क्षणभरी उघड नयन देवा..
ह्या सावळ्या तनुचे..
चांदण्या रात्रीतले स्वप्न तू विसरून जा..
या राधेला अडवू नको..
हसले मनी चांदणे..
जाळीमंदी पिकली करवंद..
कौसल्येचा राम..
तुझ्या मनात कुणीतरी लपले ग..
मज आणुनी द्या तो.. हरिण अयोध्या नाथा..
घननीळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा..
ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्म शताब्दी वर्षात..अनेक ठिकाणी त्यांच्या गाण्यांची मेजवानी मिळत आहे..
पुण्यातील माणिक वर्मा यांच्या कडून चार वर्ष गाणं शिकलेल्या ज्येष्ठ गायिका शैला दातार यांचेकडून त्या गाण्यांची शिस्तशीर तालीम घेतलेल्या डॉ. सौ. लीना राजवाडे यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरू शैला दातार यांच्या समोर हसले मनी चांदणे..हा खास माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा उत्तम स्वर नजराणा पेश केला.
ऐकताना अगदी सहज..सोपी.. गोड ही गाणी सादर करण्यासाठी अतिशय अवघड.. पण म्हणूनच त्या माणिक स्पर्श झालेल्या गाण्यांना आपल्या अभ्यासपूर्ण गायनाच्या तयारीने राजवाडे यांनी ती उत्तम सादर करून गुरूंना आणि रसिकांना मोहित करणारी एक माणिक वर्मा यांच्या गाण्याची स्वतंत्र मैफल शुक्रवारी १८ जुलै ला ऐकवून त्या सोज्वळ.आणि सात्विक स्वरांना पुन्हा उजाळा दिला..
यावेळी शैला दातार यांच्या सोबत निर्मलाताई गोगटे आणि माधुरीताई डोंगरे रसिक म्हणून समोर उपस्थित होत्या. यावेळी शैला दातार यांचा गुरू म्हणून सन्मानही झाला..
सभागृहातील सारे रसिक गाण्यांना आपल्या मनात साठवत ती गाणी मनात गात गात ऐकत होता.
उत्तम साथ संगत लाभल्याने गाण्यांना ताल.. स्वराचा भरणा तसाच श्रीमंत करीत होता..
त्यासाठी जयंत साने, नचिकेत मेहेंदळे, पखवाज आणि ढोलकी..निवेदिता मेहेंदळे , चारुशीला गोसावी आणि राजेंद्र साळुंके यांच्या साथीचे कौतुक करायला हवे..
प्राची घोटकर यांनी यानिमित्ताने माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा,, त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेऊन त्यातून प्रत्येक गीताला शब्दाने त्या पुढे नेत होत्या..
अतिशय मेहनतीने लीना राजवाडे यांनी माणिकबाईंची गाणी फुलविली.. त्या स्वरात भावना निर्माण करून..स्वरातील परिणामकारकता ओळखून गाणी सादर करण्यासाठी परिश्रम घेतले..त्याचे सार्थक ऐकताना जाणवत होते..
अगदी सहज या कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि या माणिक स्वरांचा अतिशय परिणामकारक अनुभव घेता आला..
आणि भास्कर बुवा बखले ह्यांच्या नातसून शैला दातार या तयार करत असलेल्या शिष्याचे गाणे ऐकता आले..आणि त्यातून ही मराठी गाणी आजही काळाच्या ओघात पुढच्या पिढीपर्यंत पोचत असल्याचे समाधान मिळत आहे.
हसले मनी चांदणे..हा एक माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा उत्तम कार्यक्रम यानिमित्ताने स्वर मंचावर प्रकाशमान झाला..तो अगदी सहज कुठेही करता येण्यासारखा आहे..
- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment