Saturday, August 16, 2025

मी कोण.. चा शोध घेणारा परिणामकारक मंचीय अनुभव कोSहम ..!

 


आजच्या आधुनिक सोशल माध्यमातून प्रत्येकजण सांगतोय..होय मी आहे..
हा मी नेमका कोण आहे.. तुम्ही जिथे कार्य करत
आहात तिथे मी चा शोध घ्या.. आपोआपच निंदनीय विचार सोडून वंदनीय होण्याकडे कल वाढेल ..
आपले अस्तित्व काय आहे..
याचा शोध घेताना काळाच्या उदरात ..इतिहासाच्या .. संत साहित्याछ्या पुस्तकाच्या दुनियेत दडलेल्या गोष्टी आणि आजचा काळ यांची सांगड घालत विराजस कुलकर्णी यांनी याची संहिता लिहिली आहे.
मी.. कोण आहे..याचा डोळसपणे विचार पुढे नेणारा हा एक नाट्यमयरित्या मंचीय दर्शन देणारा अनुभव..म्हणजेच कोSहम..
पुण्यात १५ ऑगस्टला या दोन अंकी नाट्यानुभवचा शुभारंभाचा प्रयोग पाहण्यात आला.. त्यानिमित्ताने हे टिपण करावेसे वाटले.



आजच्या इंटरनेटच्या काळात याच मी...चे महत्व असलेल्या तरुणाईला सहज वाचता वाचता त्याला तुकाराम महाराजांची ओवी वाचायला मिळाली..
रडोनियां मान ।
कोण मागतां भूषण
रडता रडता कौतुक मागून काय उपयोग
लावितां लावणी ।
विके भीके केज्या दानी ॥
अर्थ एव्हढाच स्वतः शेतात खपून पिकविलेले धान्य..आणि रस्त्यात भीक मागून गोळा केलेले गहू.. यात फरक आहे..
गो.नी दांडेकर .. आपले पणजोबा यांच्या मोगरा फुलला..संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर.. तुला आकाशा एवढा..ही तुकारामांच्या जीवनावर..आणि कादंबरीमय शिवकाल..ही शिवाजी महाराज यांच्यावरील जीवनावरील लिहिलेल्या संचातील घटना.. यातील निवडकभाग घेऊन त्याला काळाशी सुसंगत अशी जोडणी करून विराजस यांनी ..आयुष्याच्या अस्तित्वाचा विचार.. कोSहम यातून उतरविला.. सुमारे ३७५ वर्षापूर्वी संतानी आणि मोठ्या लोकोत्तर पुरुषांनी आपल्या आयुष्यात केलेल्या विचारांचा ..आणि आपण का आलो..आपले ध्येय काय..याचा घेतलेला हा शोध यानिमित्ताने पुन्हा तरुण रंगकर्मींना घ्यावासा वाटला..तो पट ..आजच्या आधुनिक काळातही किती महत्वाचा आहे..हेच यातून मांडण्याची ही दोन अंकात मंचीय दर्शन देणारी कलाकृती निर्माण केली..हे याचे महत्व अधिक आहे..



हे मऱ्हाठी भाषेचे त्या काळाचे संस्कार इथे एकत्र होऊन त्यातून ते अनुभव वाचले जातात.. गोष्टीत तो बाज..आणि साज चढवत अभिवाचन करणारे कसदार अभिनेते प्रसंग रसिकांच्या मनावर संस्कार करत..तो विचार व्यक्त करतात..हे याचे वैशिष्ट्य आहे.
याचे संकलन करताना मधुरा देव यांचा विचार असा होता.. कोs हम - संकल्पना म्हणून संत चरित्रात असंख्य ठिकाणी सापडते- जी आजच्या काळातही सर्वार्थाने लागू आहे आणि भविष्यात ही हे ‘शहाणपण’ उपयुक्त असणार आहे.
महाराष्ट्रात आणि मराठीत इतकं मोठं भांडार अनेक शतकांपासून उपलब्ध आहे त्याचा शहाणा वापर, जाणीवपूर्वक करता येईल; जेणेकरून जनमानस सुसह्य आणि आनंददायी जीवन मिळवू शकतील. संतवाड्मय आणि आप्पांच्या लेखनाचे आपल्याकडे उपलब्ध असलेले हे भांडार पुन्हा एकदा लोकाभिमुख आणावे हा विचार प्रामुख्याने होता.
आणि अर्थातच आप्पांच्या लेखनातले कोणते प्रसंग निवडावे इथे माझी मदत झाली.
आणि त्याची बांधाबांध विराजसने यथार्थ केली.. असे त्या सांगतात.




तोच नाट्यानुभव म्हणजे कोहम ही कलाकृती..
यात अभिवाचन आहेच..पण ते करताना ते कलावंत अभिनय साकारतात..वेशभूषा..संगीत.. यातून ..
त्याला जोडली गेली आहे ती नृत्यभाषा..
असा हा एक परिपूर्ण अनुभव देणारा प्रयोग नुकताच मुंबईत झाला..आणि आता पुण्यात होतो आहे.. ते प्रयोग आहे..आणि इथे कलाकार हातात वाचनाची पोथी घेत ते अनुभव परिपूर्ण रित्या. उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न करतात..हे नक्कीच.
एके काळी ही तो श्रींची इच्छा..ही आप्पांची कादंबरी..वाचनासाठी घेऊन त्यातून अभिवाचन कसे असावे हे सांगणारे डॉ. वीणा देव.. डॉ. विजय देव..सोबत..मृणाल देव..कुलकर्णी आणि रुचिर कुलकर्णी यांचे हे रूप अनुभवले..
आणि आता इतक्या वर्षानंतर आपल्या पणजोबा यांची साहित्य कृती घेऊन त्याला अशा नव्या स्वरूपातील अभिवाचना द्वारे..नव्या स्वरूपात कार्यक्रम करण्याचे सुचणे..हीच तर एका पिढीची परंपरा पुढे नेण्याचे काम होत आहे. याचे
स्वागत करायलाच हवे.. इतके ते परिपूर्ण आहे.



आजच्या आधुनिक काळात मी पणाचा बडेजाव मिरविणाऱ्या युगात..अंतर्मुख करणारा ..विचार करायला लावणारा अनुभव देणारा हा नाट्यानुभव थिएटरॉन एंटरटेनमेंट ..यांनी दिला आहे..
या तरुण रंगमंच करणाऱ्या कलावंतांना हा विषय .. तोही संत ज्ञानेश्वर..तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज ..यांच्या जीवनचरित्रातून घ्यावासा वाटावा हेच खूप मोलाचे आहे..



शिवानी रांगोळे.. शिवराज वायचळ आणि मृणाल कुलकर्णी..या तिन्ही कलावंतांनी. ती भाषा..त्यातील भावना.. ते प्रसंग रसिकांच्या मनावर आपल्या वाचिक आणि शारीरिक अभिनयातून बोलते केले असे म्हटले तर योग्य ठरेल..
आवश्यक तेव्हढीच..पण परिणामकारकता वाढविणारी मदत घेत फुलवा खामकर यांच्या नृत्य दिग्दर्शनातून हा मंचिय अनुभव अधिक उठावदार होत रहातो.



साजेसे अभंग..तो भक्तीचा भाव..निषाद गोलांबरे यांनी संगीतातून दिला आहे. याचे संकलन मधुरा देव यांचे आहे.
सुरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी आपल्या दिग्दर्शनातून कोSहम रसिकांना अनुभवण्यास अधिक परिणामकारक सादर केले आहे. प्रयोग मोहित करणारा होतो.



संकेत पारखे, विक्रांत पवार, साज जोशी, शताक्षी पंडित यांनी हा मंचीय अनुभव देण्यासाठी याथसार मदतच केली आहे.

- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

No comments: