Friday, July 22, 2011

ध्येयशील निश्चयी जीवाची व्यक्तिरेखा

ही आहे १९३७ सालाची, एक वर्षाच्या दृष्ट लावण्या योग्य, देखण्या बाळाची कथा.

नुकत्याच पाळण्याच्या बाहेर पडलेल्या चिमुकल्या मोहन फाटक ह्या बाळावर पोलिओ नावाच्या रोगाने आघात करून त्याला जन्माचा अधू केले. त्याचा उजवा पाय पूर्णत: आणि इतर शारीरिक अवयव त्या आजाराने कायमचे क्षीण झाले. पण त्या बाळाला आईच्या ममतेची आणि मनोबळाची शक्ती मागे होती. आपल्या मुलाच्या ह्या शारीरिक व्यंगावर न खचता त्यांनी निष्ठेने त्याचे जतन केले. त्याला त्याच्या अपंग अवस्थेची जाणीव सुद्धा येऊ दिली नाही. त्या त्याला कडे वर घेऊन शाळेला न्यायच्या हे सांगणे नलगे.

अशा अतोनात प्रयत्नाने त्यास, त्या मातोश्रीने सुशिक्षित केले. कुबड्यांच्या मदतीने तो पेरू गेट भावे स्कूलला जात राहून तेथूनच मॅट्रिकच्या परीक्षेंत १९५२ साली, पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. त्याच्या शारीरिक न्यूनतेचे निमित्त काढून आमच्या घराच्या मंडळीनी आणि मित्रांनी महाविद्यालयात जाण्याबद्दल त्याला खूप विरोध केला. पण स्वत:च्या दृढनिश्चय आणि चिकाटीच्या बळावर, दूरच्या वाणिज्य महाविद्यालायात त्याने आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. दुर्दैवाने त्याला प्रोत्साहित करणारी शक्ती म्हणजे त्याची आई त्याच्या १७व्या वर्षी त्याला पोरका करून दिवंगत झाली.

ह्या अवचित घटनेनी न खचता त्याने मोठ्या आत्मविश्वासाने बी.कॉम, एम.कॉम, एल.एल.बी, एम.एस.सी, एवढ्या पदव्या मिळविल्या. तिथेच न थांबता १९६५ साली अर्थ शास्त्रांत (economics) एम.ए घेऊन, विद्यापीठांत पहिला आला आणि आपले भारतीय शिक्षण पूर्ण केले.

१९६६ साली, फुलब्राईट आणि फोर्ड फौंडेशन सारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्त्या मिळवून त्यांनी अमेरिकेत पदार्पण केले. अमेरिकेच्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या जी. आर. ई. (GRE) ह्या परीक्षेंत ते नुसते उत्तीर्णच झाले नाही तर अर्थ शास्त्रातल्या ह्या परीक्षेत त्यांनी गुणांचा एक नवीन उच्चांक स्थापित केला.

न्यूयॉर्क प्रांतात रॉचेस्टर नावाच्या शहरी तिथल्या विद्यापीठांत पी.एच.डी.शिक्षण चालू केले. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती ही की तिथल्या खडतर हिवाळ्यात मोटार गाडी चालविणे आवश्यकच होते. आपल्या अधूपणाच्या आडोश्याला न जाता त्यावर त्यांनी मात केली. स्वत:च्या प्रयत्नाने गाडी मध्ये असे बदल केले की ती गाडी त्याना फक्त डाव्या पायाने चालविता येणे शक्य झाले. विद्यार्थी जीवनात गाडीची दुरुस्ती ते स्वत:च करीत असत. ह्या मुळे त्या विद्येत पण ते पारंगत झाले.

१९८३ साली म्याक्रो इकोनॉमिक्स (Macro-economics) मध्ये त्यांनी आपली पी.एच.डी संपूर्ण केली. हे शिक्षण चालू ठेवत ते वेगवेगळ्या देशांत राहिले. ह्याच काळांत त्यांनी आपल्या गाडीने पूर्ण अमेरिकेचे तसेच युरोपामध्ये पर्यटन केले. टोरोंटो (कॅनडा), पॅरिस (फ्रांस) व होंगकोंग येथल्या विद्यापीठांत त्यांनी अर्थ शास्त्र शिकविले.

१९८४ साली त्यांनी नवीन आलेल्या संगणक (computer) शास्त्रांत उडी घेतली व ओघा ओघाने त्यातले तज्ञ विश्लेषक (system analyst ) बनले. १९९४ मध्ये ते आपल्या माय देशी म्हणजे भारतात परतले. आपले भारतीय नागरिकत्व त्यांनी जोपासून ठेवले होते. हे स्वदेशावरच्या प्रेमाचे द्योतक आहे.

पुण्यात मोटार गाडी चालविणे अवघड झाले असले तरी त्यांनी आपले गाड्यांच्या दुरुस्तीचा अनुभव वापरून स्कूटर (दुचाकीला) दोन्ही बाजूला चाके लावून आणि हाताची गाडी सुरू-किल्ली (starter) स्वहस्ते बसवून आपली स्वतंत्र भ्रमंती कायम राखली. त्यांचे अनुकरण बरेच लोकांनी केले आणि अजूनही करीत आहेत.

दरवर्षी होणा-या सवाई गंधर्व महोत्सवात ते त्यांची विजेची खुर्चि घेऊन जातात याबद्दल `सकाळ`मध्ये लिहून आले होते.

देव करो त्यांना दीर्घायुष्य देवो.


-सुभाष फाटक

Subhash Phatak
subhash.phatak@gmail.com

No comments: