Sunday, March 25, 2018

अभिजित पंचभाईंच्या गीतरामायणाची तपपूर्ती






भावभक्तिच्या शक्तिचे आजच्या काळातले एक वेगळे उदाहरण

रविवारची सकाळ रामजन्माचा दिवस..निवारा सभागृह  रसिकांच्या साक्षीने बारा वर्षे पूर्ण झालेल्या अभिजित पंचभाई प्रस्तुत  गीतरामायण ऐकण्यासाठी आतुर झालेला.  राजेंद्र गलगले आणि अभिजित पंचभाई …`स्वये श्री रामायण गाती…..`हे गीत सादर करते झाले आणि त्या तपपूर्ती कार्यक्रमाची  सुरवात झाली.

प्रमोद रानडे, श्रीपाद भावे आणि संगीतकार- व्हायोलीनवादक सचिन इंगळे तसेच सरहद्दचे संजय नहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गीतरामायणाचा स्वर महोत्सव सुरु झाला..



यामागचा इतिहास सांगताना निवेदिका सौ. मीरा ठकार सांगत होत्या..
तेरा वर्षापूर्वी संतदर्शन मंडळाच्या श्रीराम साठे यांनी गीतरामायण गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यात अनेक तरूण महाराष्ट्रातून स्पर्धक आले होते. यात अभिजित पंचभाई आणि राजेंद्र गलगले ह्या धुळ्यातून आलेल्या मुलांनी  पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून त्यात ते यशस्वी ठरले होते..
त्यातून प्रेरणा घेऊन त्या दोघांनी श्रीराम साठे यांच्या मार्गदर्शनानी आपण यापुढे दरवर्षी रामनवमीला गीतरामायण सादर करायचे हा संकल्प केला..त्यासाठी गीतरामाणाचा अभ्यास केला..विविध मान्यवरांकडून त्यातले शब्द आणि बाबुजींच्या सोप्या वाटणा-या आणि लोकप्रिय असणा-या चाली आत्मसात केल्या . त्यातूनच  गीतरामायण ते श्रध्देने, निष्ठेने आणि एकलव्याच्या चिकाटीने अभिजित पंचभाईच्या पुढाकाराने प्रतिवर्षी पुण्यात रसिक, भक्तांच्या श्रवणार्थ त्याचे आयोजन विनामूल्य होत आहे. आपण त्यांच्या या कार्याला जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देऊ...

त्यासाठी अभिजीत आणि राजेंद्र स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.



गीतरामायण ..गदिमा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून जनतेच्या दरबारात सादर केले... गीतरामायणायणाला ६३ वर्षे उलटून गेली.. पण ती मोहिनी मराठी मनावर राज्य करुन आहे.. वाल्मिकींचे रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..


रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकद..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके समर्थपणे ते  सादर होते.



यंदाचे वैषिष्ठ्य म्हणजे सोनल पेंडसे आणि त्यांच्या सहकलाकालरांनी काही गीतरामायणातल्या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. भक्तिभावाने आणि आपल्या दमदार आवाजाने  अभिजित पंचभाई आणि  राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो) यांनी गीतरामायणातली भावपुर्ण गीते अतिशय प्रभावीपणे सादर करुन रसिाकांची शाबासकी टाळ्यांच्या गजरात मिळविली.

या कार्यक्रमात स्वरप्रिया बेहरे, माधवी तळणीकर, अमिता घुगरी आणि देवयानी सहस्त्रबुद्धे यांनी उत्तम सादरीकरण करून आपल्या तयारीची चुणूक दाखवून दिली.


शुभदा आठवले ( हार्मोनियम), आभिजित जायदे ( तबला) चारुशीला गोसावी( व्हायोलीन) ,उध्दव कुंभार (तालवाद्ये) ...या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे मुद्दाम सांगायला हवी..कारण उत्तम साथीशिवाय हा कार्यक्रम रसिकाच्या ह्दयात आपले स्थान निर्माण करू शकत नाही.



आधि जाहिर झाल्याप्रमाणे प्रा. सच्चीदानंद कानेटकर निरूपणासाठी येणार होते. पण तब्येतीच्या कारणाने ये आले नाहीत.तेव्हा ही जबाबदारी मीरा ठकार यांनी स्विकारली भक्तिमय गीतरामायणातले प्रसंग आपल्या भावनेच्या ओलाव्यांतून त्यानी रसिकांसमोर मांडले. त्यांचा खास उल्लेख केला पाहिजे..त्याच्या निवेदनात आपलेपणा आणि अभिजित, राजेंद्र आणि इतक कलावांताची तळमळ सतत जाणवत होती.
यासगळ्यांच्या मागे तेवढ्याच आपुलकीने दिप्ती कुलकर्णी यांचे पाठबळ होते हेही खास सांगावेच लागेल.



गीतरामायण सादर करताना सोवळे नेसून अभिजित पंचभाई ते भक्तिभावाने सादर करतात याचे कौतूक प्रमोद रानडे यांना वाटले. बाबुजींच्या स्वरांवर आणि गदिमांच्या शब्दांवर आपण सारे प्रेम करताय. हे विलक्षण प्रतिभेचे देणे आहे. ते गीतरामायणाची सेवा करणारा अभिजित सारखा गायक आजही ते करतो आहे हे पाहून आनंद होतो.

बाबुजींनी ज्या रागांची निवड करून ह्या गीतांना अजरामर करून सोडले..त्या त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही, असे सचिन इंगळे यांना वाटते.


बारा वर्षांच्या प्रवासात अनेक टप्प्यावर यात सहभागी जालेल्या आणि आज कार्यक्रमात असलेल्या कलाकारांचा, ध्वनिव्यवस्था पाहणारे हेमंत उत्तेकर यांचाही सन्मान पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तु देऊन केला गेला

 

स्वत्ः  कसलाही अभिनिवेश आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतात याला दाद ही दिलीच पाहिजे  त्यांच्या या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव होवो हिच अपेक्षा.










- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com