Wednesday, August 17, 2011
अभिजित कुंभार-सांगीतिक प्रवास
सकाळी सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात बसते. मग तेच गाणे गुणगुणत बसणे हे तर अगदीच रुटीन. परंतु केवळ अशी गाणी गुणगुणत बसण्यापेक्षा स्वतः रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गुणगुणायला किती आनंद मिळतो, या कल्पनेतूनच सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करताना इचलकरंजी ते कॅलिफोर्निया असा पल्ला गाठणाऱ्या अभिजित कुंभारने चक्क स्वरचित गीतांचा एक म्युझिक अल्बमच तयार केला आणि तोही त्याच्या आयटी क्षेत्रातली टिपिकल ऑफशोअर ऑपरेशन्सची कल्पना वापरून! अभिजितने आपल्यासारख्या अनेकांना, ज्यांना इच्छा असून वेळ काढता येत नाही किंवा पायरसीच्या भीतीमुळे त्यांची कल्पना कल्पनेतच विरते अशांना एक वाट खुली करून दिली आहे.
"मी प्रेमिका' या अभिजितच्या म्युझिक अल्बमने समस्त तरुण वर्गाचा विकपॉइंट असलेले "प्रेम' आणखी एकदा गाण्यातून सादर केलेय. "जी मिळे ती नजर..', "चहू ओर पाहता...', "नवा नवा श्वास हा...' अशा एकूण आठ गाण्यांच्या या अल्बमचे गीत आणि संगीतकार अभिजित, संगीत संयोजक मिलिंद गुणे आणि गायिका कस्तुरी पायगुडे-राणे हे तीन मुख्य आधारस्तंभ. अभिजितने गीते रचली, त्यांना चाली लावल्या आणि ती कस्तुरी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर मिलिंद गुणेंनी त्यावर काम केले. गीत-संगीतकार कॅलिफोर्नियात आणि संगीत संयोजक व गायिका पुण्यात असे ऑफशोअर ऑपरेशन सुरू असताना फोनवर खूप चर्चा झाल्या, टिप्स दिल्या-घेतल्या गेल्या.
संगीताचे शिक्षण घेता आले नसले तरी चाली रचण्याचा छंद पूर्वीपासून होता. अभिजितवर प्रभाव आहे तो हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, आर. डी. बर्मन आणि एस. डी. बर्मन यांचा! रोजच्या रहाटगाडग्यातून समाधान मिळेल अशी रचना करण्याच्या तीव्र इच्छेने "प्रेमिका'ची संकल्पना सत्यात आल्याचे अभिजित सांगतो. नव्या संगीतकारांसाठी या क्षेत्रात पाय रोवणे किती कठीण आहे हे आपल्याला या अल्बमच्या निमित्ताने कळले, असे सांगतानाच अभिजितने जगभरातल्या मराठी कलावंतांना विश्वासाने एकत्र येण्यासाठी एखादे व्यासपीठ नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अल्बम पूर्ण करण्याच्या ऊर्मीतून अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती मिळत गेली आणि पुढे जात राहिलो, असे सांगतानाच पत्नी मानसीची साथदेखील यात महत्त्वाची असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
परदेशात स्थायिक असल्यामुळे तिकडच्या मराठी रसिकांपर्यंत हा अल्बम बऱ्याच प्रमाणात पोचला आहे. भारतातून विदेशात गेल्यानंतर मातृभूमी, मातृभाषेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. करिअरच्या मागे धावताना आपले छंद, आवडी जोपासणे सोपे नाही; पण परदेशात राहूनही आपली सांस्कृतिक मूल्ये जपत असताना कलेची आवड जोपासणाऱ्या गुणवंतांची संख्याही कमी नाही. या आवडीपोटी असे धाडस हे कलावंत करू धजतात, असे अभिजितला वाटते.
http://www.esakal.com/esakal/20110818/5341174800411566553.htm
Tuesday, August 16, 2011
युसुफभाई मिरजकरांचे अपघाती निधन
' संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्क बोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.
पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.
सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.
सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms
Monday, August 15, 2011
तो राजहंस एक...च्या निमित्ताने
नटसम्राट बालगंधर्व...
आपल्या स्वर्गीय गायनाने अबालवृध्दांना भारून टाकणारा जादूगार.
युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली.
नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.
नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.
बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे.
बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे.
ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक
निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव
अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे
त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.
असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.
तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर
यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे.
श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे.
गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे..
गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.
वर्षा जोगळेकर, पुणे
http://www.facebook.com/event.php?eid=171470582926679&view=wall
Subscribe to:
Posts (Atom)