्ठ्य़ात्याचा आशीर्वाद आमच्या मस्तकी रहावा...


*जगाच्या पाठीवर... खरचं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या त्रिमूर्तांनी इतिहास घडविला ते म्हणजे सुधीर फडके, गदिमाडगूळकर आणि राजा परांजंपे...त्यांच्याविना मराठी चित्रपट संगीतांची वीणा पुढे जाऊच शकत नाही. त्याच चित्रपटातले अर्थपूर्ण गीताला व्हायोलीनमधून सादर करणार आहेत. जीवनाचा सारा प्रवास एका गीतातून सांगणा-या या शब्दासाठी स्वतः बाबुजींनी स्वर दिलाय...थकले रे नंदलाला.. यातला एक आवाज नक्कीच तुमच्या मनात साठविला जोईल तो म्हणजे..दिमडीचा ती वाजविली आहे. आण्णा जोशी यांनी. सुधीर फडके यांच्याबरोबर गीतरामायणाच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी केलेली साथ अनेकांना स्मरणात असेल... ज्यांनी काही अभंगांनाही उत्तम चाली दिल्या आहे.. तर ऐकूया...


*मंगेश पाडगावकर हे नाव आले की त्यांच्या रचनांना सलाम केल्याशिवाय पुढे काही बोलणे अशक्य आहे...त्यांच्या अनेक रचना आजही मराठी सुगम संगीताच्या क्षेत्रात अनेक नवगायक गाऊन स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करत आहे..बाबूजींनी आर्तपणे म्हटलेले हे भारदस्त गीत . गीताचे संगीतकार आहेत यशवंत देव. यातल्या प्रत्येक ओळीतला जो आतला आवाज दडलाय तो ऐकताना सहजपणे बहार येतो...`तुझे गीत गाण्यासाठी` आता सादर करताहेत...
शांत शांत उत्तररात्री मंदमंद तारे ..
तुझे प्रेम लेऊन येती
गंध धुंद वारे..
यातले शब्दन शब्द..व्हायोलीन मधून तुम्हाल अनुभवता येईल. पाहूया...

















*गीतकार
- ग. दि. माडगुळकर

गायक
- लता मंगेशकर

चित्रपट
- किचक वध - 1959



धूंद मधुमती रात रे
धूंद मधुमती रात रे, नाच रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे, नाच रे

जल लहरी या धीट धावती, हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अली रमले कमलात रे, नाच रे

ये रे ये का मग दूर उभा, ही घटीकाही निसटून जायची
फुलतील लाखो तारा, परी ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनि, कटी भवती धरी हात रे, नाच रे

भूप रागात बांधलेले हे गीत संगीतबध्द केले आहे..मा. कृष्णराव यांनी. लता मंगेशकरांच्या स्वरात गदिमांनी रचलेल्या या गीतातून गीतरामायणाची आठवणही जागी होईल. ऐकायला सुंदर पण ते सादर करणे आणि त्यातली रचलेली सुरावट वाद्यातून काढण्याचे कसब आता या सा-याच कलावंत संचाला करायचे आहे. महाभारताच्या अजरामर अशा महाकाव्यावरुन `किचकवध` हा चित्रपट १९५८ साली तेवढाच देखणा साकार झाला. आपण चला जावू या महाभारत काळात आणि ऐकूया...
धुंद मधुमती..रात रे..नाच रे..
तनमन नाचे यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ ते नाच रे..


*सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात ऐकताना ज्या गाण्याला तुम्ही दाद द्याल तेच हे गीत..
तुझ्या गळा माझ्या गळा ..
गुंफू मोत्यांचा माळा....
भावूकतेचा हा उत्तम नमुना.. एकमेकांच्या तरल प्रेमभावनेला आणि तशाच समर्थ शब्दात रेखाटण्याचे कसब केलेय भा.रा तांबे यांनी... संगीतही बाबुजींचेच आहे,,,
गेली ३२ वर्ष व्हायोलीन सारख्या वाद्यात आपले कसब निर्माण केलेल्या सौ. चारुशीला गोसावी यांची मेहनत आपण सारेच पहात आहोत. घर,संसार आणि कला या तिहेरी आघाडीवर लढणा-या या कलावंत स्त्रीची नोकरी सुरू आहे. भारत संचार निगम च्या कार्यालयात नोकरी..आणि उरलेल्या वेळात कलेची सेवा करत आज आपले स्थान निर्माण करत स्वतंत्र व्हायोलीन वादनाच्या क्षेत्रात त्यांची प्रगती आपण पहातच आहात. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याला त्यांनी साथ केली नाही.

पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळे निर्माण
झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी
वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळाव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या
वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी
यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची
गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर
आकाराला आले...आज त्यातूनच हे व्हायोलीन गाऊ लागले आहे. स्वतंत्रपणे...त्यातूनच उमटत आहेत.

*नवी सुरावट जी शब्दांना साद घालताहेत. तशीच साद आशा भोसले यांच्या स्वरातून मिळते. गायकाने शब्दातून गाण्याला कसा अर्थ दिला तर ते पडद्यावर अधिक उत्तम दिसेल याचे उदाहरण म्हणून `जांभूळ पिकल्या झाडाखालीचा` उल्लेख आशा भोसलेंना करावास वाटला..मूडप्रमाणे आपला आवाज ,आपला ढंग कसा बदलायचा.. ना धों महानोरांचे गीत जांभूळ वाचताना मला माझ्या आजोळी गेल्यासारखे वाटते ..असे त्या एका मुलाखतीत सांगतात. कारण त्यांची आई तिकडची...ह्दनाथ मंगेशकरांनी हा थाट-बाजही तेवढाच उत्तम सजविला आहे..तर जैत रे जैत मधले हे गीत... यातला पुरुष स्वर आहे रविंद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा...


*आज या पवित्र स्थानी ही व्हायोलीनची गीत मैफल आपण ऐकत आहात त्याला साथही तशीच साजेशी मिळत आहे..तशी तुमची दादही...विविध तालवाद्यातून घुमत आहेत राजेंद्र साळुंखे . *छोट्या छोट्या वेगवेगळ्या तालांच्या सुरावटींनी गाण्याची रंगत ते वाढवित आहेत.
*हार्मीनियमची साथ करत आहेत सौ. शुभदा आठवले.
*तर सिंथेसायझर मधून नेमकी गाण्याबरहूकुम वाद्यांची सुरावट करत आहेत सौ. दर्शना जोग. *तबला आणि ढोलकीच्या तालाकडे आकर्षित करणारे कलावंत आहेत रविराज गोसावी. ते चारुशीला गोसावी यांचे सुपुत्र आहेत. स्वतः आर्किटेक्ट असून विजय दास्ताने यांच्या तालमीत त्यांच्या हाताला आकार आला आहे.
*आणि मी स्वतः सुभाष इनामदार... सुरांशिवाय शब्दांनी नुसताच व्यक्त होतोय..


*दशरथ पुजारी यांची गीतेही एके काळी तेवढीच लोकप्रिय होत होती. त्यांनी चाली दिलेल्या गीतानी ते संगीतकार म्हणून तर लोकप्रिय होतेच ,पण सुमन कल्याणपूर यांच्या कडून त्यांनी जी गीते गाऊन घेतली ती ऐकताना त्यांच्या सांगितिक बैठकीचा थाट संगीत क्षेत्रात स्वतःचे कर्तुत्व सिध्द करत गेली. त्यातलेच एक अजरामर गीत ..
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे ||
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणूनी त्याचे नाव अमर आहे ||
भक्त बाळ प्रल्हादाला छळिले पित्याने
नारसिंहे रुपे त्याले रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मुर्ती अजून विश्व पाहे ||
साधुसंत कबीराला त्या छळिती लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुग्ध रूप दोहे ||
गायिका:
सुमन कल्याणपुर
संगीतकार:
दशरथ पुजारी
गीतकार:
मधुकर जोशी


*व्हायोलीनच्या सुरातून आता उलगडत जाणार आहे लावणीच्या ढंगाने सादर होणारे गीतातून.. अगदी ढोलकीच्या ठेक्यावर...पडछाया- चित्रपटातली हे गीत आणि त्या संगतीला जोडलेला ढोलकीचा खनखनाट... ठेका... हा ढोलकीवाला कोल्हापूरातला नाही तर अस्सल पुण्यातला आर्किटेक्ट झालेला आणि आपल्या आईच्या साथीसाठी आपल्यासमोर असलेला रविराज गोसावी..तुमच्यासह मलाही ह्या लावणीची उत्सुकता आहे..तर सादर आहे..शब्द पहा...
जळी वाकून मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन पाठीमागून, माझी वेणी ओढली


ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी उगी काढली
बाई माझी करंगळी मोडली

*शास्त्रीय संगीताचा वापर करुन सी रामचंद्र म्हणजेच रामचंद्र चितळकर यांनी केलेली ही सुंदर चाल..त्याला लता मंगेशकरांना लाभलेला तेवढाच स्वर्गीय आवाज...लयकारी आणि मीनाकुमारी .यांची चित्रपटातली आदाकरी सारेच तुम्हाला आठवत असेल.. `आझाद` या चित्रपटातले हे गीत...राजेंद्रकृष्ण यांचे शब्द-
राधा ना बोले रे....
गीतातली सुरावट आणि साधेपण सुंदर भावमय सुरेल आविष्कार नक्कीच आवडेल...


*एका हिंदी चित्रपटातले एक गाजलेले एव्हरग्रीन गीत..गायिका आहेत वाणी जयराम...संगीत देणारे अजरामर संगीतकार होते एक मराठीच नाव वसंत देसाई.... दो आंखे बारा हाथ, गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे, अशा लोकप्रिय चित्रपटांना संगीत देणारे हे वसंत देसाई....मराठी मनात त्यांचे एक गीत नक्कीच ताजेटवीत नाट्यपद ..जे कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या आवाजात लोकप्रिय ठरले आहे. `देव दिनाघरी धावला नाटकातले बाळ कोल्हटकरांनी लिहलेले...ऋणानुबंधाच्या....जिथून पडल्या गाठी. भेटीत तृप्तता मोठी... त्य़ांची आठवण आली त्यांच्या मृत्यूबद्दलची हळहळ मनात दाटून येते. शब्दांना योग्य आणि सरस चाल देणारा हा श्रेष्ठ संगीतकार....हाच ताल, सूर आणि त्यातून येणारा सुरेल अनुभव सारेच तेवढेच नादमधुर असेल...तर बोलण्यात फोर वेळ न घेता तेच गीत ऐकू या...गीताच्या सुरावटीतूनच तुम्ही नक्कीच चित्रपट आणि शब्द ओळखाल....

*संगीतकार ह्दयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायलेले हे पहिले भावगीत. माझ्याकडे काय चांगले आहे बाळने म्हणजे ह्दयनाथने त्यावेळी ओळखले.. त्याने संगीत दिलेले गाणे गाणे म्हणजे गायकाचा कस लावणारे असते...असे आशा भोसले यांना आजही वाटते.... हंसध्वनी या रागावर आधारित हे गाणे व्हायोलीनच्या सूरात कसे वाटते पहा..
चांदणे शिपिंत जाशी.
चालता तू चंचले..
ओंजळी उधळीत मोती
हासरी ताराफुले...
किती छान कल्पना आहे.. बघा..


*भावना घेऊन गाणे हेच ज्यांचे वैशिष्ठ्य असे मराठी रंगभूमीवरचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पं. रामदास कामत. त्यांनीच गायलेले वसंत कानेटकरांच्या `मत्स्यगंधा` या नाटकातले गीत..याचे संगीतकार आहेत पं. जितेंद्र आभिषेकी...अभिषेकींच्या नाट्यसंगीताने काही काळ थबकलेली मराठी संगीत नाटकांची परंपरा पुन्हा उजळ माथी डौलाने फडकू लागली..त्यातलेच एक नाटक म्हणचे कट्य़ार काळजात घुसली...
सूर शोधावा लागणा-या या वाद्यातून कोणतेही गीतांचे प्रकार वर्ज्य नाहीत हेच यातून सौ. चारुशीला गोसावी आपणास पटवून देताहेत. आजवर अनेक कार्यक्रमांना साथी करुन सर्व प्रकारच्या गाण्यांना त्यानी साथ केली..म्हणून त्यांच्या व्हायोलीन मधून ही सारी गाणी अलगद सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत..ती तुम्हा रसिकांना आव़डतात हेही तुमच्या चेह-यावर दिसत आहे....तर सादर आहे एक .नाट्यपद.....गुंतता ह्दय हे....


*आशा भोसले यांनी गायलेली ही बैठकीची लावणी..`को हो धरीला मजवरी राग...`.किती साधी सोपी आणि तरीही गायकाला ही अवघड वाटावी अशी रचना... सुधीर फडके यांनी संगीतातून शब्दांची ही सारी किमया कायम ठेऊन त्यातल्या शब्दांना आणि भावनेला सुरात गुंफण्याचे सामर्थ्य त्यांच्या संगीतरचनेत आहे...इथे केवळ शब्दातूनही सा-या भावना किती समर्थपणे प्रकट झाल्यात तेही पाहता येते...


*सुधीर फडके यांचे भावनेत गुंतून गेलेले शब्द...गीतातली सारी रचना माणसाच्या आयुष्याची कहाणी वर्णन करणारी आहे..ग.दि माडगळकरांची रचना आणि राजा परांजपे यांचे दिग्दर्शन यातून साकारलेला चित्रपट म्हणजे `जगाच्या पाठीवर...` .अर्थात संगीतही सुधीर फडके यांचेच...व्हायैलीनच्या सुरातून ऐकवण्यासाटी सिध्द झाल्या आहेत. चारुशीला गोसावी आणि त्यांचे साथीदार... आता आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्यावर येऊन पोचलो आहोत. एक गाणे सुखाचे हिंदोळे देत आहे..तर आता कार्यक्रम संपणार याचे दुखःही आहेच नाही काय..


*इतक्या भारावलेल्या वातावरणात मनाला आणि जिद्दीला उजाळा देणा-या एका स्फूर्ती गीताने आजच्या या कार्यक्रमाचा आपण शेवट करणार आहोत... हा संगीतमय प्रवास असाच सुरु रहावा असे वाटले तरी सुखाचा, आनंदाचा शेवट हा होणारच असतो...त्यातच तर खरी अवीट मजा आहे. यातून सूर आणि संगीत घेऊन आपण सारे परतणार आहोत... सौ. चारुशीला गोसावी यांनी व्हायोलिन वर हा `व्हायोलीन गाते तेव्हा..` चा प्रवास आपणापर्यंत मांडला आपण तो अखेरपर्यत तेवढ्याच तन्मयतेने ऐकलात..याबद्दल आणि आयोजकांनी ही संधी प्राप्त करुन दिली. त्यांबद्दल त्यांचेही आभार मानतो....

कुसुमाग्रजांनी लिहलेले हे स्फूर्तीगीत गायले आहे लता मंगेशकरांनी आणि याचे संगीत दिले आहे पं. ह्दयनाथ मंगेशकर यांनी.... ह्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि हे तो राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा होती.....
जाताना प्रत्येकाच्या ओठात घुटमळत राहिल ..त्याचे स्मरण राहिल असं गीत... या गीताने आपण या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत....
वेडात मराठी वीर दौडले सात.....
धन्यवाद....


निवेदन आणि लेखन- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276