

मराठी रंगभूमीवर फारच कमी नाटकात काम करूनही संगीत रंगभूमीची परंपरा निष्ठेने जपणारा कलावंत म्हणून पं. शरद गोखले यांचे नाव नक्कीच लक्षात रहाते. तशी उंची बेताची. बोलताना फारसा प्रभाव पडत नव्हता. पण गाण्यात तरबेज. शास्त्रीय संगीताची उत्तम तयारी.
अनाथ विद्यार्थी गृहातल्या शाळेत शिक्षणाचे अनमोल कार्य शेवटपर्यंत करून विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा गुरु. म्हणून त्यांनी ते काम तन्मयतेने अखेरपर्यंत केले.
शिलेदारांच्या मराठी रंगभूमीचा स्पर्श त्यांच्यातल्या गायकाला झाला. आणि जयराम शिलेदारांनी शरद गोखले यांना अभिनयासाठी, त्यातल्या गद्यासाठी तयार करुन रंगभूमीवर प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यांचे नाव आज संगीत गायक नट म्हणून आहे त्याचे सारे श्रेय शिलेदार मंडळींना आहे.
शिलेदारांच्या सर्वच पारंपारिक संगीत नाटकात शरद गोखले यांचे नाव कायमचे कोरले गेले. त्यांनीही ते अखेरपर्यंत राखले. आवाजाला बऴ देऊन त्यांच्यातल्या कलावंताला घडविले त्यांनीच. तीन वर्षापूर्वी त्यांना महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार प्राप्त झाला. तेव्हा त्यांनीही हे स्पष्टच म्हटले होते.
त्यांच्यातले वेगळेपण आणि भूमिकेत चपखल बसले ते स्वरसम्राज्ञी या विद्याधर गोखले यांच्या नाटकात. लावणी आणि शास्त्रीय संगीताची ही जुगलबंदी सादर करून कीर्ति शिलेदार आणि शरद गोखले यांनी नाटक तर गाजविलेच...पण त्यातली गाणीही लोकप्रिय केली. पं. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या संगीत मार्गदर्शनातून या नाटकातली पदे रंगली... त्यांच्या शिस्तप्रिय संगीतकाराने गोखले यांच्यातल्या गायकाला पुरते बाहेर काढले. रसिकांची पसंती आणि संगीत नाटकात गोखले यांचे नाव कायमचे कोरले गेले.
सुमारे पस्तीस वर्षापूर्वी भरत नाट्य संशोधन मंदिराच्या संगीत भेटता प्रिया या डॉ. वा. शं. देशपांडे लिखित आणि बाबुराब विजापुरे दिग्दर्शीत नाटकातून शरद गोखले यांनी पहिले पाउल टाकले. आणि खरे म्हणजे यातून त्यांच्या जीवनात प्रितीचे पाऊलही पडले. त्यांतली प्रिया त्यांच्या ख-या आयुष्याची जोडीदार झाली.
नटाकडे इच्छाशक्ति असेल आणि कष्ट घेण्याची इच्छा मनोमन असेल तर तो रंगभूमीवर आपवी छाप पाडू शकतो असे त्यांनी आपल्या भूमिकेने दाखवून दिले.
असा संगीतावर निष्ठा असणारा आणि आपल्यात जे नाही ते मिळविण्याचा हट्ट करुन जिद्दीने पाय रोऊन भक्कमपणे उभा राहिलेला हा कलावंत आज गेला. तोही कॅन्सरसारख्या दुर्घर आजाराने. शरीराने त्यांचा देह आपल्यात नाही. आठवणीत राहतील त्यांनी केलेल्या भूमिका आणि स्वरसम्राज्ञीतला कडक शिस्तप्रिय गुरू.
त्यांच्या प्रेमळ स्वभावाची प्रचिती घेतलेले अनेक जण हेच सांगतील.
त्यांना हिच आमची भावपूर्ण शब्दांजली.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com