Saturday, April 4, 2026

गुरू-देव स्वरोत्सव-पुणेकरांच्या मनात रुजला..!

 



‘गुरू-देव स्वरोत्सवात चारुशीला गोसावी यांचे व्हायोलीन प्रभुत्व तर आग्रा घराण्याची श्रेष्ठ गायन परंपरा विकास कशाळकर यांनी रसिकांच्या मनात रुजविली..!

पंडित गजानन बुवा जोशी व पंडित भालचंद्र देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रसिद्ध व्हायोलिन वादक चारुशीला गोसावी यांच्या संकल्पनेतून ‘गुरू-देव स्वरोत्सवा’चे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
यात गुरूंच्या प्रतीचा आदर , ओलावा आणि कलेतून मिळालेले स्वरांचे आंदण दोन्ही कलाकारांनी आपल्या गायन वादनाच्या उत्तम सादरीकरणातून उपस्थित श्रोत्यांच्या मनामनात साठविले.





आपले वडील आणि गुरु पं. भालचंद्र देव यांच्याकडून घेतलेल्या व्हायोलीन वादनाच्या तालमीतून त्यात झालेल्या चारुशीला गोसावी यांनी व्हायोलिन वादनाची सुरुवात राग मियाँ मल्हारने केली. शांत, संयमी परंतु बहारदार वादनातून रसिकांना मोहित करत त्यांनी तीन तालातील एक चीज ऐकविली. व्हायोलीनमधून उमटणाऱ्या आर्त स्वरातून ‘याद पिया की आये’ ही ठुमरी इतकी उत्तम पेश केली की ती अधिक ऐकण्याचा मोह होत होता..



चारुशीला गोसावी यांची अनेक कार्यक्रमातील साथ ऐकली आहे. व्हायोलीनवर वाजवलेली गाणी देखील ऐकली आहेत..पण केवळ शास्त्रीय संगीताची इतकी जोरकस आणि परिपूर्ण मैफल ऐकण्याचा हा अनुभव काही आगळाच होता.. व्हायोलीन वादनाची परंपरा त्या अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत . संगीत क्षेत्रातील त्यांचे स्थान असेच वाढत राहो .
त्यांना मोहन पारसनीस यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. पारसनीस यांचा हात अतिशय सुंदर पद्धतीने तबल्यावर पडत होता.. हळुवार आणि तेव्हढाच खणखणीत.



मध्यंतरात आनंद देशमुख यांच्या निवेदनाचा जागतिक स्तरावर सन्मान केला गेला..म्हणून त्यांचा खास सन्मान चारुशीला आणि राजय गोसावी यांच्या हस्ते झाला. आणि ज्येष्ठ शहनाई वादक शैलेश भागवत यांच्या हस्ते डॉ. विकास कशाळकर.. आणि सर्वच साथीदारांचा सन्मान केला गेला.



आग्रा घराण्याची परंपरा सांगणारे ओम तोम..
कशाळकर यांच्या गावातून ऐकण्यासारखे..!
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि पं . गजानन बुवा जोशी यांच्याकडून तालीम घेतलेले आजचे अभ्यासू गुरू डॉ. विकास कशाळकर यांची गायन मैफल रंगली..ती ओम तोमच्या सादरीकरणाने..
यांनी आपल्या मैफलीची सुरुवात पंडित गजानन बुवांच्या आवडत्या छायानट या रागाने केली.




‘गरवा कैसे’, ‘मलानिया गुंद लाओ री’, ‘पिया बन जा’ या आग्रा घराण्यातील रचना ऐकवून ‘बिगीबेगी आओ सैया’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली.
त्यांचे तानांमधील वैविध्य, दमदार गायकी आणि रागातील बारकावे दर्शविणाऱ्या सादरीकरणातून रसिक मंत्रमुग्ध झाले. डॉ. कशाळकर यांनी दुर्मिळ रागातील बंदिश तसेच ‘करन मोरी लागी कलाई’ ही रचना ऐकवून मैफलीची सांगता खास लोकप्रिय तराण्याने केली.




७५ वर्षाचे बुजुर्ग कलाकार आजही आपली मैफल आवाज तापवत कशी रंगवतात याचे हे उदाहरण होते.
त्यांना परिमल कोल्हटकर (स्वरसाथ), दिपीन दास (तबला), आशिष कुलकर्णी (संवादिनी) यांनी तयारीची साथ केली.






गुरुदेव या नावाविषयी आनंद देशमुख यांनी केलेले विवेचन ऐकण्यासारखे होते.





गुरुंप्रतीची श्रद्धा, भक्ती, प्रेमस्वराने भारावलेली सुरेल सांज पुणेकर रसिकांनी अनुभवली असेच म्हटले पाहिजे.

या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सनई वादक शैलेश भागवत, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, वृद्धी रिॲलिटीचे अमोल शहा, माधव मोडक, रत्नाकर गोखले उपस्थित होते.


- Subhash Inamdar, Pune
9552596276
subhashinamdar@gmail.com