Saturday, November 19, 2011
चारोळ्यांनी पुन्हा केले घायाळ..
`माझे शब्द`च्या निमित्ताने चारोळीकार चंद्रशेखर गोखल्यांनी केला रसिकांशी मनमोकळा संवाद
`मी माझा अनुभवताना
मी माझाच रहात नाही
ऐकताना गुंतून तुझ्यात
माझा कधीच उरत नाही`
अक्षरधाराच्या ४२१ व्या माय मराठी शब्दोत्सवात चंद्रशेखर गोखले आले..बोलले..आणि आपल्या अर्थपूर्ण गप्पातून आणि सादर केलेल्या भावस्पर्शी चारोळ्यातून चटका लावून गेले...
शनिवारची संध्याकाळ ..१९ नोव्हेंबर २०११.. अकरा वर्षांनी जाहिर कार्यक्रमाच्या निमित्ताने वाचकांसमोर आले ते पुण्यातल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने.
पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणा-याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत
या सहज सुचलेल्या पहिल्या चारोळीच्या अनुभवविश्वात नेवून इथं चंद्रशेखर गोखल्यांनी आपण अनुभवेलला अद्ष्य झालेला काळ पुन्हा दृष्य केला..आपल्या तेवढ्याच भावूक शब्दांतून..
आयुष्य जगताना येणा-या विरोधाभासातून या सहज सुचलेल्या चारोळ्यांनी त्यांच्या आयुष्याच जे परिवर्तन घडविले..विशेषतः `प्रिया तेंडूवकरांनी आपल्या पिशवी तपासताना माझा कवितेची वही उलगडून पाहिली आणि ती वाचतच गेली. तिने भराभर फोन केले...आणि लोकसत्ताच्या कार्यालयात माधव गडकरी यांनी आपल्या सर्व सहका-यांना केबीनमध्ये बोलावून जेव्हा या चारोळ्यांचे वाचन केले तेव्हा..आणि लौकप्रभेत ह.मो. मराठे संपादक असताना चारोळ्यांनी स्वतःचे अस्तित्व सिध्द केले तेव्हा झालेला बदल`....ते आनंदाश्रुंच्या मदतीने सांगत गेले आणि रसिक टाळ्यांनी त्याला दाद देत गेले..
शाळेत शिक्षक हुशार मुलाला पुढे बसवितात..त्यांना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायची पार्सलिटी करतात....मात्र अभ्यासात कच्च्या असलेल्य़ा माझ्यासारख्या मुलाला वर्गात मागच्या बाकावर बसवू काय बैलोबा..म्हणत..जेव्हा विचारतात..तेव्हा त्यावेळी येणारे नैराश्य..कधी कधी अनेकांच्या जिव्हारी लागते...मला ही ते बोचायचे...म्हणूनच उपस्थितातल्या शिक्षकांनी त्यांनी विनंती केली की, हुशार नसलेल्या मुलातही काही चांगले गुण असतात त्यांना सारखे हिणवू नका...त्यांनाही माणूस म्हणून वागविण्याचे आवाहन केले.
`संघर्ष, कष्ट आणि आयुष्यात नोकरी करायची नाही..या लिखणावर जगायचे ठरविले..आजपर्यंत तेच केले..मात्र ज्यांनी सतत अवहेलना केली त्यांच्या शेजारी मान्यवर म्हणून बसायचा मान मिळतो..तेव्हा..माझे मलाच आश्चर्य वाटते.. आणि असे वाटते ...त्यांनी त्यावेळी आपल्याला योग्य प्रोत्साहन दिले असते तर अधिक कांही माझ्याहातून घडले असते असे वाटते...` ;गोखले सांगत गेले.
आपल्याला इंग्रजी जमत नाही.. आणि तरीही माझे अजूनही कधी अडले नाही...मी नापास झालो..तरीही भावना व्यक्त करण्यात कमी पडत नाही...हुशारात गणला गेलो नाही....तरीही कलेतल्या मान्यवरांचे आशिर्वाद....क्वचित त्यांनी माझ्या सह्या घेतल्या.... सारेच ते बोलत असताना..
मधुनच..एखादी चारोळी सांगतात आणि त्यापाठीमगचे घटना ऐकवतात तेव्हा तर हे यांना कसे सुचते असेच जाणवत रहाते..
अंधेरीला माईकडे रहायलो गेलो..पण आई-वडिल पार्ल्यांला...एके दिवशी माझी पावले सहजपणे जुन्याच पार्ल्याच्या घराकडे वळली..गोखलेच्या घरात सगळे दिवे सुरु होते.. तेव्हा ध्यानात आले..मी चुकीनं इथं आलो..मी माईकडे अंधरीला रहातो...दारातच पावलं थबकली आणि चालतो झालो...आणि ओळी आल्या
प्रत्येकाला एक आभाळ असावं
कधी वाटलं तर भरारण्यासाठी
प्रतेकाला एक घरटं असावं
संध्याकाळी परतण्यासाठी
आपल्या मित्र नव्हते..आणि फारसे नाहीतच...म्हणून आयुष्यभर मी शब्दांशीच बोललो..आणि लेखनाचे व्यसन लागलं...
घरात पालक सांगतात..मुलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं रहावं...मुलीला म्हणतात..काय नाचायचं ते त्या घरी जावून नाच... चेद्रशेखर गोशले यांना या वाक्यांचा तिटकारा आहे..ते सांगतात... पालकहो..मुलाच्या पायात बळ देण्याचे सोडून त्याला स्वतंत्रपण सोडून देणं किती बरोबर...मुलीलाही फुलायचे ..उमलायचे..बहरायचे नाचायचे..ते माहेरी..तिला स्वतः अस्तित्व ..जग मिळायला पालकांनीच मदत केली पाहिचे..जग पाहण्याचे आणि अनुभवण्याचे बळ त्यानीच दिलं पाहिजे....
१८ एप्रिल १९९० ला माईंच्या आर्थिक बळावर `मी माझा` पहिले पुस्तक प्रकाशित झालं...मग मात्र आपण मागे वळून पाहिले नाही...
तसा मी लाजरा, बुजरा...इथंही येण्याबूर्वी आपण बोलू शकू की नाही..अशी भिती मनात होती...
मात्र असे म्हणतानाच स्वतःचे आयुष्य उसवत ते मागे मागे..काय घडलं..माणसं कशी भेटली...एका स्टुडिओच्या लिफ्टपाशी माझ्या देवता असलेल्या आशा भोसले यांनी माझ्या समोरचर `मी माझे` पुस्तक पुढे करुन यावर `सही कर` म्हणून दरडावले..तो क्षण आपण आयुष्यात विसरु शकणार नाही..असेच कांही सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे आज वयाची पन्नास वर्ष पूर्ण करताना ( ८ जानेवारी २०११) पाणावताना पाहिले..की आपणही हळवे बनतो...
त्यांचे एकच सांगणे होते माणसाला माणूस म्हणून समजावून घ्या...त्याच्यात लपलेल्या गुणांना शोधा..त्याला प्रोत्साहन द्या....
ही संध्याकाळ बोलती करणारे आमचे मित्र संजय बेंद्रे यांनीही `तू नसतास आलास तर चालले असते... कारण तूझ्या जाण्याचे दुःख अधिक होते...असे सांगून हूरहूर व्यक्त केली.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Sunday, November 13, 2011
समाजासाठी एक वस्तुपाठ-कलागौरव पुरस्कार
मुलाच्या स्मृतिसाठी ...कलावंतांना पुरस्कार
अनंतरंग आर्ट फौंडेशनचे कला गौरव पुरस्कार आणि त्यामागची भूमिका
रविवारी १३ नोव्हेबरला पुण्यात भारत गायन समाजात असंख्य संगीत श्रोत्यांच्या साक्षीने बालरोगतज्ञ डॉ. प्रमोद जोग यांच्या हस्ते समारंभपूर्वक कलागौरव पुरस्कार श्रीपाद भावे आणि सौ. अस्विनी गोखले यांना तो दिला गेला.
प्रथम तो ३०० रुपयांचा. मग ५०० आणि नंतर ७५० रुपयांचा झाला. आणि गेली काही वर्षे तो १००१ रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन वितरीत केला जातो. त्यासाठी काही लोक स्वेच्छेने पैसे देतात..पण न मागता...पण त्यासाठी स्वबळावर तो देण्याची परंपरा भिड़े कुटुंबीय जपत आहे.
या `अनंतरंग आर्ट फौंडेशनचे` कार्यवाह चित्रगुप्त भिड़े सांगतात... पुरस्कारासाठी आम्हीच नावे ठरवितो. काहींचा सल्लाही घेतो. आत्तापर्यं दिल्या गेलेल्या पुरस्कारात मधुवंती दांडेकर, विजय कोपरकर, कै. शरद गोखले, मुकुंदराज गोडबोले, रविंद्र कुलकर्णी, प्रभाकर करंदीकर, अश्विनी भिडे, सानिया पाटणकर, संजीव मेहेंदळे, विद्यानंद देशपांडे, संजय गोगटे, आनंद भाटे, राजीव परांजपे, सुचेता अवचट, संपदा थिटे ,उदयन् काळे, मानसी खांडेकर, बिल्वा द्रविड अशा अनेक गायक-वादकांचा समावेश आहे.
अनंत भिडे. हे ज्येष्ठ चित्रकला शिक्षक. अनंतरंग आर्ट फौंडेशन यानावानं ते वयाच्या ७७व्या वर्षी आपली कला जपत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होत असतात. आपल्या मिळालेल्या कमाईतला काही वाटा ते आवर्जुन समाजोपयोगी कार्यासाठी दरवर्षी वापरतात. त्यातलाच एक भाग म्हणजे सदाशिव पेठेतल्या पुण्यातल्या श्री नृसिंह मंदिरात ते गेली दहा वर्षे त्रिपुरी पौर्णिमेला ३०० पणत्या लावून दिपोत्सव साजरा करतात. यंदा तर त्यांनी पितळी निरांजने विकत घेऊन त्या १५० कायमस्वरुपी प्रकाशांनी मंदिर उजळून निघाले होते.
त्यांचा तिसरा मुलगा जन्मापासूनच मेंदुच्या पक्षघाताने आजारी असायचा. त्याला कुठलाही उपचार नाही. तो उठून बसणेही शक्य नाही. हाताच्या आधाराने बसायचा. मोजकेच अन्न भरवायचे. आई, बाबा, काका आणि आमा एवढेच चार शब्द तो उच्चारु शकायचा. सर्व उपचारानंतर तो जन्मभर तसाच रहाणार. उठणे आणि चालणे शक्य नाही. कधी झटका येईल याची खात्री नाही. त्याही अवस्थेत अनंतराव भिडे आणि त्यांच्या पत्नी यांनी आपली रोजची कामे , नोकरी सांभाळून या मुलाला..त्याचे नाव विश्वजित ...सांभाळले. अगदी २२ वर्षे. बुध्दीत वाढ होणार नाही..म्हणून शाळेत नाव नाही.. केवळ जन्म दाखला..एवढेच... त्या काळात दोघांनी आणि घरातल्या दोन्ही मुलांनी या `विश्वजीत`ला जपले. पेरुगेट भावे हायस्कूल मध्ये चित्रकला शिक्षकाचे काम ध्यासाने केले. विश्वजीतच्या काळात..कुठे सभा-समारंभात जाणे नाही... नाटक, सिनेमा पहायचा नाही. सारा वेळ मुलाच्या पालनपोषणात...घालविला...
विश्वजीतला बोलता..येत नव्हते..मात्र.. क्रिकेटचे वेड अफाट..टीव्हीवरची सगळी मॅच तो पहायाचा..मात्र लंच झाला की तो संतापायचा...भक्तिसंगीत आणि नाट्यसंगीत त्याला फार प्रिय होते. गाणे बंद झाले की तो अस्वस्थ असायचा..ते संपण्याआधी ते वडिलांना खुणेने सांगायचा..
आयुष्यातली २३ वर्षे..जपल्यानंतर तो १९९७ साली गेला. मात्र तुमचा विश्वास बसणार नाही..गेल्यानंतर महिन्याभराने अनंत भिडे यांच्यासमोर हजर झाला आणि मी दुस-यांकडे उत्तम असल्याचा साक्षात दृष्टांत दिला. भावाला `तुम्ही समारंभाला जाता पण माझे पोटाचे काय? `, असे स्वप्नात विचारले..त्यानंतर रोज सकाळी त्याला वरणःभाताचा नैवैद्य दाखवून मगच आम्ही जेवतो...अनंतराव भिडे सांगत होते..
तो तसा मासाचा गोळाच जणू..पण आमच्याकडे जन्माला आला हे भाग्य..आमच्याकडून सेवा व्हायची होती..म्हणून...त्यांचे नाव कुठेच नाही..केवळ जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यापुरते उरले..त्याचे अस्तित्व आणि नाव जागविण्यासाठी त्याला आवडत असलेल्या संगीतात काम करणा-या कलावंतांना गेली १३ वर्षे त्याच्या नावे पुरस्कार देण्य़ाचे व्रत हे कुटुंबीय करतात. स्वतःच्या पैशातून..हे कायम रहावे यासाठी एक लाख रुपये त्यासाठी डिपॉझिट ठेऊन त्याच्या व्याजातून दरवर्षी दोन कलाकारांना कलागौरव पुरस्कार दिला जातो.
आपल्याकडून समाजासाठी काही करावे यातूनच हा एक वस्तुपाठ अनंत भिडे आणि त्यांचे कुटुंबीय जपत आहेत. आपल्या मुलाचे हाल तर पाहिले..सोसले...त्याला बळ दिले..जगायला दोन हात दिले...आणि तो गेल्यावर त्याचे नाव अशा त-हेने पुरस्कार देऊन समाजासमोर ठेवले..
हा एक आदर्शच आहे..त्यासाठी यात राबणा-या सा-याच हातांचे आभार....
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
Mob- 9552596276
Subscribe to:
Posts (Atom)