Thursday, October 25, 2007

गंभीर विषयावरचे विनोदी नाटक "सारखं छातीत दुखतय !"

थोडं जरी छातीत दुखायला लागलं तरी माणसाला शंका येते ती हृदयरोगाची. "सारखं छातीत दुखतंय!' नाटकाने याच गंभीर विषयावर चिंता दूर करणारे भाष्य केलेय, पण सहज, सोप्या आणि विनोदी धाटणीने. मध्यमवर्गीय माणसांना दिलासा देता देता छोट्या छोट्या गोष्टींचा आपण किती बाऊ करतो. त्यामुळे स्वतःचा तर गोंधळ उडतोच, पण घरचेही घाबरतात.संजय मोने यांनी गंभीर विषयातून लिहिलेले हे नाटक तुम्हाला सहजपणे विषयाकडे लक्ष द्यायला तर लावते, पण त्यानिमित्त आजाराची काळजी करा- बाऊ करू नका, असा सरळ सरळ संदेशही देते. अशोक सराफ असले तरी विनोदाचा अतिरेक नाही. निवेदिता सराफ आणि अशोक यांना एकत्रित काम करताना पाहण्यातला आनंदही देते. विजय केंकरे, संजय मोने आणि अशोक सराफ, राजन भिसे या चौकडीने सादर केलेला प्रयोग पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.कैलास तायशेट्ये हा कंपनीतून व्हीआरएस घेतलेला संशयी माणूस. छातीत कुठं खुट झालं की आपल्याला काहीतरी होणार या शंकेने डोक्‍यात विचार येणार. डॉक्‍टरांकडे जाऊन सगळे रिपोर्ट काढून तुम्हाला काहीही झालेले नाही असे एकदा कळले, की थोडी निश्‍चिंती लाभणार. शंकेला फूस मिळावी तशी डॉ. आत्माराम देसाई (संजय मोने) यांच्या घरी येण्याने दुसऱ्याच पेशंटची कहाणी ऐकताना ते आपल्याविषयीच बोलतात, असा कैलास समज करून घेतो. नाट्याला इथून रंग भरतो. आपण पंधरा दिवसांचे सोबती आहोत, या कल्पनेने ऍड. सदाशिव तुराडकर (विनय येडेकर) या मित्राशी पुढच्या भविष्याची चिंता चर्चिली जाते. कैलासच्या बायकोला- मालनला (निवेदिता सराफ) कैलासच्या स्वभावामुळे आधीच वैतागलेल्या संसारात अचानक तिच्या कॉलेजमधल्या मित्राचा (राजन भिसे) मनोहर देवचा प्रवेश होतो. संशयी कैलासच्या बघण्यात फरक पडतो. आपल्यानंतर या दोघांनी एकत्र यावं, अशी इच्छा मनात धरून त्यांना सिनेमाला पाठवितो. मात्र स्वतःच्या लायब्ररीतील मदतनीसाला मदत करण्यामुळे घरात संशयाची पाल चुकचुकते. मालन-कैलासचा सुखी संसार आधीच आजाराच्या संशयी वृत्तीने हललेला असतो. आता नव्या काळजीने दुभंगण्याची भीती निर्माण होते. प्रेमाच्या त्रिकोणाचा फुगा फुटतो आणि आजाराची काळजी अवश्‍य घ्या, पण बाऊ करू नका, सल्ला देऊन नाटकाचा पडदा पडतो.विश्राम बेडेकरांच्या "वाजे पाऊल आपुले'ची आठवण करून देणारे हे नाटक. संजय मोने यांनी मध्यमवर्गीय लोकांच्या आजाराच्या संशयी वृत्तीवर बोट ठेवून हा गंभीर विषय साध्या प्रसंगांतून फुलविला आहे. लेखनात सहजता आहे. साहित्यिक, पुस्तकी भाषा नाही. सोपी पण रोज वापरली जाणाऱ्या बोली भाषेतून नाटक घडविले आहे. संशयकल्लोळाचा खेळ निर्माण करताना रंगविलेला मनोहर देव झकास. कैलासच्या संसारातली गोडी वर्णन करणारे दोनच प्रसंग नाटकाची पोत आणि श्रीमंती वाढवितात. मोनेंनी औषधाचा डोसच पाजलाय, पण उत्तम वातावरणनिर्मिती करून.विजय केंकरेंचे दिग्दर्शन प्रसंगातील नेमका आशय व्यक्त करण्यात यशस्वी ठरले आहे. हालचालीत संयमितता आहे. भाषेतला सोपेपणा त्यांनी व्यक्तिरेखेतून खुलविला आहे. कैलासचे संशयीपण मालनचे पतिप्रेम, ऍड. तुराडकरचा वकिली डाव, मनोहरमधला थेटपणा, सारेच विजय केंकरेंच्या दिग्दर्शनातून व्यक्त होतात.अशोक सराफसारखा विनोदाचा बादशहा नाटकात असून कुठेही नाटक कलाकारांच्या आहारी जात नाही. संयमित आणि सहजपणा हे नाटकाचे वैशिष्ट्य ठरावे.राजन भिसे यांच्या श्रीमंती घरात नाटक रंगते. घरातला थाट उच्चमध्यमवर्गीय घराचे रूप दृष्टीलाही सुख देते. नजर घरातल्या वस्तूंवरही जाते. देखणेपणा आणि गरज दोन्ही भागविते.अशोक सराफ यांचा संयमित अभिनय. शब्दांमध्ये दडलेला विनोद ते शारीरिक अभिनयाने प्रेक्षकापर्यंत पोचवितात. ते भूमिका थेट पोचवितात. विचारी, पण संशयी व्यक्तिरेखा बंदिस्त चौकट राखून ते उत्तम सादर करतात. भाषेचे सौंदर्य अधिक खुलविताना कैलासच्या भूमिकेचे कंगोरे उलघडून दाखवितात.त्यांना तेवढीच संयमित साथ दिली आहे मालनच्या रूपातल्या निवेदिताने. दोघांचे प्रसंग पाहताना ते तुम्हाला नक्की दिसेल. व्यक्तिरेखेला त्या स्वतःचा चेहरा देतात. विनय येडेकरांनी हशे घेतलेत. नाटकात ते रमतात. रसिकांना बरोबर घेऊन जातात. राजन भिसे दिसतातच प्रभावी. वावरतातही आत्मविश्‍वासाने. त्यांचे बोलणे. मैत्रीचा धागा पकडून ते मालनबरोवरचा मोकळेपणा ते सहजी व्यक्त करतात. संजय मोनेंच्या छोट्या भूमिकेतही ते फॅमिली डॉक्‍टर म्हणून घरातलेच एक बनतात.अशोक पत्की यांचे पार्श्‍वसंगीत आणि शीतल तळपदेंची प्रकाशयोजना नाटकाला अधिक खुलविण्यात यशस्वी झाली आहेत.अजित भुरे यांनी सादर केलेले आणि स्वाती कारूळकरांनी निर्मिलेले हे नाटक पाहणे म्हणजे एक अनुभूती घेणेच आहे. नाटक पाहिल्यावर त्याच्या आठवणी जरूर घरी घेऊन जाल.
सुभाष
इनामदार.
subhashinamdar@esakal.com

No comments: