Thursday, January 17, 2013

आपल्या लेखनावर कर्तुत्वाची स्वतःची छाप

ज्योत्स्ना देवधर यांचे गुरुवारी दुपारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले . त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांची आठवण पुन्हा एकदा झाली..म्हणूनच हा साठव..
 
 प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन..म्हणजेच पुण्याची पीडीए...त्यांनी ज्योत्स्ना देवधर यांची कल्याणी कादंबरी नाटकासाटी निवडली..त्यानिमित्ताने त्यांच्याशी थोडी जवळीक झाली..
अतिशय शांत आणि प्रसन्न ,मंद हास्य करणा-या जोत्स्ना देवधर.. लेखनात जेवढा कणखरपणा आणि प्रसंगी स्त्रीच्या  अंतरीच्या मनाला ओळखून तिला शब्दातून बोलते करणा-या त्या लेखिका.. घरगंगेच्या काठी ' या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला . कल्याणी , चिमणीचं घर मेणाचं , रमाबाई , आक्रीत या कादंबऱ्या , तर गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या , सात घरांच्या सीमारेषा , मधली भिंत , समास , विंझणवारा , पैलतीर हे त्यांचे कथासंग्रह विशेष गाजले .
भालबा केळकर यांनी त्यांना कल्याणी या कादंबरीवरून नाटक लिहायला सांगितले..त्यांनी ते लिहलेही..त्याचे पंचवीस तरी प्रयोग झाले असतील..
पुणे आकाशवाणी केँद्रावर त्या गृहिणी हा विभाग किती समर्थपणे पहात होता..ते जुना आकाशवाणीचा श्रोताच सांगेल..त्यांच्या गृहिणीमधल्या कितीतरी श्रुतिकांनी पुन्हापुन्हा श्रोत्यांना आनंद दिलाय..सामाजिक जाणीव ठेऊन आणि जुन्या आणि नवीन पिढीच्या महिलेचे बदलते स्वरुप त्यांनी या कार्यक्रमातून आवर्जुन दाखविले...
एके काळी..पुणे आकाशवाणीवर नाटक विभाग..पुरुषोत्तम जोशी, ग्रामिण विभाग..व्यंकटेश माडगूळकर, संगीत विभाग..मधुकर गोळवलकर तर गृहिणीत.. ज्योत्स्ना देवधर...सुमारे २०-२५ वर्षापूर्वीची आकाशवाणी आजही स्मरून पहा...ही नावे दिसतील...
आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतून त्या चटकन वाचकांशी जवळीक साधायच्या..जे सांगायचे ते इतकं सुंदर भाषेत असायचं..की ते मनात घर करुन राहायचे.. त्यांनी आपल्या कथांतून स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खं, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण केले आहे. कथाकथनाच्या माध्यमातून मोठ्या समुदायापर्यंत कथा पोहचवणार्‍या लेखिका - ही ज्योत्स्नाबाईंची विशेष ओळख सांगावी लागेल.
आपल्या कर्तुत्वावर स्वतःची छाप ठेऊन त्या आज अनंताच्या प्रवासाला गेल्या...त्यांच्या साहित्यातून मनस्वींच्या कितीतरी गोष्टी मागे आठवण म्हणून जपून राहिल्या आहेत...
गंगेसारखी निर्मळ..सोज्वळ आणि सात्विक साहित्यिक असलेल्या ज्योत्स्ना देवधर कधीही ठळकपणे आढळल्या नाहीत..तर मंदपणे स्मित करीत आपल्या लेखनातून त्यांनी दिव्य चक्षु दिले..तेच त्यांचे मोठेपण ...

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 


साधारण 1975 नंतर त्यांच्या लेखनाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. वयाची चाळीशी पार केल्यानंतर त्यांची पहिली कादंबरी प्रसिध्द झाली. मात्र त्यानंतर त्यांच्या लेखनाचा वेग वाढला. मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती कथानक मांडतांना त्यांची भाषा आणि शैली विशेष होती. यावर त्या म्हणतात की माझ्यावर श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा मोठा प्रभाव आहे तर वि. स. खांडेकर, मामा वरेकर, राम गणेश गडकरी यांना मी गुरु मानते. आपल्या लेखन प्रवासाविषयी बोलताना त्या म्हणतात की, पंडिता रमाबाई यांच्या जीवनावरील रमाबाई ही कादंबरी आणि अरविंदाच्या जीवनावरील उत्तरयोगी ही कादंबरी लिहिताना खूप कष्ट मी घेतले. कारण त्यावेळी मी नव्यानेच लिहायला घेतले होते. चरित्रात्मक कादंबर्यांसाठी वाचन, संशोधन याबरोबरच चिकित्सक विषय घेण्याचा मी प्रयत्न केला. रमाबाई यांच्यावरील पुस्तक लिहितानाचा अनुभव सांगताना त्या म्हणतात की, रमाबाईंच्या कार्याचा नीट परिचय होण्यासाठी मी कडेगावलाही जाऊन आले.
 http://navshakti.co.in/aisee-akshare/93086/ 
 यातून साभार

 

 

 


No comments: