पन्नास वर्षे निळू फुलेंना ओळखणारे. त्यांच्या बरोबर अनेक चित्रपट- नाटकात काम केलेले राघवेंद्र कडकोळ आपल्या मित्राच्या पहिल्या स्मृतिदिना निमित्ताने आठवांना पुन्हा उजाळा देतात.
राष्ट्रसेवादलाचे संस्कार. साधी रहाणी उच्च विचारसरणीत वावरणारा एक कलावंत. प्रत्येकाचे नाव आठवणीत ठेवणारा माणूस.
कलावंत म्हणून तर श्रेष्ठच पण माणूस म्हणूनही तेवढाच आदर करावा असा आपला जीवाभावाचा मित्र आपल्यात शरीररूपाने आज नसला तरी माझ्या ह्दयात तो कायम आहे.
कित्येक आठवांना आणि भावभावनातून राघवेंद्र कडकोळ आपल्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय.
'साधे सरळ वागणे. जे काही आहे ते चार आठ जणात वाटून घेणे ही शिकवण निभूभाऊला सेवादलाच्या कलापथकापासून मिळाली. चित्रपट क्षेत्रात निळू फुले गेले आणि तिथे कुठल्या पदाला जावून पोचले ते सर्वजण जाणतात.हा सर्व प्रवास करताना निळू भाऊचे पाय जमिनिवर होते, ही गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे. दुस-यावर स्वतःची मते कधी लादली नाहीत. न पटणारी मते त्याला ऐकायला मिळाली तेव्हा कधी कांगावा केला नाही'.
अशा अनेक वैशिष्ठांसह कडकोळ यांनी निळू फुलेंचा आटव वारंवार केला.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतले मोठे नाव म्हणजे निळू फुले. आज १७ जुलै हा त्यांचा प्रथम स्मृतिदिन. त्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी एक स्मरणयात्रा लघुपटाच्याव्दारे साकारून निळूभाऊंच्या कर्तुत्वाचा आलेख रेखाटण्यात आला होता..
पडद्यावरच्या बेरकीपणाचे कवच गळून पडल्यावर त्यांच्यातला कार्यकर्ता आणि खरा माणूस यातून पुन्हा एकदा ठळकपणे दिसला.
चित्रपट-नाटकातली दृष्ये दाखवून त्याला त्यांच्याच मुलाखतीमधून व्यक्त झालेल्या भावनांचा मेळ घालून कलावंतांची सामाजिक जाणीव यानिमित्ताने ठळकपणे लोकांसमोर मांडली गेली.
यानिमित्ताने मैत्रेयी निर्मित आणि एस एच एंटरप्राईझेस प्रकाशित 'एका पावसात' हा पावसातल्या कवितांता आणि गाण्याचा ओला अनुभव देणारा सुरेख कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते.
आनंद चाबुकस्वारांची संकल्पना आणि प्रसाद ओक आणि गार्गी फुले-थत्ते यांचे निवेदनातून कवीतांचे शब्द उलगडत गेले.
शब्दांनंतर शौनक अभिषेकी आणि सावनी शेंडे-साठ्ये यांच्या आवाजातल्या जादूने विविध रांगांच्या छटा स्वरातून बरसत गेल्या.
पुरूषोत्तम करंडकाच्या स्पर्धेच्या तारखा जाहिर झाल्या की पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधील नाटकांवर प्रेम करणारे सारेच एकत्र येतात. विषयांवर चर्चा होते. एकांकिका लिहिली जाते. आणि चमू तयार होतो. तालमींसाठी.
हा तर पारंपारिक शिरस्ता. याची आठवण करून देणारे काव्य रविवारी ११ जुलैला भरतच्या रंगमंचावर साकारले . तोच आवेश, तीच उर्मी. तोच युवा वर्ग. मात्र इथे फरक इतकाच की हा सारा वर्ग... या सा-यातून बाहेर पडला. आपापली अवधाने सांभाळून पुन्हा काहीतरी वेगळे करायचे या उद्देशाने. डीग्री घेऊन नोकरीच्या निमित्ताने विसावलेल्या तरूणांना पुन्हा काही करायची जिद्द निर्माण झाली आणि तयार झाला एक नवा प्रयोग 'कट्टा कविता.'.
इथल्या कविता इतरांच्या नाहीत. तर त्या त्यांनीच केलेल्या, यात विषयाची विविधता तर आहेच. पण जीवनाच्या अनुभवांचे क्षणही डोकावतात. सोमवार ते शुक्रवार आपापल्या चाकरीत कामकरुन थकणारे हे जीव शनवार-रविवारी कट्टयाच्या निमि्त्ताने एकत्र येतात. वैचारिक संघर्षाची भाषा बोलतात. जगण्यातला तो आनंद उपभोगतात. आणि साद घालतात मनातल्या सुप्त उर्मीला. पुन्हा महाविद्यालयातले दिवस आठविले जातात आणि सुरू होते कट्टयावरची गंमंत. कश्यप देशपांडे, रोहित भोपटकर यांनी शब्दाला महत्व देताना सादरीकरण करताना प्रकाश, नेपथ्य आणि संगीत यांचा नेमका वापर करून याभावना इतक्या सहजपणे रंगमंचावर सादर केल्या की टाळ्यांच्या प्रतिसादाने रसिकांची पावती मिळवून जातात. स्वतःचे लेखन इतक्या वेगळ्या वातावरणात वलयांकित होते की त्या भावनेला धार येते. शब्दाला वलय येतायेता ते वातावरणही बनत जाते. अमित सावरगावकर, नंदिता केळकर, सागर गोगटे, कश्यप देशपांडे, आर्या रानडे, अमित कर्वे आणि मयुरा गायकवाड यांनी कट्ट्यावर ज्या पध्दतीने कवीता सादर झाल्या त्या प्रत्यक्षात थिएटरमध्ये पाहणे हा आनंदाचा भाग असेल.
आजच्या जगण्यातील धडपड. प्रेयसीच्या नादात घुमणारे शब्द. मुक्तछंदात व्यक्त झालेल्या मध्यमवर्गींयांच्या व्यथा. लोकशाहीची चाललेली थट्टा. सारेच या 'कट्टा कविता'त सादर होते. पायनापल ग्रुप हा नवा तरूणांचा संच यामुळे एकत्र आला. स्पर्धेतून बाहेर असले तरी यांचा उत्साह तोच आहे हे माझ्या दृष्टिने महत्वाचे. पुण्यात अशा या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद पाहिला की वेगळा प्रयोग करुन प्रेक्षकांना रंगमंचाकडे खेचण्याची ताकद या प्रकारात आहे याची जाणीव झाली.
-सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com 9552596276
नियोजन मंडळाचे सदस्य. अर्थतज्ञ. मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु. अशा अनेक पदांवर काम करीत असलेले डॉ. भालचंद्र मुणगेकर यांना ऐकताना विविध विषयांबाबतीतली त्यांची नव्याने ओळख झाली.राज्यसभेचे खासदार म्हणून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाचारण केलेल्या डॉ. मुणगेकरांची जगण्यातली मुल्ये. त्यांचा लेखी स्त्रीला किती महत्वाचे स्थान आहे. भारतातली विषमता. नोकरशाहीत जबाबदारीचे नसलेले भान.बेस्ट फाइव्ह प्रकरणी महाराष्ट्राच्या अधिका-यांची चालढकल. असे कितीतरी विषयीचे त्यांचे स्पष्ट आणि तडफदार विचार ऐकण्याची संधी लाभली.
खरेच मुणगेकर सर, तुमची साहित्यातील जाण. तम्ही जिवनात केलेला संघर्ष. सारेच यानिमित्ताने कांही प्रमाणात होईना समजले. बलराज सहानी-साहिल लुधियानवी संस्थेच्या वतीने शिक्षणातल्या ड़ॉक्टरांना आभिनयातल्या डॉक्टरांकडून मिळालेला पुरस्कार हाही एक उत्तम योगायोग होता. तो शनिवारी साधला गेला. नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पुण्यातल्या कचरा कुंडी प्रकरणी तयार केलेल्या चित्रपटाचे सर्वसर्वा अतुल पेठे यांचे सामाजिक कार्य पाहून पाच सफाई महिलांच्या हस्ते त्यांचा केलेला सत्कार पाहता आला. समाजतल्या विविध प्रश्नाविषयी सजगपणे पाहताना सामाजिक प्रश्नाविषयी पेठे यांची चाललेली एकनिष्ठ धडपड पाहिली की या पुरस्काराचे मोल कळते.
या निमित्ताने 'मी असा घडलो' या डॉ. मुणगेकरांच्या पुस्तकावरच्या परिसंवादाचे आयोजन करून पुस्तक हे विद्यापीठस्तरावर लावले पाहिजे एवढे छान असल्याचा शेरा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला. मला निसर्गाने घडविले. मी कसा घडलो यापेक्षा मला आजुबाजूचे वातावण, आई, शिक्षक, मामा, वडील यांनी कसे घडविले याचे चित्रण असल्याचे मुणगेकर सांगतात. पुस्तकाविषयी सांगताना ते भारावून जातात. मोठ्या पदांवर असूनही त्यांचे पाय किती जमिनिवर आहेत ते त्यांच्या भाषणात अनुभवता आले.
समाजात घडणा-या विषम अशा विविध प्रश्नांबद्दची चिड त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
सामाजिक विषमता. जाती-धर्माचे राजकारण. खालावत चाललेली मूल्ये. यांचा पाढाच त्यांनी त्यांच्या भाषणता वाचला.
जे समोर ऐकायला हजर होते त्यांना त्यांच्यातल्या स्पष्टपणाची जाणीव तर झालीच पण किती साधा हा माणूस आणि कीती उच्च कोटीचे विचार आहेत याचे दर्शन घडले.
हजारो वर्षापासून स्त्रीयांना मिळणारी दुय्यम वागणूक याचे दुःख त्यांना बोचते. त्यांच्या मते पुरुषांनी स्वतःला पुरुषी अहंकारातून मुक्त केले तरच स्त्रीमुक्ती साध्य होईल.
एक सुंदर भाष्यकार म्हणूनच त्यांचे विचार ऐकण्याचे भाग्य लाभणे हे तर मोलाचेच. पण ते अंशतः पोचविण्याची उर्मी आजही जागृत असणे हे त्या ड़ॉक्टर मुणगेकरांच्या भाषणाच्या परिणामातून घडले.