Thursday, August 30, 2018

तालयात्रा अनुभवताना भान हरपून जाते...




पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पुण्यातल्या धायरीमध्ये गुरूकुल पध्दतीने सुरु केलेल्या तालयोगी आश्रमाच्या सातव्या वर्धापनदिनाच्या भव्य कार्यक्रमाच्या स्मृती आजही मनात भारून राहिल्या आहेत. सुरवातीचा चार पखावाजांचा ठेका..ती लयकारी . तबल्याचे घुमत राहलेले बोल. पाश्चात्य वाद्यांची भारतीय परंपरेतली यथायोग्य मिश्रीत लयकारी. पं. सुरेश तळवलकरांचे तोंडून घुमत राहिलेले अनाहत नाद. आणि सर्वात नृत्यकलावंतांकडून त्या लयींवर केले गेलेले रेखीव नर्तन.



या सर्वांचा एकत्रित परिणाम पाहताना हरखून गेलेले तृप्त रसिकजन यांच्या वाजत असेल्या टाळ्या. आणि सर्वांत महत्वाचे राज्याचे उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांची पंडीतजींना  मिळालेली....तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. ची शाबासकीची थाप.


श्रीकांत बडवे यांची भरघोस मोलाची मदत.भारत फोर्जच्या उपाध्यक्षा लिना देशपांडे यांनी केलेले कौतूक..सारेच तालयोगी आश्रमाचे कार्य अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी पुरेसे आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा काही विलंबाने उघडतो..आणि तालयात्री..या भव्य कार्यक्रमाची अक्षरे मनात घर करून राहतात..आणि अगदी झपतालापासून ते त्रितालापर्य़तचा हा सुखद प्रवास अंगावर रोंमांच उभा करत पुढे सरकत जातो..गौरी स्वकूळच्या निवेदनातून कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य रसिकांसमोर येते .




अमृता गोगटे, अस्मिता ठाकूर,शितल लाळगे,इशा फडके, मृणालिनी खटावकर,श्रुती आपटे, गौरी स्वकूळ,आयुषी दिक्षित, रजत पवार..यांच्या नृत्यदर्शनाने रंगमंच उजळून निघतो. एकेक तालातला बोल डोळ्यांचे पारणे फेडतो.



पंडीतजी जरी तबल्यातले बादशाह असले..तरी त्यांच्या या कार्यक्रमात..पखावाज, तबला कीबोर्ड, परदेशी वाद्ये. यांचा इतका सुंदर संगम होत असतोना ते वादन अनुभवणे हा एक वेगळा अनुभव सुंमारे दोन तास रसिक इथे घेत होता..तेही कुठलीही विश्रांती घेता.
अनिरूध्द जोशींची सतार आणि मग विनय रामदासन..नागेश अडगावकर यांचे सुंरेल आलाप , ताना स्वरातून उमलतात..आणि ठेका वाद्यातून मग नृत्यांगनांच्या पदन्यासातून उमटतो..आणि रसिकांच्या मनाचे ठाव घत रहातो.



सावनी तळवलकर, आशय कुलकर्णी,सौरभ सनदी यांचा तबला वाजू लागतो. आेंकार दळवी, सुजीत लोहोर,भागवत चव्हाण , कृष्णा साळुंके..यांची पखावजवरील थाप घुमू लागते.आणि सारे वातावरण नादाने दुमदुमून उठते.
अभिषेक सिनकर, अनय गाडगीळ आणि तेजस माजगावकर यांची हार्मोनियम, कीबोर्ड आणि टाळावरील हुकुमत लक्षात येते..पण ती त्या नादात काहीशी दूर होते.
अभिषेक भुरूक, उमेश वारभुवन,ऋचुराज हिंगे, उमेश परांजपे यांची  वाद्ये तानातालात बोलू लागतात.तेव्हा ठेका अधिक तीव्र होत जातो.



तालाबरोबरच लय आणि नाद वापरून..रागांचा विषय रंजक करत पंडितजींनी ही तालयात्रा लोकांसमोर सादर केली..त्यांच्या तबला बोलाने ती अधिक संपन्न होत गेली.
मान्यवरांचे आशिर्वाद आणि कलावंतांचे अनुभवसंपन्न सादरीकरण यातून ही तालयात्रा नादमय..आणि गुरुकुलाची परंपरा वृध्दींगत करत या वाद्यांकडे आकर्षीत होणारी ही तरूणाई यात आपले योगदान यापुढेही देत राहिल याची प्रचिती येते.



सुभाष इनामदार,पुणे
Subhashinamdar@gmail. com