Wednesday, March 25, 2009

संस्कृती पाळा, जबाबदार बना


गुढी पाडवा. भारतीय संस्कृतीला बहर आणणाऱ्या तेजोमय दिवसाचे नाव.

आरोग्यदायी कडुलिंबाचा डहाळा आणि साखरेची गाठी या दोहोंनी गुढीचे तोरण उभे राहील.

मंदीच्या कडू वातारणाचा साज लेऊन यंदाची गुढी उभी राहणार आहे. नेत्यांच्या, पक्षांच्या आश्‍वासनांच्या साखरेनी त्यावर तात्पुरता लेप लावला जाईल.

खेडी ओस पडताहेत. शहरे विस्तारीकरण चाललेय. स्वतःकडे पाहताना दुसऱ्याचे भानही तो विसरायला लागलाय.शेतकरी कामगार मिळत नाहीत म्हणून ओरड करताहेत. तर शहरातला युवक बेकार फिरतोय. महागाईचा तारू ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनतर सामान्याला जगण्यातला थोडा आनंद देणारा हा गुढी पाडवा महत्वाचा.

संस्कृती म्हणजे तरी काय? भुकेलेल्या घास द्या. शेजाऱ्यावर प्रेम करा. मुलांना जगाचे भान द्या. जेष्ठांचा आदर करा. कुणी रस्त्यात पडले तर त्याला हात देऊन उठवा. दुसऱ्यांचा आदर करा हे सांगणे.आज तीच दुर्मीळ होताना दिसत आहे.

राग, लोभ, भय, मत्सर या चौघांचे राज्य वाढतेय. जनमानसात जात-धर्माचे वचर्स्व वाढलेय.बुध्दिच्या शक्तिपेक्षा बळाची शक्ति वापरणाऱ्याचे प्रमाण जास्त होते आहे. समाज संकुचित बनू पाहतोय. "स्व"च्या पलिकडे पाहण्याची दृष्टी अधू बनत चाललीय.जगण्यासाठी काम आणि कामासाठी धावणे वाढलेय. समाजाचे आपण देणे लागतो ह्याचा विसर पडतोय. घरातला संवाद कमी झालाय. टीव्ही भोवती कुटुंब फिरतय.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने यंदा लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहतेय. त्यांच्यापेक्षा मी चांगला. आश्‍वासनांची खैरात होती आहे.दुचाकीवाला नॅनो घ्यायला निघालाय. रस्ते, वीज, पाणी या मुलभुत गोष्टीकडे डोळेझाक होतीय. प्रश्‍न माहित आहेत पण ते सुटत नाहीत.यंदा नक्की मार्गी लावणार अशी आश्‍वासने मिळताहेत. सामान्याला जगणे मुश्‍कील करून सोडणारे हे दिवस.

सणाला सामोरे जाताना उद्याची काळची करण्याचे दिवस. म्हणूनच सावध व्हा. संस्कृती जपताना जबाबदारीचेही भान ठेवणे हेच या गुढी पाडव्याचे सांगणे.

सुभाष इनामदार,पुणे.

email- subhashinamdar@gmail.com

No comments: