Friday, March 2, 2018

आपले सण संस्कार घेऊन येतात..ते जपा




..तर सारे टिकेल
 

होळी पौर्णिमा आली.अगदी दोन दिवसातच हवामानात झालेला बदल शरीराला चटके देऊन स्वतःच्या अस्तित्वाची ग्वाही देऊ लागला. घरा-घरातून म्हणजे काही घरातून पुरणाचा खमंग वास होळीच्या आगमनाची वार्ता देऊन आपला दरवळ पसरवीत हॊता. चुट-चुट उड्या मारत हाताला चटके देत पुरण आपल्या परिपक्वतेची ,आपल्या सिद्धतेची जाणीव मला करून देत होते.

एका हातात अगदी शेवटच्या टप्प्यात पोहचलेले पुरण आणि त्याचवेळेला खण खणणारा फोन ! घाईच्या वेळी तड तडणारी फोडणी आणि त्याच वेळी खण-खणणारा फोन हे समीकरण तर नेहमीचंच असत. होळीच्या दिवशी दवाखान्याला सुट्टी असतेच असे नाही .पण त्याच दिवशी पोळ्या करायचा काहीसा माझा हट्ट असतो.

एकदा माझी एक मैत्रिण मला म्हणाली ,"कशाला एव्हडा आटापिटा करतेस जीवाचा,? आजकाल छान पुरणपोळ्या मिळतात की विकत. थोडं त्या गृहिणींना पण कमवु दे की. चार पैसे सोडले की सगळं मिळत की आयत. पेशंट ,दवाखाना करून कशाला हवा तुला हा सोस ." मला तिच्या उपदेशाचा अजिबात राग नाही आला . कारण तिच्या 'त्या' उपदेशात मला शहाणपण शिकवण्याचा हेतू अजिबात नव्हता तर माझ्या होणाऱ्या धावपळी ची काळजी , प्रेम कुठेतरी माझ्या मनाला स्पर्शून जात होते .

खरच ,आजकाल काय नाही मिळत विकत. सगळं मिळतं ! मग नक्की कशासाठी करतो आपण हा सगळा आटापिटा... मला वाटत प्रश्न पैशाचा नव्हता ! किंवा पैसे वाचवायचे म्हणून घरी पदार्थ करायचे अस तर नक्कीच नव्हतं.



ती केवळ मौज मजेची गोष्ट नाही


प्रश्न हौशीचा होता ,प्रेमाने आपल्या मुलांना ,नवऱ्याला एखादा पदार्थ खाऊ घालताना मिळणाऱ्या आनंदाचा होता. आणि खर सांगु ,त्याबरोबरच आपल्या हिंदू सणांच्या ,आपल्या मराठमोळ्या पदार्थाना , आणि त्या त्या दिवशीच्या विशेष संस्कारांना जपण्याचा तो एक आटापिटा होता ! आपले कितीतरी सण वार काहीतरी चांगला संदेश घेऊन येतात . त्या सणाच्या काही रूढी,परंपरा या तुमच्या मनावर चांगले संस्कार देखील करत असतात.पण काळाच्या ओघात त्या सणवारांकडे आपण फक्त एक मजा,करमणूक म्हणून पहातो. त्या सणांचे सार्वजनिकरण होऊन त्या सणांचे पावित्र्य , गाभा कुठेतरी हरवतोय.

आपल्या पूर्वजांनी दिलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी आज जुन्या पुराण्या म्हणून मोडीत निघाताहेत. तीच गोष्ट संस्कारांची. उत्तम संस्काराचे लेणे जपण्या ऐवजी त्याची मात्र बिनबोभाट आज होळी होते आहे.

योग ,ध्यान ,प्राणायाम यासारख्या आरोग्य प्रस्थापित करणाऱ्या किती तरी गोष्टी आज परदेशातून आपल्याला मॉडर्न टच देऊन विदेशी मंडळी हे आमचंच बाळ आहे अस आपल्याला भासवताहेत. आपण या अनेक लेण्यांना जीवापाड जपले नाही तर आपल्या मातीतील कितीतरी गोष्टी बाहेरून आपल्याला वाकुल्या दाखवणार आहेत


मराठमोळ्या पदार्थांची चव टिकवा


आपली चपातीची गुंडाळी आपलीच रेसिपी जशी फासोस नावाखाली इथे दिमाखात उभी आहे . अगदी त्या प्रमाणेच येथील अस्सल मराठमोळे पदार्थ गूळ पोळी ,पुरणपोळी ,मोदक ....आणि किती तरी ..... आपण जर त्याची चव ,कृती जीवापाड नाही जपली तर तीही आपल्या पुढच्या पिढ्यां पर्यंत पोहचण्या आधी लुप्त होऊन जाईल. जसे मराठी भाषा जपण्याचा आपला प्रयत्न आहे ,तो खरेतर फक्त मराठी भाषेपुरता मर्यादित नाही. या मराठी मातीतील माणुसकी ,मराठी मातीतील सुसंस्कृत विचार,आचार ,आणि मराठमोळ्या पदार्थांची चव, सार काही जपण्याची , आणि पुढील पिढीला या सर्व गोष्टींचे वाण देण्याची आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे


सण केवळ मनोरंजनाचे साधन नाही


होळी म्हणजे केवळ कॅम्प फायर नव्हे .तर होळी म्हणजे तुमच्या तील वाईट वृतींचे दहन ,चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टींवर झालेला विजय.गणेशोत्सव म्हणजे केवळ मिरवणुकीतील हिडीस नाच नव्हे ,तर गणेशपूजन करून विद्येच्या देवतेला सुबुद्धी मागण्याचा ,त्याची मनोभावे आराधना करण्याचा सण .हे सगळे सण केवळ मनोरंजनाचे साधन नाही ,तर प्रत्येक सणा मागे काहीतरी चांगला विचार,तत्व हे असते.तो संस्कार पुढच्या पिढीला देणं आणि मराठी भाषे बरोबरच मराठी संस्कृतीही जपण्याचा प्रयत्न करणें तुमचं माझं अगदी प्रत्येक मराठी माणसाचं काम आहे.




डॉ. शमा देशपांडे, ,पुणे