Sunday, December 15, 2024

पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन





 मला आठवतं तेव्हापासून त्याला मी, झाकीरकाका असं म्हणत आलोय. कारण तो माझ्या सगळ्यात धाकट्या काकाचा- रवीकाकाचा खास दोस्त. त्याला पहिल्यांदा पाहिला तो वयाच्या तिसर्‍या वर्षी. १९६९ साली. संध्याकाळी डेक्कन क्वीननं रवीकाका व अरुणकाका मुळे त्याला घेऊन आमच्याकडे कर्जतला आले होते. आमचा ८० वर्षांचा जुना वाडा होता. ते तिघं अचानक आले होते. पण आजीनं त्याला वाड्याच्या बाहेर उभं केलं. त्याच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला, पायावर दूध-पाणी घातलं आणि मग त्याला आत येऊन दिलं होतं. आमच्या बाजारपेठेच्या नाकावर कामतांचं वड्याचं दुकान होतं. रवीकाकाला त्यानं सांगितलं, "यार कर्जतका वडापाव खिलाओ." रवीकाकानं कामतांच्या हॉटेलातला वडापाव मागवला आणि त्यानं चवीनं वडा-पाव व सोबत तिखट मिर्ची खाल्ली. मला आठवतं त्याप्रमाणे, झाकीरकाका नंतर घरभर फिरला, मागे विहिरीवर गेला.

विहिरीचं पाणी स्वत: शेंदून काढलं, त्यानं हातपाय धुतले. गोठ्यातल्या म्हशीचं ताजं दूध मधुकाकांनी काढलेलं, त्यांच्यासमोर हातात ग्लास धरून उभा राहिला व थेट तसंच ते दूध प्यायलं. त्यावेळी मला ह्या साध्या गोष्टींचं महत्त्व कळलं नव्हतं. पण आज या लेखाच्या निमित्तानं आठवणींचा गोफ उलगडत असताना, त्यावेळपर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवलेल्या त्या माणसाचं साधंपण सर्वप्रथम लक्षात आलं.


त्या संध्याकाळी झाकीरकाका कोपर्‍यावरच्या मारुतीकाका मगर यांच्या दुकानात दाढी करायला गेला. तिथं त्याला कळलं की मारुतीकाका हे भजनी आहेत. तो लगेच त्यांना म्हणाला, "रातको रवी के यहाँ आ जाना. हम लोग बजानेवाले है." त्या रात्री रवीकाका, अरूणकाका त्याला घेऊन जवळच असलेल्या प्रभा आत्याच्या घरी गेले. तिच्या घरच्या दिवाणखान्यात हे सारी रात्र गाणं बजावणं करत बसले होते. नंतर कधी तरी आठवणी जागवताना रवीकाका म्हणाला त्या रात्री प्रभाआत्याच्या घरी गजाननबुवा पाटील, लीलाताई दिवाडकर, प्रभा आत्या, कल्पनाआत्या कुलकर्णी (हिचं नुकतंच निधन झालं) असे सारे गायले, शांताराम जाधव हार्मोनियमवर होते, मारुतीकाका टाळ घेऊन साथीला होते. त्या दिवशी गजाननबुवांची गायकी ऐकून झाकीरकाका त्यांना म्हणाला होता, "आप तो भजन के गोपीकृष्ण हो" बाकी सारी मंडळी हौशी होती. पण, झाकीरकाकाला तो कोणाबरोबर तबला वाजवतो, यात फारसा रस नव्हता. तो तबल्याचा आनंद घेत होता. दुसर्‍या दिवशी सकाळी डेक्कन एक्स्प्रेसने तो सवाई गंधर्व सोहळ्यात तबला सोलो सादर करायला गेला. तो त्याचा सवाई गंधर्व सोहळ्यामधला पहिला कार्यक्रम होता.


त्यानंतर झाकीरकाका कर्जतला रवीकाकाच्या सांगण्यावरून १९७१, ७२, ७३ आणि नंतर बेडेकरांच्याकडे पाडव्याच्या निमित्ताने संगीत सोहळा असे, तेव्हा १९७५ साली आला. त्या प्रत्येक वेळी त्याच्यातला साधेपणा मनात घर करून गेला. कोणताही झब्बा पायजमा घालायचा आणि तबला वाजवायचा. कपड्यांपेक्षा त्याचं संगीताकडे अधिक लक्ष असायचं. आणि तो इतका देखणा आहे की त्याला काहीही साजून दिसतं.


झाकीरकाकाची एक सवय आहे. तो तुमची ओळख झाल्यानंतर व नंतर जवळचा परिचय झाल्यानंतर तुम्हाला एखादं टोपणनाव देतो. मला लहानपणापासून ज्या टोपणनावानं सारे हाक मारत तेच टोपणनाव तो आजही वापरतो. त्याच्याशी परका माणूस जरी बोलला तरी त्या व्यक्तीला तो परकेपणाची जाणीव कधी करून देत नाही.



त्याने मराठीत मुलाखती दिल्या पण शब्दांकन दिलं नाही. 'ऋतुरंग'च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.


१९८७च्या सुमारास दर रविवारी दुपारी सिद्धार्थ बसूचा एक 'क्वीझ टाईम' नावाचा शो असायचा. त्या क्वीझ शोमध्ये झाकीरकाका एकदा गेस्ट म्हणून गेला. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. त्या शो मध्ये सिद्धार्थ बसूने त्याला प्रश्न विचारला, "तू जगभर फिरलास. आता तुला भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यातला कोणता भेद सांगता येईल." त्यानं दिलेलं उत्तर आजही काळजावर कोरलं गेलं आहे. तो म्हणाला, "मी जेव्हा पाश्चिमात्य संगीतकारांना भेटतो, तेव्हा त्यांना हस्तांदोलन करून हॅलो माईक, हॅलो मार्क असं म्हणतो. पण जेव्हा मी पं. रवी शंकरजी, पं. शिवकुमार शर्माजी, पं. हरिप्रसाद चौरसिया, अशा दिग्गजांना भेटतो, तेव्हा त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. दुसर्‍या बरोबरीच्या वयाच्या लोकांना भेटतो, तेव्हा दोन्ही हात जोडून ते जोडलेले हात हृदयाशी नेतो व मान झुकवून नमस्कार करतो आणि वयानं लहान असलेल्यांना हृदयाशी धरतो. ही माझी भारतीय संस्कृती आहे, ज्येष्ठांना मान देणारी आणि कनिष्ठांविषयी प्रेम व्यक्त करणारी." मला याचा अनुभव आहे.


तीन वर्षांपूर्वी अब्बाजींच्या, उस्ताद अल्लारखांसाहेबांच्या, बरसीला पद्मविभूषण बेगम परवीन सुलताना यांचं गाणं त्यानं आयोजित केलं होतं. त्यावेळी पहाटे पहाटे मी व रवीकाका षण्मुखानंद सभागृहात पोहोचलो होतो. परवीनजींचं गाणं सुरू व्हायचं होतं. त्यापूर्वी ड्रेसिंगरूममध्ये बरेच जण जमले होते. परवीनदीदी सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या बाजूला अन्य ज्येष्ठ संगीततज्ज्ञ बसले होते. पहिला कार्यक्रम सुरू करून देऊन झाकीरकाका त्या ड्रेसिंगरूममध्ये आला, आणि परवीनदीदींच्या जवळ खाली जमिनीवर जाजम अंथरलं होतं त्यावर बसला. त्याला कोणी तरी बाजूच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला. तेव्हा तो हळूवारपणे म्हणाला, "परवीनजी ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबाजूला बसणं योग्य होणार नाही." नंतर आम्ही उस्ताद आमीरखांसाहेबांच्या बरसीला एन्.सी.पी.ए. ला गेलो होतो. त्या दिवशी झाकीरकाका हा नवोदित उमद्या अशा सारंगीवादकाबरोबर- दिलशादखांबरोबर वाजवणार होता. कार्यक्रमाच्या सूत्रानुसार आधी दिलशादखां येणार आणि नंतर उस्ताद झाकीर हुसेन येणार असं होतं. मी व रवीकाका विंगेत होतो. उस्तादजींनी निवेदकाला क्रम बदलायला सांगितला आणि म्हणाले, "मी आधी स्टेजवर येतो व मी दिलशादला इंट्रोड्यूस करतो." त्याच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर, रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्यानं त्याच्या चपला बाहेर काढून ठेवल्या. मग रंगमंचावर शिरला. सर्व रसिकांना नम्रपणे कमरेतून वाकून नमस्कार केला आणि मग त्याने दिलशादखांबद्दल छानसं वक्तव्य केलं, 'आज मी त्याच्याबरोबर पहिल्यांदा वाजवणार आहे' असं सांगून मग श्रोत्यांना टाळ्यांच्या गजरात दिलशादखांचं स्वागत करावं अशी विनंती केली. एखाद्या ज्येष्ठाने नवोदिताचा इतका मोठा सन्मान कधी केला नसेल.


तो मूल्ये जपणारा माणूस आहे. 'लोकसत्ते'तील माझी शब्दांकनं लोकांना आवडत होती. एका मोठ्या उद्योजकाला ती फार आवडली. त्यांच्या पत्नीनं मला शोधून काढलं. मला फोन करून त्यांच्या पतीचं आत्मकथन लिहिण्याची विनंती त्यांनी केली. मी फारसा तयार नव्हतो. त्याचं एक कारण म्हणजे ते अफाट श्रीमंत असले तरी त्यांचा व्यवसाय हा तंबाखूशी निगडित होता. मला कोणतीही व्यसनं नाहीत, मी व्यसनांना स्पर्शही केलेला नाही. मी प्राध्यापक आहे. त्यामुळे ते मला योग्य वाटत नव्हतं. पण माझे वडील म्हणाले, 'एक वेगळं जीवन समजून घेता येईल.' त्या उद्योगपतींचं जीवन खरोखरच समजून घेण्याजोगं होतं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी मला विचारलं, "या रक्तदान शिबिराला झाकीरजी भेट देऊ शकतील का?" विचाराल का? अब्बाजींची बरसी जवळ आली होती. आम्ही आदल्या दिवशी झाकीरकाकाकडे गेलो. मी झाकीरकाकाला विनंती केली, "अशा अशा कार्यक्रमाला तू येशील का?" त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं व पुढच्या क्षणी म्हणाला, "नहीं, मैं नहीं आऊंगा, पहले लोगों का खून चूसो बाद में खून भी लो।इस भारत में मैं दो सेलिब्रिटीज को जानता हूँ जिन्होंने आजतक किसी इंटॉक्सिकेशन से रिलेटेड कोई काम नहीं किया। एक बहोत बडा है जिसका नाम सचिन तेंडुलकर है और दुसरा बहोत छोटा है जिसका नाम झाकीर हुसेन है." मी अर्थातच त्या व्यक्तीचं आत्मकथन शब्दांकित केलं नाही.


 उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.

त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.


डोंबिवलीला एम्.आय्.डी.सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्‍यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, "बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है." नंतर दुसर्‍या कोपर्‍यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!

आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्‍या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, 'आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?' सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, "तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?" मी आत्मविश्वासानं, "हो, मी ओळखतो आणि तो येईल." सर थोडे वैतागले, "अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है." मी सरांना म्हणालो, "तो माझ्या काकाचा मित्र आहे." सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, "२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ." तो रविवार होता. सरांना विचारलं, "सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, "अरे, आओ उस्ताद आओ." विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, "कोणाकडे शिकतोस" असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, "त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत." पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्‍यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.

मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्‍या चेहर्‍याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, "अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?" तो उत्तरला, "लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु.लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही." मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्‍या दिवशी पु.ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, 'कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला.' मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु.लं.चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, "P. L. says Zakir is the definition of Tabla." त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.


कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, "आजोबा. किती थापा मारता." मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, "बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं."


वलयांतिकांच्या सहवासात..यातून साभार

- डॉ. नीतिन दत्तात्रेय आरेकर

nitinarekar@gmail.com

यांच्या सौजन्याने


No comments: