Thursday, July 1, 2010

'आई रिटायर होतेय'-प्रयोग सफाईदार


'आई रिटायर होतेय' या नाटकाचा विषय निघाला की, नाव येते ते भक्ती बर्वे यांचे. किती सहजपणे त्यांनी आभिनयाचे दर्शन घडवून नाटकाला समर्थ केले. आज तेच अशोक पाटोळे यांचे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचा घाट पुण्याच्या रवींद्र सांभांरे यांनी घातला आणि मध्यमवर्गीय नाट्यवेड्या रसिकांना आवडेल असे नाटक दिमाखदारपणे उभे केले. वास्तविक नाटकात एकही नावाचा कलाकार नाही. (तसे म्हटले तर नाव असूनही नाटकाला किती येतात हा प्रश्न वेगळा) पण नाटकाची जाण आणि अभिनयाचे धडे घेतलेले नट यात काम करतात. नाटकाचा प्रयोग चोख होतो. भडकपणा, नाटकीपणाचा लवलेशही नसणा-या या नाटकाला आजही तेवढीच दाद मिळते. तुम्हीही एकदा अनुभव घेउन बघा.

रसिकानंद निर्मित या दोन अंकी नाटकाचा विषय सांगणे, ही आजची गरज नाही. साधेच म्हटले तर घरी सर्वांचे हवे-नको ते पाहणार्‍या, सुख-दुःखात पाठीमागे खंबीरपणे उभी असणार्‍या आईनेच ही चाकरी करण्याचे बंद केले तर काय होईल? यातून नाटक घडते आणि खरे तर नाटक बिघडते. बायको, आई, सासू या तिन्ही भूमिकेत वावरणारी आई ठरवून रिटायर होण्याची घोषणा करते आणि ती या भूमिकेशी खंबीर राहते. यातून घडलेले हे नाट्य. मुळातच अशोक पाटोळे यांच्या संवादातून उभ्या राहिलेल्या या नाटकाने रसिकांची मने जिंकली आहेत. पण ते संवाद त्याच ताकदीने रसिकांपुढे यायला हवेत. तेच काम दिग्दर्शक या नात्याने रवी सांभारे यांनी चोख बजावले आहे.
मुळातच वीणा फडके यांच्याकडून आईची भूमिका काढून घेताना त्यांच्यातल्या सहजीपणाला अधिकाधिक वाव देऊन नाटक सांधले व साधले आहे. हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाटक पाहताना प्रेक्षक नाटकाशी एकरूप होतो. मधूनच दाद देत राहतो. नाटक कुठेही रेंगाळत नाही. प्रवाही होत प्रत्येक प्रसंग चढत्या क्रमाने मनावर बिंबवला गेला आहे. आजच्या काळात नाटकाला आलेली परिस्थिती पाहता जुनी नाटके पुन्हा करायला हवीत, याचे भान ठेवून नाटकाची निर्मिती केली गेली आहे. रवी सांभारे मुळातच नाटकवेडा माणूस. बॅरिस्टरही त्यांनी यापूर्वी सादर केले होते.
रेखीव नेपथ्य. भासमय प्रकाशयोजना. संगीताचा माफक वापर करून नाटकाला कणखरपणे ऊभे करण्यात दिग्दर्शक पुरेसा ठरला आहे.
वीणा फडके आईच्या मध्यवर्ती भूमिकेत अतिशय साधेपणाने कुठलाही अभिनिवेश न आणता उठावदार भूमिका सादर करतात. देहबोली आणि वावरण्यातूनही त्यांची भूमिका ठसत जाते. संवादातील सहजता तर नाटकाला अपेक्षित परिणाम देते.
विश्वास सहस्रबुध्दे (पपा), मंदार गोरे (मंदार), नेहा परांजपे (नेत्रा), रश्मी देव (वीणा) यांच्या साथीने नाटक घडत राहते. रवींद्र बापट यांचा फाटक नाटकात नाट्य निर्माण करण्यास पुरेसा आहे. सुशीलकुमार भोसले आणि रूपाली फोपसे अधिक परिणाम देऊ शकले असते.
सौ. रश्मी सांभारेंच्या निर्मितीला साह्य करून मनोरंजन संस्थेने एक चांगले नाटक पुनरुज्जीवीत करण्यात सहाय्य केले, याचा आनंद आहे.
आज काळ थोडा बदलला असला, तरी नाटकाला पुन्हा प्रेक्षक येतील याची खात्री वाटते.
नावाचे कलावंत नसूनही प्रयोग सफाईदार होतो व त्याला प्रेक्षक टाळ्या देतात, याचाही उल्लेख करावा लागेल.

सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: