Tuesday, May 7, 2024

तू अन् मी..शब्द सुरांचा हा हिंदोळा...

शब्द शब्द जणू साद मनीची सूर चेतवीती याद मनीची गाणी अशी ती लळा जिव्हाळा शब्द सुरांचा हा हिंदोळा... असा शब्द सुरांचा हिंदोळा रविवारी ५ मे २४ रोजी संध्याकाळी पुण्यात रसिकांनी अनुभवला..
काही स्वरचित रचना यात सहज सुंदर भाव घेऊन प्रकटल्या..तर काही नवीन कवींच्या..काही तुमच्या आमच्या आवडीच्या..तर उत्तम गजलचे नमुने ..असा सारा स्वर हिंदोळा उत्तमरित्या मनाला आनंद देत सादर झाला.. कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या संगीत क्षेत्रात तीस वर्षाहून अधिक काळ आपल्या कलेतून रसिकांना आणि नवीन कलावंताना प्रोत्साहन देणाऱ्या जोडीने ...तू अन् मी..या नावाने नवा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कुमार आणि श्रुती यांच्या संसाराला पंचवीस वर्षे.. कुमारजी यांची पन्नाशी आणि संगीत क्षेत्रातील तीस वर्षे असा हा एकूण प्रवास सुरू आहे..तेही उभयतांच्या जोडीने..एकमेकांच्या साक्षीने..
कुमार करंदीकर यांनी संवादिनी संगतकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.. अनेक नामवंत गायकांच्या मैफलीला साथ केली.. त्यांना गजानन वाटवे यांचे मार्गदर्शन लाभले नंतर.. काही रचना संगीतबद्ध केल्या.. आणि ते शशिकला शिरगोपिकर यांचेकडे गजल शिकण्यासाठी वळले..आणि त्यात गजल समजून त्या पेटीवर साथ करीत गायला सुरुवात केली..त्यात आपले कर्तृत्व सिद्ध केले..आणि गायक..साथीदार.. संगीतकार म्हणून नाव कमावले..
तसेच श्रुती करंदीकर..यांनी रीतसर गायनाचे शिक्षण घेतले..गजानन वाटवे यांचेकडे सुगम गायनाचे धडे घेतले.. आणि मराठी - हिदी.. गाण्यांची मैफल सुरू केली..कुमार प्रमाणे गजल कडे त्याही वळल्या ..स्वतः गाण्याचे शिक्षण देण्यास सुरुवात केली..आणि दोघे मिळून असा नवा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.. उत्तम शब्दांची जाण..कवितेची निवड..आणि संगीत देण्याची तयारी..यातून हिंदोळा प्रस्तुत.. तू अन् मी.. असा नवा कार्यक्रम सादर करण्याची संधी घेऊन रसिकांना आपल्या अभ्यासपूर्ण गाण्यातून बांधून ठेवण्याची हातोटी साधली.
कार्यक्रमात नेहमीची गाणी न घेता नव्या रचना ..घेऊन त्यातील शब्दांना कानात साठविण्याची संधी त्यानी यानिमित्त घेतली.. नवीन चाली आणि नव्या रचना इथे ऐकायला मिळणार याची खात्री असूनही रसिकांनी या गाण्यांना .. चालींना तशीच दाद दिली..हे कौतुकास्पद आहे. तू सप्त सूर माझे.. कुमार..मग तुझ्याचसाठी कितीदा..हे श्रुती यांचे गाणे ऐकत आनंद घेत दाद देत..स्नेहल दामले यांच्या सहज आणि उत्स्फूर्त निवेदनाने गाणी ऐकत रसिक तृप्त होत होते.. धुंद तू धुंद मी, तू येता या फुलांना अशी दोघानी स्वरांनी नटविलेली गाणी त्यातले भाव अधिक उठावदार करत होती..
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.. इलाही जमादार यांची गजल मधूनच वास्तवाची भान देणारी ठळकपणे अधोरेखित होते..ती कुमार करंदीकर यांच्या उत्तम सादरीकरणातून. मधूनच. आपल्या चुका कबूल करत जाहल्या काही चुकाचे दर्शन श्रुती देत होत्या.. कधी कुठे भेटणार..मग फांद्यावरी बांधिले मुलींनी हिंदोळे. श्रुती..आणि मोहूनिया तुजसंगे..असे कुमार म्हणत गजाजन वाटवे यांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला. सांजवेळी सोबतीला घेऊन श्रुती करंदीकर.. कुमार यांच्या अधिक जवळी गेल्या.. तर संजीवनी बोकील यांच्या ढळे वाऱ्याचा पदर..सारखे मालकंस रागात बांधलेले गाणे मनात खोलवर परिणाम करून जाते.. मराठी गजलकडे वळताना गडे सोडून दे रुसवा..ही दीपक करंदीकर यांची नवी रचना कुमार तेव्हढ्याच आत्मीयतेने सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवितात.. मग सुरू होतो..शशिकला शिरगोपीकर यांची तयार करून घेतलेल्या उर्दू गजलांची .. बात निकलेगी तो.. तुमको देखा तो.. तुमको हम दिलमे.. दीलमे एक लहरसी.. तुम अपना रंजो गम.. सारख्या गजल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात..त्या कुमार आणि श्रुती दोघानी ताकदीने सादर केल्या. त्याला शशिकला शिगोपिकर यांनी उपस्थित राहून दादही दिली. ये दिल तुम बिन..हे दोघानी ताकदीने सादर केलेली रचना.. आणि गो जरासी बातपर..ही गजल अर्थासह पेश करून कुमार करंदीकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गाण्याचा आनंद दिला. अखेर रंजिश ही सही..ही रचना कुमार..श्रुती यांनी रसिकांच्या मनात साठवून ठेवताना ..ये तो ट्रेलर है..पिक्चर अभी बाकी है..हेच दाखवून दिले.. नवीन रचना आणि त्यात जुन्यांची आठवण करत..हा शब्द सुरांचा प्रवास पुढेही नवीन मालिकेत सुरू ठवण्याचे आश्वासन देऊन.. तू अन् मी.. चा पहिला एपिसोड इथेच संपवितात..
यासाठी अरुण गवई..केदार तळणीकर..आणि मिहिर भडकमकर यांची स्वर तालाची संगत शब्दांना अधिकाधिक परीपूर्ण करत होती.. आणि स्नेहल दामले यांचे ओघवते शब्द मनाला अधिक भिडत होते..कधी कधी कमीत कमी शब्दातून गहरा असर व्यक्त करत होता.. असे प्रयोग रसिकांना नक्कीच भावतात..पण त्यासाठी त्यांची अधिकाधिक उपस्थितीची गरज आहे.. तरच हे नव्या रचना सादर करायला कलावंताना प्रोत्साहन मिळेल. - सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com

No comments: