Monday, April 9, 2012

ग्रेस यांच्या मृत्यूनंतर



-अफवा,कंड्याचे कुरूप आणि हिडीस दर्शन

आयुष्यभर आपल्या कवितेतून अज्ञाताचा शोध घेणारे आणि जिवंतपणीच एक दंतकथा बनलेले कवी ग्रेस मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेले . मराठी साहित्यातला एक बावनकशी प्रतिभावंत कायमचा पडद्याआड गेला .
जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणारच असतो . एखाद्याचा मृत्यू अकल्पित , अचानक झाला तर हयात असणा-यांना धक्का बसतो ,.मरणारा जीवाभावाचा असेल हा धक्का अतिशय तीव्र असतो आणि तो पचवणं खूप कठीण असतं .
ग्रेस यांना कर्करोगाने ग्रासले , त्या रोगाला शरण न जाता गेली काही वर्ष ग्रेस अतिशय धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले . ग्रेस यांचा तो धीरोदात्तपणा ग्रेस यांनाच साजेसा होता ; म्हणजे एकाचवेळी तो आचंबित आणि लुब्ध करणारा होता , ते धैर्य आपले डोळे दिपवणारे आणि आपल्याला त्यापुढे नतमस्तक करायला लावणारा होते , मृत्यूला सामोरे कसे जावे याचाही तो एक आदर्श वस्तुपाठ होता .


ग्रेस यांचे हे असे धीरोदात्तपण बघणारे त्यांचे जे आप्त , मित्र आणि चाहते होते त्या काफिल्यातला मीही एक होतो . यापैकी ग्रेस यांच्या निकटचे कोण आणि दूरचे कोण , त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने आतून उन्मळून गेलेले कोण आणि वरवर उमाळे काढणारे कोण याचा जो अनुभव या काळात आला तो कथन करणे हा या मजकुराचा हेतू आहे .

मनाच्या अगदी तळपातळीवर ग्रेस यांना त्यांच्या जवळचं कोण वाटत होतं , त्यांना कोणाविषयी किती ममत्व होतं , कोणाविषयी ग्रेस यांच्या मनात टोकाची कृतज्ञता होती याचे उल्लेख त्यांच्या लेखनात आलेले आहेत . विविध मुलाखती , लेख , भाषणे आणि अगदी त्यांच्या शेवटच्या ‘ओल्या वेळूची बासरी’ या पुस्तकातही ही नावे सापडतील . ग्रेस यांच्या घरी ‘आय एम फ्री बट नॉट अव्हेलेबल’ ही सूचना धुडकावून कसा थेट प्रवेश कोणा-कोणाला होता , ग्रेस यांना कोण ‘अरे-तुरे’ संबोधू शकत असे आणि कोणाला ग्रेस ‘अरे-तुरे’ संबोधत हेही जाणकारांना चांगलं ठावूक आहे . असं असलं तरी मृत्यूनंतर ग्रेस यांच्यासंबधी ज्या वावड्या उडवल्या गेल्या , ज्या अफवा पसरवल्या गेल्या त्या असभ्य ,अश्लाघ्य आणि हिडीसपणाचा कळस होत्या . नागपूरच्या साहित्य जगतातील काहींनी हे असं वागताना सर्व मर्यादा ओलांडल्या आणि काही पत्रकारही त्यात सहभागी झाले .

इथे माझा स्पष्टपणे काही मजकूर लिहिण्याचा संबध आला तो ग्रेस यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्काराच्या ‘लोकसत्ता’त आलेल्या बातमीनंतर . या बातमीत माझा मित्र ज्येष्ठ कविवर्य श्रीपाद भालचंद्र जोशी याच्याविषयी एक असभ्य उल्लेख आला . हा उल्लेख मी ‘लोकसत्ता’त प्लान्ट केला अशी बातमी ‘लोकसत्ता’चे मुंबई कार्यालय आणि विदर्भ साहित्य संघातील काही जनाकडून पसरविण्यात आलेली आहे असे माझ्या २ एप्रिलला ( एव्हाना श्रद्धांजली सभाही आटोपली होती ) नागपूरला परतल्यावर अनेकांनी लक्षात आणून दिले . ‘लोकसत्ता’चा गेल्या वर्षी राजीनामा दिल्यावर मी त्या वृत्तपत्रात ३/४ कौटुंबिक पातळीवरील मित्र वगळता कोणालाही दूरध्वनी केलेला नाही ; एवढेच कशाला त्या दिशेने वळूनही पाहिलेले नाही . ज्या थाळीत जेवलो त्या थाळीला छिद्र पाडावे अशी माझी वृत्ती नाही आणि ज्या कोणाची कधीही थोडी जरी मदत झाली त्यांच्याबद्दल कोणताही गैरसमज पसरवणारे बोलावे हा माझा स्वभाव नाही , ‘लोकसत्ता’बद्दल तर माझ्या मनात नितांत कृतज्ञता आहे ; हे मला ओळखणा-या सर्वांना चांगले माहिती आहे . ती कृतज्ञता अनेकदा व्याख्यानातून मी प्रकट केली आहे ; यापुढेही करत राहीन.

खरं तर , ग्रेस यांचे २७ मार्चला पहाटे अंतिम दर्शन घेतल्यावर पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे व्याख्यानासाठी मी लगेच औरंगाबादला रवाना झालो , तिथून नासिकला गेलो आणि २ एप्रिलला परतलो . स्वाभाविकच ग्रेस यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी काय घडले याची मला काहीच कल्पना नव्हती . शिवाय असे काही ‘नॉन जर्नलिस्टिक’ असभ्य उद्योग करण्याचा , एक पत्रकार म्हणून बेजबाबदारपणे वागण्या किंवा लिहिण्याचा कोणताही विक्रम माझ्या आजवरच्या साडेतीन दशकाच्या पत्रकारीतेत नोंदला आणि नोंदवलाही गेलेला नाही . त्यामुळे श्रीपाद भालचंद्र जोशीविषयी आलेल्या असभ्य उल्लेखाचे अपश्रेय मला दिले गेल्याचे आश्चर्य वाटले .

मग माहिती मिळवली तर ,‘लोकसत्ता’च्या मुंबई येथील महापे कार्यालयातून (या आधी नागपुरात असलेल्या) ) माझ्या एका कनिष्ठ सहका-याने ही अफवा पसरवली असल्याची ठोस माहिती मिळाली . त्यानेच नागपुरात विदर्भ साहित्य संघातील काहींना तसेच एका नवश्रीमंत व्यावसायिकाला सेलवर संपर्क साधून करून अंत्यसंस्काराचे तपशील मिळवले आणि त्याची बातमी मुंबईतून पाठवताना नागपूरहून आलेली बातमी बाजूला ठेवली .हे करताना कार्यकारी संपादकांनी ‘हीच’ बातमी वापरण्याचा आदेश दिले असल्याचे सांगितले . त्याने नागपुरात कोणाला आणि नागपुरातील कोणी त्याला सेलवर संपर्क साधला याचा तपशीलच कळला . ‘लोकसत्ता’ची त्या वृत्तामुळे साहित्य वर्तुळात नाचक्की झाली आणि त्याचे खापर ‘लोकसत्ता’च्या नागपूरच्या वार्ताहरावर फुटले . वस्तुस्थिती मात्र वेगळी आणि विकृत आहे . ही सर्व माहिती माझ्याकडे विचारणा करणारांनाच मी दिली आणि माझ्याविषयी होऊ पाहणारा गैरसमज दूर झाला . ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राची विश्वासार्हता , चक्की-नाचक्की याविषयी आता मी विचार करण्याची गरज नाही ,त्यासाठी नवे नेतृत्व आहे पण , खाल्ल्या अन्नाला माणसं जागत नाहीत हा सार्वत्रिक अनुभव या निमित्ताने आला हे मात्र खरं !


ग्रेस यांच्या निधनाच्या बातमीनंतर ‘महेश एलकुंचवार मिडियापासून दूर पळाले’ ही कंडी तर ज्या पत्रकार आणि साहित्यिकांनी पिकवली त्यांच्या बौद्धिक दारिद्र्याची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे !

घडलं ते नेमकं असं आहे –

‘स्टार माझा’च्या भारती अत्रे-सहस्रबुद्धे हिचा मला २६ मार्चला सकाळी फोन आला . ती म्हणाली की , सर, कवी ग्रेस वारले आहेत , बातमी कन्फर्म करायला रिपोर्टर आत गेलाय , त्याचा फोन आला की लगेच फोन करते , तयार रहा . माझी पत्नी ग्रेस यांची विद्यार्थिनी , शिवाय पत्रकार ; ( अधिक माहितीसाठी ‘रुची’च्या दिवाळी अंकातील ‘एकांतपुरुष’ हा माझा लेख वाचा ) टीव्ही सुरु करून तिला ही माहिती देत ग्रेस यांच्या निधनाचे वृत्त जाहीर होताच कोण-कोणाला फोन करायचे हे तिला सांगत असताना आणि ही यादी महेश एलकुंचवार , विवेक रानडे , शुभदा फडणवीस अशी होते ना होते तोच ‘स्टार माझा’तून फोन आला . नंतर तासभर वेगवेगळ्या वृत्त-वाहिन्यांना ग्रेस यांच्यासंबंधी माहिती देण्यात मी अडकलो . हे काम संपल्यावर मी आणि माझी पत्नी दहा-बारा मिनिटे सुन्नपणे बसून होतो .

ग्रेस यांच्या प्रदीर्घ काळापासून अपेक्षित असलेल्या निधनाच्या बातमीने बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर ‘सरांनी फोन करायला सांगितला आहे’ असं पत्नीने सांगितलं . मी फोन केला तर एलकुंचवार सेलफोन उचलेनात आणि त्यांचा घरचाही फोन कोणी उचलला नाही . या दोन ( पक्षी : ग्रेस आणि एलकुंचवार ) प्रतिभावंतामधला अदृश्य जिव्हाळा मला चांगला ठाऊक आहे . एकमेकाच्या गैरहजेरीत परस्परांच्या प्रतिभाशाली सर्जनशीलतेचा किती अथांग आत्मीयतेने ते बोलतात हे मला ठाऊक होते . बराच वेळ दोन्ही फोनवर डायल करुनही एलकुंचवारांशी संपर्क होत नव्हता . एलकुंचवार आणि भास्कर लक्ष्मण भोळे यांच्यातील असाच ऋणानुबंध होता . भोळे आजारी झाले आणि कोमात गेले तेव्हा एलकुंचवार चीनमध्ये होते . नागपुरात आल्यावर भोळेसरांना पाहिल्यावर ते कसे सैरभैर झाले होते ते आठवलं आणि फोनला प्रतिसाद का मिळत नाही हे समजून घेण्यासाठी एलकुंचवार यांच्याकडे जायला मी तयार झालो . निघण्याआधी पुन्हा एकदा फोन केला तर घरी काम करणा-या बाईंनी फोन घेतला आणि चौकशी केल्यावर सांगितलं ते असं- त्या ( म्हणजे त्या बाई ) बाहेर अंगणात काम करत होत्या म्हणून त्यांनी फोन घेतला नाही आणि सर सेलफोन घरीच विसरून पोस्टात गेले आहेत . मोबाईल सारखा वाजतो आहे पण मला तो घेता येत नाही , वगैरे वगैरे . माझा जीव भांड्यात पडला . नंतर घरी परतल्यावर एलकुंचवार यांचा फोन आला आणि त्यांनी सेलफोन कसा घरी विसरला वगैरे सांगितलं .आता यात एलकुंचवार मिडियापासून दूर पळण्याचा संबध येतो कुठे ? ( अशा काही अफवांना उत्तरे देण्याचा एलकुंचवार यांचा स्वभाव नाही पण वस्तुस्थिती ही अशी आहे ) अशी कंडी साहित्य संघाचे काही पदाधिकारी , तो नवश्रीमंत व्यावसायिक आणि मुंबईत बसून हा दीडशहाणा पत्रकार करत होते . घटना काय घडली , तिचे गांभीर्य काय आणि अशावेळी कसं वागायचं असतं हे विसरून किंवा त्याचं भान नसल्यानं असं विकृत वर्तन या सर्वाकडून घडलं असावं .

कवीश्रेष्ठ ग्रेस यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा मोठा उमदा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला . कलावंत आणि साहित्यिकांचा मरणोत्तर ही सन्मान करणारे राज्यकर्ते सुसंस्कृत आहेत आणि त्यांना सांस्कृतिक भान आहे याचे दर्शन यानिमित्ताने घडलं , पण इथेही काहीचा
( पुन्हा तेच ते ! ) नतद्रष्टपणा

मोठ्या कुरुपतेने आणि हिडीसपणे समोर आला . ग्रेस यांच्या पार्थिवावर त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने सरकारला हे काम करावे लागते आहे असा प्रचार केला गेला , ही या कुरूपता आणि हिडीसपणा याची हद्द होती . शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हा सन्मान असतो हे काहींनी सुनावल्यावर हा सन्मान ग्रेस यांना प्राप्त व्हावा यासाठी आपण कसा पुढाकार घेतला हे शहाजोगपणे सांगणे या मंडळींनी सुरु केले , हा त्यांच्यातील विकृतीचा कळसाध्याय होता . खरं तर गिरीश गांधी आणि मंत्री अनिल देशमुख यांनी या सन्मानासाठी प्रयत्न केले , शासनाचा तो आदेश गिरीश गांधी यांच्या कार्यालयात पोहोचला तेव्हा ( २६ मार्चला ) मी तिथेच होतो ! ही बातमी सांगण्यासाठी अनिल देशमुख यांचा सेलवर गिरीश गांधी यांना निरोप मिळाला तेव्हा व्यासपीठावर आम्ही दोघे शेजारीच बसलेलो होतो . असं काही घडवून आणलं हे जाहीर न करण्याचा स्वभाव गिरीश गांधी यांचा असल्याने ते या संदर्भात काही बोलणार नाहीत हे माहीत असल्यानेच श्रेय उपटण्याचे हे उद्योग केले गेले यात शंकाच नाही .

काही नतद्रष्ट नागपूरकरांनी ग्रेस यांना जिवंतपणी सुखाने जगू दिले नाही आणि मेल्यावरही हे असे लाजिरवाणे वर्तन केले . ग्रेस हयात असताना समजा हे घडले असते तर त्यांची प्रतिक्रिया असती ,

‘ हे प्रभो त्यांना क्षमा कर . ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाहीये !



-प्रवीण बर्दापूरकर
९८२२०५५७९९