Tuesday, January 22, 2013

`सुनो भाई साधो..`पुन्हा पुन्हा अनुभवा


संत कबीर..एक धाडसी संत. आजच्या काळातही त्याचे कवित्व..त्याने लिहलेले दोहे अजरामर आहेत. ते काळाच्या ओघात नव्या संदर्भात सुसंगत वाटताहेत...हेच सारे त्यांनी स्पष्ट तर करुन दिलेच पण त्यांनी कविता खरवंडीकर यांच्या आवाजातून आणि धनंजय खरवंडीकर यांच्या शास्त्रीय संगीताच्या मखमली पोतडीतून निटसपणे अर्थ पोचवत रसिंकांसमोर पुन्हा जेव्हा उलगडले तेव्हा टाळ्यांची दाद मिळत गेली..रंगत जसजशी वाढत गेली तशी उत्सुकताही वाढत गेली....

हा अनुभव पुणेकर रसिकांना मिळाला एस एम जोशी सभागृहात.. रविवारी ( २० जानेवारी २०१३) संध्याकाळी. तो अधिक मनात रुंजी घालू लागला तो डॉ. अनिल अवचट यांच्या सहज आणि प्रत्ययकारी निरुपणामुळे..त्यांनी या महान संतांच्या रचनांना स्वतःचा स्वतंत्र दृष्टीक्षेप जोडला..कुठल्याही धर्माची पताका न फडकवता त्यांनी माणसातल्या अस्सलतेचे दर्शन घडविणा-या रचना लिहिल्या. त्या १४व्या आणि १५व्या शतकात रचल्या गेल्या असाव्यात..पण त्या वरवर श्रीमंती मिरविणा-या माणसांना त्यांच्या वेदनवांवर आजही घाव घालतात. हेच तर सारे अवचटांनी पटवून दिले. त्यांची भाषा कमालीची लाघवी तर होतीच पण त्यात सहजी मार्मिकतेचे दर्शन घडत होते.

अनिल अवचट यांनी या निमित्ताने रसिकांना संत कबीर आणि त्यांच्या रचनांमागचे सार समजावून दिले. त्यांच्या दृष्टीने ते संत तुकारामांचे त्या अर्थाने पूर्वज मानावे लागेल. आजच्या काळात अनेक सांस्कृतिक अधःपतन होत असताना त्यांचे विचार आजही लागू पडत असल्याचा पुरावा त्यांना आपल्या सूत्रातून सांगितला. कदाचित आजच्या समाजाला ते वाट दाखवीत आहेत असेच जणू यातून दर्शन घडले.त्यांच्या एका अभंगात सबूरी हा शब्द आहे..सबुरी म्हणजे संयम. पण जिथे हा शब्द वापरला जातो तिथे संयमाचा पूर्ण अभाव असल्याचे दिसते..त्यांनी सबुरी तून सारे साधेल असे म्हटले आहे.

जीवनात साधेपणा महत्वाचा आहे. केवळ मोठेपणाचे दर्शन न घडता..मन मोठे करुन आहे तसे रहा असा सल्लाही दिला. सगळी माणसे सारखी आहेत. सगळ्यांचा उगम एकाच मार्गातून झाला आहे..मग जातीचे वेगळेपण कशासाठी. कबीराच्या दृष्टीने परमेश्वरापेक्षाही गुरु मोठा कारण तो परमेश्वरापाशी जाण्याचा मार्ग दाखवितो.अहंकार सोडून इतरांमध्ये विरघळून जगायला शिका असा संदेशही कबीराच्या रचनेत असल्याचे मर्म डॉ. अनिल अवचट सांगतात.

एक अभंग ऐकविला की कविता खरवंडीकर तोच अभंग आपल्या सुरेल आणि विविध सप्तकात फिरणारा सूर आळवत शब्दांना नेमक्या मुशीत फिरवून पुन्हा समेवर आणायच्या...शब्द स्वर आणि ताल यांची ही रंगलेली मैफल प्रत्येक अभंगादरम्यान अधिक हवीहवीशी वाटू लागली..हमन है इश्क मस्तना. ए दिल गाफिल गफलत मतकर. मन लागो मेरे यार फकिरी मे. मत करो मोह तू हरिभजन को मान रे. हम बिगडे तो बिगडे भाई, तुम बिगडे तो राम दुहाई.

किंवा

आई गवना की सारी. नैना झंकार झनकारे, झीनी झीनी बीनी चदरीया. प्रितम घर आये, रहेना नही देस बिराना है आणि शेवटी ये संसार कारे की बाही- उलझ पुलझ मर जाना है...

( कदाचित रचना मला जी ऐकू आली...त्यात बदल असू शकेल..क्षमस्व)अनेक रचनांचा पोत त्याला धनंजय खरवंडीकर यांनी दिलेली स्वरचाल फारच मोहकपणे कविता खरवंडीकर यांनी सादर केली..त्यातला भाव..त्यातली आर्तता आणि त्याची परिणीती ती भावना नेमकी स्पष्ट सांगणारी होती.

म्हणूनच `सुनो भाई साधो..` हा एक अतिशय सुंदर कार्य़क्रम देऊन  त्यांना आपली उत्तम छाप रसिकांवर टाकली यात कोणतेही अतिशयोक्ति विधान नाही. धनंजय खरवंडीकर यांची तबला संगत आणि राजीव परांजपे यांनी तेवढीच ऑर्गनवर केलेली साथ यातून कबीररचना समजण्यास आणि त्यारचना मनापर्य़ंत पोचण्यास कार्यभूत  झाली..
जेव्हा केव्हा तो कार्यक्रम जिथे असेल..तिथे मात्र डॉ. अनिल अवचट यांची निरुपणाची साथ हवी..त्यातूनच कबीर तर समजण्यास मदत होईलच . पण आजच्या काळातही या रचना किती समर्पक आहेत याचे दर्शन होईल. पुन्हा हा कार्यक्रम व्हावा हिच अपेक्षा..आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच.


सुभाष इनामदार,पुणे

9552596276


subhashinamdar@gmail.com

No comments: