Thursday, October 18, 2012

मी तुला






मी तुला स्वप्नात पहावे
की तुला पापण्यात लपवावे
मी तुला शब्दात शोधावे
की तुला भावनेत पहावे
अस्तित्व तुझे मनी असावे
की ते फक्त मला कळावे
अंतरीच्या डोळ्यांनी पहावे ........


पाकळ्या गळून जाव्या
गंध उडून जावा
परी अस्तित्व वृक्षाचे
जसे जागेवरी उरावे
खुणा भेटीच्या विरलेल्या
प्रेम मात्र ह्रदयी उरावे
मी तुला नित्य स्मरत जावे .........


संपून मैफील गेली तरीही
गाणे मनात राहावे
वाट रिकामीच जरीही
वाटेकडे डोळे असावे
वळणावरी सुखाच्या तू मला भेटावे
निशब्द दोघांनी असावे



shrikant aphale

संतोष दास्ताने..अकाली गेला.



भारावलेल्या जड अंतःकरणाने थोडा विसावलो होतो. हे कधीतरी होणारच होते..फक्त ते इतक्या लवकर होईल असे वाटले नव्हते.आज मात्र घडले. दुःखद घटना खरच किती अनपेक्षित येतात. एकदम कोसळतात. न सांगता..चाहूल न देता...अनपेक्षित..

आमचा प्रकाशन क्षेत्रातला अभ्यासू मित्र संतोष दास्ताने..अकाली गेला..काही दिवसापासून आता हा व्यवसाय त्याने कमी करायला सुरवात केली होती. पण तो इतक्या लवकर जाईल याची कधीही त्याच्या चेह-यावर खूणही दिसली नाही...

दास्ताने रामचंद्र आणि कंपनीचा तो संचालक..मालक..

महाराष्ट्र नावाचे एक पुस्तक गेली कांही वर्षे तो काढत होता..प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्यातल्या सांस्कृतिक, राजकीय, समाजकारणातील ..तसेच आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणारे हे वार्षिक...आपल्या परिने तो ते सातत्याने प्रकाशित करायचा...
महाराष्ट्र राज्याबद्दल सर्व काही माहिती देणारा वार्षिक संदर्भग्रंथ.  अद्ययावत माहिती व आकेडीवारी, त्याचप्रमाणे नकाशे, आकृत्या इत्यादींचा समावेश यात होता..

प्रकाशकांनी एकत्र येऊन..व्यावसायात असणा-या अडचणींसाठी आणि एकमेकांच्या चांगल्या गोष्टींची स्तुती करण्य़ासाठी तरी का होईना एक व्हावे अशा इच्छेने धडपडणार हा प्रकाशक..



आज त्याचे सारे संकल्प त्याच्याबरोबरच संपल्यासारखे झाले..आता तोच गेला..आपण फक्त श्रध्दांजलीसाठी चार शब्द लिहू शकतो..बाकी काय...


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, October 17, 2012

श्री पार्टनर मधून पुन्हा वपू अनुभवता येणार !


एखादा चित्रपट येण्याआगोदर काही दिवस त्याची जाहिरात येऊन धडकते. तशी या श्री पार्टनर बाबत परवा झाले.  १९७७ साली आलेल्या वपुंच्या ( बापूंच्या) कादंबरीने मध्यमवर्गीय जीवनातील सुख-दुखाःच्या प्रसंगातून एकलेपण घालविणा-या आणि मित्राचे नाते , त्याचे प्रेम जपणा-या या जीवनाचे विलक्षण शब्दात केलेले हे शब्दचित्र डोळ्यासमोर ऊभे रहाते. याच नावाचे नाटक आले. त्याचे १०० प्रयोग झाले. त्यात वपुंनीच पार्टनर ची भूमिका केली होती. 

नंतर आली ती मालिका. त्यात विक्रम गोखले यांनी पार्टनर रंगविला. आणि आता समीर रमेश सुर्वे तीन वर्षांच्या अथक् धडपडीनंतर याच कादंबरीतून चित्रपट तयार करून तो रसिक-वाचकांसमोर आणत आहेत. गेल्या दीड वर्षात त्याच्या धाडसाला आणि ध्येयाला बाबा काळे सहनिर्माते म्हणून प्रप्त झाले आणि ही श्री पार्टनरची फिल्म पडद्यावर साकार झाली.

आता मार्केटिंग तंत्र बदलेले आहे. गावागावात जावून आधी त्याबाबात पत्रकार परिषद कलाकारांसोबत केली जाते. विविध माध्यमाचे प्रतिनिधींसमोर त्यातल्या कांही गोष्टींची चर्चा होते. त्यातली वैशिष्ठ्ये मांडली जातात. त्याचे गुणगान होते...मात्र एकदा चित्रपट लागल्यावर पुढे सारेच विरुन जाते. कारण तो चित्रपट त्या ताकदीचा नसतो.

मात्र पार्टनर बाबत पाहिलेला आणि ट्रेलर मधून दिसणारा आणि गाण्यांची रंगत आणि त्याचे चित्रिकरण पाहता तो कादंबरीसारखा नव्हे तर वाचकांच्या मनात कादंबरी वाचताना ती जशी भावेल असा चित्रपट असावा याची खात्री पटते..कारण तो काळ आता नाही हे नक्की पण संवादाचे आणि त्या परिस्थीतीचे भान लेखकाला आणि पटकथा लिहिताना समिर सुर्वे यांना असावे असे दिसते.

इथे कुठलाही चेहरा फारसा ओळखीचा नाही. कारण विविध शहरात जाऊन कलाकारांच्या मुलाखतीमधून ही कलावंताची फौज उभी राहिली आहे.त्यात नवखेपणा असेल पण पण जिवंतपणा नक्कीच दिसेल. 



पार्टनरची भूमिका सतीश पुळेकर या अतिशय कसदार अभिनय करणा-या वेगळ्या धाटणीने आपली करियर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्याने केली आहे. आईच्या भुमिकेसाठी लालान सारंग ह्या ब-याच काळाने चित्रपटात ठसा उमटवित आहे...मात्र श्री (पद्मनाथ विंड) पासून त्याच्या पत्नि आणि प्रेयसीच्या भूमिकेसाठी (श्वेता पगार) या नविन चेह-याची ओळख रसिकांना होणार आहे.

चित्रपट करायला होकार देणा-या बापूंच्या कन्य़ा स्वाती चांदोरकरांनी चित्रपटाबाबत अतिशय चांगले मत व्यक्त केले आहे. आज बापू असते तर त्यांनाही तो आवडला असता, असे त्यांच्या तोंडून येते. त्या चित्रपटाच्या प्रचारासाठी गावोगावी जातात. 

चित्रपट करण्याआधी १४ वेळा परत परत यावर विचार करुन त्याचे स्क्रिप्ट समीरने पुन्हा पुन्हा लिहले. विविध लोकांना विचारुन हा विषय कसा रुचेल यासाठी त्याचा सर्व्हेही केला.

यातले संगीत हा एक महात्वाची भुमिका वठवतोय. अश्विनी शेंडे यांच्या गीतांना निलेश मोहरीर या संगीतकाराने चित्रपटात ते विश्व उभे केले आहे. त्यात मधुरता तर आहेच पण भारतीय परंपरेचे विशेषतः शास्त्रीय संगीतातल्या रागांवर आधारित गाणी वेगळी वाटतात.


आता २४ ला पाहूया या श्री पार्टनरला रसिक कसे स्विकारतात ते.




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



संगीताची माझी आवड



संगीताची माझी आवड कदाचित लहानपणापासूनची. सकाळी त्या काळी आईने जुना रेडिओ विकत घेतला..त्यालाही साल उजाडले असेल. १९७०.. त्यावेळी रेडिओसाठी पोस्टातून परवाना काढावा लागे..आकाशवाणी,पुणेचे कार्यक्रम ऐकताना..विशेषतः सकाळचे भक्तिसंगीत...मनाला आनंदाचे सुखद वातावरण देत असे..सकाळच्या गीतांची मोहिनी इतकी जबरदस्त होती की, त्यांच्या भक्तिगीतांनी आनंदाच्या लाटा मनाच्या त्या कोवळ्या वयात उमटवीत असत...तीची सकाळ रोज येई पण रोजचा तिचा गंध आणि सहवासही निराळा भासे...

तेच रेडिओचे संगीत मनात आणि ओठांवर नाचवत आमची पिढी आताच्या नव्या संगीताकडे वळली आहे...
तरीही कालची ती मराठी गाणी मनावर कोरण्यात प्रमुख हात होता तो रडिआचाच..सकाळी भक्तिसंगीत, आणि साडेआठच्या दिल्लीवरुन दिल्या जाणा-या मराठीतल्या बातम्यांनतर होणारी नाट्यसंगीताची मेजवानी दिवसाचे नऊ वाजल्याचे रोज दाखवित होते.....नंतर शालेय विद्यार्थ्यांसाठीच पाठ असायचे तोपर्यंत थाबांयला कुणाला वेळ होता...


शाळेची घंटा होणार म्हणून आईने केलेले गरम गरम जेवण पोटात ढकलून दप्तर भरुन शाळेकडे धूम ठोकली जायची..

घरातही पेटी कधी कधी लहर आली तर वडिल वाजवायचे. स्वतः पोवाडेही म्हणायचे..त्यांना गाण्याची आवड होती..तसे ते कलावंत जातीतले..पण कुठल्याही कलेत पारंगत नाही..आवडीमुळे आमचा मामा वडूजवरुन आला की छोटेखानी मैफल घरात जमायची,,,मामा..कै. वासुदेव आंबिके.
..घरी आला भजने म्हणायचा त्याला तबला बाजवायचा नाद...तो वडूजला एका भजनी मंडळात साथ करुन गाणेही म्हणायचा.. पेटी घरात असली तरी ती कीर्तनाला साथ करण्याची होती..त्याचा सूर थोडा उच्चच होता..तरीही

कांद्या वांग्याचे लगीन ठरले वडीलपणासाठी ..
दसाशीर भोपळा .. फळामध्ये वांगोपंत फाकडे..
मुळा बटाटा कोबी गाजर वांगोआण्णाकडे...

वगैरे आता निट आठवत नाही पण ती घरगुती संगीत बारी मला आवडायची..घरातले परिस्थितीचे ओझे थोडे हलके वाटायचे...
हाच नाद शब्द आणि स्वरांचा लागला तो अनेकविध माध्यमातून स्वतःला विसरवायला शिकवून गेला..शाळेच्या प्रार्थनेपासून त्या शब्दाचं आणि सूर-तालाचे महत्व नकळत मनात ठसले..पुढे पाचवी ते आठवी संगीत हा विषय अभ्यासक्रमात आला...मग तर काय..



सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मटंगे सर गाणं शीकवायचे...अगदी सारगम ते रागाच्या आलापी पर्य़ंत..त्यातला भूप राग आजही आठवतो..शब्द होते..
प्रभू नाही कोणी तुजविण...
कदाचित आजही हा राग म
ला आठवत फारसा नाही..पण तो तास मनाला वेगळा आनंद देत असे...
तसाच दुसरा तास म्हणजे चित्रकलेचा... रेघांची मोठी गंमत वाटायची...
कमीत कमी रेषांतून चित्र कसे उमटते याचे कुतूहल आजही माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्य़ांना उमजले नसेल...

आणि बरका, शाळेत एक तास असायचा तो सुतारकामाचा... तगारे सर तो तास मनापासून घ्यायचे..पटाशी, रंधा, करवत..तेव्हापासून माहित झाली...
या सा-यांचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात किती झाला हा भाग गौण..

पण अभ्यासाचा हा ही एक भाग असू शकतो..जो पुस्तकापेक्षा कृतीवर भर देतो..
त्या सा-या शालेय शिक्षणातून व्यक्तिमत्व विकासाची जडण सुरू झाली..

गाण्याच्या क्लास संपला तरी शाळेत गाण्याचे वेड कायम होते.



मला वाटते आठवीच्या स्नेहसंमेलनात त्यावेळचे नाटकाचे शिक्षक आणि पुढे मुख्याधपक झालेले मा.ह.टिळक यांनी द.मा.मिरासदारांची `गाणारा मुलूख` ही एकांकिका बसविली..त्यात दस्तुरखुद्दनी भाग घेतला...घाबरत का होईना रंगमंचावरुन हा गाण्याचा आविष्कार तिथे शेकडो मुलांसमोर करण्याची ती पहिली संधी मिळाली. काम फार नव्हेते तरी सर्व पात्रे गाण्यात बोलतात ...आता भूमिका फारशी आठवत नाही..पण दिलेली नक्कल चोख पाठ आणि न घाबरता केल्याचे स्मरते...
आमच्या शाळेत आठवी पासून कॉमर्स होते...मी ते निवडले..म्हणून तुकडीही `क` मिळाली. कंग्राळकर सर या कॉमर्स विभागाचे प्रमुख होते..मात्र या वाणिज्य शाखेमुळे साहित्य किंवा संगीत याकडे थोडे दुर्लक्ष झाले ..

आयुष्याच्या त्या शाळेच्या दिवसात माझा वाणीज्याशी जो संबंध आला त्यामुळे साहित्य हा काय प्रकार आहे याची कुणकुणही कानी पडली नव्हती...फक्त एकच झाले...मराटीचे शाळेतले सर क.प्र.कुलकर्णी यांना माझे अक्षर आवडल्याने त्यांनी शाळेच्या फलकावर रोजचा `सुविचार` लिहिण्याची जबाबदारी दिली..मी ती अखेरपर्य़त निभावली..त्या निमित्ताने साहित्यातल्या त्या वाक्यांचा संबंध केवळ चांगले विचार एवढयापुरताच आला....
पुढे घरातल्या परिस्थितीने स्वरांशी नाते कमी झाले...कधी काळी आमचे शाळेतले एक सर शंकरराव कान्हेरे यांचा जलतरंगाचा क्लास होता..तो मोती चौकाजवळ होता...त्यांचे वादन आणि त्यांची त्या विद्येतली पारंगतता मला भावली..त्यांचेही आकाशवाणीवर कार्यक्रम होत..म्हणून कधीतरी मी त्या क्लासमध्ये जायचो...आज जे मिलिंद तुळाणकर जलतरंग वाजवतात ते त्यांचे नातू..(मुलीचा मुलगा..)...
दुसरे मात्र संगीताचे सूर गणपतीच्या कार्यक्रमात ऐकण्यात आले...आमच्या आळीत ( आमच्याकडे पेठेला आळी संबोधित असत) दयाळ म्हणून कलावंत होते. स्वतः नगरपालिकेत नोकरी करायचे..पण गायचे छान..त्यातही ते गोंधळी होते..अनेकांकडे गोंधळासाठी ते जायचे..आमच्यामागेच गोंधळी आळीत ते रहायचे..त्या काळातले ते रेडिओस्टर होते..त्याकाळी आकाशवाणीसाठी त्यांना पुण्याला जायला लागायचे..
त्यांचे नाथांचे भारुड अजूनही कानात ऐकू येते...

नेसली ग बाई.
चंद्रकला ठिपक्याची
बाई ठीपक्याची
तिरकी नजर माझ्यावरती
काळ्या ठिपक्याची

------------------------



खरं तर मला संगीत ऐकण्याची विलक्षण ओढ..पण घरातली परिस्थिती आणि त्यासाठी लागणारा वेळ आणि पैसाही ..पण त्यामुळे एक झाले..कलाकार आणि संगीत साथीदार यांच्याबद्दल विलक्षण उत्सुकता निर्माण होई लागली..
जेव्हा सातारला वसंतराव देशपांडे, सुमती टिकेकर यांचे संगीत नाटक आले ..आत्ता नाव आठवत नाही..पण सातारच्या शाहू कला मंदिर मध्ये मी डोअर किपर –लोकांना बॅटरीद्वारे सिट नंबर दाखवायचो...त्या नाटकातील संगीताने मन मोहरुन उठले. ते नाटक गाजले नाही..पण संगीत नाटकाचा ठसा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला...
शंकराराव कान्हेरे यांच्या सहवासात काही संध्याकाळ..त्यांच्या क्लासमध्ये.. मजेत जायच्या. पण संगीत शिकण्याचा माझा मनसुबा आणि ते शिकविण्याचा त्यांचा उत्साह कधीही एकत्र आला नाही.
एकूणच सातारच्या मातीच्या गंध जसा पैलवानी थाटाचा..ऐतिहासिक आणि रांगड्या मुलखाचा आणि सरळ- स्पष्ट बोलणा-या सातारी भाषेचा... त्या माती-पाण्याने मला दिले..संस्कार..संगीताचे...मन सुरेल ऐकण्याचे आणि स्वरांकडे मोहवून टाकणारे..
खऱं तर सातारा सोडण्याआधी कांही महिने सातारला नव्याने होऊ घातलेल्या नावंधरांच्या राधिका टॉकिजच्या सुरवातीचा ट्रायलचा काळ सुरु होता..अमर प्रेम आणि कटी पतंग हे दोन चित्रपटातील काही गाणी तासाठी सतत कानावर पडायची...त्यामुळेही सूर ऐकण्याची इच्छा कायम राहिली..कारण सहा महिने तिथे पहिला बुकींग क्लार्क हणून माझी नेमणूक झाली होती...तीच पुढे पुण्यात आल्यानंतर वाढीला लागली....




पुण्यात ७४ साली आलो ते चाकरीसाठी .नरकेसरी प्रकाशनाचा तरुण भारत या दैनिकात हिशेब विभागात कारकून झालो. तेव्हा पुणं पाहिलं. काहीसे नाराजीने आनुभवले..पण ते पुणं आजही मनात कोरुन राहिले आहे. ११ ते ६ या कामाव्यतिरिक्तच्या वेळेचे  काय  करायचे हा प्रश्न होता. जवळच भरत नाट्य संधोधन मंदिर होते.


तिथे नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे संस्थेचे आध्यक्ष होते. वि. शं. काळे..हे नाव आज कदाचित नविन वाटेल. पण त्यांच्या ओळखीतून भरत नाटय मंदिर संचलित नाट्यशिक्षण वर्गात संध्याकाळी प्रवेश मिळाला..आणि सातारला ज्या कलेची तोंडओळक झाली त्या नाट्यकलेविषयी जाणून घ्यायची ही संधी साधली..आजही नाटकाची..नाळ जुळली आहे ती यामुळेच.

(क्रमशः)


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276