आपल्या आयुष्याचे धेय्य ठरवून त्यानुसार तत्वाने वाटचाल करणारे फार कमी...त्यातही जे मी प्राप्त केले आहे..ते सारे माझे नाही..ते सारे या समाजाना दिले ते मी समाजाला परत देणे लागतो..असे सांगून त्याप्रमाणे आचरण करणारे आमचे ज्येष्ठ आदर्शवत् म्हणजे रांगोळीतून समाजाला ओळख देणारे कलाकार वंसतराव थिटे...आज ७५ वयाची पूर्ण झाली..आता जे सारे आहे..ते माऊलीच्या चरणी समर्पीत करण्याची त्यांची भाषा आहे..
त्यांच्या विषयीचा हा मागोवा म्हणजे त्यांच्या धेय्यवेड्या पुणेरीपणाचा एक ज्वलंत आदर्श नमुना...
कलेच्या कार्याची साठी आणि वयाची पंचाहत्तरी सामाजिक उपक्रमातून साजरा करणारे चिन्मय रंगावलीकार म्हणजे वसंत थिटे.
कलाकार आणि कलावंत हे निसर्गाच्या सौंदर्याचे खरे उपासक व भाष्यकार मानले
जातात. रांगोळी कलेच्या माध्यमातून चैतन्य निर्माण करतात. रांगोळीचे ठिपके
जोडणाऱ्या या रंगरेषांच्या अप्रतिम कलेचा उपयोग मानवतेच्या दृष्टिकोनातून
माणसे व मने जोडण्यासाठी-गुंफण्यासाठी व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील राहून
वसंतरावांनी सामाजिक बांधिलकी-एकात्मता-विश्वशांती व विश्वबंधुत्वाचा
संदेश समाजात व जनमानसात पोहोचविला. कलासंपन्न व कलासमर्पित जीवनाचे साठावे
वर्ष व वयाचा अमृतमहोत्सव एका आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमातून व
संकल्पनेतून साजरा करण्याचा संकल्प थिटे यांनी केला आहे.
मातोश्रींकडून मिळालेला हा कलेचा वारसा त्यांनी केलेले समाजकार्य
आजही वयाच्या ७५ व्या वर्षीसुद्धा हे माझे नाही म्हणून सुरुच आहे.
आता गाडी थोडी थकली. वाकली. पण संस्काराचे बीज कायम आह. ते त्यांनी मुलांमध्ये रुजविले. जोपासले..
वसंतराव
मूळचे पुण्यातील खेडचे रहिवासी. राजगुरुनगर येथे आई-वडिलांच्या सहवासात
सुसंस्काराचे व रंगावलीकलेचे धडे घेतले. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने
जास्त शिक्षण घेता आले नाही. अर्थार्जन आवश्यक होते. त्यासाठी गाव सोडून ते
पुण्यात आले. अभिजात कलेची साथ व स्वत:चा आत्मविश्वास जोडीला होताच.
पुण्यातील एक स्नेही माधवराव, अनंतराव गीर बंधू परिवार यांच्या सहकार्याने
पीएमटीमध्ये नोकरीस रुजू झाले. उत्तम व प्रमाणिक कार्यपद्धतीमुळे उच्च
पदभार प्राप्त होत गेला. थिटे यांच्या पत्नीसुद्धा या रंगावली कलेत पारंगत
आहेत.
वसंतरावांनी अत्यंत निरपेक्ष वृत्तीने-आनंदाने आपल्या नयनरम्य
रंगावलीचे सादरीकरण व रंगावली प्रदर्शन, अनेक सभा-समारंभ-देवस्थाने,
सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमस्थळी, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिक संघाचे
कार्यक्रम व प्रत्येक अधिवेशन, महाअधिवेशन (एसकॉफ-फेसकॉम-आईसकॉन) चिन्मय
मिशन, आदित्य प्रतिष्ठान अशा अनेक ठिकाणी पुढाकार घेऊन केले. प्रथम
पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, दगडूशेठ हलवाई मंदिर, मोदी गणपती
सिद्धीविनायक मंदिर, सार्वजनिक अखिल मंडई गणपती मंडळासमोर गेल्या ५०
वर्षांपासून रंगावली सेवा आहे.
रंगावली प्रदर्शनाच्या जागी रांगोळीच्या बाजूलाच
एक दानपेटी ठेवण्याची पद्धत आहे. येणाऱ्या प्रेक्षकाने त्यात फक्त एक रुपया
तोसुद्धा ऐच्छिकपणे टाकण्याचे आवाहन वसंतराव करतात. समाजकार्यासाठी
निधीसंकलनाचे काम इतके सहजसोपे करणाऱ्या कलाकाराचे हे आवाहन रसिक प्रेक्षक
आनंदाने स्वीकारतात व बघता बघता दानपेटी भरून जाते. त्यामध्ये स्वत:चा वाटा
घालून तो संपूर्ण निधी विविध मानवी सेवा सामाजिक संस्थांच्या, देवालयाच्या
कार्यासाठी म्हणून पुन्हा समाजालाच अर्पण करतात.
आजपर्यंत
दहा लाखावर निधी अनेकविध सामाजिक उपक्रमांसाठी समर्पित
केला आहे. तसेच आळंदी, पंढरपूर देवस्थान, चिन्मय मिशन, ज्येष्ठ
नागरिकांसाठी असणारे उपक्रम, कार्यक्रम, सर्व छोटे मोठे अधिवेशन यासाठी एक
ते दीड लाखांची मदत केवळ रांगोळी प्रदर्शनाद्वारे उपलब्ध करून दिली आहे.
यामागे सामाजिक बांधिलकी व कर्तव्याची जाणीव तर आहेच, परंतु माझी रंगावली
कला व त्यातील निपुणता-अचुकता त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट हे सर्व
ईश्वरीप्रसाद आहे व त्याचा उपयोग देव-देश व मानव यांच्यासाठी सेवाभावी
वृत्तीतून व्हावा हा ईश्वरी संकेत आहे, असे स्वत: वसंतरावांचे मत आहे.
माउलींच्या
समाधीशी वसंतरावांचे व सुहासिनीताईंचे अतूट नाते आहे. वसंतरावांचे गुरू-
गुरू सोनोपंत दांडेकर यांच्या सहवासात वयाच्या २० व्या वर्षी वसंतरावांनी
सुरू केलेली वारी आता वयामुळे थोडी सैल झाली. पण तरीही वाहनाने प्रवास करुन ते कांही ठिकाणी आजही रांगोळी काढतात. तेवढ्याच भक्तिने आणि भाविकतेने.
थिटे उभयतांनी आपल्या ५० व्या आळंदी-पंढरपूर वारीच्या
निमित्ताने व ज्ञानेश्वर माउलींच्या ७११ व्या संजीवन समाधी दिवशी, मतिमंद,
मूक-बधिर, अनाथ, अपंग, अंध व्यक्ती, लहान मुले, अनेक वृद्धाश्रम, समाजसेवी
संस्था, शाळा, अनाथाश्रम यामधील सव्वा लक्ष लहान-मोठय़ा व्यक्तींना तसेच
मुला-मुलींना रांगोळीचे मोफत प्रशिक्षण देऊन ज्ञानेश्वरीची एक प्रत,
हरिपाठ, मनाचे श्लोक अशी पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच दूध, साखर, पोहे
असा माउलींचा प्रसाद सव्वा लक्ष मुलांना खाऊ घालून आळंदी येथे संकल्पनाची
सांगता केली. त्यापूर्वी ७०० वर्षपूर्ती सोहळ्यात ज्ञानेश्वर मंदिरात
दिव्यांची रोषणाई वसंतरावांनी केली होती. संकल्पाचाच एक भाग म्हणून थिटे
उभयतांनी रांगोळी प्रदर्शन, प्रशिक्षण व निधी संकलन यासाठी स्कूटरवरून
भारतभर भ्रमंती केली.
वसंतरावांना या कार्यात अनेक गुरुवर्य साधुसंतांचे
सद्गुरूंचे शुभाशीर्वाद लाभले आहेत. या साधुसंतांच्या आशीर्वादाच्या
शिदोरीवरच तथा दिग्गज कलाकार, पंडित भीमसेन जोशी, ज्येष्ठ गायिका लता
मंगेशकर, आनंदरसिक पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर अशा
अनेकांकडून कौतुक व शुभेच्छा मिळाल्या आहेत.
आज ते पूर्ण समाधीनी आहेत. भक्तिचा मार्ग त्यांच्याकडून रांगोळीच्या रेखाटणायतून जातो..तेच त्यांचे कार्य अखंडपणे आणि मनाजोगते घडावे...एक आदर्श घालून देणारे हे रंगावली कलावंत...तृप्तीच्या भावनेला साथ देणा-या सौ. सुहासिनी थिटे यांचेही मनापासून अभिनंदन..कौतूक..
- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Saturday, March 23, 2013
Wednesday, March 20, 2013
झगडा..
अर्थ कुठलाही घ्या झगडा मात्र रोज आहे
अगदी सकाळपासून रात्रीपर्य़त
घरापासून सुरु होतो
पुन्हा घरापाशीच थांबतो
दाराशी आलेली कुठलीही गोष्ट
विनासायास मिळत नाही
त्यासाठी प्रत्येकाला झगडा करावाच लागतो...
अगदी पाणी, दूध.. दाराशी असते पण ते तापवावे लागते
पाणी साठवावे लागते..काही बाटल्यात तर काही माठात..
कचेरीत जाताना रस्त्यावरच्या वाहनांशी हमरी तुमरी
वाहन लावताना थोडी झगडगीरी
फाईली संपविताना आधी कुठली यावर मनाचा झगडा
अधिका-याच्या शे-यावर नजर फिरवताना मनात होत असतो झगडा
दुस-याच्या डब्यात काय भाजी...ती आपल्याकडे का नाही
कालच्या शिळ्या पोळीवरुन झालेला झगडा आठवतो
सुटताना उद्याच्या भाजीचा झगडा
आणल्यावर हीच का आणली म्हणून झगडा...
मुलांना हेच पाहिजे..आई-वडीलांची निराळीच वळणे
प्रत्येकासाठी निराळे कारण...मनाचा त्यासाठीही झगडा
रात्री झोपताना उद्याची मस्त हवा..
ताजी बातमी कोणती.....
झगडलेल्या नशीबातून उद्याचा दिवस उजाडणार
सापडलेल्या उत्तरातून नेमकेपण शोधणाराही झगडाच
-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Tuesday, March 19, 2013
' आविष्कार ' चे आधारस्तंभ-अरुण काकडे
मुंबईतील प्रायोगिक
चळवळीचे एक प्रणेते अरुण काकडे यांची प्रकट मुलाखत नाट्यसमीक्षक रवींद्र
पाथरे घेणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी, २२ मार्चला सायंकाळी ६.०० वाजता
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन,
ग्रंथाली आणि वैद्य साने ट्रस्ट यांच्या वतीने कृतार्थ मुलाखतमालेमध्ये
काकडे – पाथरे संवादगप्पांचे हे पुष्प आयोजित करण्यात आले आहे.
काकडे यांनी सत्यदेव दुबे यांच्या
नाट्यकृतींपासून अलिकडच्या सुषमा देशपांडे यांच्या ‘चित्रगोष्टीं’पर्यंत
अनेक नाटकांचा पाठपुरावा केला आहे. ‘चित्रगोष्टी’मध्ये अरुण काकडे या
वयातदेखील रंगमंचावर येऊन खणखणीत पोवाडा म्हणतात. त्यांनी ‘दुर्गा झाली
गौरी’ या नाटकाची ‘आविष्कार-चंद्रशाला’साठी निर्मिती केली. ते नाटक गेली
एकोणतीस वर्षे मुंबईच्या रंगमंचावर, दरवर्षी नव्या संचात प्रकट होत असते.
अरुण काकडे यांच्यामुळे गेली तेवीस वर्षे मराठी रंगभूमीची ध्वजा दिल्लीच्या
राष्ट्रीय रंगभूमीवर फडकत राहिली आहे. ती कशी ते आणि अन्य रोमांचकारी
गोष्टी काकडे यांच्या या मुलाखतीमधून श्रोत्यांसमोर उलगडल्या जातील...
' आविष्कार ' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ किंवा ज्याच्या खांद्यावर आज संस्था उभी आहे असा मजबूत खांब म्हणून अरुण काकडे उर्फ काकडे काका यांच्याकडे पाहिलं जातं . गेली ६० वर्षे ते प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून आहेत आणि वयाची पंच्याहत्तरी पार करूनही तरुणांना लाजवील अशा उत्साहाने आजही नित्य नवीन नाटकं सादर करत आहेत . त्यांच्या या एकूण योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला आहे .
काकडे यांनी पुण्यातून आपल्या करिअरला सुरुवात केली , पण लवकरच ते मुंबईत आले . विजया मेहता , अरविंद देशपांडे , विजय तेंडुलकर , माधव वाटवे या तेव्हाच्या तरुण रंगकर्मींनी ' रंगायन ' ही संस्था सुरू केली होती . तिच्याद्वारे ते वेगवेगळी नाटकं करीत असत . या संस्थेशी अरुण काकडे जोडले गेले . ' रंगायन ' मध्ये वाद होऊन संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे , विजया मेहता , सुलभा देशपांडे प्रभृतींनी १९७१ साली ' आविष्कार ' ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली . त्यावेळी काकडे या मंडळींच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले . या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून काकडे काका म्हणजे ' आविष्कार ' हे समीकरणच बनून गेलं , जे आजतागायत कायम आहे .
' आविष्कार ' ने छबिलदास चळवळ उभी केली . या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले . रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले . काकडे काका या चळवळीचे बिनीचे शिलेदार होते . आजही प्रत्येक नवा प्रयोग ' आविष्कार ' ने करावा हा त्यांचा ध्यास असतो . स्वतः पडद्यामागे राहून ते त्यासाठी अविरत झटत असतात . त्यांना प्रसिद्धीची हाव नाही की रंगमंचावर चमकण्याचा मोह नाही . त्यांनी कायमच निर्मिती सूत्रधार या भूमिकेत राहणं पसंत केलं . त्यासाठी त्यांनी आपल्यातील अभिनेतेपणालाही वेळोवेळी मुरड घतली आहे . तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची पंच्याहत्तरी ' आविष्कार ' ने मोठ्या थाटात साजरी केली . त्यावर्षी काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं ' आविष्कार ' तर्फे रंगमंचावर आणली . आपल्या ६० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी रंगकर्मींच्या तीन पिढ्या पाहिल्या आणि घडवल्याही . आविष्कारमध्ये सतत नवे , युवा कलाकार येत असतात .
कालांतराने पुढे निघून जातात . परंतु चळवळ चालवायची तर निष्ठावान आणि सच्च्या कार्यकर्त्याची गरज असते . अरुण काकडे हे असे हाडाचे कार्यकर्ते आहेत . ते स्वतः नवनव्या कलाकारांना ऊर्जा पुरवीत राहिले . त्यांच्या कामाला चालना देत राहिले . कलाकारांच्याही मनात त्यांच्याविषयी अतिशय आदराची आणि कृतज्ञतेची भावना आहे . मात्र , मृदुभाषी काकडे काका या सगळ्या यशाकडे तटस्थपणे पाहतात . नवं नाटक करायचं म्हटलं की मात्र त्यांच्या अंगात उत्साह वीज बनून संचारतो आणि त्यांचा वावर बघताना तरुण कोण असा प्रश्न संस्थेतल्या रंगकर्मींना पडतो .
काकडे यांनी सत्यदेव दुबे यांच्या नाट्यकृतींपासून अलिकडच्या सुषमा देशपांडे यांच्या ‘चित्रगोष्टीं’पर्यंत अनेक नाटकांचा पाठपुरावा केला आहे. ‘चित्रगोष्टी’मध्ये अरुण काकडे या वयातदेखील रंगमंचावर येऊन खणखणीत पोवाडा म्हणतात. त्यांनी ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकाची ‘आविष्कार-चंद्रशाला’साठी निर्मिती केली. ते नाटक गेली एकोणतीस वर्षे मुंबईच्या रंगमंचावर, दरवर्षी नव्या संचात प्रकट होत असते. अरुण काकडे यांच्यामुळे गेली तेवीस वर्षे मराठी रंगभूमीची ध्वजा दिल्लीच्या राष्ट्रीय रंगभूमीवर फडकत राहिली आहे. ती कशी ते आणि अन्य रोमांचकारी गोष्टी काकडे यांच्या या मुलाखतीमधून श्रोत्यांसमोर उलगडल्या जातील...
Subscribe to:
Posts (Atom)