नवे संगीत नाटक करणे हेच आज शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. कलापिनी संस्थेने ते उचलेलेच नाही तर ते पेललेही. योगिनी जोगळेकरांच्या "चैती' या कादंबरीचे शरद जोशी यांनी केलेले हे नाट्यरूपांतर. संगीत कलेचे चाहते आणि संगीताला राजाश्रय देणाऱ्या बिंदापूर संस्थानात घडलेली ही कथा. संगीत नाटक आवर्जून पाहणाऱ्या रसिकांना "चैती' नक्कीच आनंद देईल. कलावंतांत व्यावसायिक सफाई नसली तरी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने ते नाटक रंगमंचावर सादर करतात. संगीत नाटकांची परंपरा जपणाऱ्या कलापिनीचे खास आभिनंदन.
संगीततज्ज्ञ रघुनाथबुवा अवचट, त्यांची मुलगी चैती यांच्या संगीतमय आयुष्यावरची ही कथा. बिंदापूर संस्थानचे राजगायकपद भूषविलेल्या राजगायकाच्या जिद्दीची ही संगीतमय कहाणी. जिद्दी, तापट आणि अहंकारी गायकाच्या जीवनाची फरफट जोगळेकरांच्या कादंबरीत आहे. अवचटबुवांची मुलगी भर दरबारात चैती गाऊन राजेसाहेबांच्या मर्जीत बसते. तिचे गाणे वाढावे यासाठी ते संस्थानात तिला आश्रय देतात. तिचे गाणे बहरते. मात्र राजांच्या दरबारी आलेल्या पाहुण्यांच्या संगीतातल्या खोट्या फुशारकीने अवचटबुवा संतापतात आणि राजगायकपदाला लाथाडून निघून जातात. या प्रसंगानंतर चैती आणि अवचटबुवांची होणारी ताटातूट आणि चित्राने गायलेल्या "आयी ऋत बसंत' या गायनामधून सांधली गेलेली नाती यांचा संगीतमय अनुभव नाटकात सजवला गेला आहे.
कादंबरीतला विषय नाटकात आणताना संगीताकडे आधिक प्राधान्य दिले गेले आहे. त्यातले नाट्य यामुळे झाकोळले जाते आणि हे नाटक म्हणजे संगीताची रंगमंचीय मैफलच होऊन जाते. अर्थात ती श्रवणीय आहेच; तितकी देखणीही आहे. दरबारात घडलेल्या अपमानाचा प्रसंग. बुवांचे स्मशानातले वावरणे आणि चित्राची प्रेक्षकातून एंट्री या ठळक प्रसंगांची नोंद करावी लागेल. आजकाल विसरत चाललेल्या संगीत नाटकाला पुन्हा एकदा रंगमंचावर विराजमान करताना काळानुरूप बदल न करता रंगावृत्ती तयार केली आहे. शरद जोशी यांनी त्यातल्या संगीताच्या जागा नेमक्या निवडल्या आहेत आणि उपलब्ध कलावंतांकडून त्या नटविण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक मकरंद जोशी यांनी नाटकाची जातकुळी आणि संगीत नाटकाला योग्य असा नटसंच तयार करून नाटकातले प्रसंग खुलविले आहेत. नेपथ्य-प्रकाशाच्या साहाय्याने प्रयोग खुलविला आहे.
मात्र संगीताचा थोडा भाग कमी करून नाट्य खुलविणाऱ्या प्रसंगावर भर दिला तर नाटकाचा बॅलन्स साधेल. अन्यथा संगीतात नाटक असल्याचा भास कायम राहील.
संपदा थिटे यांच्या भूमिकेत संयमी आभिनेत्री सतत डोके वर काढते. मात्र तिचे संगीतातले यश वादातीत आहे. भूमिकेला साजेसा अभिनय करून "चित्रा'च्या पदांना त्या सहजगत्या खुलवतात. उच्चार आणि संगीतातला सच्चा सूर मनाची पकड घेतो. सर्वच पदे लक्षात राहतात, पण उल्लेख करावा "आयी ऋतू बसंत' या पदाचा. अवचटबुवांच्या भूमिकेत रवींद्र कुलकर्णी शोभतात. पदांना आणि ख्यालगायकीला ते न्याय देतात. भूमिकेतल्या संवादाला ते न्याय देण्यास कमी पडतात. नाटकात नाट्य फुलविणारे अनेक प्रसंग आहेत, मात्र त्याचा पुरेसा लाभ प्रेक्षकांना घेता येत नाही. विनायक लिमयेंचा नागनाथ प्रभावहीन वाटतो. संगीताची जाण हीच त्यांची ताकद आहे. राजीव कुमठेकर, विनायक भालेराव, केदार तापीकर, डॉ.सुहास कानिटकर, शरद जोशी आणि मकरंद जोशी यांच्याही भूमिका उल्लेखनीय झाल्या आहेत.
डॉ. अ. शं. परांजपे यांची नाटकात भूमिका आहे, पण कलापिनीकडून हे नाटक रंगमंचावर आणण्याची खरी ताकद त्यांची आहे. प्रयोग अजून सफाईदार होण्याकडे लक्ष देऊन संगीताच्या भागाकडे नाटक म्हणून पाहिल्यास "संगीत चैती' संगीतरसिकांना अधिक भावेल, असे जाणवते.
सुभाष इनामदार,
subhashinamdar@esakal.com
(या नाटकाची ध्वनिचित्रफीत दोन भागांत www.esakal.com वर पाहता येईल.)
No comments:
Post a Comment