Tuesday, November 17, 2009

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


सुभाष इनामदार, पुणे

1 comment:

Anonymous said...

Thank you for bringing the news to us.