Wednesday, October 17, 2012

बदल साहित्यातून होईल`..






`राजकारणातून समाज बदलणार नाही. तो बदल साहित्यातून होईल`..


- यशवंतराव गडाख 

`अंतर्नाद`चे संपादक भानू काळे यांना स्वतःला वाटले की आपले भाषण लांबले तेव्हा ते ` लवकरच मी थांबणार आहे. लोकही कंटाळळे असतील.`.तेव्हा प्रेक्षकातून एक वाक्य आले..`तुम्ही बोला, आम्हाला अशी भाषणे ऐकायला मिळत नाहीत तुम्ही बोला..`

बुधवारी एस एम जोशी सभागृह तुडूंब भरले. बाहेर वेगळा स्क्रिन लावून आत घडत असलेला कार्यक्रम ऐकण्यासाठी स्वतंत्र सोय करावी लागली. अशी ओसंडून वाहणारी गर्दी..रावसाहेब कसबे म्हणाले देखील , हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमदिरात घ्यायला हवा होता. आमचे चुकलेच.`
 
याचे एक कारण होते.. पुस्तकाला पुरस्कार देण्याचा..तोही अहमदनगरचे राजकीय परिपक्व व्यक्तिमत्व माजी खासदार य़शवंतराव गडाख यांच्या `अंतर्वेध` या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा के.विद्याधर पुंडलिक साहित्य पुरस्कार देण्य़ाचा समारंभ. पुण्यातले वाचक तर होतेच पण माणसांमध्ये वावरणारा राजकारणी म्हणून प्रसिध्द असलेले य़शवंतराव गडाख यांचे असंख्य चाहते निरनिराळ्या गावातून आले होते. त्यांना तिथे असे वक्ते फारसे ऐकाय़ला मिळत नाहीत..


राजकारणी आणि साहित्यिक अशा के. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा त्यांच्या जन्मशताब्दीचा उल्लेख इथे सतत होत होता. आत्ता या काळात जेव्हा राजकारण बिघडत चालले आहे. तेथे गढूळपणा आलाय. तेव्हा राजकारण्यांनी लेखणी हातात घेऊन समाज घडवायला हवाय...अशी वेळ आल्याचे सर्वच जण कळकळीने सांगत होते.


उल्हास पवार म्हणाले `राजकारण घडविण्याची गरज नाही ते आधिच बिघडले आहे, गरज आहे. माणसं घडविण्याची आज ती घडवायला कुणीही नाही. दुस-याचे कौतूक करावे असा शब्दच राजकारणात येत नाही.`

राजकारणातली सगळीच माणसं खराब झालेली नाहीत..काही चांगली माणसं आहेतच म्हणून तर देश चालला आहे..नाहीतर तो केव्हाच खराब झाला असता. य़शवंतराव गडाख यांनी आपल्या सभोवतालचा निसर्ग, समाज आणि माणसांशी केलेला संवाद..म्हणजे हे पुस्तक आहे...असे मत रावसाहेब कसबे यांनी मांडले..

आपण गावगाडा पाहिला. तो पदर धरत ..त्याचा सहवास घेत पुढे गेलो. वाढलो..मोठा झालो..त्यातून जी माणसं दिसली, भावली. त्यांचे चेहरे पुढे आले ते या पुस्तकात आणण्याचा आपण प्रयत्न केल्याचे गडाख सांगतात. साहित्य म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे. जे कथा, कादंब-यातून दिसते. आजचे चित्रपट, त्यातल्या हाणामा-या, त्यातली स्वप्नवत दिसणारी परिस्थिती. त्या मालिकेतले जग..ह्यातून ज्याप्रकारचे स्वप्नरंजन दिसते यातून नवी पिढी निष्क्रिय होते आहे की काय अशी भिती वाटते. जे वास्तव दिसते ते साहित्यातून आले तर ते नव्या पिढीला ते हवे आहे..यासाठी त्यांनी आपले पुस्तक वाचून अनेकांनी सांगितलेले अनुभव अधिक बोलके होते.

आता राजकारणातून समाज बदलणार नाही. तो बदल साहित्यातून होईल, असा विश्वास यशवंतराव गडाख यांना वाटतो. आजची तरुण पिढी वाचते आहे. त्यांच्यापुढे प्रत्यक्षात असणारा संघर्ष, व्यथा साहित्यातून दिसायला हव्यात तरच नवा समाज निर्माण होऊ शकतो, असे त्यांना वाटते.

राजकारण्यांना मनुष्य स्वभावाचे जेवढे आकलन आहे. तेवढे इतरांना नाही हे सांगत राजकारणी नेत्यांना आपण कुणाला जवळ करायचे आणि कोणाला दूर हे चांगले समजते असा टोलाही भानू काळे यांनी मराला .अनुभूतीतून लिहलेले साहित्य म्हणून यशवंतराव गडाख यांच्या पुस्तकातील काही संदर्भ भानू काळे यांनी वाचून दाखविले.

पुण्याच्या साहित्य क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात नोंदला जावा असा एक उत्तम पुरस्कार  सोहळा म्हणून यासमारांभाचा उल्लेख नक्कीच करावा लागेल.




सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 



ग्रामीण आणि शहरी भागातील बदलत्या परिस्थितीचा चिंतनात्मक वेध

अहमदनगरसारख्या कायमच्या दुष्काळी प्रदेशात नंदनवन फुलविणारे कर्तृत्ववान राजकारणी आणि साहित्यिक म्हणजे यशवंतराव गडाख. गल्लीपासून दिल्लीपर्यत आपल्या सामर्थ्याचा ठसा उमटवणा-या गडाखांचे `अंतर्वेध’ या नावाचे तिसरे पुस्तक ऋतुरंग प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकातून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील बदलत्या परिस्थितीचा चिंतनात्मक वेध घेतला आहे.

या पूर्वी त्यांची `सहवास’ आणि `अर्धविराम’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या पुस्तकातले साहित्यमूल्य आपल्याला पानापानावर जाणवत राहते. सत्तरीच्या उंबरठय़ावर असलेल्या गडाखांची उत्साही लेखणीही दिसत राहते. म्हणूनच `सत्तर आणि आनंदाचे अत्तर’ असेच या पुस्तकाबाबत म्हणावे लागेल! या पुस्तकाच्या वाचनाने आपल्याला त्यांच्यातील एक ध्येयवेडा आनंदयात्री दिसत राहतो.

या पुस्तकातून गडाख जीवनप्रवासात भेटलेल्या माणसांची उत्कृष्ट शब्दचित्रे आपल्यापुढे उभी करतात. स्वतःची आणि गावाची प्रगती करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले याचा केवळ पाढा न वाचता परिस्थितीशी केलेला दमदार सामना ते वाचकांसमोर मांडतात. जुन्या घरची आठवण सांगताना घाम आणि अश्रू यामध्ये भिजत ढोपरात मान कशी घातली होती हे ते एके ठिकाणी प्रांजळपणे नमूद करतात. या पुस्तकात आपल्याला गडाखांच्या मनातले घर आणि त्या घरातील माणसे भेटतात. `लग्नघर’मधील त्यांचे अनुभव चिंतनशील आहेत. आयुष्याच्या प्रवासाचे सोबती ताई, मनसुखशेट, पारुबाई ही व्यक्तिचित्रे ते उभी करतात. या व्यक्ती आपल्या मनावर ठसतात.


No comments: