Friday, September 14, 2012
अशा उमटल्या प्रकाशवाटा...
सप्टेंबरच्या ८ तारखेला ( 2012),चिंचवडचे रामकृष्ण मोरे सभागृह पूर्णपणे भरले होते. लाकबिरादरी प्रकल्पाचे कार्य कोणते आणि तो कसा ऊभारला गेला..त्यात डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांचे योगदान आहे..हे लोकांनी वाचले होते.
लोकबिरादरी मित्रमंडळ, पुणे यांच्यावतीने आमटे दांपत्यांची मुलाखत सुधीर गाडगीळ घेणार म्हणूनही उत्सुकता होती...
अपेक्षे प्रमाणे हा कार्यक्रम खरचं छान झाला...मुलाखतीतून अनेकविध नवे पदर समजले. दोन पायाच्या या माणसाने चार पायाच्या प्राण्यांनाही कसे वश केले तेही उमजले आणि खरचं त्यांच्याकडून समाजाला खूप काही शिकायला मिळाले.
अशा संस्थांना किती उत्स्फूर्तपणे आर्थिक मदतीचा हाच देतात तेही समजले. एक ७८ वर्षांचे गृहस्थ रंगमंचाच्या मागिल प्रकाश आमटे यांना भेटायचे सांगून आत आले. त्यांच्या हाता चेक होता...त्यांनी तो प्रकाश आमटे यांच्या हाती सुपूर्द केला..आणि सांगितले..मी निवृत्त शिक्षक आहे.. माझे वय. ७८ आहे. माझ्या पेन्शमधून पैसे साठवून तुम्हाला तुमच्या कार्याला २५ हजार देत आहे. त्यांचे नाव रामचंद्र त्रिंबक भालेराव, चिंचवड....
कार्यक्रमात शेवटी पुष्पा जोशी नावांच्या बाईंनी कै. स्नेहलता पुराणिक यांच्या स्मरणार्थ एक लाखाचा चेक आमटेंच्या हाती दिला. हे दिसणारे..इतरही कितीतरी आहेत आणि असतील..त्यांच्या त्या मुलाखतीमधुन जे बाहेर आले..ते प्रत्येक शब्दातून सांगणे कठीण आहे...त्याचा गोशवारा द्यावा हा उद्देश होता..
पण..इ-अनुभवच्या मासिकातून डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वतः सांगितलेली माहितीच आज वाचनात आली..ती पुढे प्रकाशवाटा मध्येही आली आहे. तोच त्यांचा लेख इथे त्यांच्याच आणि मासिकाच्या सौजन्याने पुन्हा देत आहे....मला वाटते त्यांच्या या लेखातून ते स्वतः आणि तिथली परिस्थिती त्यावेळचा काळ सारेच आले आहे...
धन्यवाद...
आपला,
सुभाष इनामदार,पुणे
------------------------------------------
अशा उमटल्या प्रकाशवाटा...
1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, “”आपण भामरागडला जाऊया.” आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.
बाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.
या काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.
शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, “”तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा? त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली ! मी चट्कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार? मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो.” बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते खूप खूष झाले.
अर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय!
अर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्यक्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.
हा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, “”बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, “”आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो.” प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच! या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.
या सुमारास परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप. शेवटचे तीन महिने इंटर्नशिप कुठल्यातरी खेड्यात करावी लागते. आनंदवन हे खेडंच आहे. त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो, पण तिथं काम करायला अजून जागा मिळाली नव्हती. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. बाबांनी त्यांना विनंती केली की, भामरागड भागात 50 एकर तरी जागा मिळावी. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती. नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांना पाहिजे ती जागा द्या, असं सांगितलंही होतं. भामरागड परिसरात काम करायचं बाबांच्या इतकं डोक्यात होतं की, पुन्हा 1971 साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले होते. यापैकीच अजित मळकर्णेकर, नागेश हटकर हे पुढे माझ्याबरोबर काम करायला लागले.
बाबा दुखऱ्या पाठीच्या उपचारांसाठी इंग्लंडमध्ये होते, त्याच दरम्यान शासनाकडून पत्र आलं की, तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमलकसा इथं जागा आहे, ती बघून घ्या. बाबा नसल्यानं आमचे ट्रस्टी पावडे वकील व विनायक तराळे यांच्याबरोबर मी ती बघायला गेलो. पहिल्यांदा तरी ही जागा सोयीची वाटली नाही. पण तेव्हा असा विचार केला की, आता या जागेला नाही म्हणालो, तर पुन्हा कधी मिळेल कुणास ठाऊक! निर्णय आम्हालाच घ्यायचा होता. “हो’ म्हणून टाकलं. जागा मिळणार हे नक्की झालं.
पण प्रत्यक्षात जमीन हातात यायला पुढं अजून तीन वर्षं लागली. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. पण नागपूरला गेलो तेव्हा कळलं की ऍडमिशनची मुदत संपून गेली आहे. मग डॉ. सुशीला नायर यांचं “कस्तुरबा ट्रस्ट’चं “महात्मा गांधी मेडिकल कॉलेज’ होतं तिथं प्रवेश घेतला, मी सर्जरीला आणि विकासनं मेडिकलला. मंदाची आणि माझी ओळख इथंच झाली. तिनं ऍनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तिथं त्याच वर्षी प्रवेश घेतला होता. तिलाही नागपूर कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती. त्यामुळं तीही “कस्तुरबा’मध्ये आली होती. मी सर्जरी विभागात आणि ती ऍनेस्थेटिस्ट, त्यामुळे आमची सतत भेट होणं साहजिकच होतं.
यातला मजेचा भाग असा की, मंदाही आमच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर झालेली. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती. तरीही कॉलेज एकच. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे भेटणं, बोलणं तर दूरच. ती कॉलेजक्वीनच होती. दिसायला चांगली, त्यामुळे तिच्याशी बोलायला, लग्न करायला खूपजण इच्छुक होते. आणि मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं!
पण ओळख झाली आणि एकत्र काम करताकरता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागल्या आणि लक्षात आलं की आपली वेव्हलेंग्ध जमतीये. आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय. पण माझा स्वभाव इतका संकोची की, मी हे तिला स्पष्टपणे सांगणं शक्यच नव्हतं. तीही काही बोलली नाही. आमच्या दोघांपैकी कुणीच एकमेकांना “प्रपोज’ वगैरे केलं नाही. आपले स्वभाव जुळताहेत हे लक्षात आल्यावर लग्न करायचं, हे मनात ठरलेलंच होतं. हे थोडंसं “अनरोमॅंटिक’ वाटेल. पण आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेतले तर त्याला हे सुसंगतच होतं.
शिक्षणानंतर मी काय काम करणार आहे, त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती. तिनं तो भाग पाहिलेला नसूनही. आणि मला हे विशेष वाटत होतं. बाबांचं नाव तिनं ऐकलं होतं, त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती, पण ती ज्या कुटुंबातून आली होती, त्यांना सामाजिक कामाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. त्यामुळेच मंदानं माझ्याशी लग्नाला तयार होणं हे आश्चर्य होतं. प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो. पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिनं माझ्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. हे आयुष्य किती खडतर असेल, याची कल्पना हेमलकसाला गेल्यावर तिला आली. पण तरीही तिनं तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला. अगदी सहजतेनं आणि आनंदानं.
मुलींशीच काय कुणाशीच जास्त न बोलणारा मी, पण ज्याअर्थी मंदाशी माझी इतकी मैत्री झाली आहे त्याअर्थी काहीतरी गडबड आहे, हे विकासनं ओळखलं. बातमी बाबांपर्यंत गेली. त्यांनी दोघांनाही भेटायला बोलावलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की, “”तू काय काम करणार आहेस याची माहिती हिला आहे का?” मी म्हटलं, “”सांगितलंय. आणि तिच्या मनाचीही तयारी आहे.” त्यावर बाबांनी निर्णय दिला, “”तयारी पक्की असेल, तर जास्त दिवस थांबू नका. परीक्षा नंतर देता येईल, आधी लग्न करा.”
मंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिवाय विकास माझ्याहून मोठा. त्याच्याआधी माझं लग्न करायचं, त्यामुळं ताईला हे फारसं पसंत नव्हतं. पण बाबा ठाम होते आणि त्यांच्यापुढं बोलायची कुणाची प्राज्ञा नसे.
लग्न आनंदवनात होणार, हे नक्की होतं. कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार? आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! “देणंघेणं’ अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरूमालही द्यायचा नाही, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील, असंही ठरलं.
मंदाच्या आईवडिलांचंही वैशिष्ट्य की, त्यांनी कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. रजिस्टर लग्न मात्र नको, असा आग्रह त्यांनी धरला. ताईलाही तसंच वाटत होतं. रजिस्टर लग्नात नुसते दोघे एकमेकांना हार घालतात, असं लग्न नको, असं म्हणण पडलं. शेवटी मधला मार्ग काढला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमचं लग्न लावा. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे. ते आनंदानं तयार झाले.
मुहूर्त बघायचा नव्हता. रविवार असल्याने 24 डिसेंबर 1972 हा दिवस निवडला. त्या दिवशी योगायोगानं साने गुरुजींची जयंती होती. बाबांनीच मंगलाष्टकं तयार केली होती. लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता लग्न लागलं. डॉ.आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नव्हत्याच. सगळ्या निमंत्रितांना पेढा दिला. आनंदवनात जेवायला त्यादिवशी मसालेभात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं, असं हे लग्न होतं.
लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हेमलकसाला गेलो. नंतर तिथून ताडोबाला. तिथंच एक रात्र मुक्काम केला. लग्न झाल्या झाल्या आम्ही जंगलात आलो आणि इथंच काम करणार, या गोष्टीचं तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरना फार कौतुक वाटलं. मंदानं आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथं त्या वेळी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. शहराच्या ते जवळ होतं. हेमलकशाला असंच काहीतरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं ते अजिबातच नव्हतं. तरीही ती शांत राहिली.
लग्न झाल्यावर हेमलकसा-ताडोबा मुक्काम आटोपल्यानंतर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ “अशोकवन’ हा अजून एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प आकाराला येत होता. तिथं आम्ही राहिलो. तिथून नागपूरला ये-जा करायचो. व्यक्तिगत आकसापोटी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश नाकारला गेला, पण नागपूरच्याच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा ही स्थानिक लोकांसाठी होती, त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येत नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त दुसरे ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. हे आवडत नव्हतं. पण माझ्यापुढं पर्याय तरी काय होता?
दरम्यान मंदानं तिचं शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तिला तेव्हा 850 रुपये पगार मिळायचा. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता वाढत होती. हेमलकसाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. आणि याच सुमारास हेमलकसा आणि नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. ही मंजुरी देण्याआधी आम्हाला अजून दोन जागा दाखवल्या होत्या. त्यातल्या एका जागेजवळ नाला होता. त्याचं पाणी तुम्हाला वापरता येईल, असंही सांगितलं होतं. या जागा होत्या त्रिवेणी संगमाजवळ, आत्ताच्या जागेपासून अजून थोड्या लांब. आता पावसाळ्यात एकच नदी पार करायला लागते. ह्या जागांसाठी दोन नद्या पार कराव्या लागल्या असत्या आणि पावसाळ्यात अजून हाल झाले असते. त्यामुळे आम्ही त्यांना नकार दिला.
आनंदवनातून हेमलकसा अडीचशे किलोमीटरवर; पण रस्ते खराब. काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळं तिथं जायला एक दिवस लागायचा. नंतरच्या टप्प्यात ओढे, नदी आहेत. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा परिस्थितीत वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून “नागेपल्ली’ची जागाही मागितली होती.
जागा मंजूर झाल्याचं पत्र मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला जाऊन धडकले. 23 सप्टेंबर 1973 या दिवशी त्यांनी तिथं डेरा टाकला. याच दिवशी “लोकबिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच; पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हतेच. “”तू तुझ्या वेळेला ये. मी कामाला सुरुवात करतो,” असं म्हणून ते गेलेच.
हेमलकसाची जागा मूळची वनखात्याची. त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि त्यांनी बाबांना- म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. बाबांनी तिथं जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली, कारण राहण्यासाठी थोडी तरी जागा मोकळी करणं गरजेचं होतं. वनअधिकारी आले आणि त्यांनी “”तुम्ही बेकायदेशीरपणे आमच्या जागेत कसे घुसलात?” असा आक्षेप घेतला. बाबा म्हणाले, “”कागदोपत्री जागा माझी आहे.” त्यावर ते म्हणाले, “”पण त्याच्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.” ते ऐकेनात. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला.
खरंतर, बाबा थेट हेमलकसाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनअधिकाऱ्याला खटकलं होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्यानं तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथं होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. “”झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही वसूूल करा” असं त्यांनी वनअधिकाऱ्याला सुचवलं. त्याची जी काही किंमत ठरवण्यात आली ती बाबांनी दिली आणि हे प्रकरण मिटलं.
सोमनाथला “कार्यकर्ते निर्माणा’ची श्रमसंस्कार शिबिरं व्हायची. अजूनही होतात. त्यातून हजारो मुला-मुलींनी विधायक काम करायची प्रेरणा घेतली आहे. त्यातील पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवातीला बाबा गेले. त्यांच्याबरोबर बरे झालेले पाच कुष्ठरोगीही होते. विकासनं ट्रक खरेदी केला होता. हेमलकसाला येण्या-जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.
हेमलकसाची जागा ताब्यात घेतल्याचं मला जानेवारी 1974 मध्ये कळलं आणि मग मी माझं शिक्षण सोडून तिथं जायचं ठरवलं. मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकसाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असताना ती सोडून मी हेमलकसाला जायचा निर्णय घेतला. बाबांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, असं त्यांना वाटत होतं. पण माझं मन आता नागपुरात रमत नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्या इच्छेनुसार आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलचा अनुभव घेतला.
मार्च 1974 मध्ये मी हेमलकसाला गेलो. बाबांनी तोपर्यंत पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदानं यायचं, असं ठरवलं होतं. शिवाय तिनं विशिष्ठ काळासाठी बॉंडही लिहून दिला होता. त्यामुळं ती नागपूरलाच राहिली. ती पुढं डिसेंबर 1974 मध्ये नोकरी सोडून हेमलकसाला आली.
हेमलकसाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. तेव्हा तिथं नुसतं दाट जंगलं होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. तिथं आवाज होते ते वन्यप्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीचे. साप, विंचू यांचं अस्तित्व पावलापावलावर होतं. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं, ही गोष्ट तुलनेने सोपी असते. तिथं राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकसात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तिथं फक्त जंगलच जंगल होतं.
बाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते होते. त्यानंतर जगन मचकळे, दादा पांचाळ हेही 1974 सालीच आले. दादा पांचाळ सोमनाथच्या शिबिराला आले होते. त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि ते हेमलकसाला आले. जगन हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूप प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला “”या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का” म्हणून विचारलं आणि तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हे होतेच. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला.
सुरुवातीचं काम जरा जास्त कठीण होतं, कारण आम्हाला राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. झाडाखाली किती दिवस राहणार? मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. त्यासाठी आधी झाडं तोडून थोडा भाग साफसूफ करून घ्यायला लागला. कार्यकर्ते कमी असल्यानं सगळे एका झोपडीतच राहायचे. पुढं मंदा आल्यावर झोपडी लहान पडायला लागली. मग ती मोठी केली. मग इतरही एक-दोन झोपड्या बांधल्या.
जागा मिळाली होती, पण पाण्याची सोय नव्हती. शेजारी नाला होता. त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच! ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्सची सोय नव्हती. कशी असणार? त्यामुळे सगळं उघड्यावरच. छोट्या झोपडीत राहायचो. झोपडी म्हणजे काय, दोन खाटा टाकता येतील एवढीच. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती, मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.
बाबांनी काही कुष्ठरोग्यांना प्रकल्पावर आणलं होतं. हे सगळे बरे झालेले होते. पण तरीही समाज, त्यांचं कुटुंब त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्यावर बाबांनी खूप विचार केला होता. कुष्ठरोग्यांना आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा, हे तर बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. लोक स्वीकारत नाहीत, म्हटल्यावर त्या माणसाला परत वैफल्य येणार! तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम शिकवलं. त्यामुळे हे सगळे शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा बनवणं, अशी कामं करायचे. त्यामुळे ते गुंतूनही राहायचे आणि समाज स्वीकारत नाही याचं दुःखही कमी व्हायचं. बाबांचे शंकरदादा म्हणून एक सहकारी होते, जणू त्यांचा उजवा हातच. तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस कर्तबगार. त्यांनी पुढं सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा कितीतरी जणांत आपण खूप काही करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकसालाही आणले होते. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, ही कष्टाची कामं त्यांनी केली. आम्ही सगळे त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. काही दिवसांच्या सततच्या परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली, ज्यात झोपडी उभारली गेली. कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेडही तयार केली. याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. निदान डोक्यावर गवताचं का होईना छप्पर आलं. पाण्याची थोडीफार सोय झाली. स्वयंपाकाचा शिधा बरोबर आणला होताच. अशा तऱ्हेनं आम्ही त्या जंगलाला घर बनवलं. सोबत वन्यप्राणी होतेच. कोण कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील, याची खात्री नव्हती. पण काही का असेना, आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.
इथं आल्यावर बऱ्याच गोष्टी प्रयोग करत, चुकत शिकलो. उदाहरणार्थ, घड्याळ दुरुस्ती, ट्रान्झिस्टर दुरुस्ती, हातपंप कसे दुरुस्त करायचे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चंद्रपूरला जाणं शक्य नव्हतं. बाकी भांडी घासणं, कपडे धुणं, स्वच्छता या कामांची सवय होतीच. आनंदवनात असताना आम्ही या सगळ्यात ताईला मदत करायचो, त्यामुळं इथंही त्याचं काही वाटलं नाही.
मी आणि माझे सहकारी इथं आल्यावर बाबा परत गेले. पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकसातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की, थांबायचं नावच घेत नाही. नागेपल्ली हा आमचा “बेस कॅंप’. तिथून हेमलकसा 65 किलोमीटरवर. उंचावर. त्यामुळे हा सगळा रस्ता चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. सगळा कच्चा रस्ता. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि नदी. हेमलकसात पाऊस सुरू झाला की उंचावरचं ठिकाण आणि जंगल त्यामुळे बदाबद कोसळायचा. हे पाणी खाली वाहत गेलं की, ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद.
बाबांना हेमलकसाला राहावंसं वाटायचं. कारण पावसामुळे नंतर पुन्हा सहा महिने गाठ पडणार नसायची. इकडे आभाळ भरून आलेलं. पाऊस पडतोय. निघावं की नाही, असं वाटायचं. पाय निघायचा नाही. पण जास्त वेळ थांबलं तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार, तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकतात. वाटेतले ओढेही भरल्याने ते परतही येऊ शकणार नाहीत. ते गेले तरी काळजी वाटत राहायची. कारण आम्हाला ते अडकले की व्यवस्थित पोहोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.
तेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकसात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकनं यायचे. नंतर नदी पार करून यायला लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त पोहायला यायचं नाही. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं पोहायला शिकणं राहूनच गेलं.
एकदा ते, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. यात पोहायला येणारा मी एकटाच. मंदालाही पोहता येत नाही. बाबा चेष्टेनं म्हणाले, “”काय रे, आत्ता होडी बुडली तर कुणाला वाचवशील? मला की हिला?” मी अर्थातच निरुत्तर झालो. पुढं बाबांना तब्येतीमुळं होडीतून येणं जमायचं नाही. मग ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि कांदोडीला मुक्काम करायचे. ते आलेत हा निरोप घेऊन तिथून जगन 30 किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन जायचो. सहसा बाबा सकाळी निघून दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो. पोचायला रात्र व्हायची. तिथंच मुक्काम करायचा. त्यांना घडलेल्या बऱ्या-वाईट घटना सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे आणि आम्ही हेमलकसाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून त्यांच्या खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची. पण ते ऐकायचे नाहीत.
आनंदवनातून गाडी आली की प्रत्येकवेळी अमुकअमुक गोष्टी गेल्याच पाहिजेत, याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. याचं कारण आम्ही जंगलात राहत असल्यानं आम्हाला काहीच मिळायचं नाही. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं हे आनंदवनाहून यायचं. विकास स्वतः ट्रक चालवत हे सगळं आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. ज्या सहा महिन्यांत आमचा संपर्क तुटायचा, त्या सहा महिन्यांत तिथलाच भाजीपाला उपयोगाला यायचा. त्या काळासाठी डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे भरून ठेवायचो.
हेमलकसाभोवती छोटी छोटी शेकडो गावं असतील. तिथं राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्याशिवाय या परिसरात वनखात्यातील मोजकी माणसं असायची. त्यामुळे तिथं दुकानं कसली असणार? दुकानं होती ती तीन-चार किलोमीटरवर भामरागडला आणि तीही अगदी किरकोळ माल, कांदे, बटाटे वगैरे ठेवायचे. ते आणायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळं आम्ही आनंदवनातून येणाऱ्या शिध्यावरच अवलंबून होतो.
बाबांप्रमाणे ताईही बऱ्याचदा यायची. तिची चार महिन्यांतून एक तरी फेरी असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. ट्रक, पुढं डोंगा आणि त्यानंतर 15 किलोमीटर चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. ताई आली की काय काय घेऊन यायची! त्यामुळे ती आली की आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरणभात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहान असताना मी भात कधीच खायचो नाही. मला पोळीच लागायची. मात्र इथं ही साधी गोष्टही मिळू नये, म्हणून ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे. मग ते पीठ चार दिवस पुरवून पोळ्याच खायच्या!
आनंदवनात काही निमित्ताने गोड झालं तर आम्हाला मिळत नाही, म्हणून त्यांच्या घशाखाली ते उतरायचं नाही. विकासही जास्तीत जास्त वेळा येऊन आम्हाला काही कमी पडत नाही ना बघायचा. सगळ्यांनाच हे जंगलात राहताहेत तर त्यांना कमी त्रास व्हावा, असं वाटायचं.
कुठल्याही आई-वडिलांना आपण कष्ट केले तरी आपली मुलं सुखात राहावी, असं वाटतंच. त्यामुळे त्यांचा जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे, तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. अर्थात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. कारण मनाची तयारी होती. तरुणवय असल्याने उभारी होती.
या वेळेस आम्हाला प्रत्येकी 150 रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्यानं आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्यानं ते पैसे खूपच होते. आमचं “किचन’ तेव्हा कमी लोक असल्यानं एकच होतं. ते पुढंही तसंच राहिलं. आमचं कुटुंब हे आमचं दोघांचं कधीच नव्हतं. ते सगळे मिळून असलेलं मोठं कुटुंबच होतं. मी सोडलो तर सगळे सुरुवातीला एकेकटेच होते. प्रत्येकाच्याच खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळं आमचा मध्यप्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा, हे पथ्य आम्ही कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसेल तरी काही बोलायचं नाही.
आम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथं नवीन घर करायला आलो होतो. उमेद असली, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं व्हायला वेळ गेला. मला झोपडीत राहायची सवय होती. साप, विंचवाची सवय होती. कष्टाचीही सवय होती. पण आजूबाजूला माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती. माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून एकत्र आले होते. पण कधीकधी आमचेही मतभेद व्हायचे. अशा वेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार? सल्ला कुणाला मागणार? ही स्थिती माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच खूप दूर आलो होतो, जिथं आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. शिवाय एवढ्या लांब, संपर्क नसलेल्या ठिकाणी राहिल्यानं त्यांची खूप काळजी वाटायची. त्यामुळे जोपर्यंत काही निरोप-बातमी कळत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं आहे, असं समजायचं. या गोष्टीची आम्ही स्वतःला सवय लावून घेतली. “नो न्यूज इज गुड न्यूज’.
आम्ही ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहत होतो ते आदिवासी मात्र आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. त्यांचंही बरोबरच होतं… त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळं त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क तरी व्हायला हवा; तोच होत नव्हता. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता आणि आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागल्या.
चार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत. कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथं तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.
याच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. एक तर हे सगळं आयुष्यच तिच्यासाठी नवीन. एक मी सोडलो, तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर तीही नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. रस्ते नाहीत, बस नाहीत. त्यामुळे मंदाचे आईवडीलही लग्नानंतर सात-आठ वर्षं हेमलकसाला येऊ शकले नाहीत. बहिणीही खूप नंतर आल्या. त्यामुळे तिलाही कुटुंबाचा आधार नव्हता. तिला काही बोलावंसं वाटलं, तर तिथं काम करणाऱ्या शांताबाई म्हणून होत्या त्यांच्याशी ती बोलायची. तेव्हा दळणवळणाच्या फोनसारख्या इतर सोयीही नव्हत्या. या सगळ्याचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. बाबा असले, तरी त्यांना सगळ्या अडचणी सांगणं शक्यच नव्हतं. पण त्यातून चांगली गोष्टही घडली. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासानं, अडचणी एकत्र सोडवण्यानं आम्ही सगळे खूप जवळ आलो. त्यातून आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं.
सुरुवातीला हेमलकसात संपर्काची काहीच साधनं नव्हती. फोन वगैरे जाऊ दे, रस्तेही नव्हते. तेव्हा नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेला जगन मचकाळे हाच आमच्यातला आणि आनंदवनातला दुवा होता. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचे आणि अशा वेळेस काही महत्त्वाचा निरोप, सामान पोचवायचं असेल, तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडं सायकलशिवाय वाहन नव्हतं. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निरोप द्यायलाही यायचा. कधी काही महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान पोचवायला लागायचं. पावसाळ्यात इतर गाड्या येणं शक्यच नव्हतं. जगन ते सायकलवर ठेवायचा. वाटेत दहा-बारा नाले, नदी असायची. बऱ्याचदा हे सगळं दुथडी भरून वाहत असायचं. एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान हातात घेऊन पाण्यातून पलीकडच्या तिरावर जायचा. मग परत येऊन सायकल हातात घेऊन जायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा दोन-तीन फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने भरलेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण होतं, म्हणून हा सारा खटाटोप. पुन्हा पुढच्या नाल्यापर्यंत सायलकवरून रपेट. पाणी आलं की पुन्हा थांबायचं. पाणी जास्त असेल, तर ते उतरायची वाट बघत त्या निर्मनुष्य जंगलात तासन् तास थांबून राहायचं. हे तो वर्षानुवर्षं करत आला आहे, तेही हसतमुखानं.
हेमलकसात अशा एक ना अनेक अडचणी होत्या, पण हळूहळू त्यांची आम्हाला सवय होत गेली. दरम्यानच्या काळात मंदा प्रेग्नंट होती. इथं खाणंपिणं सगळंच मर्यादित. तिनं या वेळी ताज्या भाज्या खायला हव्यात. त्या कुठं मिळणार? कपूर नावाचे ट्रक ड्रायव्हर तेव्हा त्या भागात बाबूंची वाहतूक करायचे. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. ते चंद्रपूर, नागपूरला गेले की तिकडून येताना हमखास ताज्या भाज्या घेऊन यायचे. त्यांच्याबरोबरचे संबंध खूप टिकले. त्यांच्या मुलांबरोबरही आमचे अजून संबंध आहेत. अशी सहृदयता आम्ही खूप अनुभवली. हे तरुण इथं सगळं सोडून येऊन बसलेत, त्यांना मदत करावी, अशी इच्छा तिथं येणाऱ्या प्रत्येकालाच व्हायची आणि त्यांनी ती यथाशक्ती केलीही.
ताईला हे कळलं तेव्हा ती येऊन मंदाला तिथून घेऊन गेली. पावसाळ्यात तिला तिथं ठेवणंही धोक्याचंच होतं. पिलूचा जन्म 9 ऑगस्ट 1975चा, नागपूरचा. त्या वेळेस मंदाचे वडील पक्षाघाताने खूप आजारी होते. तिच्या आईची खूप धावपळ व्हायला लागली. म्हणून पिलू झाल्यावर लगेच ताईनं मंदाला आनंदवनात आणलं. मला मात्र पिलूबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांनी तिकडून पत्र टाकलं होतं. पण एवढ्या पावसात ते माझ्यापर्यंत कसं पोचणार? बाबांनी जगनला फोन केला; पण पाऊसच एवढा होता की तो सायकलनंही येण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे मला बातमी कळलीच नाही. हेमलकसा उर्वरित जगापासून तुटलेलं होतं.
दुसरीकडे, मी हेमलकसाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंटही येत नव्हते. आदिवासी नसलेले, छोटे दुकानदार, जंगलखात्यातले लोक उपचारासाठी यायचे. पण ज्यांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं इथं आलो होतो त्यांचा विश्वास अजून मिळवू शकत नाही, याची खंत वाटायची. त्यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, मॅनेन्जायटिस हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडून हात-पाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळं जखमी होणं, हेही नेहमीचंच. तेव्हा मलेरियाची साथ आली होती. गावोगाव फिरायचो. हेमलकसाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गावं म्हणजे छोट्या वस्त्याच. 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटरवरच्या गावी जाऊन लोकांनी दवाखान्यात यावं असं आम्ही सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती पूर्णपणे वेगळीच भाषा आहे. ती भाषा शिकावी कशी असाही प्रश्न होता. कारण लोक खाणाखुणांनी का होईना, संवाद साधायला, समोर यायलाही तयार नव्हते.
माडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नाहीत. आता काळ बदललाय. पण पूर्वी कमरेला बांधलेलं एक फडकं, एवढाच त्यांचा पोशाख. यापेक्षा जास्त कपड्यांसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून असणार? आणि त्यांना गरजही वाटत नव्हती. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. अगदी नुकतं जन्मलेलं मूलही तसंच उघडं असायचं. कितीही थंडी असो, पाऊस असो – यांचा वेष ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परकेपणा वाटण्याची शक्यता होती.
मला स्वतःला कपड्यांचा अजिबात शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी शर्ट-पॅंट घालायचो. हेमलकसाला आल्यावर पायजमा- शर्ट घालायला लागलो. तरीही कुडकुडणाऱ्या थंडीत हे आदिवासी उघडे राहतात, हे पाहून आपण पूर्ण कपडे घालतोय याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅंट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन, असे कपडे मी घालायला सुरुवात केली. नंतर हेमलकसात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला घालायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकसाला सोय नव्हती, तेव्हा मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले आहेत.
पेशंट न यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे अंधश्रद्धा. हे लोक शिकलेले नसले, तरी आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे, हे त्यांना कळत होतं; पण अनेक वर्षं चालत आलेल्या प्रथांना ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कोणी आजारी पडलं तर त्यानं या मांत्रिकाकडंच उपचारासाठी जायचं, हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची. पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा, अंगारेधुपारे करायचा. कधी कधी पेशंट बरा व्हायचा, बऱ्याचदा नाही. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल, अशी समजूत या लोकांत होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे.
हेमलकसाजवळच्या एका छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फीटचा त्रास व्हायचा. इथं थंडी प्रचंड आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून अगदी जवळ झोपायचे. असे झोपले असतानाच हा मुलगा फीट आल्यामुळे शेकोटीत पडला आणि तीस-चाळीस टक्के भाजला. पारंपरिक उपाय केले; पण त्यानं फरक पडला नाही, म्हणून शेवटी गावातले लोक धीर करून त्याला आमच्याकडं घेऊन आले. या सगळ्यात काही दिवस निघून गेले होते. त्याच्या भाजल्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या होत्या. (कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात संवेदनाच होत नाहीत, त्यामुळे जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे त्या जखमेत अळ्या-पू होणं हे प्रकार नित्याचेच.) मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटिबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. त्यानं अशा गोळ्या त्यापूर्वी कधीही घेतल्या नसल्यानं त्याच्यावर त्याचा परिणाम लवकर झाला. त्याचं फीट येणं कमी व्हावं म्हणून त्याही गोळ्या दिल्या. तो खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काहीजण आले. त्यांना डायरिया झाला होता. औषधानं तेही बरे झाले.
हे सगळे पेशंट आसपासच्या गावांतून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काहीजण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्थितीत असेल तर त्याला ते स्वतः बनवलेल्या “स्ट्रेचर’वरून आणायचे. कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडाच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं.हा त्यांचा स्ट्रेचर. बाज किंवा ज्याला खाट म्हणतात ती उलटी करायची आणि त्याच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं, अशीही पद्धत होती, अजूनही आहे. दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी चार-सहाजण येतात. पेशंट असा वाटेतल्या सगळ्या गावांतून आमच्याकडे यायचा. तो बरा झाला पाहिजे, हाच आमचा ध्यास असायचा, कारण नाही बरा झाला, तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावागावांतून जाणार. बाकीचे लोक ते सगळं बघणार आणि त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार. तसं घडू नये म्हणून येणारे पेशंट बरं होणं आवश्यक होतं. याचं खूप दडपण यायचं. आम्ही दोघंच डॉक्टर. त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी. प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यामुळे पुस्तकं बघून, आपसात चर्चा करून उपचार कसे करायचे, हे ठरवायचो.
एकदा अशाच एका माणसाला लांबच्या गावाहून चार-पाचजणांनी उचलून आणला. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध असल्याने त्याला काय होतंय, हे कळायला मार्ग नव्हता. मलेरिया, मॅनेन्जायटिस काहीही असू शकत होतं. आमच्याकडे इतर तपासण्या करून निदान करायला काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना, या विचारात रात्रभर झोपच आली नाही. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि हायसं वाटलं. येताना खांद्यावरून आलेला पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला.
लोकांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना, पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. पण लोक अजूनही मांत्रिकाकडे जायचे. एकतर त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. पण त्याच्या उपायांनी बरं वाटलं नाही, तर “”तुझ्याकडून बरा झाला नाही, आता डॉक्टरकडं जाऊन बघतो,” असं सांगून आमच्याकडं यायचा धीटपणा काहीजण दाखवू लागले होते.
मांत्रिकांचा आम्हाला विरोध होता. साहजिकच आहे. आमच्यामुळे त्यांच्या पोटावर पाय येत होता. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्यानं त्याच्या पद्धतीनं उपाय केले; पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय, या भीतीनं तो तिला आमच्याकडं घेऊन आला. तिला औषधं दिली, सलाइन लावलं. ती वाचली. त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला.
पण कधी कधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही. कधीकधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, याला बाहेरचीच बाधा झाली आहे. याला मांत्रिकच बरा करेल. मग वाईट वाटायचं. कारण एकदा पेशंटला घेऊन गेले की गेले. तो परत यायचा नाही. तो थांबला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून एक तोडगा काढला. जर पेशंट लगेच बरा झाला नाही, तरी त्याला घेऊन जाऊ नका, अशी विनंती आम्ही त्याच्या नातेवाईकांना करायचो. तुमच्या मांत्रिकालाही इथंच बोलवा. त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो. कुणाकडूनही तो वाचणं महत्त्वाचं, असं सांगू लागलो. अंगारे-धुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल, हे आम्हाला माहीत होतं; पण त्या लोकांना समजावून सांगणं कठीण होतं, म्हणून मग हा मार्ग काढला. त्यामुळे काहींचं श्रेय मांत्रिकाकडं गेलं असेलही; पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्त्वाचं होतं. या उपायानं मांत्रिकांचाही विरोध जवळजवळ संपला.
त्याकाळी आम्ही सगळेच बांबूच्या पट्ट्या मारलेल्या झोपडीत राहत होतो. त्यामुळे पेशंट आले की. त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठंही एक मांडव टाकलेला असे. तिथं ते राहायचे, कारण ते बऱ्याच लांबून, सत्तर-ऐंशी किलोमीटरवरूनही आलेले असायचे. बरोबर आठ-दहाजण असायचे. ते परत कसे जाणार? मग पेशंटला बरं वाटेपर्यंत ते सगळे तिथंच राहायचे. तिथंच अन्न शिजवून खायचे. अजूनही हीच पद्धत आहे. मात्र आता मांडवाऐवजी शेड आहे. त्याला “घोटूल’ म्हणतात. आता दवाखान्याची इमारत झाली असली, तरी गंभीर पेशंट दवाखान्यात आणि बाकीचे बाहेर राहणंच पसंत करतात.
आमच्या कार्यकर्त्यांपैकी पाच-सहाजण आम्हाला दोघांना मदत करायचे. आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. औषधंही आम्हीच द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यांसमोर होती, त्यामुळं पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून यायची. त्यामुळं सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे. पेशंटचं बॅंडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं, अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी मदत करायचे. मंदा ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी करायची तिथं फारशी ऑपरेशन्स नसल्यानं फार काम नसायचं. त्यामुळे या वेळात नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बॅंडेज तयार कशा करतात, हे तिनं शिकून घेतलं होतं. त्याचा इथं उपयोग झाला. ते तिनं इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिनंच शिवले. त्यासाठी शिवणाचं मशिनही मागवलं होतं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. त्यातले काही गाऊन अजूनही आहेत.
हेमलकसा परिसराला डॉक्टरची गरज आहे, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं आम्ही तिथं गेल्यावर पेशंटची रीघ लागेल, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला धक्काच बसला होता, पण नंतर नंतर गाडी रुळावर येत गेली. आता गरजेचं होतं ते तिथली भाषा शिकणं. ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो.
माडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा “बेस’ आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत “दंड’ म्हणतात. “यॉव’ म्हणजे पाणी. इथल्या वनखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती. त्यांच्याकडून काही शब्द लिहून घेतले. पेशंटचीही मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालंय? मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस? गावाचं नाव काय? किती लांब आहे?’ हे विचारायला लागलो. दुभाष्या नसल्यानं त्रास व्हायचाच. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. त्यातून हळूहळू जरुरीपुरती माडिया भाषा कळायला लागली.
भाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची, हा मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं, गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर कसं काढायचं हे माहीत नव्हतं. लोक त्याच्यासकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर बरं वाटेल, असं वाटल्यावरून सगळ्या गोळ्या एकदम खायचे. असे दोन-तीन प्रकार घडले. असं झालं की, त्याला उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्याच्या पोटातून बाहेर काढायचो. असं काही घडलं की भीती वाटायची. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो. पण नंतरच्या डोसाचं काय? वेळा कशा सांगणार? त्यांना घड्याळच माहीत नाही. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणं उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही धोका होताच. पेशंट आमच्यासमोर असताना आमचं लक्ष असायचं. तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल, याचं दडपण यायचं.
माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे, याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ते डोळ्यांनी पाहिलेलंही होतं. पण यांना लिहिता-वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही, याची जाणीव इथं आल्यावरच झाली. इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. गरिबीमुळं दोन वेळच्या खाण्याची मारामार. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ते मिळवायच्या तजविजीत. खाणं काय, तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीही ते करून खातात. कारण यापलीकडे काही दुसरे पर्याय असतात याची जाणीवच नाही. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेचजण खंगलेले. माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो होतं. माणसं ऐन तारुण्यात सुरकुतलेली. त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळणारच नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून ते ओळखायचं. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठं बसणारच नाही, इतकी फसगत होते.
गरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे इतके स्वतःच्या कोषात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्याच्या रंगामुळं, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. कलिंगडासारखी फळं त्यांनी कधी बघितली नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथं काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना, असं वाटायचं. (त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात, हे बघून मला इतक्या वर्षांत कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदानंही घातला नाही आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडं आनंदवनात ताईनंही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती.)
मात्र मला वाटायचं की, या आदिवासींत अंधश्रद्धा आहे, अगदी कमालीची आहे, ती असूही नये. पण आपण त्याच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं-वाईट आपल्याला कळतं, असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणं ते करताहेत तेच चांगलं, असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन “तुम्ही करता ते वाईट’ असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल? पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून? मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता?” तो एक मोठा धडा होता. खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं तुमच्यावाचूनही चाललेलंच होतं. आपण आपल्या समाधानासाठी इथं आलेलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईनं होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील.
त्या वेळी काम करायची अशी आमची काही “सिस्टीम नव्हती.
आम्ही सगळेच तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं. त्यामुळं आयुष्य जसं समोर येईल, तसं त्याला तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार, असं वाटायचं. अशा वेळेस एक पथ्य पाळलं ः मनाविरूद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. प्रत्येकालाच इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. त्यामुळं आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलंय, ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या. सगळ्यांनाच…
डॉ. प्रकाश आमटे
लोकबिरादरी प्रकल्प,
हेमलकसा, पो. भामरागड, जि. गडचिरोली, 444703.
ई-मेल : lbprakalp@lycosmail.com
संपर्क : अनिकेत आमटे : 9423208802
(शब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक)
Tuesday, September 11, 2012
नशीबाची साथ
अविरत कष्ट आणि मेहनत घेतलेली अनेक माणसे आहेत.पण त्यांना तसे यश मिळत नाही...
कारण शोधायची प्रयत्न केला तर दिसते..त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही..
तुम्ही म्हणणाल नशीब वगैरे काही झूट.
पण मित्रांनो शेवटी संधी शोधण्यासाठी ती मिळवावी लागते...
सहजपणे ती घरबसल्या चालून येत नाही..
जर तशी ती आली तर एखादा भाग्यवानच.
म्हणूनच गरज असते ती मार्गदर्शकाची...त्यालाच आपण सारे गुरू म्हणून संबोधतो.
अनेक जण मित्रमंडळी ज्या बाजुला जातात तो अभ्यासक्रम निवडतात..
मग बारावी नंतर लक्षात येते आपली साईड चुकली..
हिच निवड योग्य बाजुला तेव्हाच केली असती तर...
मार्ग अधिक सुकर झाला असता..
एकूणच सारा भार आहे तो तुमच्या शिक्षकांवर..
त्याप्रमाणे मार्गदर्शकावर..
यात तुमचे पाल्यही असू शकतात..
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
कांही नाती पक्षाच्या पलिकडली असतात..
राजकारणातील कांही नाती पक्षाच्या पलिकडली असतात..केवळ मित्रत्वाच्या नात्याने ती जपली जाऊ शकतात. याचा उपयोग समाजात कार्य करणा-या अनेकविध व्यक्तिंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठीही होऊ शकतो याचा आदर्श पुण्यातल्या कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार २०१२ च्या वितरण सोहळ्यात पुणेकरांना अनुभवता आला.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ११ सप्टेंबरला झालेल्या समारंभात हे चित्र स्पष्टपणे मनावर उमटले गेले. एवढेच नव्हे तर महिलांवरच्या अन्यायाविऱुध्द आवाज उठविणा-या सातारच्या वर्षा देशपांडे..काच-कागद-कचरा गोळा करणा-या संघटनेच्या लक्ष्मी नारायणन या दोन चळवळीत स्वतःला झोकून दिलेल्या दोघींचा सत्कार हा पुरस्कार देऊन केला गेला.
धनंजय थोरात जाऊन पाच वर्षे झाली..तो कॉँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता..त्याच्या मित्रमंडळाने त्याची संगीताची आवड आणि तबला वादनाची किमया ओळखून संगीत क्षेत्रातल्या कलावंताचाही गौरव करण्याचे ठरविले. गेली पाच वर्ष तो पुरस्कार देताहेत. यंदा तो ज्येष्ठ गायक विजय कोपरकर यांना दिला गेला.
धनंजयचा मित्रपरिवार यात अगदी उल्हासदादा पवार , गिरीश बापट, अंकूश काकडे ते मोहनदादा जोशींसारखे नेतेही समाविष्ट आहेत. दरवर्षी त्याची स्मृती जपण्याचे काम ते करतात...त्यातून समाजात चांगले काम करणारे अनेक कार्यकर्ते लोकांपर्यत त्यांच्या कामातून माहित होतात.
अशा सोहळ्यातून अनेकांना स्फूर्ती मिळते. अनेक विविध मान्यवरांचे विचार ऐकता येतात. खासदार वंदना चव्हाण आणि संगीतकार आनंद मोडक दोघांनीही निवड समितीचे योग्य निवडीबद्दल जाहीर कौतूक केले.
आजच्या समाजाला दिशा देण्याचे काम यातून घडते. दिशा देता देता त्यातून शिक्षणही होते. परंपरा आणि संस्काराचे जतन होते. नव्याचे कौतूक होते. जुने आणि काळाबरोबर वाहून गेलेली जुनेपुराणे साफ होऊन पुन्हा नव्या तजेला घेऊन तरुणांच्या पुढे नवा आदर्श निर्माण होतो...
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्यांना दहशतवादी ठरवून मोक्का लावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी मंगळवारी येथे केली.
धनंजय थोरात यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देशपांडे, विजय कोपरकर आणि लक्ष्मीनारायण यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना देशपांडे बोलत होत्या. खासदार वंदना चव्हाण, संगीतकार आनंद मोडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. थोरात यांच्या मातु:श्री रमाबाई, आमदार गिरीश बापट, उल्हास पवार, मोहन जोशी, विपिन गुपचूप व्यासपीठावर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाल्या, ""मुली मारण्यात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. राजर्षी शाहू, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या राज्यात स्त्रीभ्रूणहत्या इतक्याच मोठ्या प्रमाणावर होते, ही खेदाची बाब आहे. त्यातही हा प्रकार उच्चवर्णीय, शिकल्या-सवरल्या शहरी लोकांनी केला आहे. मूल्य व्यवस्था ढासळल्याचेच हे लक्षण आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली मुलींची सर्रास हत्या करण्यात आली. असे गैरप्रकार टाळण्यासाठी महिलांच्या योजनांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, महिला आयोग अध्यक्षपद चार वर्षांपासून रिक्त आहे ते भरावे, महिला धोरण जाहीर करावे.''
सतेज पाटील म्हणाले, ""आम्हाला आई, बहीण, पत्नी हवी असते. मात्र, मुलगी नको असते. दुसरीकडे चिल्लर पार्टीसारखे प्रकार याच शहरात उघडकीस येतात. हे वातावरण बदलण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे. केवळ कायदे करून या समस्या सुटणाऱ्या नाहीत. उलट कायद्याच्या अंमलबजावणीची मानसिकता समाजाने ठेवल्यास असे प्रकार सहज टळू शकतील. एकविसाव्या शतकातील हे वैचारिक प्रदूषण घालविण्याची वेळ या पुरस्कारानिमित्ताने आली आहे. समाजप्रबोधनाची चळवळ या पुरस्कारानिमित्ताने सुरू व्हावी.''
लक्ष्मीनारायण म्हणाल्या, ""कचरावेचकांमुळे पर्यावरणाचे रक्षण होत असूनही त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जात नाही. घरोघर जाऊन कचरा वेचणाऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जावेत,'' अशी मागणी करतानाच पुणे महापालिकेने इतरांच्या तुलनेत बऱ्याच योजना लागू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोपरकर म्हणाले, ""संगीत, साहित्य, कला, क्रीडा यांना प्रोत्साहन देणे आवश्य क आहे; अन्यथा चिल्लर पार्टीसारखे प्रकार घडत राहतील. दूरचित्रवाहिन्यांनी सुरू केलेले महागायक, आयडॉल हे प्रकार संगीताबरोबरच तरुण पिढीसाठीही घातक आहेत.'' ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.
http://www.esakal.com/esakal/20120912/5070298357134235573.htm
Sunday, September 9, 2012
दिव्यत्वाची प्रचिती
कुणास ठावे किती काळ ते
येथे आता जगणे आहे.
किती दिसांची ही संगत आहे
इथे उदेला कोणी तो तो
जाण्यासाठी जगला
आयुष्याची बळकट दोरी
जीवनभर चिंती जाळी
जितेपणी ते कधी साधीशी
मरणातून मुक्त
इथे घडाया आज पाहिजे
क्षण तरी तो सुप्त..
काय घडावे कुठे पळभरी
थांबायाचे नाही..
जीवनातूनी आला तेव्हा
गणीत दिसांचे होई...
वाट संपता..खोल दिसे ती
दरी दाट वृक्षांची
कुठे जाणे..परतुनी येणे
ती दिव्यत्वाची प्रचिती...
-सुभाष इनामदार,पुणे
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदांपरी येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
यज्ञी ज्यांनी देउनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती
मध्यरात्रि नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी
त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती !
Subscribe to:
Posts (Atom)