Thursday, December 13, 2018

नेमकं आणि नेटकं गाणारे गुरू- पं. मधुकर जोशी

 

 

पं. मधुकर गजानन जोशी.. ख्यातनाम गायक आणि व्हायोलिनवादक पं. गजाननबुवा जोशी यांचे पुत्र. त्यांच्या वयाला ८१ पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त त्यांच्या सांगेतिक कारकीर्दीचा आणि त्यांच्या गायनकलेचा परिचय करून देणारा हा लेख मला ठाण्याच्या गायिका डॉ. वरदा गोडबोले यांनी लिहला. सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्या वाचनात आला. तोच त्यांचा उत्तम परिचय करून देणारा ठरतो. असे गुरू कसे असतात. ते संगीताकडे कसे पाहतात. साराच उलगडा यातून होईल.



साधारण १८ ते २० वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. ठाण्याला स्वानंदी नावाचा आमचा एक छोटासा शास्त्रीय संगीत प्रेमींचा ग्रुप होता. त्यापैकी एका मैफिलीत पं मधुकर बुवा जोशी यांचं गाणं आयोजित केलं होत. मी तेव्हा साधारण २५ वर्षांची असेन. तोपर्यंत जवळजवळ १२ - १३ वर्षे मी पं अच्युत अभ्यंकरांकडे किराणा घराण्याची विशुद्ध तालीम घेत होते. तो काळ असा होता की, मैफिल, रेडिओ किंवा ऑडिओ कॅसेट या माध्यमातूनच फक्त इतरांची गाणी ऐकता येत असत. इंटरनेट हा प्रकार नव्हता. तर सांगायचा मुद्दा असा की इतकी वर्षे गाण्यात असूनही मी मधुबुवांचे गाणे ऐकलेच नव्हते. पं गजाननबुवा, मधुबुवा हि नुसती नावे ऐकून होते. त्यामुळे मैफिलीला जाताना घरंदाज अस्सल गायकी ऐकायला मिळेल असा अंदाज होताच. या मैफिलीच्या वेळी बुवांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. पायाला प्लास्टर होता. तरीही ते गायला बसले होते.

मैफिलीचे स्वरूप अत्यंत अनौपचारिक होते. बुवांनी यमन राग सुरु केला आणि काय सांगू ?

एक विलक्षण अद्भुत आनंदाची अनुभूती आली. पहिल्या काही मिनिटांतच पूर्ण मैफिलीत, श्रोत्यांमध्ये एक चैतन्य संचारले. बुवांच गाणं ऐकणं आणि त्यांना गाताना बघणं या दोन्ही गोष्टी इतक्या कमाल वाटल्या मला की त्याक्षणी मी चुकचुकले की इतकी वर्षे मी हे का ऐकले नाही.

मी शिकलेल्या गायकीपेक्षा संपूर्ण वेगळी गायकी असूनही मी अक्षरशः भारावून गेले. यमन, संपर्णू मालकंस, बसंतबहार अशी चढत्या भाजणीची मैफिल आणि शेवटी बुवांची दैवी भैरवी. भैरवीच्या बाबतीत तर मी म्हणेन बुवा म्हणजे भैरवीचा अनभिषिक्त सम्राटच!

त्या मैफिलीत बुवांच्या गाण्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाणं हे किती बोलकं असावं. अक्षरशः समोरच्याच म्हणणं आपल्याला कसं तंतोतंत पटतं तसं बुवांच प्रत्येक स्वरवाक्य पटत होतं. जणू ते त्या माध्यमातून आमच्याशी बोलतच होते आणि आम्हाला ते मनोमन पटत होते. असो. 

ती मैफिल झाल्यानंतर काही वर्षे अशीच गेली. माझ्या घरगुती अडचणी किंवा दुसऱ्या व्यस्त गोष्टींमध्ये तो विषय मागे पडला. मात्र, पं गजाननबुवांची रेकॉर्डिंग कुठे मिळतायेत का ते मी शोधू लागले आणि ती मला मिळाली. ती ऐकताना जाणवलं की, ही इतकी श्रीमंत गायकी आहे. आपल्याला आवडते आहे मग ती का शिकू नये. म्हणून २००६ साली मी बुवांकडे शिकायला गेले. मला अजून तो दिवस आठवतोय. बुवा त्यांच्या शिष्यांना शंकरा शिकवत होते. मला म्हणाले पुढचे काही महिने नुसतं ऐक. मग गाणं सुरु करू. मी रोज जायला लागले. बिलावल, गौड सारंग, ललिता गौरी, छायानट मला सगळे राग, सगळे ताल, संपूर्ण गाणंच वेगळं होतं. चार पाच दिवसांनी बुवांनी मला गाऊन दाखवायला सांगितलं. मी अगदी घाबरत शुद्ध कल्याण गायले. त्यांना काय वाटलं माहीत नाही. पण दुसऱ्याच दिवसापासून मला ललितागौरी शिकवायला सुरुवात केली.

बुवांच्या शिकवण्याबद्दल काय आणि किती सांगू? मुळात मला ती पद्धत संपूर्ण नवीन होती. किराण्यामध्ये एक एक सूर किंवा एक एक स्वरसंगती गुरुजी सांगणार आणि मी गाणार असं असे. इथे बुवा संपूर्ण आवर्तन मांडत आणि पुन्हा ते तसंच गायला सांगत. त्यात तिलवाडे, झूमरे. सगळचं कठीण होऊन बसलं. अक्षरशः आगीतून फोफाट्यात पडल्यासारखं. पण बुवांची शिकवण्याची पद्धतच अशी होती. की अगदी दगड विद्यार्थीसुद्धा गाता होईल.

 

 

बुवांकडची शिकवणी म्हणजे अगदी हसत खेळत रंगलेली मैफिलच असे. स्वरसंगती एकमेकांमध्ये गुंफून स्वरवाक्य तयार करणे आणि अलगद मुखडा म्हणजे क्रियापद घेणे हे बुवा इतके कमाल गाऊन दाखवत की त्यांच्याबरोबर आपोआप मी गाती झाले. आवर्तनात स्वरसंगतीला ते शब्द म्हणत. म्हणजे वाक्यात कसं एका शब्दानंतर नेमका कोणता शब्द घेतला की अर्थपूर्ण वाक्य होईल तसंच स्वरवाक्ये बनवण्यासाठी कोणत्या स्वरसंगतीनंतर कोणती स्वरसंगती सुसंगत होईल ते वेगवेगळ्या प्रकारे बुवा गाऊन दाखवत. अत्यंत थेट, नेटकं आणि मुद्देसूद बोलणं एखाद्याच असावं तसं बुवांच गाणं आहे.

बुवा गाऊन अनेक प्रकारे दाखवायचे. पण त्याचबरोबर ते अशी काही चपखल उदाहरणे द्यायचे किंवा आम्ही गायलेल्या आवर्तनावर टिपणी करायचे की त्यातून नेमकं कसं गाव हे समजायचे. एकदा नटबिहाग शिकवताना त्यांनी अनेक आवर्तने घेऊन त्यात नटाचं सौंदर्य कसं आणि कधी दाखवावं, त्याच नेमकं टायमिंग काय हे सांगितलं. नंतर आम्हाला गायला सांगितलं. एका विद्यार्थिनीने गाताना नटाचं अंग भलत्याच ठिकाणी दाखवलं. बुवा म्हणाले, काय गं, दसरा नाही, दिवाळी नाही आणि मग नटून कशाला आलीयेस? आम्हाला काय समजायचं ते आम्ही समजलो. आवर्तनात शोभतील अशा स्वरसंगती नाही आल्या आणि काही वेगळे आले तर म्हणायचे, अगं नऊवारीवर बॉबकट शोभेल का? पण या अशा उदाहरणांमुळे गाण्यातले विचार पटकन स्वच्छ समजले. बुवांच्या बोलण्यातूनही खूप गाणं शिकायला मिळालं.

एखादा राग शिकवताना बुवा त्याच्या मुख्य स्वरसंगती घेऊन त्याचा आराखडा आमच्याकडून म्हणून घेत. मग आम्ही त्या आराखड्यानुसार आवर्तन भरायचो. पण मग बुवा एखादं दिवशी त्या रागाचं इतकं भव्य स्वरूप दाखवत की आम्ही अवाक! मग हसत हसत म्हणत, तुम्हाला अजून रागाचे मुख्य रस्ते माहीत आहेत. गल्ल्या कुठे माहीत आहेत? बुवांची अशी विनोदबुद्धी अफाट आहे. आणि अशा विनोदबुद्धीतूनच त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता दिसून येते.

ग्वाल्हेरच्या गाण्याबद्दल ते नेहमी म्हणतात, काय ते थेट बोला. नेमकं, नेटकं बोला, ताकाला जाऊन भांड लपवू नका. राग ताबडतोप स्वच्छ दिसला पाहिजे. तालाचा डौल कसा असावा हे सांगताना बुवा म्हणायचे हत्तीची चाल कशी तसा छान गजगतीने ललिता गौरी चाललाय. मग मध्येच हत्ती डुगूडुगू पळाला तर कसं दिसेल? म्हणूनच लयीचा आब राखूनच गायलं पाहिजे.

समेवर कसं यावं याबद्दल बुवा फार छान सांगतात. ते म्हणतात, केसरबाई, गजाननबुवा हे बुजुर्ग गवई जेव्हा खूप सुंदर काम करून समेवर येत तेव्हा त्यांची आमद ही एखाद्या घारीने आपले विशाल पंख पसरून आकाशातून झेपावत अत्यंत अलगदपणे जमिनीवर बसावे तसे या लोकांचे समेवर येणे असते. नाहीतर तुम्ही कावळे, चिमण्या कशा बसतात तसे समेवर येता. असं म्हणून एकच हशा आणि टाळी. पण अशी उदाहरणे दिली की गाणं कसं असावं हे अगदी चित्रमय पद्धतीने पटते.

एक शिष्या म्हणून माझं आणि बुवांच नातं हे अत्यंत जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे. बुवा एकदा माझ्या घरी राहायला आले होते तेव्हा मला म्हणाले. रियाझ किती करतेस. मी म्हणाले, बुवा दोन तीन तासच होतो. तेव्हा म्हणाले ठीक आहे रियाझ करताना आपणच आपल्या आवर्तनांना ग्रेड द्यावी. हे बी ग्रेड झालंय. सी ग्रेड झालंय असं.

एका गुरुपौर्णिमेत मी हमीर गायले. प्रथमच ग्वाल्हेरचा राग मैफिलीत गात हेते. देवाच्या आणि बुवांच्या कृपेने अनेकदा हॉलची वाहवा मिळाली. बुवांनापण गाणं खूप आवडलं आणि बुवांनी माझा पहिला नंबर असं सांगून टाकलं. काय सांगू, अगदी शाळेतल्या मुलीसारखा मला आनंद झाला. बुवांना माझ्याबद्दल विशेष आत्मीयता हे माझं भाग्यच. माझी जी काही सात - आठ गाणी त्यांनी ऐकली आणि त्यांना ती आवडली त्याने मी धन्य झाले. मला म्हणतात तू आधी किराणा शिकण्याचा तुला फायदा झालाय. त्यामुळे तुझी सुरांची नजर चांगली आहे.

बुवा अत्यंत दिलखुलास आणि थेट आहेत. खोटं खोटं वागणं त्यांना जमत नाही. इतका असामान्य गवई पण साधी रहाणी. अशा या असामान्य गवयामध्ये एक वेगळंच अवलियापण दडलेलं आहे. ते अवलियापण त्यांच्या गाण्यात वीज लखलखावी तसं तेजस्वीपणे प्रकट होतं.

एकदा संपूर्ण शिकवणीभर सुमारे एक दिड तास एक सुंदर फुलपाखरू बुवांच्या डोक्यावर बसलं होत. काय म्हणावं याला ? ईशस्पर्श झालेलं हे दैवी गाणं आम्हाला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं आणि यापुढेही मिळेल हे आमचं अहोभाग्य.

बुवांना त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त खूप शुभेच्छा आणि साष्टांग नमस्कार. असंच उत्तम आरोग्य आणि सांगीतिक आयुष्य भरभरून त्यांच्या वाट्याला येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

पं. मधुकर जोशी आणि डॉ.वरदा गोडबोले

 

 

- डॉ वरदा गोडबोले, 
ठाणे.

2 comments:

mhnmk.com said...

नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी मिळविण्याचे केंद्र म्हणजे mhnmk.com | NMK All Maha NMK Job Recruitments advertisement details in Marathi in one place.

Unknown said...

www.jobnmk.com thanks you