Saturday, November 26, 2022

अभिनयाचा स्वामी हरपला!

विक्रम गोखले हे नाव व्यावसायिक रंगमंचावर प्रथम झळकले ते चंद्रलेखेच्या स्वामी या नाटकातून.. उत्तम शरीरयष्टी, गोल भाऊक चेहरा, उत्तम वाणी आणि सहज अभिनय यामुळे विक्रम गोखले रंगभूमीवर रसिकांच्या नजरेत भरत असत. माधवराव पेशवे यांच्या वेषात त्या भूमिकेचा रुबाब खरोखरच गोखले यांच्यात रसिकांचे डोळे आणि मन सुखावणारा होता.. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य होते त्यात त्यांचेसोबत सहकलाकार होत्या वृषाली सुळे.. त्यांची रमाची भूमिका केली होती.नंतर मात्र त्या विक्रम गोखले यांच्या आयुष्यात पत्नी वृषाली गोखले म्हणून प्रवेशित झाल्या.. या नाटकाने इतिहास घडविला. याचा शंभरावा प्रयोग शनिवारवाड्यात दिमाखात झाला होता.. त्याआधीही बाळ कोल्हटकर यांच्या वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातून त्यांचे नाट्यक्षेत्रात पाऊल पडले होतेच..पण स्वामी नाटकाने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मग आले बॅरिस्टर! स्वामी नाटकाचा विक्रम होतो ना होतो तोच गोवा हिंदू असोसिएशकडून विजया मेहता यांचे दिग्दर्शन लाभलेले नाटक विक्रम गोखले यांना लाभले. त्यांनी या नाटकाचे सोने केले.. सुहास जोशी आणि विक्रम गोखले यांच्या यातल्या भूमिका अंगावर काटा आणीत असत..त्यात विजया मेहता आणि चंद्रकांत गोखले यांचाही अभिनय रसिक विसरू शकणार नाहीत. नाट्यसृष्टीत रमता रमता त्यांनी राजदत्त यांनी वऱ्हाडी आणि वाजंत्री चित्रपटात प्रथम विक्रम गोखले यांना नायकाची भूमिका दिली. पुढे जोतिबाचा नवस या चित्रपटासाठी कमलाकर तोरणे यांनी त्यांना या क्षेत्रात अधिक उमदा रोल दिला.
पुढे तिथेच ते अनेक चित्रपटांमधून स्थिर झाले..मला आठवते ते गोविंद घाणेकर यांच्या कैवारी चित्रपटात त्यांची वेगळी भूमिका गाजली. हळूहळू हिंदी चित्रपटातून ते वावरू लागले. मला त्यांची छोटी भूमिका होती आजही आठवते ती श्रीकृष्णाची. चित्रपट होता स्वर्ग नरक.. गाजली . पुढे संकेत मिलनाचा नाटकाने वेगळी ओळख करून दिली..स्वाती चिटणीस आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने हे नाटक गाजले. वऱ्हाडी आणि वाजंत्री पासून कळत नकळत, महानंदा कितीतरी मराठी चित्रपटातून विक्रम गोखले प्रेक्षकांच्या नजरेत भारून गेले होते. कलाक्षेत्रात असताना त्यांनी कधीही राष्ट्रभक्तीशी दुरावा केला नाही..सामाजिक भान जपता जपता प्रसंगी राग आला तरी त्यांनी आपले वेगळे मत ठामपणे मांडले. कला आणि सामाजिक भान दोन वेगळी ठेवली..
कणखर वृत्ती आणि देशभक्तीची आस ते नेहमीच जपत असत. स्पष्ट बोलणे हा तर त्यांचा स्थायीभाव होता. आजी कमलाबाई गोखले, वडील चांद्रकांत गोखले यांच्या नंतर अभिनयाचा वारसा त्यांनी कायम ठेवला. विक्रम गोखले मोठ्या अभिमानाने आणि तेजस्विपणे ते अखेरर्यंत जगले..असा राष्ट्रप्रेमी माणूस आणि एकनिष्ठ कलावंत पुन्हा होणे नाही.. आमच्यासारख्या रसिक, प्रेक्षकांची विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली! - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com
*'अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) *विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५) *‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार *हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार (४-८-२०१७) *पुलोत्सव सन्मान (डिसेंबर २०१८) *चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार

Wednesday, November 16, 2022

विजयनगर साम्राज्य इतिहास आणि वास्तव...

हम्पी या विजयनगरच्या खुणा दाखविणारे पुरातन मंदिरे, जुन्या शिल्पकला आणि त्या वैभवी परंपरेचे अवशेष पाहताना त्याविषयी अनुभव तर्फे लोकेश या आमच्या मार्गदर्शक व्यक्तीने तो सारा इतिहास असा समोर उभा केला.. आम्ही सारे अनुभवचे सुमारे ३६ प्रवासी यात सामील होऊन या भौगोलिक इतिहासाचे साक्षीदार बनलो.. तरुणाई इथे एकत्र होतो.. उत्तम व्यवस्था, जातीने लक्ष, भरपूर खुराक, छान भोजन आणि सुखकर १२ सिटर चार गाड्या होस्पेट, हम्पी, बदामी आणि अखेरीचा टप्पा विजापूर येथे आमच्या गाड्या जोडीने कर्नाटकात फिरत होत्या..जाहिरात न करता अनुभवचे सुरक्षित कवच आमच्या पाठी उभे होते.. आठवडाभर आम्ही विविध क्षेत्रातील तरुणाई इथे एकत्र होतो....

Monday, November 14, 2022

यात नवे ते काय?

जर काही मला नवे वाटले तर ते तुम्हाला सांगावेसे वाटते.. मला त्याचीच तर आवड आहे. जे जे आपणासी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन! बरोबर ना!

Saturday, January 15, 2022

तारेवरची कसरत...भालचंद्र देव

ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि गुरू पं. भालचंद्र देव यांचे ११ जानेवारी २०२२ ला तीव्र हृदयविकाराने पुण्यात निधन झाले..त्यांनी ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वतःच्या आयुष्याचा धावता आढावा लिहून माझेकडे दिला..तोच त्यांचा जीवनप्रवास मी इथे देत आहे.. -सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे
माझा जन्म मुंबईचा. साल १९३६. माझे वडील दामोदर चिंतामण देव हे ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक कै. पंडीत अनंत मनोहर जोशी उर्फ अंतूबुवा यांचे शिष्य. ते मुंबई महापालिकेच्या गुजराथी शाळेत संगीत-शिक्षक होते. ते उत्तम गात आणि हार्मीनियमही वाजवीत असत. बालपणापासून माझ्यावर सुरांचे आणि तालांचे संस्कार झाले. पुरंतु अंतुबुवांचे चिरंजीव पंडित गजाननबुवा जोशी यांचे व्हायोलीन वादन माझ्या वडीलांना फार आवडायचे आणि आपल्या एका तरी मुलाने व्हायोलीन शिकावे व त्यात नाव कमवावे असे त्यांच्या मनात होते. म्हणून त्यांनी कोठून तरी एक लहान आकाराचे व्हायोलीन माझ्यासाटी पैदा केले. ते माझ्या हातात देऊन सुरवातीचे स्वरपाठ मला शिकवायला सुरवात केली . आणि काय योगायोग...मला ते जमू लागले. माझ्या थोरल्या भावाला हार्मानियम आणि मला व्हायोलीन असे शिक्षण सुरु झाले. त्यावेळी माझे वय ९ वर्षाचे होते. व्हायोलीनचे तंत्र मला जमते आहे असे पाहिल्यावर वडील स्वतः हार्मोनियम वाजवीत व मी त्यांच्या बरोबर व्हायोलीन वाजवित असे. कधी कधी थोरला भाऊ हार्मोनियम, मी व्हायोलीन आणि वडील डग्ग्यावर ठेका धरीत. त्यामुळे सुराबरोबरच तालात वाजविण्याची मला सवय झाली. कधी कधी वडील मला त्यांच्या शाळेत घेऊन जात व तिथल्या मुली व शिक्षिका यांच्यासमोर मला व्हायोलीन वाजविण्यास सांगत. पुढे वडील सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही आमच्या गावी म्हणजे पुण्याजवळच्या चिंचवडला स्वतःच्या घरात रहायला गेलेो. परंतु मला पुण्याच्या शाळेत घातल्यामुळे मी बराच वेळ घराबाहेर असे आणि घरी आल्यावर दमून जात असे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी पटकन माडीवर जाऊन झोपून जात असे.. परंतु वडील मला खाली बोलवीत व अर्धा तास रियाज करावयास लावीत. मला त्या वेळी या गोष्टीचा राग येत असे परंतुत्याचे महत्व आता मला पटते. गावातील निरनिराळ्या उत्सवात माझे वादन होत असे. तेव्हा चिंचवड गावात मीच एकटा व्हायोलीन वाजविणारा व तो ही वयाने लहान. त्यामुळे लोकांकडून भरपूर कोतूक होई. चिंचवडला आम्ही तीनच वर्षे राहिलो. नंतर आमच्या शिक्षणासाठी वडीलांनी पुण्याला जायचे ठरविले. लवकरच पुण्यास कसबा पेठेतील मोटे मंगल कार्यालयात आम्हाला जागा मिळाली व आम्ही पुणेकर झालो. शाळेत जाणे-येणे सोपे झाले. त्यामुळे व्हायोलीन वादनासाठी अधिक वेळ मिळू लागला. आमच्याच वाड्यात प्रसिध्द गायक व हार्मानियम वादक पं. बबवराव कुलकर्णी रहात होते. घरातच त्यांचा क्लास होता. त्यांचीही ओळख होउन मी मार्गदर्शनासाठी त्याेच्याकडे जाऊ लागलो. ते शास्त्रीय संगीत तर गायचेच परंतु भजन, गौळणी, अभंग, अष्टपदी, ठुमरी, भावगीत असे प्रकारही फारच सुंदर गायचे. हळू हळू त्यांच्याबरोबर कार्यक्रमातही साथ करु लागलो .असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात मी दुर्गा राग वाजवीत होतो. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. माझे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून मला मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती. माझी मावसबहिण सौ. लीला इनामदार ( प्रसिध्द गायिका सौ. प्रतिभा इनामदार यांची सासू) लग्नापूर्वी आमच्या घराजवळच रहात होती. तिचा गळा अतिशय गोड होता व अनेक जुनी भावगीते तिला येत होती. वडिलांनी मला काही दिवस तिच्याकडे शिकण्यासाठी पाठविले. तिच्याकडून मीही काही गाणी वाजविण्यास शिकलो. गजाननबुवांच्या घरी तालीम इतक्यात एक नामी संधी चालून आली. पं. गजाननबुवा डोंबिवला रहायला आल्याचे थोरल्या भावाकडून समजले. या संधीचा फायदा घ्याचा असे वडिलांनी ठरविले. मला डोंबिवलीस भावाकडे पाठविले. गुरूबंधूचाच मी मुलगा असल्यामुळे बुवा मला शिकविण्यास आनंदाने तयार झाले. मी प्रथम त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला त्यांनी थोडेसे व्हायोलीन वाजवावयास सांगितले. मी सारंग रागातील `ब्रिजमे दधी बेचन जात सखी..`ही चीज वाजवून दाखविली. मग बुवांनी व्हायोलीन काढले आणि सुमारे अर्धातास नुसते `सारेगम`...चे निरनिराळे पलटे बाजवून दाखविले. ते ऐकून मी प्रभावित झालो..घरी जाऊन तसे वाजविण्याचा प्रयत्न करु लागलो. बुवांच्या घरी मला मुक्त प्रवेश होता. सकाळी ७ वाजता मी तिथे हजर राहून तंबोरे पुसून ठेवीत असे. थोड्याच वेळात बुवा येऊन बसत. त्यांचा मुलगा मधू आणि इतर चार-पाच शिष्य शिकवणीसाठी बसत. मी तंबोरा वाजवीत असे आणि ते सारे श्रवण करीत असे. त्यांचा धाकटा मुलगा नारायण नुसत्या डग्ग्यावर ठेका धरीत असे. त्यांनतर थोड्या वेळाने बुवा व्हायोलीनच्या रियाजाला बसत. कधी कधी मला ठेका धरायला सांगत ..असे दिवसभर कधी गाणे ..तर कधी व्हायोलीन वादन चालू असे. दिवसभर ऐकलेले कानात साठवून घरी आल्यावर मी आठवेल तसे लिहून काढत असे..आणि मग त्याचाच रियाज करीत असे.. रविवारी बुवांकडे दिवसभर निरनिराळे कलाकार तबला वादक येत असत. त्यामुळे भरपूर ऐकायला मिळे. मुंबईत कुठे बुवांचा कार्यक्रम असेल तर मी तंबो-याच्या साथीस जात असे. त्यामुळे मैफलीत बुवा कसे वाजवतात हे जवळून अनुभवायला मिळाले..या काळात बुवा सांगतील त्या वेळेला मी त्यांचेकडे हजर रहात असे. या माझ्या वक्तशीरपणावर आणि एकंदरीतच प्रगतीवर बुवा खूष होते. १९५६ ते १९५८ या तीन वर्षांच्या काळात मला बुवांचा दीर्घ सहवास लाभला. आणि माझ्यावर संगीताचे उत्तम संस्कार झाले. गजाननबुवांकडे असताना ते मला मधुनच तबल्याचे बोल सांगत आणि ते पाठ करुन ताल देऊन म्हणायला सांगत. त्यांच्याकडून निघताना त्यांनी मला पुण्यातील प्रसिध्द तबला वादक सूर्यकांत उर्फ छोटू गोखले यांच्याकडे तबला शिकण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन वर्षे मी त्यांच्याकडे तबला शिकलो. १९५८ मध्ये मला टेलिफोन खात्यात नोकरीची संधी आल्यामुळे मी बुवांचा निरोप घेतला आणि पुण्याला परत आलो. `आकाशवाणी`चाही उपयोग कसबा पेठेत रहात असताना बाहेरच्या खोलीतील फडताळात एक रेडिओ होता. त्यावर दररोज सकाळी आणि दुपारी नियमितपणे शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम होत असे. त्या कार्यक्रमातील गायकाच्या वा वादकाच्या स्वरात मी माझे व्हायोलीन ट्यून करुन त्यांच्याबरोबर वाजवीत असे. त्यामुळे साथ करायची सवय झाली. दिवाळीत रेडिओ संगीत संमेलन असे. ते रात्री सोडनऊला सुरु होत असे आणि रात्री एक पर्यंत चालत असे. त्यात अखिल भारतीय कीर्तिच्या गायक-वादकांचे कार्यक्रम होत. त्या कार्यक्रमाबरोबर सुध्दा मी हळू आवाजात साथ करीत असे. त्यामुळे अनेक रागांची व तालांची माहिती झाली. एकच राग निरनिराळे गायक- वादक कसा रंगवतात हे लक्षात आले. त्याचा मला माझे वादन सुधारण्यात खूप फायदा झाला. भरपूर रियाज केला आणि आकाशवाणीची अॉडिशन दिली. त्यात उत्तीर्ण होऊन रेडिओवर कार्यक्रम करू लागलो.मनात एकच इच्छा होती की आपले वादन गुरूजींना कसे वाटत असेल.. पण ती हि इच्छा लवकरच पूर्ण झाली. एकदा मी सकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावरुन व्हायोलीनवर वाजविलेला राग `हिंडोल` तिकडे डोंबिवलीला गजाननबुवांनी ऐकला आणि लगेच मला त्यांचे एक पत्र भारत गायन समाजाच्या पत्त्यावर आले. त्यात त्यांनी लिहले होते.. `तुझा सकाळचा हिंडोल ऐकला. खूप आनंद झाला. आता तुझी उत्तम प्रगती झाली आहे..`... ते पत्र मी अजूनही जपून ठेवले आहे. तसच मंगळवारच्या संगीत सभेत दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित झालेला राग मारुबिहाग वडिलांनी ऐकला. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांचे भरभरुन आशीर्वाद मिळाले. टेलिफोन खात्यात लागल्यावर १९६० साली झालेल्या लखनौ येथील सांकृतिक स्पर्धत मला सुवर्णपदक मिळाले आणि पुढे ती प्रथा मी जवळजवळ २० वर्षे कायम राखली. पुण्यात त्या वेळेस आणखी एक गायक प्रसिध्द होते. ते म्हणजे पं. नागेश उर्फ राजाभाउ खळीकर. वडील मला त्यांचेकडे घेऊन गेले आणि याला तुमच्या साथीला घ्या म्हणून विनंती केली. खळीकरबुवा थोड्या नाखुषीनेच म्हणाले, `मी साथीला व्हायोलीन आत्तापर्यंत कधीच घेतले नाही, कारण ते सुरेल वाजेलच याची मला खात्री वाटत नाही. परंतु तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने माझ्याकडे आलात तर याला एक संधी देऊन पाहतो.` दुसरे दिवशी सकाळी त्यांनी मला व्हायोलीन घेऊन घरी बोलावले. त्यावेळी ते रियाजाला बसले होते. सुमारे दीडतास निरनिराळे प्रकार ते गायले .रियाज संपल्यानंतर प्रफुल्लीत नजरेने ते म्हणाले, `वा. देवा.. आज तुम्ही माझी समजूत खोटी ठरविलीत. आजपासून तुम्ही माझ्या कार्यक्रमात व्हायोलीनची साथ करा. तेव्हापासून मी त्यांचीही साथ करु लागलो. पहिली बिदागी १९६१च्या पानशेत पुराच्या आधी पाच-सहा दिवस खळीकरबुवांचा भारत गायन समाजात गाण्याचा कार्यक्रम ठरला. कार्यक्रम रात्री साडेनऊ वाजता होता. बुवा मला म्हणाले, `माझा भारत गायन समाजात कार्यक्रम आहे. तू साथीला येशील काय.. बिदागी वगैरे काही मिळणार नाही.. ` मी म्हणालो, `इतक्या चांगल्या व पवित्र वास्तूत आपल्याबरोबर मला वाजवायचा योग मिळतो आहे याहून भाग्याची गोष्ट कोणती. मला काहीही नको..` ठरल्याप्रमाणे बुवांचा कार्यक्रम रात्री सुरु झाला. हार्मोनियच्या साथीला ज्येष्ठ हार्मोनियमवादक बंडोपंत साठे आणि तबल्याच्या साथीला ज्येष्ठ तबलावादक दत्तोपंत राऊत होते. बुवा अगदी अटीतटीने गात होते. समोर श्रोत्यात सरदार आबासाहेब मुजुमदार, हिराबाई बडोदेकर, दत्तोपंत देशपांडे, प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. ग. ह. रानड़े असे मान्यवर उपस्थित होते. त्या दिवशी माझी साथही हार्मोनियमच्या बरोबरीने झाली व मी श्रोत्यांची वाहवा मिऴविली. विशेष म्हणजे, बिदागी ठरलेली नसताना भारत गायन समाजाच्या प्रमुखांनी मला स्वखुशीने १५ रुपये बिदागी दिली. १९६२ साली माझे लग्न झाले. पत्नी सौ. निलाला गाण्याची आवड होती. तीही माझ्या वडिलांकडे हार्मोनियम शिकू लागली होती. परंतु लग्न झाल्यावर तीन महन्यातच माझी आई अर्धांगवायूने आजारी प़डली आणि सौ. चे हार्मोनियम शिकणे बंद झाले ते कायमचेच. पुणे विद्यापीठाची डिप्लोमा इन म्युझिक परिक्षा प्रथम श्रेणीत पास झालो. तसेच भारत गायन समाजाची संगीत विशारद परिक्षाही प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झालो. हिराबाईंची साथ एकदा माझा मित्र रमेश सामंत संध्याकाळी माझ्याकडे आला व मला व्हायोलीन बरोबर घेण्यास सांगून त्याने मला सरदार आबासाहेब मुजुमदार यांचेकडे नेले. तिथे त्यांच्या दिवाणखान्यात हिराबाई बडोदेकरांचे गाणे होते. रमेश तबल्याच्या साथीला होता व मला त्याने व्हायोलीनच्या साथीला बसवले. या अचानक प्रकाराने मी गांगरुन गेलो. परंतु लगेच मी स्वतःला सावरले आणि जमेल तशी साथ करु लागलो. हिराबाई गाताना अत्यंत शांत व तेजोमय वाटत होत्या. गाणं संपल्यावर रमेशने मला साथ चांगली झाल्याचे सांगितले. हा एक माझ्या आयुष्यातील अत्युच्य आनंदाचा क्षण होता. कालातरांने भारत गायन समाजात मला व्हायोलीन शिक्षक म्हणून पार्टटाईम नोकरी मिळाली. नोकरी सांभाळून संध्याकाळी मी तिथे शिकवित होतो. माझी कन्या चारुशीला आता ९ वर्षांची झाली होती. तिच्या हातात मी माझे व्हायोलीन दिले आणि शिकविण्यास सुरवात केली. लहानपणापासून ती व्हायोलीन ऐकत असल्यामुळे तिनेही ते लवकरच आत्मसात केले. शाळा-कॉलेजाजीतील कार्यक्रमातही ती भाग घेत आसे. भारत गायन समाजाची संगीत विशारद आणि एस.एन.डी.टी.ची एम.ए.(संगीत) परिक्षा ती प्रथम श्रेणीत पास झाली. `स्वरांनद`चा हिस्सा एकदा मला स्वरानंद संस्थेचे संस्थापक प्रा. प्रकाश भोंडे यांचा निरोप आला की, त्यांच्या संस्थेत यावे. त्यावेळी `स्वरांनद`, हा मराठी गाण्यांचा महाराष्ट्रात एक अग्रगण्य वाद्यवृंद होता. त्यात वाजविण्याची संधी मिळते आहे.म्हटल्यावर मी लगेच तिथे दाखल झालो. संस्थेचे महाराष्ट्राबाहेरही बरेच कार्यंक्रम होत. वाद्यवृंदात वाजविल्यामुळे नोटेशन लिहिण्याची आणि वाजविण्याची सवय झाली. अनेक प्रतिथयश गायक, गायिका आणि वादक ह्या वाद्यवृंदात होते. थोड्याच दिवसात प्रा. भोंडेंनी चारूलाही बोलावले. अशा त-हेने आम्ही दोघेही स्वरानंदचा अविभाज्य घटक झालो. सुप्रसिध्द संगीतकार व गायक गजाननराव वाटवे, बबनराव नावडीकर, अरूण दाते, यशवंत देव यांच्या बरोबरही वाजविण्याचा योग आला. आनंद माडगूळकर यांचेबरोबर गीतरामायणाचे अनेक कार्यक्रम वाजविले. सुप्रसिध्द तबलावादक आणि आयोजक अजित गोसावी यांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमातही साथ केली. सुप्रसिध्द नकलाकार वि.र. गोडे यांच्या ``अंतरीच्या नाना कळा ``,या कार्यक्रमातही अनेक वर्षं साथ केली. शिवाय आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील निरनिराळ्या कार्यक्रमात साथ केली.
मी आणि कन्या चारुशीला गोसावी यांनी मिळून `स्वरबहार` नावाचा जुगलबंदीचा कार्यक्रम सुरु केला आणि एकाच बैठकीत शास्त्रीय व सुगम संगीत ऐकविण्याचा नवा पायंडा पाडला. हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला. काही वर्षांपूर्वी आमची दोघांची जुगलबंदीची `हेरिटेज` नावाची सीडीही निघाली.
१९९४ मध्ये मी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर टेलिफोन खात्यातून सेवानिवृत्त झालो. परंतु सेवानिवृत्तीनंतर येणारे रिकामपण मला माझ्या व्हायोलीनने कधीच जाणवू दिले नाही. आजही वयाच्या ८१ व्या वर्षीही मी पूर्णपणे माझ्या कलेत मग्न आहे. भारत गायन समाजास ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक समारंभ आयोजित केला होता. त्यात संगीतकार नौशाद आलि यांच्या हस्ते माझा `आदर्श शिक्षक` म्हणून गौरव करण्यात आला. माझ्या आकाशवाणीवरील शास्त्रीय वादनाच्या कार्यक्रमाला १९१६ मध्ये ५३ वर्षं पूरी झाली ही आयुष्यातील मोठी आनंदादायी घटना आहे. पाच वर्षापूर्वी पं. गजाननबुवांच्यावर एक माहितीपट निघाला. त्यात बुवा व्हायोलिनचा रियाज करीत आहेत असा एक प्रसंग होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली. तसेच बुवा लहानपणी औंधला महाराजांच्या कीर्तनात व्हायोलीनची साथ करीत. बाल गजाननबुवांच्या जागी एका १०-१२ वर्षाच्या मुलाची निवड झाली आणि त्या प्रसंगीही मी व्हायोलीनवर ``जय जय राम कृष्ण हरी,`` वाजविले. मी २०१४ साली भारत गायन समाजातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. कारण उतारवयामुळे मला तिथे जाणे-येणे त्रासदायक वाटू लागले. भारत गायन समाजातील ४६ वर्षांची प्रदीर्घ सेवा हा माझ्या आयुष्यातील ऐक आनंदाचा काळ होता.
याच वर्षा मला मुंबईच्या `रायकर व्हायोलीन अॅकॅडमी `कडून सत्कार स्वीकारण्यासंबंधी विचारणा झाली आणि ती मी मान्य केली. पं. डी.के.दातार यांच्या उपस्थितीत पुण्याचे प्रख्यात व्हायोलीनवादक उस्ताद फैय्याज हुसेन खॉसाहेब यांचे हस्ते मला `व्हायोलीन गुरू `ही उपाधी देण्यात आली. आता मी वयाची ८० वर्षे पार केली आहेत. अजूनसुध्दा मी घरी काही विद्यार्थ्य़ांना विद्यादान करीत आहे. आजपर्य़तच्या या माझ्या सांगितिक वाटचालीचे श्रेय प्रथम मी माझे पिता कै. दामोदर चिंतामण देव यांना देतो. कारण लहानपणीच त्यांनी माझ्यातील कलागुण हेरून मला व्हायोलीन शिकविण्यास उद्युक्त केले आणि पुढेही सतत प्रोत्साहन देत राहिले. तसेच माझ्या सौभाग्यवतीने ( सौ. नीला देव) मला उत्तम साथ दिली. शेवटी सर्व गुरूजनानांना आणि परमेश्वराला वंदन करून माझे हे मनोगत संपवितो. -भालचंद्र देव, पुणे

Sunday, November 14, 2021

शिवकाल मनामनात कोरणारा शिवशाहीर हरपला

आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास पुस्तके, कथा, आवाज आणि नाट्यमय पद्धतीने जगभर सांगणारा शिव शाहीर सोमवारी पहाटे आपल्यातून कायमचा निघून गेला.. त्यांची तेजस्वी प्रतिमा मराठी माणसाच्या मन मनावर कायमची करण्याचे काम निष्ठेने आणि अभ्यासपूर्वक आयुष्यभर करणारे बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून कायमचे हिरावून घेतले.. सुमारे साठ वर्षांपूर्वी सातारच्या जलमंदिरात सुमित्राराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचा इतिहास आठ दिवस रोज ऐकताना बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रभावी वक्तृत्वाची साक्ष समक्ष घेता आली.. त्यांनी तो इतिहास ज्या पद्धतीने कथानकातून मांडला तो ऐकताना सारे सातारकर त्या अनुभूतीने भारून गेल्याचे अनुभवत होतो..आजही ते चित्र डोळ्यासमोर उभे रहाते.. पुण्यात आल्यावर त्यांचा परिचय आणि थोडा सहवासाही लाभला.. आयुष्य सारे देशाच्या राष्ट्रभक्तीने कसे वेचले ते ऐकले होते..आता प्रत्यक्ष ते पहात होतो.. गोवा मुक्तीसाठी त्यांचे योगदान होते.. त्यांची पुस्तके ऑडीओ स्वरूपात बाजारात आली.. मग पुढे जाणता राजा हे महानाट्य त्यांनी भव्य अशा स्वरूपात सादर केलेले रेणुका स्वरूप प्रशालेत केलेले अनुभवले.. नाटक, संगीत, साहित्य या तिन्ही क्षेत्रात त्यांची तळपती वाणी अनेकविध कार्यक्रमात समोर बसून ऐकली. हे बुद्धिमान तेजस्वी व्यक्तित्व स्वभावातून अधिक कोमल आणि वाणीतून जाज्वल्य अभिमानाचे असल्याचे स्पष्ट पाहिले.. त्यांची ती मुजरा करण्याची पद्धत आणि लहान असलेल्यालाही आदराने वागविण्याची सवय मनात कायमची कोरली गेली.. दिलेली वेळ पाळण्याची त्यांची शिस्त अनेकांना पचनी पडत नव्हती. बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, भालजी पेंढारकर हे त्यांचे आदर्श.. आपल्या बालपणी भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी लावलेली इतिहासाची गोडी ते आजही जाणीवपूर्वक अभिमानाने सांगत असत. वयाची शंभरी गाठून ते सरस्वतीच्या दरबारात कायम नांदत असत.. आज त्यांच्या जाण्याने तो बहुमोल ठेवा मराठी माणसांना लाभला..त्याची जपणूक करून बाबासाहेबांचे काम कायमस्वरूपी इतिहास बनून राहील. बाबासाहेबांचं बहुमोल कार्य जगात भूषणावह ठरेल यात शंका नाही.. - सुभाष इनामदार..

Saturday, June 5, 2021

तरल प्रतिभेच्या शांताबाई शेळकेआनंदपर्व .. कॅसेटवर तयार करत असलेला दिवाळी अंक  १९९७ साली पुण्यात तयार  होत होता..फ्लॅश म्युझिकच्या वतीने फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्यावतीने दोन भागात ही तयार होत होती.. सर्व लेखक आपल्या कथा, कविता आणि लेख यात वाचणार होते.. 

दिवाळीच्या वातावरणाचे दर्शन शब्दातून करणारी एकरचना मला हवी होती..मी तडक शांताबाई शेळके यांना फोन केला.. मला त्यांनी अतिशय सहजी बोलण्यातून ही संकल्पना समजून घेऊन दुपारीच घरी बोलावले ..येताना त्यांनी मला भेळ आणायची आठवण केली..ती घेऊनच मी सातारा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या भावाच्या घरी हजर झालो..

आधी भेळेचा आस्वाद घेत त्यांनी ही कॅसेट कशी असेल.. त्यात कोण काय करेल ह्याची विचारणा करून सारा आराखडा समजून घेतला आणि चटकन कोरा कागद घेऊन एकेक शब्द त्यावर आपल्या उत्तम पेनातून माझ्यासमोर ठेवले..

जरा येई रे बाहेरी बघ आसपास

दाही दिशात दाटला आनंद उल्हास

अशा आशयाची पाच कडव्याची रचना केवळ पंधरा मिनिटात लिहून दिली.. तो  शब्दोत्सव मी पाहिला आणि चकितच झालो..त्यांच्या त्या प्रतिभेची  मला त्याक्षणी कल्पना आली.. 

बरे ती करूनही त्या  थांबल्या नाहीत मला म्हणाल्या ..सुभाष, यात तुला काही बदल हवा असेल तर सांग..ही नम्रताही अनुभवली..

खरोखर सरस्वतीच्या प्रतिभेचे दर्शन काही  यापेक्षा आगळे असेल काय..  रचनेत सोपेपण आणि तेही चित्रमय दर्शन त्यांच्या रचनेत असते ते मला  त्यातून अनुभवता आले..

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या वागण्यातला आपलेपणा..आईची माया.. आणि सहजी बोलण्यातून त्या मनात कायमस्वरूपी साठून राहिल्या.

पुढेही अखेरपर्यंत हे नाते कायम राहिले.. एक उत्तम माणूस..खाण्याची उत्तम आवड आणि संवादात मोकळेपणा तेच शांताबाईंच्या वागण्यात होते..

तेच क्षण माझया मनात आजही जिवंत झाले..तो सुखद अनुभव पुन्हा झाल्याचा भास आत्ताही होत आहे..

त्यांच्या स्मृतीला  कायमचअभिवादन..- सुभाष इनामदार, 

पुणे

subhashinamdar@gmail.com


Friday, January 8, 2021

कलंदर वृत्तीचा मनस्वी कलावंत डॉ. सत्यशील देशपांडे
पं. सत्यशील देशपांडे यांचा सर्जनशील कलाप्रवास


मी पहिली दुसरीत असेन तेव्हा लेकिन सिनेमा पाहिल्याचं आठवतंय.. मग त्याची cassette आणली गेली आणि गाणी ऐकली गेली.. त्यात एक 'निके घुंगरिया चाल चलत' असं गायलेला एक वेगळा आवाज , जो एरवी सिनेमातल्या गाण्यात ऐकायला मिळत नाही असा ऐकायला मिळाला.. हे गाणं फारच नादमधुर वाटलं.. 

सत्यशील काकांचे स्वर पहिल्यांदा कानावर तेव्हा पडले.. हीच त्यांची पहिली ओळख होती माझ्यासाठी. आम्ही आपले सहज जे समोर येईल तसं गाणं करत होतो, शिकत होतो. मग पं. कुमार गंधर्व, वीणा सहस्रबुद्धे अशांच्या रेकॉर्डस् घरी येत होत्या. अनेक कार्यक्रम जसजशी समज वाढत होती तसतसे ऐकत होतो.

          कुमार गंधर्व कधी 'राजन अब तो आ' अशा बंदीशीतून किंवा 'ऋणानुबंधाच्या' , 'उड जायेगा हंस अकेला' अशा गाण्यातून अधून मधून कुठे कुठे कानावर पडत होते, ओळखीचे होत होते. म्हणजे काही आवाज ऐकणे ही एक ritual होती आमच्या बालपणी. music carries memories.. आणि या अनेक आवाजांनी आपला पिंड पोसला जात होता, आत्मा संस्कारित होत होता. बालपणीच्या स्मृतींमध्ये या सर्व गोष्टी अढळ स्थान घेऊन बसलेल्या आहेत. पण या गायकीकडे कधी गांभिर्याने पाहायचा योग येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

         जनरल 'क्लास' मधून माझ्या गाण्याची जडण घडण होत होती. 'क्लास' मध्ये जे शिकवलं जातं ते 'क्लासिकल' ! वगैरे अगदी पुलंच्या व्याख्येत बसणारं नसलं तरी क्लास पद्धतीच्या शिक्षणाला मर्यादा आहेतच. वयोपरत्वे विशारद वगैरे पार पडलं. पुढे आमच्या बाईंनी जाणीवपूर्वक मोठ्या गुरूंकडे पाठवलं. मग अचानक कळायला लागलं की आपल्याला गाणं अजिबात येत नाहीये. संगीत वाटेवर दरमजल करत असताना अशाच एका वाटसरूने पत्ता दिल्यावर मी पं. डॉ. चंद्रशेखर म्हणजे बाबुराव रेळे (गुरुवर्य B.R . देवधर यांचे शिष्य आणि पं. कुमार गंधर्वांचे सहाध्यायी) यांच्याकडे जाऊन टपकले आणि ज्ञानाची एक आगळी वाट पाहून हरखून गेले. पण हाय दुर्दैव !! या गुरुमाऊलींची साऊली २ वर्षेच मिळू शकली. आजवरच्या समस्त शिष्यगणासमोर संगीतप्रात्यक्षिक दाखवत असताना, अत्यंत आनंदामध्ये असताना आणि त्यांच्या आवडीचं म्हणजे शिकवण्याचं काम करत असताना बाबुकाकांना देवाज्ञा झाली. त्यांच्या ज्ञानाचा मार्ग मला खुणावत होता. बाबुकाकांनी जाताना सुद्धा माझा मार्ग बंद होणार नाही याची तरतूद करून ठेवली असावी. कारण बाबुकाका जिथे ते शेवटचं संगीत प्रात्यक्षिक दाखवत होते, ते ठिकाण होतं पं. सत्यशील देशपांडे यांचं वाळकेश्वर येथील घर आणि संवाद फौंडेशन या नावाने सत्यशीलजींनी प्रस्थापित केलेलं ध्वनी संग्रहालय. मला पुढची वाट इथे सापडेल असा अंगुलीनिर्देशच केला होता जणू बाबुकाकांनी.

ज्या प्रचंड विद्वान संगीतज्ञाला बोलताना, गाताना मी आजवर फक्त TV वर पाहिलं होतं त्या पं. सत्यशील देशपांडे यांना मी प्रत्यक्ष पाहत होते ! मला खूप कुतूहल होतं.  मनातून खूप भारीही वाटलं की, आपण किती मोठ्या लोकांसोबत येऊन गाणं शिकतोय!

          पुढे मुंबई युनिव्हर्सिटीत गाण्यात मास्टर्स करताना फायनलला परीक्षक म्हणून पं. सत्यशीलजीच होते. बरोबरीचे सगळे विद्यार्थी जरा टरकूनच होते. दडपण मलाही होतंच पण मला वेगळंच समाधानही होतं. पं. सत्यशील देशपांडे जर आपली परीक्षा घेणार असतील तर आपल्या मास्टर्स होण्याला काहीतरी अर्थ आहे असं मला प्रकर्षाने वाटून गेलं. त्यांचं परीक्षा घेणं म्हणजे शिकवणंच आहे. एखाद्या  प्रश्नाचं उत्तर ते आमच्याकडून अशा पध्दतीने काढून घेत होते की उत्तर देता देता त्यातल्या आणखी चार गोष्टी आपल्याला कळाव्या. लौकिकापेक्षा त्यांचे विचार वेगळे होते. विचारांची जळमटं लख्ख धुवून काढणारे होते. विषयातलं नेमकं मर्म कळून घेण्याची धडपड आपल्यात निर्माण व्हावी असे होते. मला ते खूपच आवडलं. यथावकाश उत्तमरीत्या मास्टर्स पार पडलं.  बाबुकाकांनंतर 'आता काय ?' म्हणून खरंतर मी मास्टर्स करायला घेतलं होतं. तिथे गेल्यावर फक्त कॉलेजची lectures आणि शिकवणी पुरेशी नाही असं ध्यानात आलं. मग पुन्हा गुरुंची शोधाशोध! इथे मला शाल्मली ताई( विदुषी शाल्मली जोशी, पं. रत्नाकर पै बुवांच्या शिष्या, जयपूर घराणे) हा उत्तम पर्याय दिसला. म्हणून मी ताईंकडे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. किराणा घराण्याचे संस्कार असलेल्या मला बाबुकाकांडे ग्वाल्हेरची थोडी ओळख झाली होती. आता इथे ताईंकडे जयपूर घराण्याची तालीम..! परत शून्यापासून तयारी..! जयपूर गाणं फारच अवघड! पण ताईंनी माझ्यावर खूप धीर धरत माझी गाडी रुळावर आणून ठेवली. पण लगेचच लग्न ठरलं आणि मी आले पुण्याला..! 

      सुरुवातीचे एक वर्ष दर महिन्याला ८ दिवस माहेरी यायचं आणि आठही दिवस ताईंकडे शिकून परत पुण्याला जायचं असा माझा नेम होता. पण माझी आई गेल्यानंतर माझ्या पुणे- मुंबई-  फेऱ्यांमधलं अंतर खूप वाढायला लागलं. मधल्या कालावधीत मी बाबुकाकांनी शिकवलेली माझी चोपडी काढून बसत असे. मग वाटलं की 'हे काही खरं नाही'. मला बाबुकाकांनी सांगितलेल्या गोष्टी पुढे कशा नेता येतील? मग उत्तर सापडलं ते म्हणजे पं. सत्यशील देशपांडे हेच..!

           माझी फारशी ओळख नसताना केवळ एका फोन कॉलवर आणि कुरिअर केलेल्या पत्रिकेवर पुण्यात माझ्या लग्नाला आवर्जून सत्यशीलजी आले होते याचं मला परत एकदा खूप भारी वाटलं होतं. लग्नात आम्हा उभयतांना आशीर्वाद दिले आणि न विसरता माझ्या नवऱ्याला सांगितलं की "हिचं गाणं बंद पडू देऊ नकोस!" मला किती किती आनंद झाला होता तेव्हा! हे सगळं आठवून गाणं मी यांच्याकडे शिकायलाच हवं हे मी पक्क केलं.

         ताईंना याची रीतसर कल्पना दिली. मला ताईंकडेही जाणं सोडायचं नव्हतं पण ही वाट सुद्धा खुणावत होती. शाल्मली ताईंना सुरुवातीला ही गोष्ट फारशी रुचली नव्हती. कारणही तसं बरोबरच होतं ना. आधीच गाण्याचा धड एक संस्कार नसलेल्या मला त्यांनी ताळ्यावर आणलं होतं महत्प्रयासाने! किमान एका गुरूकडे १२ वर्षे सलग शिकणे गरजेचे असते तरच एखादी शैली गळ्यावर चढते, तिचा विचार मनात पक्का होतो. आणि मी जयपूर ची तालीम घेऊन २ वर्षे नाही झाली की सत्यशीलजींकडे जाण्याचा विचार करत होते.  
         एक दिवस फोन करून काकांना पुण्यातल्या त्यांच्या 'छंदोवती' या त्यांच्या सुंदरशा घरी भेटायला गेले. ते म्हणाले तुला नक्की काय शिकायचंय? What do you exactly expect from me?  मी खरं खरं काय ते सांगितलं. 

   'Ok सुरू करूया' म्हणाले. त्या दिवशी त्यांनी कल्याण घेतला. 'बनू रे बलैया' हा ख्याल. मी हरखून गेले. कारण मला त्याचं गाणं ऐकताना फार मजा येत होती, आनंद होत होता. त्यांनी त्या रागाची नुसती बंदिश नाही तर त्याचा संपूर्ण इतिहास, कल्याणच का? यमन का नाही? इथपासून सगळा त्यांच्या दादा गुरूंपासूनचा पटच उलगडून दाखवला होता. संगीतावर त्यांच्या इतकं ठोस, अधिकाराने , तर्कदृष्ट्या पटण्यासारखं , सौन्दर्यस्थळं दाखवत रसास्वाद घ्यायला शिकवणारं व्यक्तिमत्त्व विरळाच! प्रचंड चौफेर वाचन केलेली अभ्यासू बोली, मधूनच कोपरखळ्यांची, मार्मिक टोल्यांची हास्यकारंजी उडवणारी, एखाद्याची बेमालूम फिरकी घेण्याची किंवा मधूनच गझल आणि कवितांच्या ओळींचेही अगदी ओघवते दाखले देणारी ती सहज वाणी ऐकून मी प्रभावित झाले नसते तर नवलच होतं. त्यांचं विद्वात्तेबरोबर आलेलं हे लालित्य खरंच मोहवतं. हे सगळं मला किती हवंहवंसं होतं, मला असं व्हायचं होतं!

 सत्यशीलकाकांकडे फारच आवडून गेलं सगळं. हळू हळू  त्यांच्या घरातल्या सर्व सदस्यांची ओळख होत गेली. त्यांच्या पत्नी उषा काकू या मराठी नाहीत तर राजस्थानी आहेत.. landscape art garden designer असलेल्या अगत्यशील उषा काकू राजस्थानी लोकगीतं सुंदर गातात. मुलगा सृजन आणि सून पूजा माझ्याच वयाचे. सृजन आणि मी एकत्रच शिकायला बसायचो. त्यामुळे पं. सत्यशील देशपांडे वरून मी त्यांना 'सत्यशील काका' म्हणती झाले. माझ्यामधे आणि सृजनमधे कधीही आप-परभाव काका काकूंनी केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्यामुळे मला उत्तम गुरुबंधू लाभले. सृजन, स्मित ही मंडळी अतिशय गुणी आणि नम्र आहेत. कधीही मदतीला तयार असतात. आपल्याकडचं हातचं न राखता देणं, share करणं ही तशी आजकाल दुर्मिळ होत चाललेली गोष्ट. विशेषतः शास्त्रीय संगीतात तर जास्तच ! पण ती मला इथे मिळते. 

काकांचं प्रथम दर्शन हे फार दरारा निर्माण करणारं असतं. मलाही हा दरारा नेहमीच वाटला आहे. पण काका अतिशय प्रेमाने शिकवतात. ते प्रेम आपल्या विषयावरचं असतं !  एखादी जागा खूप वेळा चुकीची गेली की लगेच वैतागतातही.. पण ती जागा बरोबर येईपर्यंत पाठपुरावा सोडत नाहीत. विशेष म्हणजे ते गुरू आहेत असा अहंभाव त्यांना कधीच नसतो. आपल्याला असलेलं ज्ञान share करणं, त्यावरचे त्यांचे विचार सखोल मांडणं हे त्यांना जास्त रुचतं. 

त्यांच्या तालमीचा तास झाला की मी निघताना नमस्कार करायला उठते. पण काकांना कुणीही नमस्कार केलेला नेहमीच अवघडल्यासारखं वाटत आलंय. 'असू दे ,असू दे 'म्हणतात. शेवटी मी एकदा काकांना म्हंटलं, 'काका मी नमस्कार करत जाणार आहे. तुम्ही 'असू दे' नका म्हणू' . मग आता काका 'god bless you!' म्हणतात. आणि नंतर सांगतात, 'ते सगळं ठिके , पण मी सांगितलेल्यावर घरी विचार कर आणि बसलं की फोन करून ये परत'. !

          काकांकडे regular ठराविक वेळी दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी तालीम होतेच असे नाही पण काका माझ्यासाठी केव्हाही available राहू शकतात ही माझी खात्री आहे. जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शन हवं असतं, तेव्हा काका दुसऱ्या शहरात असतील आणि फोनवर available असतील तर त्यावरूनही तालीम द्यायला, प्रसंगी whats app recording करून पाठवून द्यायला ते तयार असतात. आणि आत्ता pandamic मध्ये तर zoom call वर सर्वांनाच कित्येकदा एकत्र तालीम सेशन्स त्यांनी दिलीयत. एखादी बंदिश अडली किंवा आठवत नसेल तर काका त्यांच्या प्रचंड पुस्तक संग्रहातून नेमकं पुस्तक शोधून, संदर्भ शोधून शिकवतात. Notation बघून त्या नोटेशन मध्ये नसलेल्या 'between the lines' जागा सुद्धा काका दाखवतात ते त्यांच्यासारख्या नजर असलेल्या कालाकारालाच करू जमेल.      Archives च्या कामानिमित्त अनेक घराण्यांच्या गायकांची recordings त्यांनी करून घेतली.  अनेक घराण्यांचा त्यांचा तौलनिक अभ्यास आहे. एखाद्या घराण्याचा गायक येऊन गेल्यानंतर त्या गायकाने त्या गायकी बद्दल सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्या घराण्यातली वाटेल अशी बंदिश बांधण्याचा exercise काकांनी स्वतःला लावून घेतला होता. ती बंदीश ते त्या गायकाला ऐकवत. ती ऐकून गायक आश्चर्यचकित होऊन म्हणे, "अरे ये तो हमारे घरानेकीही बंदिश है.. आप को किसने दी?"!!  

  काकांनी अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलेलं आहे आणि त्यांना त्यामध्ये उभं करण्यासाठी सर्वतोपरी मदत केलेली आहे. याचा कुठेही गवगवा त्यांनी केलेला नाही. मदत करण्याच्या बाबतीत त्यांचं सगळं कुटुंब सारखंच आहे.

नवीन पिढी बाबत त्यांना ममत्व आणि कौतुकही आहे. अनेक तरुण कलाकारांचं गाणं ते आवर्जून जाऊन ऐकतात. 'एकत्र येऊन एकमेकांना गाणं ऐकवत राहावं' ही गोष्ट आजच्या तरुण गायकांनी आवर्जून करत राहण्यासाठी त्यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं. 'नवीन काही सुचलं की आपल्या मित्र गायकांना ऐकवणे' हा त्यांच्या काळातला शिरस्ता  अजूनही पाळतात. याने गाणं प्रवाही राहतं, समृद्ध होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जिथे आपल्या गोष्टी राखून ठेवल्या जातात त्या शास्त्रीय संगीताच्या जगती त्यांचा हा गुण विशेष लक्षणीय वाटतो. 

     Nepotism हा शब्द अलीकडे किती गाजला. त्या बॅकग्राऊंड वर आपला मुलगा म्हणून सृजनला वेगळी treatment दिल्याचं मी पाहिलेलं नाही. सृजन आपली वाट स्वतः शोधतोय हे मलाही शिकण्यासारखे आहे. कुणी येऊन आपल्याला मदत करेल अशी आशा बाळगण्यामध्ये शिकण्याचे अनेक मार्ग आपण स्वतःच्या हाताने बंद करतो. याउलट आपली वाट आपण शोधण्यामध्ये आपण किती तयार होतो याची आपल्यालाही कल्पना नसते. सृजन याचं उत्तम उदाहरण आहे. याचं सारं श्रेय काकांच्या ज्ञानानुगामी स्वभावाला जातं.

काकांचे वडील वामनराव देशपांडे हे उत्तम गायक आणि संगीत समीक्षक. अगदी लहान वयापासून अनेक नामवंत, गुणवंत कलाकार घरी वास्तव्याला येत असत. त्यांचं गाणं आणि चर्चा ऐकून काकांचे कान तयार होत होते. त्यांनी कुमार गंधर्वांकडे गाणं शिकायची इच्छा व्यक्त केली. कुमारजींच्या गाण्याची मोहिनी होतीच पण इतर गायकांपेक्षा कुमारजी नेमकं काय वेगळं गातायत हे कळायला अवघड होतं म्हणून त्यांच्याकडे शिकायचं ठरवलं. जे कळत नाही ते शिकावं हे साधं logic त्यामागे होतं. सामान्यतः गळ्याची जात बघून गुरू निवडला जातो. समानधर्माचा गळा असेल तर ती ती शैली पटकन उचलता येते. पण इथे काकांचा गळा कुमारजींच्या गळ्या पेक्षा खूपच वेगळा! कुमारजींचा चढ्या पट्टीतला पातळ तर काकांचा अगदी बेसचा ढाल्या आवाज! कुमारजींच्या गळ्यातल्या गोष्टी जमवण्यासाठी काकांनी किती वेळा आपला गळा सुजवलाय याला सुमार नाही. काकांनी त्यांचे विचार घेतले आणि ठरवून आपली नवीन शैली बनवली. 

काकांचं वाचन, बहुश्रुतता, विविध संगीतातील म्हणजे; उत्तर हिंदुस्थानी, कर्नाटकी, गजल, सुगम, चित्रपट, नवीन- जुनं, नाट्य, उपशास्त्रीय, निर्गुण, सगुण, लोकसंगीत अशा अनेक विषयांवरचा दांडगा अभ्यास आणि  प्रेम , काव्यातील गती, कोणत्याही भाषेवरचं आणि composition वरचं मनापासून असलेलं प्रेम हे त्यांनी बांधलेल्या, अतिशय नाविन्यपूर्ण आशयघन विषय असलेल्या आणि नवीन नवीन सांगीतिक मूल्यांच्या वापराच्या शक्यता दाखवणाऱ्या  त्यांच्या बंदीशींवरून सहज लक्षात येतं. गजल मधला कमी शब्दात मोठी गोष्ट सांगून जाण्याचा गुण त्यांच्या बंदीशीत आहे. प्रसंगी नेमक्या भावना व्यक्त करण्यासाठी नवीन शब्द तयार करण्याचं विलक्षण कसबही त्यांच्यात आहे. प्रत्येक बंदीशनिर्मितीची काहीतरी एक कथा असते. ती गोष्टीवेल्हाळपणे सांगताना काकांना ऐकणं म्हणजे नुसती धमाल असते. त्यांच्याकडून या सर्व गोष्टी तितक्याच प्रेमाने शिकवल्या जाताना आपल्यात ते तितकंच सहज उतरतं.

          iTablaPro सारखं electronic वाद्यांमधल्या परम सुरेल वाद्यालाही ते आपल्या स्वराप्रमाणे सुरेल जुळवून घेतात. उत्तम जुळलेले तंबोरे आणि सुरेल लयदार साथ तयार करून घेणं सुद्धा काकांकडून शिकावं. 

         काकांची गायकी अनेकांना समजायला जड जाते कारण प्रचलित गायकीच्यापेक्षा ती वेगळी वाटते. 

प्रत्येक बंदिश ही तानेसाठी असणं गरजेचं आहे का? मग २ स्वरां मधल्या सुकोमल संगतीचे हिंदोळे कधी दाखवणार? बंदीशीच्या जिवापेक्षा जास्त तिला नटवू नये. अशा अनेक गोष्टी काकांची स्वतःची अशी एक जबरदस्त कहन सांगतात. ती त्यांच्या आजवरच्या केलेल्या सर्व अभ्यासातून, साधनेतून तयार झालेली आहे; जिला स्वतःचं असं एक मत आहे. कोणाचीही ती डोळे झाकून केलेली कॉपी नाहीये. अगदी स्वतःच्या गुरूंचीही..! आपल्या बुद्धीचा पूर्णपणे कस लागेल अशा गोष्टी करणंच काकांनी आजपर्यंत पसंत केलंय! सरधोपटपणा नेमकेपणाने टाळलाय आणि त्याबाबतीत ते नेहमीच स्पष्टपणे बोलत आलेले आहेत.

कालपरत्वे झालेल्या पाठभेदांमुळे अनेक बंदीशींचं  बदललेले रूप नेमकं काय असेल किंवा असायला हवं हे दाखवण्याचं काम काका वेळोवेळी करत असतात. त्यांच्या या एकूण सजगतेमुळे त्यांच्या प्रत्येक शिष्यामध्ये असलेली बंदिश फेक ही जागरूक आहे आणि उत्तम जाणती आहे. मला तर बंदिश बांधण्याचा नादच लागला! सृजनची बंदिशीतील शब्द फेक तर सुंदरच! कृष्ण भट उत्तम बंदिशी बांधतात तर स्मितला सुद्धा किती सुरेख जाण आहे !

         कदाचित त्यांच्या शिष्य मंडळीच्या गाण्यात प्रचलित गायकीसारखी ओळख न पटल्यामुळे ही गायकी बरीच वेगळी वाटू शकते. पण काकांची एक बंदिश आहे अहिर भैरवातली..

    निरख रंग निको

घोल निज घटको।

चढे तो रंग लाग्यो फिको

औरनके घटको।।

(स्वतःच्या रंगाने तू शोभशील.. दुसऱ्याचा रंग कितीही सुंदर वाटला तरी तुझ्यावर तो फिकाच वाटेल.. त्यामुळे स्वतःला ओळख आणि मिरव तुझा स्वतःचा वेगळा रंग, तो जास्त झळाळी देतो! ) या ओळीत म्हटल्याप्रमाणे स्वतःची वेगळी वाट शोधत जाण्याची ताकद त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांनी नक्कीच निर्माण केली आहे. 

काकांच्या पु. ल. प्रेमाबद्दल काय सांगावं! आपण मराठी माणसं by default पु. ल. प्रेमी असतोच पण काकांबद्दल सांगायचं झालं तर  पु. ल. ही त्यांची वृत्ती आहे. आम्ही पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, कुमारजींना प्रत्यक्ष अनुभवलं नाही, पण आम्ही काकांना खूप जवळून पाहतोच आहोत. त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. अजून काय पाहिजे? 

असा हा कलंदर वृत्तीचा, काहीसा बंडखोर वाटणारा पण मुळात ज्ञानानुगामी असलेला मनस्वी आणि तपस्वी कलाकार आज सत्तरीत प्रवेश करतो आहे. असं व्यक्तिमत्त्व हे आपलं खरं वैभव आहे. त्यांच्यातल्या गुरुतत्वासमोर, त्यांच्या उत्तुंग सर्जनशीलतेसमोर मी कायमच नतमस्तकच राहीन. आज त्यांच्यासाठी मी वाढदिवसाच्या सुमंगल कामना करते. त्यांच्याकडून संगीताची अजून त्यांच्या मनासारखी खूप सेवा घडू दे आणि त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच उत्तम उत्तम शिकायला मिळू दे. हे  होण्यासाठी त्यांना निकोप सुदीर्घ आयुष्य लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापेक्षाही आपलं बौद्धिक पोषण ज्यांच्यामुळे होतं त्या गुरूंचा सहवास निरंतर आपल्याला घडत रहावा असं कायमच मला सत्यशील काकांबद्दल वाटत आलं आहे. म्हणून मला सुचलेल्या अहिर भैरव च्याच बंदिशीतल्या या ओळी इथे मांडाव्याशा वाटतायत..

गुरू सन्मुख पाउं ज्ञान

वहीं तीरथ वहीं धाम।।

सेवा सतगुरु गुनीकी

तन मन धन कर अरपन

हर पल करुं धरुं जो ध्यान

तब ही जागे भाग मान।।
- पौलमी देशमुख


(त्यांच्याच face book वरून साभार सौजन्याने)


Saturday, October 3, 2020

मीना, तुझे स्मरण कायम रहाणार...जाऊन वर्ष झाले..

लहानपणापासून ते वयाच्या साठीपर्यंत केवळ कष्टमय जीवन जगणारी बहीण मिनाक्षी विश्र्वनाथ इनामदार.. जाऊन वर्ष झाले..आठवणीने मनात अनेक प्रसंग डोळयांसमोर येऊन जातात..ते आठवले की डोळ्यातून टचकन पाणी येते..खरेच कसे हे जगणे..याला काही आयुष्य म्हणावे.. अन्ननलिकेच्या कॅन्सरने तिचा शेवटही वेदनेला सामोरे होऊन झाला.. मागचे सारे आयुष्य चित्रासारखे समोर उभे रहाते..


लहानपणी घरची पिठाची गिरणी सुरू रहावी म्हणून तिच्या समोर इतरांची दळणे आणून ती परत त्यांच्याकडे देणे..हा ससेमिरा होता.. तिचे प्रयत्न तोकडे पडत होते..पण तिचे ते काम इमानदारीत सुरू होते..
डोक्यात आकडे, बाराखडी शिरायची नाही म्हणून शाळेला रामराम ठोकून ती घरातच काही बाही कामे करत राहिली..एखादे काम केले नाही म्हणून आईचा मारही तिने त्या काळी सहन केला.. बुद्धी कमी असल्याने शाळेचे द्वार बंद झाले. मग पाणी भरणे..दळणे आणणे.. पोचविणे.. जात्यावर दळण करणे..आदी शारीरिक कष्ट लादलेली कामे आई करून घेत..घरची थोडी आर्थिक कमाई वाढली.. पण यश नाही आले..घराला आणि तीच्या कामाला..गिरणी विकावी लागली शेवटी..
सतत तिला कमी लेखणे.. तिच्यावर डाफरणे .. खायला भार.. आणि भुईला भार..असे आयुष्याला झेलणे तिने सहन केले..तेही जमेल तेव्हढ्या आनंदाने..

खरे तर तिचे तिला मनाप्रमाणे वागणे कधीच जमले नाही .सतत अपरावलंबित्व तीच्या पाचवीला पुजले होते.. तीच सवय तिला आयुष्यभर जपावी लागली.. तिचे विश्व तेवढेच मर्यादित राहिले.. घराभोवती..आईच्या भोवती फिरत राहिले..शिक्षण नाही मग वाचनही नाही.. रेडिओ ऐकणे आणि कामे नेटाने करत राहणे तिच्या नशिबी होते.. मात्र ते तिने कमालीच्या प्रामाणिकपणाने केले..सर्वांच्या मर्जीनुसार..
मग ते चिंचा फोडणे असो की भावे सुपारिवाले यांचेकडे मदत करणे असो..आपल्या मर्यादित विश्वात ती रमत असे..यातून तिने तिचा असा प्रेमळ सहवास सर्वांना दिला..त्यात त्यांना आपलेसे केले..


शिक्षण नाहीच..

शिक्षण नाही..त्यामुळे तिला लिहिता वाचता येत नाही.. कसे होणार हिचे..हीच चिंता आई वडिलांना खात असायची..मी माझा स्वतंत्र मार्ग म्हणून सातारा सोडला आणि पुण्यात नोकरी स्वीकारली.. पण माझ्या पैशाची वडिलांना खूप जरूर होती.. ते त्यांचेपुरते मिळवत..गिरणी विकून तेही थोडे फार घरात काम करत राहिले..त्यात बहिणीच्या भविष्याची चिंता सारखी सतावत असायची..

माझे बऱ्यापैकी बस्तान बसल्यावर त्यांनी मीनाला घेऊन पुण्यात हिंगण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत कामासाठी ठेवण्याचे मनाशी पक्के केले.. तिला हिंगण्यातील संस्थेत प्रवेश मिळण्यासाठी तिथल्या लोकांना गळ घातली..एका लाचार बापाची विनंती फळाला आली.. मीनाला संस्थेत दाखल करून घेतले.. दोघांनाही हायसे झाले..खरोखरच त्यानंतर पितृछत्र काही दिवसांनी हरपले..

बहीण हिंगण्यात स्वयंपाक घरातील मदतनीस म्हणून कामाला लागली.पडेल ते काम केले..वृद्धाश्रमात डबे पोचविणे..दळण दळणे..मोठ्या रगड्यावर इडली पीठ तयार करणे..
बहिणीविषयी संस्थेत प्रेम

बहीण कशालाच मागे हटली नाही..जेवण, रहाणे सोडून कपडेही मिळत.. तिथल्या प्रमुख पदाधिकार महिलांना ती आपल्या कामाने पसंत पडली..आयुष्याला नवी दिशा मिळाली..पण शारीरिक कष्ट सुरूच राहिले..पहिले ५० रुपये पगार मिळाला..पुढे ती सासत्याने आणि आपल्या वर्तणुकीने ३१ वर्षे ती संस्थेच्या विविध वसतीगृहात कामे करून लोकप्रियता आणि ममता मिळविली..पण यातही समाधानाने आणि आनंद मानून बहीण टिकून राहिली..

मुली, बाई आणि संस्थाचालक मीनाचे कौतुक करीत राहिले.. मात्र कधीतरी डोक्यात वेगळेच विचार येत..कधी भरकटत असे.. पण आपल्याला इथेच रहायला हवे हे तिने जाणले..माझ्या घरी दिवाळी आणि मे च्या सुट्टीत येत राहिली..घरच्या माझ्या मुलांची लाडकी आत्या बनली..सौच्या मनात मिनाताईंविषयी प्रेम कायम राहिले..आपला भाऊ आणि वहिनी ..भाचे आपल्याला नेहमी जपतील असा विश्वास तिला कायमस्वरूपी होता.. हे ती बोलूनही दाखवी.

तीन वर्षे मोठ्या असलेल्या बहिणीला जपणे आणि काळजी घेणे हे आई वडिलांनी आपल्यावर सोपविलेले काम तेवढ्याच मनोमनी करण्याचे माझे ध्येय होते..

सुमारे ३१ वर्षांच्या सेवेनंतर ती निवृत्त झाली..काही महिने माझेकडे होती..पण आपल्यानंतर तिची देखभाल उत्तम व्हावी म्हणून आम्ही साऱ्यानी तिला संस्थेच्या वृद्धाश्रमात ठेवले..

अखेरीस कर्करोगाने ग्रासले

तिथेही वयाच्या ६७ वर्षांपर्यंत तिची जगण्याची इच्छा शक्ती बळकट होती.
आता मात्र कष्ट नाही केवळ आराम.. ते दिवसही तिने समाधानात घालविले.. मात्र जेवण व्यवस्थित न केल्याने.. आणि स्वतःची आबाळ केल्याने तिची अन्ननलिका आकुंचन पावली..शेवटी निदान कर्करोगाचे झाले..त्यातही तिने बहुत सोसले.. पण ते जगणे शेवटी पहावत नव्हते..परमेश्वराने तिला आर्थिक समर्थ बनविले होते.. दिनानाथला डॉ. धनंजय केळकर यांनी शस्त्रक्रिया केली..त्यांनंतरही बहिणीने काही महिने सोसले..पण अखेरीस तिला सिल्पा सेन्टर मध्ये वेदनाशामक औषधे आणि शेवटही वेदनावीरहीत व्हावा म्हणून दाखल करावे लागले.. त्यातच ४ ऑक्टोबर २०१९ ला ती आम्हाला सोडून गेली.. शांतपणे..


हे सारे लिहिताना डोळे भरून येताहेत..शरीर थरथरतेय..पण अखेरीस बहिणीचे कर्म करावे लागले..साऱ्या वेदना शांत झाल्या..त्या देहाने आयुष्यभर सोसले ते इथे संपले..

आजही तिची आनंदी मूर्ती डोळ्यासमोर येते..आणि सांगावेसे वाटते..

मीनाताई..खूप सहन केलेस..एकटीने..संयमाने आणि प्रामाणिकतेने..पण तू धीराची.. शिक्षण नसताना तुझ्या संयमाने ..वागण्याने आम्हाला खूप शिकवून गेलीस..तुझ्या आठवणी मनात कायम स्मरणात राहतील..आयुष्य तू समृद्ध केलेस..आम्हावर असाच कायम लोभ ठेव..
आदरांजली !- तुझाच भाऊ

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

Thursday, September 17, 2020

मागे वळून पाहताना..
समाधानाचा पेला पुरता भरलाय !


सामान्य कुटुंबातील या मुलाला कितीतरी हातांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा टेकू दिला..

नादारीतून शिक्षण .. इतरांचे घरात आपलेपणाचा ओलावा लाभला..

आईची कडक शिस्त आणि तेवढीच प्रेमाची छाया.. वडिलांचे सौम्य पण बोलके पाठबळ..

साताऱ्यात बरीच कमी जास्त धडपड करून आपल्यापुरता मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला..

तरुणपणात धाडस केले..तडक पुणे गाठले..तरुण भारत आयुष्यात पहिले पाऊल कसून टाकण्यास उपयोगी पडला..

जिद्द आणि साधना.. दोन्ही होती..भरत नाट्य मंदिरात नाटकाची नांदी सुरू झाली..भूमिका मिळत गेल्या..नाटकाची भाषा पचनी पडली..रंगभूमीचे आकर्षण वाढले..रात्री बाबूराव विजापुरे.. आणि तिकडे पुलाच्या पलिकडे पीडीएचे भालबा केळकर..यांच्या सोबत रात्री रुंगू लागल्या..

नाटकावर आपल्या भाषेत समीक्षण सुरू झाले..

कला आणि साहित्याची आवड जोपासली गेली..वि ना देवधर यांच्यामुळे पुण्याचा फेरफटका आणि अशा उद्याची..दोन सदरे तरुण भारत मधून लिहली.

साहित्यविशारद झालो..


प्रा.एन डी आपटे सरांमुळे पदवीधर मग एक्सप्रेसने दुसरी नोकरी मग विवाहबंधन!

आयुष्याला स्थिरता आली..विद्याधर गोखले यांचा आशीर्वाद मिळाला..पुणेरी रंगमंच, पुणे तिथे काय उणे..  लोकसत्ता, चतुरंग, सांज लोकसत्ता इथे सदरे, लेखन सुरू झाले..जेष्ठ पत्रकार प्रकाश कर्दळे यांच्या प्रोत्साहनामुळे बातमीदारी आणि लेखन सुधारले..मात्र कारकुनी वृत्ती सोडून संपादन क्षेत्रात फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्या दूरदर्शीपणाने  pune flash. com साप्ताहिक  आणि फ्लॅश  म्युझिक.. मध्ये कारकीर्द बनविली..


एका बाजूला नोकरी आणि दुसरीकडे सांस्कृतिक क्षेत्रातली मुशाफिरी केली..कलावंत जवळ आले..अंतरंग समजू आले..


वयाच्या ४५ व्या वर्षी सकाळ सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्राची इ आवृत्ती सुरू करण्याची संधी आली.. त्याचा वृत्त संपादक झालो..बातमी, सदर लेखन आणि चलत चित्रणाचा अनुभव गाठीशी पडला..अखेरीस त्यांना नकोसा झालो.. राजीनामा देवून बाहेर पडलो..

मंदार जोगळेकर, अरुण खोरे, सुनील मेहता..यांच्याकडे काही लुडबुड केली. 

www.subhashinamdar.blogspot.com यातून लेखन सुरू ठेवले.. 

http://culturalpune.blogspot.com/

यातून सातत्याने घटनांची नोंद सुरू ठेवली..

सोशल मीडिया मधून face book  सतत नोंद करीत गेलो.. 


संगीत, साहित्य आणि नाटकाने भरभरून समाधान दिले..माणसे पहायला ओळखायला शिकविले..जमेल तशी मदत करावी..मित्र जोडावेत.त्यांचा सहवास घ्यावा.. फिरण्याचा छंद जपून ठेवलाय.. मनात बेचैनीचा विचार आला तर मागचे सारे आठवून त्यातून हुरूप आणतो..

आपल्या क्षमतेपेक्षाही खूप काही मिळाले.. आता हेच समाधान टिकवायला हवं!

रक्ताची आणि जोडलेली नाती टिकवून ठेवायला हवीत..समाजाने भरभरून दिले..ते समाजाला परत करायला हवे..तेवढी शक्ती आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभावे एवढीच प्रार्थना!

तुमचा आशीर्वाद आणि सहवास लाभावा हीच मनोकामना!
आपलाच,

सुभाष विश्वनाथ इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Saturday, September 12, 2020

पिंपळपान...

जाळी झालेले एक पान सहज वहीत गवसले 
जणू जुन्या स्मृतींना देत त्या आठवणी साठवित पहुडले 

 किती दिवस झाले आता निटसे आठवत नाही 
किती स्वप्ने गळून गेली आता ती उगाळायची नाही 

 वाट पाहुन थकलेले पाय कधीचेच थांबलेले 
नव्या स्वप्नांच्या धुंदीत तेही विसावलेले 

उरी चेतल्या , जागल्या त्या आठवांच्या नोंदी 
किती आणा, शपथा ती होती एक धुंदी 

नाही साहवेना आता जुनी झाली गाठोडी
चेतावली त्यात आता अंधुकशी चिंधोटी 

सारी कधी स्वप्ने पुरी होत असतात का ? 
तरीही कुणी ती पाहायची सोडतात का ? 

 गेली वर्षे आणि महिने गेला तो काळ
 पिंपळाची जीर्ण पाने नको करू त्याचा पाचोळा

 नांदती सुखी आता दोन जीव दोही दिशी 
उरलेल्या आयुष्याच्या गाठी आली फक्त एकादशी....


 -     सुभाष इनामदार, पुणे
 subhashinamdar@gmail.com