Friday, April 17, 2009

पहा पण प्रेमाणे !


तुम्हाला वाटेल लिहायला चुकलय. पण छे हो. मुद्दाम तसच काढलय.

मराठी माणूस अशा पाट्या लिहून प्रेमाची भाषा करतोय. पण प्रत्यक्षात तो स्वतःकडेही तेवढ्या प्रमाने पहाताना दिसत नाही.

कारण काय? तर वृत्ती.भाषा संस्कृती वाढली पाहिजे. ती टिकली पाहिजे असे सांगणारा हा मराठी बाणा.


मोडेन पण वाकणार नाही. असे ब्रीद घेऊनच वागतोय. मी मराठी हे स्वाभीमानाचे बीरुद मीरवतोय. पण प्रत्यक्ष वागण्यात त्याचा स्वाभीमान कुठे कच खातोय तेच कळत नाही.त्याला सतत सांगावे लागते की, बाबारे तू मराठी आहेस. भाषा जप. संस्कृती सांभाळ. अभिमानाने मिरव. सारे सांगून थकलेय. राज ठाकरेंनी तर मराठी माणसांचा स्वाभीमान जागृत करण्याचे व्रतच घेतले आहे. पण मला सांगा. त्याला ते झेपेल काय? सर्वममावेशक असा त्याचा स्वभाव. इतरांकडे वर मान करुनही न पहाण्याचा धर्म.

बोलण्यात ताठपणा पण वागण्याच बुजरा असा हा मराठी माणूस. छत्रपती शिवाजी महारांजांनी त्यांचा स्वाभीमान जागृत व्हावा म्हणून महेश मांजरेकरांच्या रुपात मराठी चित्रपट क्षेत्रातून मराठी बाणा जागवायचा प्रयत्न केला गेलाय. पण मला खरे सांगा, तो स्वभीमानी मराठी माणूस असा जागा होईल.

तो चाकरमानी बनलाय. धंद्यात आमची अन्यत्र शाखा नाही हे बीरुद अभीमानाने मिरवतोय.

काळ बदलला तरी तो काही बदल करुन घ्यायच्या मनस्थितीत नाही. भ्रष्ट समाजात वावरतोय. त्यांना जाब विचारायला कचरतोय.खाली मान घालून इतरांचे इमान राखण्यात स्वतःला धन्य समजतोय.

बुध्दी हे ज्याचे शस्त्र आहे. इमान हे त्याच्या रक्तात आहे. सर्वमावेशक अशी त्याची वृत्ती आहे. आज तो निद्रीस्त आहे. त्याला जागविण्यासाठी अनेक क्‍लुप्त्या केल्या जाताहेत.

तुम्हाला वाटते तो जागा होईल. आहे. राहिल?

मतदानाच्या दिवशी तो त्याची ताकद दाखवेल? तुमचा काय अंदाज आहे.......

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com

Sunday, April 12, 2009

कलावंताना निष्ठेपेक्षा पैशावर प्रेम अधिक


रसिकमोहिनी निर्मित चंद्रलेखा प्रकाशित चिरंजीव आईस. २०० वा प्रयोग,शुक्रवार बालगंधर्व रंगमंदीर पुणे. प्रमुख पाहुणे चंद्रलेखाचे मोहन वाघ आणि अ भा मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार. वक्ते दिग्दर्शक दिलिप कोल्हटकर. निर्माती-भाग्यश्री देसाई. कलावंत- भाग्यश्री देसाई,कुणाल लिमये,उदय लागू, आशा तारे, उपेंद्र दाते आणि सुहासिनी देशपांडे.

---------------------------------------

"आजचे कलावंत प्रयोग अर्ध्यावर टाकून मध्येच निघून जातात. नाटकापेक्षाही सिरियल आणि सिनेमाकडे त्यांचा ओढा अधिक आहे. रंगभूमीच्या निष्ठेपेक्षा त्यांना ओढ आहे ती पैशाची.

भुमिकेच्या प्रेमापेक्षाही त्यांना पैशाचे प्रेम अधिक आहे.' अशी टिका जाहिरपणे केली

ती नाट्यनिर्माते मोहन वाघ यांनी.

स्थळ होते पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर. निमित्त होते रसिक मोहिनी निर्मित आणि चंद्रलेखा प्रकाशित "चिरंजीव आईस' या नाटकाच्या दोनशेव्या प्रयोगाचे. नाटकाच्या मध्यंतरातल्या छोटेखानी समारंभात मोहन वाघ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

गेले कांही दिवस नाट्यक्षेत्रात चिंतेची परिस्थिती आहे. ठराविक नाटके सोडली तर नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या रोडावलेली दिसते. भरत जाधव, प्रशांत दामले, मोहन जोशी तर काही प्रमाणात विक्रम गोखले यांची नाटके सोडली तर नाटकाला बुकींग नसते. एकेकाळी बालगंधर्वच्या तारखांसाठी निर्मार्त्यांमध्ये चढाओढ असायची. आज बुकींग नसल्याने रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्या-तमांशांचे प्रमाण अधिक वाढलय. टाळ्यांपेक्षा शिट्ट्यांची दाद अधिक मिळताना दिसते.

अशा स्थितीत "चिरंजीव आईस' या नाटकाचा दोनशेवा प्रयोग साजरा व्हावा याचा आनंद. तर मला बरेच दिवसाने नजरेपुढे भरलेले प्रेक्षागृह पहायाचे भाग्य लाभल्याचा आनंद दिग्दर्शक दिलिप कोल्हटकरांना जाहिर पणे व्यक्त करावा लागावा याचे वाईट वाटते.अशाच महोत्सवी प्रयोगाला भरघोस उप्तन्नाचा प्रतिसाद मिळाल्याने निर्माते किशोर देसाई-भाग्यश्री देसाई यांना अधिक प्रयोग करण्याचा उत्साह निर्माण व्हावा हे या प्रयोगामुळे घडले.

भारतीय मुले अमेरिकेत स्थयिक झालीत. त्यांचेकडे पैसा आहे. पण स्वतः कडे आणि आपल्या माणसांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. अमेरिकेत गेलेल्या आपल्या आईशी बोलायला. तीच्याशी गप्पा मारायला वेळ नाही. सतत काम आणि कामच. यानिमित्ताने भारतीय मातीत रूजलेल्या संस्काराचा आणि आईचा एकटेपणाचा अनुभव सांगणारे हे नाटक तेवढेच लक्ष वेधून घेते.

त्यातही नाट्यकलावंतांच्या निष्ठेचा प्रश्र मोहन वाघ यांनी काढून रंगभूमीवर कलावंतांची वानवा का आहे याचे एका परिने उत्तरच दिले.कलावंतही म्हणतात हेच तर पैसे मिळविण्याचे आमचे दिवस आहेत. मात्र एकदा स्विकारलेली भुमिका शेवटापर्यंत निभावणे हे ही महत्वाचे नाही काय ? हा प्रश्र अधिक मोलाचा आहे.

नाट्यक्षेत्र आज मंदिच्या गर्दीतून वाट काढते आहे. निर्माते आणि कलावंत या दोघांनीही रंगभूमिवरची नवी आव्हाने पेलण्याचे शिवधनुष्य निष्ठेने उचलण्याची वेळ आली आहे. एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा नव्या विषयांची नवी नाटके समर्थपणे साकारण्याची गरज आहे. ती पेलण्याचे बळ दोघांनाही येवो हिच प्रामाणिक इच्छा !

सुभाष इनामदार, पुणे

email- subhashinamdar@gmail.com