Tuesday, February 10, 2009

इंद्रायणी काठी जाहला आनंद


पुण्यात वाहणारे नद्यांचे पाणीही आज आनंदाने गाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जरी आज खळाळत नसला तरी जेव्हा केव्हा तो बरसत होता तेव्हाची आठवण आज नक्की होणार आहे.

किराणा घराण्याची गायकी आपल्या मेहनतीने गळ्यावर चढविली. सवाई गंधर्वांच्या घरात पहाटे पाण्याच्या घागरी वाहिल्या आणि त्याच मनोभावे ते स्वरही कानात साठविले. त्या स्वरांचा सुगंध गदग पासूनच दरवळू लागला. पुढे तो गावोगावी पसरत गेला. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतल्या गायनाने त्यांच्या स्वरांना पंख लाभले. पंखांत बळ निर्माण झाले आणि असे एकही शहर नसेल जीथे पंडीतजींच्या गायनाची मैफल झाली नाही.


आपल्या गुरूंच्या नावाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून हा स्वरोत्सव आजही अव्याहत सुरू आहे. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत आणि अभंगाना पंडीतजींनी सुस्वर बनविले. अजरामर केले.आज त्यांची तब्येत साथ देत नाही. तरीही ते मनात सुरांची सेवाच करताहेत. भीमसेन जोशी नावाचा सन्मान पुण्यात स्थिरावला आणि पुणेही धन्य झाले. आज पंडीतजींबरोबर पुणेही या महान गायकाच्या सहवासाने स्वतःला धन्य समजते. पुणेकरांना त्यांची नावलौकिक मिळवून दिला.

एक गोष्ट मात्र मोकळेपणाने सांगावीशी वाटते. त्यांची गायकी भारतातच नव्हे तर जगात आपली शैली प्रस्थपित करीत होते तेव्हाच जर हा सन्मान मिळाला असता तर त्याचे मोल अधिक वाढले असते. पंडीत जसराज म्हणतात त्याप्रमाणे हा सन्मान मिळायला उशीर झाला खरा. पण तो मिळाला हे विसरून चालणार नाही. आज सारेच संगीत प्रेमी आनंदाने अभंगवाणीचे सूर आळवतील.

कलाश्रीतला तो "स्वरदेव" तृप्तपणे भारतरत्न हा सन्मान घेताना धन्य पावला असेल. त्या स्वरदेवाच्या स्वरांना आणि त्याच्या प्रतीभेला तमाम भारतीयांचा मानाचा मुजरा!स्वर आज थंडावलाय पण तो एकेकाळी बरसत होता. महासागरासारखा खळाळत होता याची आठवण होते आहे.


सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com