Sunday, March 31, 2024

व्हायोलीन वादनाचे अप्रतिम सादरीकरण..

गजाननबुवा जोशी यांच्या व्हायोलीन परंपरेचा उत्तम आविष्कार चारुशीला गोसावी यांच्या वादनातून साकारला... डॉ. विकास कशाळकर
गजाननबुवा जोशी यांच्याकडे चाळीस वर्षांपूर्वी ज्या श्री रागाने सुरवात केली त्या रागाचे अप्रतिम सादरीकरण करून चारुशीला गोसावी यांनी आपल्याला पुनः प्रत्ययचा आनंद दिल्याची भावना ज्येष्ठ गायन गुरू आणि अभ्यासक डॉ. विकास कशाळकर यांनी एस एम जोशी सभागृहात व्यक्त केली. संगीत साधनेची चाळीस वर्षे या निमित्ताने पुण्याच्या व्हायोलीन वादक चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय आणि सुगम व्हायोलीन वादनाची मैफल व्हायोलीन गाते तेंव्हा..या नावाने रविवारी ३१ मार्च २४ ला रसिकांसमोर सादर केली.
यावेळी चारुशीला गोसावी यांनी श्री रागाने शास्त्रीय व्हायोलीन वादन करून त्यामुळे भारावून जाऊन डॉ. विकास कशाळकर यांनी त्यांच्या वादनात दाखविलेले स्वरांचे दर्जे आणि लयीचे प्रभुत्व त्यांच्या वादनात होते याबद्दल आपल्या बोलण्यात कशाळकर यांनी चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची दाद देऊन..आजकाल कलाकार गॅलरी साठी वाजवितात .पण गोसावी यांनी केलेले वादन स्वतः साठी होते म्हणून ते अधिक दर्जेदार होते याची कबुली दिली. आणि गजाननबुवांची परंपरा तुम्ही नक्की पुढे न्या ..असे सुचविले. तबला वादक मोहन पारसनीस यांनी कलाकार काय वाजवितो याचे भान ठेऊन चारुशीला गोसावी यांना केलेली साथ मोलाची होती..याबद्दल ज्येष्ठ तबला गुरू पांडुरंग मुखडे यांनी कौतुक केले आणि चारुशीला गोसावी यांनी शास्त्रीय व्हायोलीन वादनात उत्तम तारेवरची कसरत उत्तम स्वर तालात साधली याबद्दल खास शब्दात त्यांनी मनोगतात त्यांची स्तुती केली. स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी चारुशीला यांच्या वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करून प्रामाणिक, मेहनत घेऊन कार्यक्रम सादर करते याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. पुण्यात अनेक कार्यक्रम सादर होत असताना या व्हायोलीन कार्यक्रमासाठी सभागृह पुरेपूर आनंद घेत रसिकांच्या उपस्थितीने भरलेले होते..
आरंभी शास्त्रीय व्हायोलीन वादनात श्री आणि त्यानंतर किरवाणी रागातली धून सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.. त्यांना तबला साथ तेव्हढ्याच आत्मीयतेने आणि तयारीने मोहन पारसनीस यांनी केली होती. सुगम संगीतात स्वतःची ओळख व्हायोलीन वाद्यावर करून चारुशीला गोसावी प्रभात समयो पातला, जगी आंधळी मी तुला पाहते, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तर लळा जिव्हाळा सारखे भावपूर्ण अवघड गीत, कारे धरिला सारखी बैठकीची लावणी, नकोस नौके परत फिरू हे गीतरामायणातले आगळे गाणे, पराधीन आहे जगती सारखे अर्थपूर्ण गीत. तर तुझे गीत गाण्यासारखे भावगीत....आणि चारुशीला गोसावी यांची शिष्या वैष्णवी काळे यांनी आईये मेहेरबान..सादर करून रसिकांची पसंती मिळविली.
मग मधुबन मे राधिका सारखे नृत्य..ताल.. लय याला महत्व असणारे लोकप्रिय हिंदी गाणे, पाकिझा मधील ईन्ही लोगोने.. आणि शेवटी हे सुरांनो चंद्र व्हा...ह्या भावपूर्ण गाण्याने आजच्या व्हायोलीन गाते तेंव्हा..या कार्यक्रमाची सांगता झाली.. संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उत्तम व्हायोलीन वादनाची अवीट मैफल अशी काही रंगत गेली त्याला यथोचित अशा निवेदिका विनया देसाई यांच्या उत्तम शब्दाने.. साथ संगत विनीत तिकोनकर, उद्धव कुंभार आणि आदिती गराडे त्यांच्या कमालीच्या हुशारीने वाजविलेल्या वाद्यातून लाभली.. पंडित भालचंद्र देव यांच्या पत्नी निलाक्षी देव यांच्या हस्ते कलावंताना स्नेह प्रतिक देण्यात आले.. तर रसिकांच्या वतीने आनंद आणि कल्याणी सराफ यांनी गोसावी यांना गुलाबाची परडी देऊन सन्मान केला. रवी मेघावत यांच्या उत्तम ध्वनीव्यवस्थापनामुळे गाणी ऐकण्याचे उत्तम समाधान रसिकांना घेता आले. तीन तास व्हायोलीनची संगत लाभलेल्या रसिकांना चारुशीला गोसावी यांच्या विशुद्ध वादनाची शास्त्रीय आणि सुगम मैफल अनुभवता आली.
- सुभाष इनामदार, पुणे