Monday, September 24, 2007
धमाल विनोदाचा शिडकावा करणारे "ए भाऊ'
प्रसंगातून फुलणारे सहजी विनोद. अतुल परचुरेने रंगमंचावर साकारलेली अफलातून भूमिका. त्याला हृषीकेश जोशीने दिलेली उत्तम साथ. संतोष पवारांचे दिग्दर्शन कौशल्य आणि अभय परांजपेंचे शब्दातून धमाल उडविणारे लेखन... साऱ्यांनीच "ए भाऊ डोके नको खाऊ'द्वारे निखळ मनोरंजनाचा आनंद दिला आहे.बायको लेखिका, तर नवरा सीरियल दिग्दर्शक. दोघेही स्वतंत्र विचारांचे. अर्थातच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. भावनिक नाते जपण्यापेक्षा तडजोडी स्वीकारणारे दिवाकर (हृषीकेश जोशी) आणि सुरुची (नीला गोखले). दर बुधवारी सामान्य बावळट माणसाला पार्टीत आणून त्याच्याकडून आपले मनोरंजन करणाऱ्या क्लबचा दिवाकर सभासद. अशा माणसाच्या शोधात असताना त्रिंबक शिंत्रे (प्राप्तिकर खात्यातला लिपिक) अर्थात अतुल परचुरे भेटतो. हा प्रकार मान्य नसल्याने सुरुची घरातून रागाने निघून जाते. त्यातच त्रिंबक शिंत्रेची एंट्री. घर सोडून गेलेल्या बायकोचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्रिंबक शिंत्रे कल्पना लढवीत नाटकात काय गमती घडतात, ते शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यातला आनंद हिरावून घेणे योग्य नव्हे.प्रसंग आणि संवादातून फुलणारे नाटकअभय परांजपे यांनी लिहिलेले हे नाटक "भेजा फ्राय' या हिंदी चित्रपटाशी मिळतेजुळते आहे. पण नाटकातले प्रसंग, मराठी भाषेतला अस्सल विनोद आणि संवादातली मजा नाटकातून अधिक अंगावर येते. त्रिंबक शिंत्रेच्या संवादात सामान्यातल्या भाबडेपणाच्या जाणिवा अधिक ठळकपणे नाटकात व्यक्त होतात. संवादातूनही नाकाने गमती घडविल्या आहेत. सीरियलचे प्रसंग लिहिताना ज्या गतीने त्या पाडल्या जातात, त्याचे गांभीर्यही प्रकट होते. डॉक्टर, मोना आणि हॉस्पिटलच्या छोट्या प्रसंगातून रंगमंचाच्या मर्यादा ओळखून विविध घटना नाट्य विविध पातळ्यांवर घडविले आहे. शिंत्रेच्या व्यक्तिरेखेतले अनेक बारकावे इथे दिसतात. झालेल्या चुका दुरुस्त करताना नव्याने चुकांमुळे भांबावलेपणा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मोठे मन सारेच.संतोष पवारांनी नाटकाला स्वतःचा चेहरा दिला आहे. त्यांच्या दिग्दर्शन स्पर्शाने नाटक फुलते आणि प्रेक्षकांना हसवत ठेवते. सामान्यातले असामान्यत्व बाहेर काढताना अतुल परचुरेंकडून जे पैलू बाहेर काढले आहेत, त्याचे श्रेय द्यायलाच हवे. शब्दात साठलेला आशय नटांकडून बाहेर काढून तो खुलविण्यात संतोष पवार सरस ठरले आहेत.अंकुश कांबळींनी दिग्दर्शकाचे घर उभे करताना एकाच रंगमंचाचा अनेक पातळ्यांवर कसा उपयोग करता येईल, ते अभ्यासून नेपथ्य निर्माण केले आहे. सेट डोळ्यांना आणि मनाला आनंद देतो. सरकता आणि फिरता अशा दोन्ही रंगमंचाचा वापर इथे केला आहे. राजन ताम्हाणे यांच्या प्रकाश योजनेत नाटक घडते.अतुल परचुरेंचा उत्तम अभिनयत्रिंबक शिंत्रेच्या अफलातून भूमिकेतून अतुल परचुरे इथे व्यक्त होतात. वाचिक, शाब्दिक आणि देहबोलीतून सफाईने त्यांनी ती साकारली आहे. त्यांनी नाटकाला खुलविले आणि भूमिकेला खेळविले आहे. सहजता आणि कमालीचे भान ठेवून नाटकाला स्वतःचा चेहराच त्यांनी दिला आहे. हृषीकेश जोशीने अतुलच्या जोडीने सफाईदार सहजता दाखविली आहे. रंगमंचावर दोघेही धमाल उडवून देतात. रसरशीतपणा आणि विनोदाचा तोल सांभाळून नाटकात आनंदा कारेकरांचा डॉक्टर आणि बलदेव या दोन्ही भूमिकांत स्वतःची छाप पाडतो. नीला गोखलेंची सुरुची, अतुल महाजनांचा सचिन आणि लक्ष्मी खानोलकर, राजन वेलणकर आणि चंद्रकांत लोकरेंनी निखळ विनोदी नाटक रंगमंचावर आणून प्रेक्षकांना आकर्षित केले आहे
Subscribe to:
Posts (Atom)