Thursday, January 5, 2023

व्हायोलिनचा समृध्द वारसा गुरुवारी रसिकांनी अनुभवला!

ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतदिनानिमित्त त्यांच्या कन्या आणि शिष्या सौ. चारुशीला गोसावी यांनी गुरुवारची संध्याकाळ आपल्या उत्तम वादनाने रसिकांच्या मनात उमटविली. व्हायोलिन गाते तेंव्हा.. या कार्यक्रमातून. स्वरबहार आणि सांस्कृतिक पुणे आयोजित कार्यक्रमाची सुरवात भालचंद्र देव यांच्या छोट्या ध्वनिचित्रफीतीने झाली. आरंभी चारुकेशी रागातली बंदिश सादर करून..त्यांनी व्हायोलीनवरची आपली हुकूमत सिद्ध करून..रसिकांना आपलेसे केले. देवाचीये द्वारी पासून अभंग जिवलागा कधी रे येशील तू , वादळ वारं सुटलं ग, का हो धरिला सारखी वेगळ्या बाजाची गीते.बाई माझी करंगळी मोडली.. सारखी खणखणीत लावणी. त्यात वाजलेली ढोलकी... आणि मग बाजे मुरलीया, ओ सजना, मधुबन सारखी हिंदी गीते अशी काही रंगतदार सादर झाली की रसिकांना वन्समोअरचा आवाज द्यावा लागला. नीगाहे मिलानेको जी चाहता है आणि लागा चूनरी मे दाग..या गाण्याच्या भैरवीला आवश्यक असा स्वर ,ताल आणि टाळ्यांचा कडकडाट करून व्हायोलीनची आनंदमयी सफर चारुशीला गोसावी यांनी घडवून आणली.. व्हायोलीनच्या सुरावटितून शब्द आणि त्यातला अर्थ रसिकांच्या मनात अलगदपणे आकार घेईल असे तयारीचे वादन इथे चारुशीला गोसावी यांच्याकडून होत होते.. गाण्यातील हरकती आणि सुरावटी सफाईदार आणि सहजपणे वाद्यातून उमटत होत्या. त्याही आपल्या वडीलांप्रमानेच व्हायोलिन वाद्यातील शिष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत.. एक आदर्श कलावंत आणि व्हायोलिन गुरू म्हणून त्यांच्याकडे पहाता येईल. मोहन पारसनीस (तबला), विनीत तिकोनकर (तबला आणि ढोलकी) , अमृता दिवेकर ( सिंथसायझर) राजेंद्र साळुंके( तालवाद्य), प्रसन्न बाम( हार्मोनियम).. यांच्या उत्तम साथीच्या संगतीत व्हायोलिन गीतांचा नजराणा रसिकांनी आनंदाने झेलला.. यावर कडी म्हणजे.. नीरजा आपटे यांचे सूचक आणि गाण्यांच्या निवडीला साजेसे अनोखे निवेदन.. भैरवी धून वाजवून गोसावी यांनी ही मैफल संपविली. कलेचा उत्तम वारसा जपत त्यांनी तो रसिकांच्या मनात व्हायोलीनची गोडी निर्माण केली आहे. असेच कार्यक्रम व्हायोलिन या वाद्यांचे सादर करून वडिलांची समृध्द कला परंपरा कायम पुढे नेतील असा विश्वास यामुळे रसिकांना पुन्हा एकदा आला. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com