Monday, December 19, 2022
सवाई गंधर्व ६८ वा.असा झाला
सवाईच्या पहिल्या दिवसाची निरीक्षणे..!
करोनाच्या कालावधीनंतर पुण्यातील संगीत रसिकांसाठी ६८ वा सवाई भीमसेन महोत्सव बुधवारी मुकुंदनगर भागातील महाराष्ट्रीय मंडळाच्या शामियानात पुन्हा सुरू झाला..
यंदा प्रथमच संपूर्ण महोत्सवासाठी एकच तिकिटाचा पर्याय आर्य संगीत मंडळाने ठेवला आहे.. त्यामुळे म्हणा किंवा बदललेल्या काळाची दखल म्हणा पहिल्या दिवशी बऱ्याच खुर्च्या आणि भारतीय मंच रीता दिसत होता..
रसिक होते पण भरपूर आस्वादक गैरहजर होते..
मंडपात लांबवर मंचावर बसलेल्या आणि खुर्च्यातून आस्वाद घेणाऱ्या रसिकांना मंचावरील गाणे ऐकायला येत होते..पण कलाकार जवळून पहाता येत नव्हते.. चार स्क्रीन होते पण ते लांब होते..
बाहेर अनेक विक्री मंडप रीते दिसत होते..
नाही म्हणता खाद्य पदार्थांना अधिक मागणी होती..
उपेंद्र भट, शाश्वती मंडल, रतन मोहन शर्मा आणि उस्ताद अमजद अली खाँ.. हे चार कलावंत पहिल्या दिवसाचे आपले सादरीकरण उत्तमोत्तम करीत होते.
पण रात्री दहाला कार्यक्रम संपविण्यासाठी सादरीकरणात मर्यादा दिसत होती..
अमजद अली खाँ यांनी पुण्यातील पोलीस आयुक्तांना हे वेळेचे बंधन शिथिल करण्याचे जाहीर आवाहनही केले.. त्यामुळे कलावंत मनसोक्त कला सादर करू शकत नाही याची खंत व्यक्त केली.
असो.. पहिला दिवस.. वत्सलाबाई भीमसेन जोशी यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट यांना प्रदान करण्यात आला..
त्यांच्या गायनातील रंगत रसिकांनी अनुभवली..
ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका शाश्वती मंडल यांचे तयारीचे रसिकांनी अनुभवले.
रतन मोहन यांची भक्तीमय शैली आणि स्वरातला भाव आवडला..त्याला दाद मिळाली..
सादरीकरणात उस्ताद असलेले सरोवादक अमजद अली खाँ..यांची संवाद साधत रसिकांना आपलेसे केलेले वाद्यवादन..ही खरी मौज संगीत रसिकांनी दिलखुलापणे अनुभवली..
निवेदक आनंद देशमुख यांची नेमकी टिपणे आणि आवश्यक तेव्हढेच बोलणे आणि सतीश पाकणीकर यांची भीमसेन शक्ती याची खास नोंद घ्यावी वाटते.
सवाई महोत्सवातील संगीत वातावरण असेच भारलेले असते..ते शब्दात सामावू शकत नाही..ती अनुभूती. प्रत्यक्ष घ्यावी अशीच असते..
यंदा पाच दिवस हा स्वरयज्ञ सुरू रहाणार आहे.. पाहू या गुरुवारी कशी निरीक्षणे नोंदता येतील ते..
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ..दुसरा दिवस..
अविनाश कुमार या तरुण गायकाने आरंभ केला.. पण उपस्थित रसिक इथे अभावानेच इथे दिसत होते.. त्यांच्या गाण्याचा परिणाम फारसा दिसला नाही..
पहिले दोन तास अगदी आलम खाँ यांच्या सरोद वादना पर्यंत रसिक तुरळक दिसले..
मैहर सेनी घराण्याचे सुप्रसिद्ध सरोदवादक आलम खाँ यांचे सरोदवादन झाले. त्यांना सत्यजित तळवलकर यांनी तबल्यासाठी साथ केली.
माहौल बहरला तो पंडित साजन मिश्रा आणि करोना काळात गमावलेले ज्येष्ठ गायक राजन मिश्रा यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांचे स्वरमंचावर आगमन झाले आणि रसिकात वाढ झाली..
विस्कळीत झालेले रसिक मुख्य मंडपात गायनाचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र आले आणि दादही तशी मिळाली..
शताब्दी स्मरण या सतीश पाकणीकर यांच्या भातरत्न भीमसेन जोशी यांच्या विविध मुद्रा आणि मागील सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचेसोबत विविध जागतिक कीर्तीच्या गायकांबरोबर काढलेल्या स्मृती असलेल्या सुमारे ७५ छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी अनेक रसिक इथल्या खास दालनात येत होते.. चित्र काढू नका हे लिहूनही अनेकजण ते चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते.
आनंद देशमुख भीमसेन जोशी यांच्यावरील काही निवडक ठळक गोष्टी लोकांसमोर आणत होते..
साजन मिश्रा यांना साथ करणारे हार्मोनियम वादक उशिरा आल्याने भीमसेन जोशी यांच्या आठवणी रसिकांच्या मनात रुजविण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला गेला..
आज पुण्याचे पालकमंत्री येणार असल्याने इथे सुरक्षा अधिक सतर्क झाल्याचे दिसले.
इथल्या भव्य मंडपात रसिकांना कलावंताचा आवाज सर्व दूर नीट ऐकू यावा यासाठी स्वरांजलीचे प्रदीप माळी यांचा सतत प्रयत्न दिसत होता.
या महोत्सवात 'राजहंस प्रकाशन'तर्फे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे लिखित 'गान गुणगान - एक सांगीतिक यात्रा' या पुस्तकाचे प्रकाशन श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाशक दिलीप माजगावकर उपस्थित होते.
छायाचित्रकार लोकप्रिय कलावंतांची छबी मिळविण्यासाठी रसिकांमध्ये मिसळून प्रयत्न करताना दिसत होते.. विशेषतः विदुषी डॉ. एम राजन, संगीता शंकर ,रागिणी व नंदिनी यांचे एकत्रित चित्र मिळावे यासाठी चाललेली धावपळ दिसत होती..
दुसरा दिवस रसिकांच्या मनात रुजविला तो साजन आणि स्वरांश मिश्रा यांनी..तर यावर कळस केला तो डॉ. एम राजन आणि त्यांच्या कन्या आणि नातींच्या उत्तम वादनाने.. चार व्हायोलिनची एकत्रित सुरावट मनात साठवीत आज भारलेल्या तृप्ततेने घरोघरी गेला..
आणि रसिकांची आठवण काढत एम राजमही भारावल्याचे जाणवले..
सवाईचा तिसरा दिवस..लक्षणीय!
६८ वास सवाई गंधर्व संगीत महोत्सव रंगतदार होत जाणार हे आता नक्की झाले..
पुण्यात, महाराष्ट्रात,देशात आणि परदेशातही कीर्ती पोचलेला हा स्वरमंच अनेकविध घटनांनी आणि कलाकारांच्या हजेरीतून लक्षात रहात आहे..
बाहेर उन्हाचे सावट असताना उपस्थित रसिकांना आपल्या उत्तम ,कोमल आणि तयारीच्या सुरावटितून गुंतवून ठेवण्यात मनाली बोस या कलाकार यशस्वी झाल्याचे दिसले.कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांनी राग मारवामध्ये एकतालात हळूवार सादरीकरणाने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर 'अब काहे सतावो जावो...' हा गारा व पिलू रागातील मिश्र दादरा व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे लोकप्रिय भजन 'बाजे रे मुरलिया बाजे' सादर केले. त्यांना अभिनय रवांदे (हार्मोनियम) पांडुरंग पवार (तबला) यांची संगत लाभली.
संध्याकाळचा हंसध्वनी रागाने मेजवानी दिली ती तरुण आणि उत्तम संतूर वादक राहुल शर्मा यांनी.. पुणेकरांचे कौतुक करून त्यांनी आपल्या वादनातले सौंदर्य रसिकांच्या हृदयात उतरविले..
आलाप, जोड, झाला आणि दृत तीनताल त्यांनी सादर केला. मिश्र खमाज धूनमध्ये दादरा आणि तीनताल सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.
त्यांना ओजस अढीया (तबला) यांनी अतिशय समर्पक साथ केली.
मध्यंतरात रसिकांचे पाय आजूबाजूचे वातावरण टिपत टिपत.. चहा.. कॉफी आणि खाद्यपदार्थ दालनाकडे वळताना दिसत होते.. बाहेर उभे केलेले भीमसेन जोशी यांच्या भव्य फलकाकडे आकर्षित होऊन त्यासोबत आपली छायाचित्र काढण्यात काही धन्यता मानत होते..
इकडे मंडपात भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि या महोत्सवाचे प्रमुख श्रीनिवास जोशी यांचे स्वरमंचावर आगमन झाले..
त्यांनी बिहाग रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. संत कबीर यांची रचना असलेला आणि जोशी यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या 'गुरुविण कौन बतावे बाट' या भजनाने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.
अविनाश दिघे (हार्मोनियम), पं.रवींद्र यावगल (तबला),गंभीर महाजन (पखावज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी त्यांना साथ केली.
मंचावरून झाली उतरलेल्या अवघ्या ९६ वर्षांच्या माऊली टाकळकर यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्यांचा सत्कार करून केला गेला. रसिकही त्यामुळे भारावून गेले होते..
आपल्या निवेदनाची तिशी पूर्ण करणारे आनंद देशमुख यांच्या आवाजाची जशी रसिकांना सवय झाली आहे तशी गायकांच्या पिढ्याही त्यांच्या निवेदनाने कशा इथल्या स्वरमंचावर अवतरल्या याची एक यादीच देशमुख यांनी इथे सादर करून.. ही महान शास्त्रीय संगीत परंपरा इथे जपली जात आहे याचे उदाहरण त्यांनी प्रस्तुत केले.
उपस्थित रसिकांमध्ये आज पुण्याच्या विकासात ज्यांचा वाटा आहे असे माजी खासदार सुरेश कलमाडी सौ. मीरा कलमाडी यांच्यासह ठळकपणे दिसले.. तर काही काळासाठी शिवसेनेच्या नेता आणि उपसभापती निलमताई गोरे हजर होत्या.
आजच्या दिवसाची सांगता अभ्यासू आणि कलावंत घडविणारे श्रेष्ठ गुरू पं. अजय चक्रवर्ती यांच्या भारदस्त गाण्याने झाली.. उपस्थित तरुण कलावंत यांना मार्गदर्शन करून ह्या महोत्सवात येण्याचा बहुमान मिळायला भाग्य लाभते ते लाभल्याने..ह्या भिमतिर्थाला त्यांनी वंदन केले. सादरीकरण करताना वेळेचे गणित आखून त्यांनी बरोबर दहा वाजता आपली सेवा थांबविली..
त्यांनी राग बागेश्रीने गायनाला सुरुवात केली. सुरेल गायकी अन् त्याला साजेसे वादन यामुळे चक्रवर्ती यांची मैफिल उत्तरोत्तर रंगली. त्यानंतर चक्रबर्ती यांनी पहाडी राग सादर केला.
अजय जोगळेकर (हार्मोनियम), ईशान घोष ( तबला), मेहेर परळीकर आणि सौरभ काडगावकर यांनी त्यांना साथसंगत केली.
वेळेची मर्यादा आता घालू नये अशी विनंती करायला ते विसरले नाहीत..
धीरगंभीर स्वराचे वलय निर्माण करत त्यांनी आपले गायन संपविले.
सवाईचा चौथा दिवस.. रसिक भारावलेले...!
दुपारी तीन ते रात्री बारा अशी मोठी पर्वणीच सवाईच्या रसिकांना शनिवारी लाभली..
सुरवातीपासूनच इथे रंग भरत गेला.. यशस्वी सरपोतदार यांचे आक्रमक आणि तेजस्वी स्वरांनी लपेटलेले गायनाने श्रोता खुश झाला.. उत्तम स्वरलगाव आणि मनाला आनंद देणारे गायन सादर करून त्यांनी स्वरमंचाला मोहित करून टाकले.
हरकती आणि लयकारी यांचा सुंदर मेळ त्यांच्या सादरीकरणात पाहायला मिळाला.
या महोत्सवात पहिल्यांदाच या व्यासपीठावर कला सादर संधीचा उत्तम फायदा त्यांनी करून घेतला.‘रंग डारूंगी नंद के लालन पे...’ या होरीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप करून रसिकांची मने जिंकली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), पं. रामदास पळसुले (तबला) यांची उत्तम साथ मिळाली.
भोपाळच्या मातीत आपली ध्रुपद गायकी विकसित करणारे पं. उमाकांत गुंदेचा आणि अनंत गुंडेचा ह्या काका पुतण्याच्या जोडीने सवाईत आलेल्या प्रत्येक श्रोत्यांच्या मनात आपला ठसा कायम केला..
ओम तोम ची या गायनातील परंपरा त्यांनी आपल्या शैलीतून उत्तम सादर केली. धीरगंभीर आणि आक्रमक हे एकाच गायनातले कौशल्य त्यांनी सहज साध्य केले आहे..
उमाकांत गुंदेचा सांगतात..धृपद हा गायनाचा प्राचीन प्रकार असून, सामवेदातून त्याची निर्मिती झाली असल्याचे मानले जाते.
२००४ साली भोपाळ येथील आमच्या धृपद संस्थान या गुरुकुलचे उद्घाटन पंडित भीमसेन जोशी यांनी केले होते. गुंदेचा यांनी राग चारुकेशीने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी पारंपरिक आलाप, विलंबित, मध्यलय अर्थात आलाप जोड झाला यांचे दमदार सादरीकरण केले. यानंतर त्यांनी चौदा मात्रेतील धृपद धमार प्रस्तुत केला. राग अडाणामधील ‘शिव शिव शिव शंकराधिदेव...’ या शिवस्तुतीने अधिक समाधान दिले.
त्यांना बंधू पं. अखिलेश गुंदेचा व ज्ञानेश्वर देशमुख यांनी पखवाजवर कमाल केली.
आज आठ कलावंतांनी महोत्सवाची रंगत अधिकाधिक वाढविली.. आजूबाजूचा परिसर आणि मंडपातील रसिकांची गर्दी त्याची साक्ष देत होती..
आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांनी राग श्री ने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. त्यांनी ‘सांज भई...’ ही विलंबित एकतालातील रचना प्रस्तुत केली. भीमसेन जोशी यांनी गायलेल्या पुरंदरदास यांच्या कानडी अभंगाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवांदे (संवादिनी), रविंद्र यावगल (तबला) यांची साथ लाभली.
विराज यांच्या गायनाने विराट दर्शन!
भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांनी सवाई मध्ये जमलेल्या तरुण कलाकारांना प्रेरणा देणारे तयारीचे गायन सादर करून आपलेसे केले..
रसिकांना त्यांनी आजोबांच्या गायनाची झलक दाखविली.
किराणा घराण्याचे उदयोन्मुख गायक असलेल्या विराज जोशी यांनी राग मारुबिहागने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली.
पं. भीमसेन जोशी यांच्या ‘संतवाणी’ या कार्यक्रमाला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचेच औचित्य साधत त्यांनी अजरामर केलेल्या भक्तीसंगीताची झलक विराज यांच्या गायनाने रसिकांनी अनुभविली.
अविनाश दिघे (संवादिनी), पांडुरंग पवार (तबला), सुखद मुंडे (पखावज) व माऊली टाकळकर (टाळ), अपूर्व द्रविड (तालवाद्य) तर राहुल गोळे (ऑर्गन) यांनी साथसंगत केली. पुन्हा एकदा माऊली टाकळकर यांच्याविषयीच्या प्रेमाला उधाण आल्याचे पहायला मिळाले.
गायक सिड श्रीराम यांनी कर्नाटक शैलीतील संगीताची सुरेल अनुभूती उपस्थितांना दिली.
श्रीवल्ली या अलीकडेच गाजलेल्या गीताने सीड श्रीराम तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्या कर्नाटक संगीताच्या प्रस्तुतीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. भाषा न कळूनही सवाईतील रसिकांनी त्यांचे गायन अनुभवण्याचा प्रयत्न केला.
त्यांना राजीव मुकुंदम (व्हायोलिन), जे. वैद्यनाथन (मृदंगम्), डॉ. एस. कार्तिक (घटम्) यांची उत्तम साथ मिळाली.
आज मंडपात आणि बाहेरही रसिक या संगीत वातावरणाचा आस्वाद मनसोक्तपणे घेत असल्याचे चित्र होते..
मुकुंद संगोराम लिखित ‘सूरश्रेष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी व सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.
पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य व किराणा घराण्याचे गायक असलेल्या गिरीश संझगिरी यांनी पंडित फिरोज दस्तूर यांच्या जीवनावर लिहिलेला चरित्रग्रंथ ‘घट घट में संगीत समाये’ याचे व ‘चंद्रमुखी’ या संझगिरी यांच्या स्वरचित बंदिशीचे पुस्तक यांचे प्रकाशनदेखील यावेळी करण्यात आले.
सुप्रसिद्ध गायक उस्ताद राशीद खान व सतारवादक उस्ताद शाहीद परवेज या दोन सुप्रसिद्ध कलाकारांच्या जुगलबंदीने महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रंगतदार बनत गेला.
‘याद पियां की आयें...’ ह्या जुगलबंदीत सादर झालेल्या ठुमरीने रसिक अधिक तृप्त झाले.
त्याआधी उस्ताद राशिद खान यांनी मालकंस रागाने आपल्या गायनाला सुरूवात केली.
मालकंस रागात त्यांनी 'जिनके मन राम बिराजे.. ' ही विलंबित बंदिश आणि 'याद न आवत मोरी प्रीत..' व 'आज मोरे घर आये न बलमा..' या द्रुत बंदिशी सादर केल्या. त्यांना ओजस अढीया (तबला), साबीर खान (सारंगी), नागेश अडगावकर, निखील जोशी व राशीद खान यांचे सुपुत्र अरमान खान (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली.
शाहीद परवेज यांनी राग झिंझोटीमध्ये आलाप, जोड, झालाचे सादरीकरण केले. त्यांना ओजस अढीया यांनी समर्पक तबला साथ केली.
शनिवार हा सर्वार्थाने सवाई मधील अधिक स्वरांनी भारावलेला दिवस ठरला.
संगीत रसिकांच्या सवाईची सांगता..पाचवा दिवस स्वर, नाद आणि तालमय..!
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस होता.
सकाळपासूनच मंडप पुरता रसिकांनी भरून गेला होता.. सकाळी दहा पासूनच आपापल्या जागा आरक्षित करणारे रसिक इथे हजर होते..
ही गर्दी पुढे पुढे वाढत गेली.. आणि कलाकार आणि आयोजकांना यामुळेच बळ मिळाले.
राग वृंदावनी सारंगने पं. आनंद भाटे यांनी आपल्या गायनाची सुरूवात केली. पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली 'मन राम रंगी रंगले' ही भक्तीरचना त्यांनी खास शैलीत सादर केली. पंडितजी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायलेल्या अतिशय लोकप्रिय अशा 'बाजे मुरलिया बाजे' या गीताच्या तडफदार सादरीकरणातून त्यांनी या दोन्ही दिग्गजांना आपली आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या प्रस्तुतीला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची उस्फूर्त दाद दिली.
त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली.
बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन रसिकांना आवडले.
त्यांनी राग अलया बिलावलद्वारे आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यानंतर पहाडी धून सादर करत, बनारसी दादराच्या प्रस्तुतीने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना रवींद्र यावगल (तबला), राजेश व ऋषभ प्रसन्ना (बासरी साथ) यांनी त्यांना संगत केली.
पं. भीमसेन जोशी यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेले राजेंद्र कंदलगावकर यांनी भीमपलास रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली.
पंडित भीमसेन जोशी यांच्या 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा..' या लोकप्रिय भजन सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम), पं. रामदास पळसुले (तबला), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथ केली.
महेश काळे व अमेरिकेतील संदीप नारायण यांची हिंदुस्थानी- कर्नाटक संगीताची जुगलबंदी रसिकांनीअधिक पसंत केली.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त सवाईमध्ये गाण्याची संधी मिळत आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. असे महेश काळे म्हणाले.. संदीप आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत मात्र आज तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र गात आहोत, असे सांगत त्यांनी धानी रागाने आपल्या गायनाची सुरूवात केली. यामध्ये 'देवी ब्रोवा समयमी दे...' ही कर्नाटक संगीतातील बंदिश, 'लंगरवा छंड मोरी बैया...' ही हिंदुस्थानी संगीतातील बंदिश जलद लयीत, 'मोरे सर से सरक गई गगरी...' ही मिश्र बंदिश आणि तराणा सादर केला. त्यांनतर 'कृष्णानी बेगडी बारू' हे कर्नाटकी संगीतातील उपशास्त्रीय गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या 'कानडा राजा पंढरीचा' या अभंगास रसिकांनी टाळ्यांचा गजर करत दाद दिली.
यावेळी महेश काळे यांना राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोलकर (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अपूर्व द्रविड (साइड रिदम), प्रल्हाद जाधव, अमृत छ्नेवार, मनाली जोशी (तानपुरा आणि गायन) यांनी साथसंगत केली. तर संदीप नारायण यांना व्हीव्हीएस मुरारी (व्हायोलिन), साई गिरीधर (मृदंग), चंद्रशेकर शर्मा (घटम) यांनी साथसंगत केली.
अर्चना जोगळेकर यांच्या नृत्याला पसंती..!
प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी सादर केलेल्या 'श्रीराम स्तुती'ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा 'श्रीराम कथा' सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला.
त्यांना झुबेर शेख (सतार) , पं. कालिदास मिश्रा (तबला) वैभव मानकर (हार्मोनियम व गायन), वैभव कृष्ण (पढंत) , भुवन (बासरी) यांनी साथ केली.
त्यांचे दर्शन आणि त्यांची सौंदर्य प्रस्तुती अतिशय देखणी होती.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या समारोपाच्या सत्रात किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे मोठे योगदान आहे, असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवीने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व 'जागी मै सारी रैन', 'जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा...' ठुमरी सादर केली.
त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर - कुंडलकर, आश्र्विनी मोडक (तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर (गायन) यांनी साथ केली.
महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या 'बिन देखे पडे नही चैन' या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली.
कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आणि सारे पदाधिकारी यांनी पाच दिवस सुरू ठेवलेला स्वरयज्ञ उत्तम रित्या रसिक आणि कलावंतांच्या सहभागाने उत्तम साजरा झाला.
- सुभाष इनामदार. पुणे
subhashinamdar@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)