Saturday, January 25, 2014

सावरकर रचित उर्दू गीत-गजल स्वरबद्ध


अमिताभ बच्चन -कवितांचे निवेदन


स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमान मध्ये जन्मठेप भोगत असताना तेथे उर्दू शिकले आणि त्यांनी उर्दूत काव्य रचनाही केली. दोन गजल आणि एक कविता असलेली एक वही स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना मिळाली. या रचना आणि अन्य मराठीतून हिंदीत भाषांतर केलेल्या वीर सावरकरांच्या गाजलेल्या रचना हिंदीतील नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आल्या आहेत.  
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ज्वलंत राष्ट्रभक्तीपर कवितांचे निवेदन हिंदी सिनेसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट अमिताभ बच्चन यांच्या स्वर्गीय आवाजात नुकतेच ध्वनीमुद्रित झाले.

श्री. अमिताभ बच्चन यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल असलेला आदर आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक यांनी  केलेली विनंती यामुळे सदर निवेदन स्वत:च्या आवाजात मुद्रित करण्याची तयारी दर्शविली आणि तातडीने त्यासाठी दोन तासही दिले. प्रसिद्ध लेखक-निर्देशक वेद राही यांनी ही संहिता लिहिलेली आहे.

ध्वनिमुद्रणानंतर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी स्वा.सावरकरांच्या अंदमान मधील आठवणींवर आधारित "माझी जन्मठेप" हे त्यांचे आत्मवृत्त आणि त्यांच्या अंदमान मध्ये लिहिलेल्या हस्तलिखिताची प्रतिकृती श्री. बच्चन यांना भेट दिली. त्याच रात्री श्री. बच्चन यांनी अंदमान मध्ये क्रांतीकारकांचा झालेला छळ, त्यांचे बलिदान याबद्दल ट्विट करताना समाज या स्वातंत्र्ययोध्यांच्या त्यागाची उपेक्षा करत असल्याची खंत व्यक्त केली. 

वीर सावरकरांच्या या गजला आणि गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन दि. २१ जानेवारी २०१४ ला स्वा. सावरकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता मराठी, हिंदी आणि गुजराथी मधील ख्यातनाम साहित्यिक श्री अरुण साधू, श्री विश्वनाथ सचदेव आणि डॉ. शरद ठाकर याच्या हस्ते झाले.

यात स्वा. सावरकरांच्या तीन मूळ उर्दू/हिंदी रचना असून हिंदु एकता गीत, स्वतंत्रतेचे स्तोत्र (जयोस्तुते), आत्मबल (अनादी मी अनंत मी), अमुचा स्वदेश हिंदुस्थान या मराठी कवितांचे हिंदी अनुवाद श्री. रणजित सावरकर यांनी केले असून उर्वरित ३ मराठी गीतांचा अनुवाद प्रभात प्रकाशन, दिल्ली यांच्या हिंदी समग्र सावरकर मधून घेतली आहेत. या गीतांचे संगीत दिग्दर्शन स्वराधीश भरत बलवल्ली यांचे असून संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार कै. अनिल मोहिले यांनी केले आहे. प्रसिद्ध गायक-गायिका सुरेश वाडकर, शंकर महादेवन, डॉ. जसपिंदर नरूला, साधना सरगम, शान, जावेद अली, वैशाली सामंत, राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर आणि स्वतः भरत बलवल्ली यांनी ही गीते गायली आहेत. ही ध्वनिफीत युनिव्हर्सल म्युसिक कंपनी द्वारा वितरीत होत आहे.

या कार्यक्रमात सुरेश वाडकर, साधना सरगम, डॉ. जसपिंदर नरूला, वैशाली सामंत आणि भरत बलवल्ली गाणी सादर करणार असून गुरुराज कोरगावकर यांच्या ध्वनिफितीतील गाण्यांवर आधारित नृत्य रचनाही सादर झाल्या.

लोकप्रिय गायक-गायिकांचे स्वर, उत्कृष्ट चाली आणि उत्तम संगीत संयोजन यामुळे ही ध्वनीफित लोकप्रिय होईल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे उत्कट देशभक्तीचा संस्कार तरुण मनावर होईल, अशी अपेक्षा अध्यक्ष अरूण जोशी यांनी व्यक्त केली. "हम ही हमारे वाली हैं" हा स्वा. सावरकर यांनी आयुष्यभर दिलेला संदेश आज ही सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांना प्रेरित करेल असा विश्वास कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी व्यक्त केला.

No comments: