Sunday, August 10, 2008
चिरतरूण आवाजाच्या आठवणीत रसिक मंत्रमुग्ध
त्यांच्या स्वराला वयाची बंधने नाहीत. ऱ्हदयात घर केलेल्या आवाजाची जादू पुन्हा घुमली शुक्रवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात. चिरतरूण्याने नटलेल्या. भावनेने ओथंबलेल्या. शब्दांना झेलणाऱ्या आणि झुलविणाऱ्या आशा भोसले यांच्या गाण्यांचे स्मरण इथे केले गेले. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने "हमलोग' या संस्थेने त्यांच्या मराठी गाण्याची मैफल आयोजित केली होती. "तरूण आहे रात्र...' या शिर्षकाला साजेसा कार्यक्रम करून सुनिल देशपांडे यांनी त्यांच्या कारकीर्दीचा आलेखच रसिकांसमोर मांडला होता.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
सुगम, भावगीत, लावणी, नाट्यगीत ,मराठी गझल, आणि मुख्यतः चित्रपटगीताने नटलेला हा स्वरांचा प्रवास नटवला
सुवर्णा माटेगावकर, मधुरा दातार आणि अनघा पेंडसे यांनी. त्याला पुरूष स्वराची साथ केली ती धवल चांदवडकर यांनी.
अनेक संगीतकारांनी आशा भोसले यांच्या आवाजात तऱ्हतऱ्हेची गाणी स्वरबध्द केली. त्यातले आघाडीचे नाव म्हणजे सुधीर फडके. आशा भोसलेतर फडके साहेंबांना गुरूस्थानी मानत.
संगीतकाराच्या स्वरांना पूर्णतः न्याय देणाऱ्या या हरहुन्नरी गायीकेच्या गीतांना आजही किती दाद मिळते याचा प्रत्यय शुक्रवारी पुन्हा एकदा आला.
संगीतकार प्रभाकर जोग आणि आनंद मोडक यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगून त्यांच्यातल्या गुणांचे तोंडभरून कौतुक केले. मोडकांनी तर त्यांनी गायलेल्या चार गाण्यांना पुरस्कार मिळाला आसला तरी ते सारे श्रेय आशा भोसले यांचेच असल्याची प्रांजल कबुली दिली.
मानसी मागीकर यांनी पुढचं पाऊल चित्रपटाच्या वेळच्या आठवणी सांगीतल्या.
आशा भोसले यांच्या स्वरांचे चांदणे रसिकांसमोर मांडले ते निवेदिका मंगला खाडिलकर यांनी.
त्यांच्या निवेदनातून आशा भोसले यांच्यातल्या गुणांचे ,त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात.
केदार परांजपे यांच्या संगीत संयोजनात कमीत कमी वाद्यमेळात स्वरांची ताकद स्वच्छपणे दिसते.साऱ्याच वादकांनी गीतांना पोषक अशीच साथ केली.
तीनही गायीकांनी आशाताईंच्या चिरतरूण स्वराला नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोचविले.
स्वरातली आणि भावनेतली ताकद स्पष्ट करण्यात गायकवृंद यशस्वी ठरला.
शनिवारी आशाताईंच्या हिंदी गीतांचा नजराणा पेश होणार आहे. तोही तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करू.
कॅमेरा, स्टोरी - सुभाष इनामदार
Subscribe to:
Posts (Atom)