Tuesday, November 9, 2010

बालगंधर्वात...गंधर्व नाटक मंडळी
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात दिवाळीनंतचा दिपोत्सव सुरु होता. रंगमंचावर गंधर्व नाटक मंडळीतल्या कलाकारांची मैफल रंगली होती. आमंत्रीत अशा नाट्यसंगीताच्या जाणकांरांच्या सहवासातल्या मैफलीचे चित्रिकरण सुरू होते. वातावरणात संगीत नाटके पाहणारा तो उल्हसित पुणेकर दाद देत होता. बालगंधर्वातल्या बालगंधर्वाच्या चित्रकार देउस्करांनी रेखाटलेल्या प्रतिमेजवळ बालगंधर्वांची भूमिका करणारा करणारा कलावंत सुबोध भावे प्रसिध्दी माध्यमांना बाईट देत होता. निमित्त होते. एके काळी संगीत रंगभूमिवर सुवर्णकाळ आणणा-या महानायकाच्या चरित्रावरच्या चित्रपटाचे शुभारंभी चित्रिकरण. गंधर्व नाटक कंपनीच्या सेटवर मंगळवारी ९ नोह्बरला चित्रपटाचा मूहूर्त साधला गेला. आणि जमलेल्या शेकडो रसिकांनी नितिन चंदर्कांत देसाई निर्मित बालगंधर्व चित्रपटला शुभेच्छा दिल्या.

तीन महिने बालगंधर्वाचे मिळेल ते साहित्य वाचनाचा झपाटा लावून सव्वा-दोन तासाच्या चित्रपटाद्वारे गंधर्व एक कलावंत आणि गंधर्वांच्या चरित्राला मराठी भाषेतून साकार करणारी कथा, पटकथा आणि संवादाच्या साच्यात बंदिस्त केली ती अभिराम भडकमकर यांच्या शब्दरूपाने. गंधर्व गायकीचे साक्षिदार . त्यांच्यासोबत काम करणारे जयमाला शिलेदारांसारखे कलाकार . लता मंगेशकरांच्या आठवणीतले बालगंधर्व. बालगंधर्वांच्या आयुष्यातला पत्नीचा आणि गोहरजान यांचा प्रभाव. यातून संगीत रंगभूवर त्यांना स्कारलेली नाटके . त्यातले नाट्यसंगीत. सा-यातून असे बालगंधर्व आता न होणे असे पुलं नी म्हटले असतानाही बालगंधर्वयूग शोधण्याचा प्रयत्न करणारे नितिन देसाई यांच्या कलाकृतीतून मराठी महानायकाची ही कथा पडद्यावर साकारली जाणार आहे.
भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांच्या आशिर्वादाने या चित्रपटाचा मूहूर्त करताना गंधर्व परिवाराला पुण्याच्या रसिकांनी दाद दिली तशीच चित्रपटाला दाद देतील असा विश्वास चंदर्कांत प्रॉडक्शन प्रा. लि. चे नितिन देसाई यांनी व्यक्त केला.
नारायण श्रीपाद राजहंस यांच्या संगीताने आणि अभिनयाने भारलेल्या काळाला साकारताना हा चित्रपट बनविणे हे शिवधनुष्य पेलण्याचा आपण प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवि जाधव सांगतात.
आपल्या संगीताची मोहिनी घालणा-या या महानायकाला पडद्यावर साकारण्यासाठी सुबोध भावे सज्ज झाला आहे. बालगंधर्वांच्या वेषात तो आज वावरत होता. खरी कसोटी आहे स्त्री वेषातले बालगंधर्व साकार करताना. आपल्या वाट्याला ही भूमिका आली याचा आनंद व्यक्त करताना ती भूमिका पेलण्याची संधी मिळाली याचे समाधान सुबोधच्या चेह-यावर दिसत होते.
बालगंधर्वांच्या पत्नीची भूमिका विभावरी देशपांडे साकारणार आहेत. त्यांच्या मते आपल्या पतीला सतत प्रेत्साहन देणारी आणि तरीही पडद्यामागे राहिलेली ही बाई बालगंधर्वांच्या जवळ जेव्हा गोहरजान आल्या तेव्हापासून ढासळली. बालगंधर्वांच्या आयुष्यातले लक्ष्मीचे स्थान काय होते ते तुम्हाला पडद्यावर दिसेल. मला ही भूमिका मिळाली याचा आनंद झाल्याचे विभावरी सांगते.
जुने संगीत. त्यातही ऑर्गनचा स्वर. भारावलेले संगीत. आणि संगीतावर प्रेम करणारा प्रेक्षक यासा-यांतून या चित्रपटाच्या संगीताचा बाज निर्माण करणे हे जबाबदारीचे आणि जोखमीचे होते. संगीतातला भराव देताना कुठेही अधुनिक काळाशी सुसंगत असे कांही घडता कामा नये याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आज नांदी ऐकली ना... चित्रपटातल्या नाट्यसंगीताही तसाच प्रय्तन केला आहे. कौशल इनामदार बोलत होते. आनंद भाटे या पं. भीमसेन जोशा यांच्या शिष्याने गंधर्व गायकीची ढब हुबेहुब निर्मिण केली आहे. स्वानंद किरकिरे यांच्या दोन गाण्यांनीही या चित्रपटाला वेगळेपण पुरविले आहे. पारंपारिक संगीत नाटकातले तेच वातावरण संगीतातून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे कौशल सांगतो.
भारलेल्या वातावणाने पुन्हा एकदा संगीत नाटकांचा काळ जिवंत झाल्यासारखे भासले. एके काळी रंगभूमी गाजविणा-या कलावंताचे जीवन रुपेरी पडद्यावर येते आणि आजकाल खंडीत झालेली संगीत नाटकांची परंपरा पुन्हा वाढच रहावी अशीच इच्छा अनेक जण इथे बोलून दाखवत होते. कलावंताचे माहेरघर असणा-या पुण्यात गंधर्वयुग घडले. त्यामुळे बालगधर्वांच्य़ा चित्रपटाला इतके सुयोग्य वातावरण दुसरीकडे कुठे मिळणार....
पुण्याच्या सुवर्णमय पेढीचे दाजीकाका गाडगीळ यांच्या सुवर्णमयी उपस्थितीने संगीताचा सुवर्णकाळ देणा-या महानायकाचा परिसस्पर्श घडला. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे, जयमालाबाई शिलेदार , किर्ती शिलेदार, लता भोगले, भास्करबूवा बखले यांची नातसून शैला दातार, , लंडनचे अनिल नेने, माजी खासदार श्रीनिवास पाटील, बालगंधर्वांच्या नात्यापैकी काही आणि संगीत रसिक यांच्या साक्षीने साकारलेल्या गंधर्वातल्या त्या संगीत पर्वाने काय सांगावे पुन्हा संगीत नाटकांची पुन्हा चलती व्हावी. मराठी रंगभूमीवर जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करण्याचे सुनिल बर्वे यांनी मनी घेतले आहे. तसे कुणीतरी संगीत नाटकांना रसिकाक्श्रय मिळव्ण्यासाठी पुढे येईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करीत आहे.

बालगंधर्व या चित्रपटातून पुढच्या पीढीला काही जुनी जाणती व्यक्तिमत्वे पहायला मिळणार आहेत. यात व्ही. शांताराम (ओमकार कुलकर्णी), शंकरराव मुजुमदार (विद्याधर जोशी), गणपतराव बोडस ( किशोर कदम), देवल मास्तर (श्रीरंग गोडबोले), गोविंदराव टेंबे (आदित्य ओक), कृष्णाजी खाडीलकर (क्षितीज झारापकर), राम गणेश गडकरी (मनोज कोल्हटकर), बाबुराव पेंटर ( अभय कुलकर्णी), भास्करबूवा बखले ( अजय पुरकर), मास्टर कृष्णराव ( विक्रंत आजगावकर) छत्रपती शाहू महाराज ( राहूल सोलापूरकर) आणि गोहरजान ( प्राची मेहेत्रे- सध्या ती बाजीराव मस्तानी मध्ये मस्तानी करत आहे).
चित्रपटाच्या माध्यमातून का होईना संगीत रंगभूमिचा आणि त्यातल्या कलावंतांचा इतिहास जपला जाईल याचा आनंद अधिक आहे.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
Mob- 9552596276

No comments: