Wednesday, October 3, 2007

माझी माय

सह्याद्रीवर माझी माय ही नामवंत कलावंतांनी सांगीतलेली मालिका आहे।मुलगा कितीही मोठा झाला तरी आईला तो लहानच.आईला मानणारा आणि आईला विचारणारा असे दोन गट पडतात.केदार शिंदेनी सांगीतले की, जन्मदात्री आई थोरच पण मला खरं वाढविले माया दिली ती माझी आजी.तीच माझी

माय.असाच एक अमुभव वाचनात आला। वाटले तुम्हालाही तो वाचायला द्यावा.

माय कुठे?

मंत्रालयात डॉ. अविनाश दिसला. मी त्याला हाक मारली, तो थोडा गोंधळला, मग सावरत म्हणाला, "अरे श्रीकांत तू, फार वर्षांनी भेट झाली'."इथे कुठे?' मी विचारलं."अरे, मंत्रालयात काम होतं. आपल्या गावाला नवीन हॉस्पिटल बांधावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. त्यासाठी सर्व जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. त्याच गडबडीत आहे' असं बोलून तो निघून गेला. त्याचा फोन नंबर घेण्याचंही भान राहिलं नाही.मला सर्व लहानपणीचं आठवलं. आम्ही दोघेही लहानपणापासून एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकत होतो. मी जरा हुड होतो, मस्ती, मारामाऱ्या करण्यात दादा होतो. अविनाश साधा, शांत व सर्वांना मदत करणारा होता. आमच्या ऐसपैस घरासमोर त्याचं छोटं घर होतं. घरात तो, त्याचे बाबा आणि एक बहीण राहत. आम्ही श्रीमंत होतो. घरात पैसा, प्रेम नुसतं वहात होतं. सर्वांचा लाडका होतो. काय हवं नको ते एका क्षणात मिळत होतं. बाबा फिरतीवर असत. आई देव देव करे, पण सर्वांना मदत करण्यातही तत्पर असायची. तिला श्रीमंतीचा तोरा नव्हता. मी लाडका होतो तसा अविनाशसुद्धा माझ्या आईचा लाडका होता. तो नेहमी आमच्या घरात असायचा आम्ही खेळायचो, कधी कधी भांडणंसुद्धा होत. असंच एकदा माझं आणि अविनाशचं भांडण झालं. भांडता भांडता मी त्याला बोलून गेलो, "तुला माय कुठं आहे, मला माय आहे, मायचं प्रेम आहे.' त्याचं अवसान गळून पडलं. तो रडत घरी गेला. आईला ते समजलं. मला बोलावलं. अविनाशला हाक मारली. आणि मला आईने मार मार मारलं. शेवटी अविनाशच मध्ये पडला आणि आईला अडवलं. तिच्या कुशीत रडत बसला. आईने प्रेमाने त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत त्याला स्वयंपाक खोलीत नेऊन जेवू घातलं. मी हमसून हमसून रडत होतो. आई माझ्याकडे मात्र लक्ष देत नव्हती. आम्ही हळूहळू मोठे होत होतो. मी शिक्षणात एवढा हुशार नसल्यामुळे मी बी. ए.पर्यंत मजल मारली. अविनाश हुशार होता. त्याला डॉक्‍टर व्हायचं होतं. आमचे आई-बाबा त्याला सर्वतोपरी मदत करत होते. मला मुंबईला मंत्रालयात नोकरी लागली. मी गाव विसरलो. पूर्णतः मुंबईकर झालो. पगार सोडून अन्य मार्गाने माझ्याकडे पैसा खेळू लागला. आईची पत्र येत होती. प्रथम प्रथम माझीसुद्धा उत्तरं जात होती. हळूहळू तीसुद्धा कमी होत गेली. मी माझ्या कामात व्यस्त होतो. या पैशापायी मी आई, गाव मित्र सर्व विसरलो. संसार थाटला, तसा पैसा सुद्धा जास्त लागू लागला. हाव वाढली. बायका पोरांच्या इच्छा वाढल्या. घरापेक्षा ऑफिसमध्ये माझा वेळ जास्त जाऊ लागला. गाव, आई-बाबा यांना विसरलो. कुणाची कामं करायची, कुणाची नाही हे तो किती पैसे देतो यावर ठरू लागलं. आईने केलेले संस्कार सगळे विसरून गेलो.मंत्रालयात गावची माणसं येत.
मोठा डॉक्‍टर झाला. तो तुझ्या आईला फार मानतो. डॉक्‍टरची पदवी मिळाल्यावर त्यांने पहिल्यांदा आईच्या पायावर ठेवली व शपथ घेतली की मी माझी सेवा गावासाठी वापरीन, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही. आईने व सर्व गावकऱ्यांनी त्याचा सत्कार केला. गावात मिरवणूक काढली. तीसुद्धा आईला बरोबर घेऊन, अशा एकेक गोष्टी मला कळत होत्या. हे ऐकून मी आईला पत्र लिहिलं, पण आईचं उत्तर काही आलं नाही.पण इथे मीही आता जास्तच मस्तीत वावरत होतो. मुंबईतील बिल्डरांची माझ्या ऑफिसमध्ये रांग लागत होती. रोज रोज पैशाचा हिशोब होत होता. तशातच एकदा गावावरून आई खूप आजारी असल्याची तार आली. मी माझ्या कामात व्यस्त होतो. आईपेक्षा मला त्या बिल्डरची काळजी जास्त होती. त्याचा पैसा, नुकसान जास्त महत्त्वाचं वाटत होतं. मी गावाला जाऊ शकलो नाही. पण तोच अविनाश मुंबईतील अतिमहत्त्वाचं काम अर्धवट सोडून आईच्या सेवेला धावून गेला. आईवर उपचार केले. त्याच्या बायको-मुलांनी माझ्या आईची सेवा केली.काही दिवसांनी बाहेर गावी कामानिमित्त जावं लागलं. गाव तिथून जवळ होतं. तेव्हा मी माझ्या गावी जायचं ठरवलं."काय आलात चिरंजीव, आहे मी जिवंत आहे. पण मी मेल्यावर तरी येशील की नाही याचीच शंका वाटत होती मला...पण आलास आधीच'""आई असं काय बोलतेस, मी तुझा मुलगा आहे.'"हो आहेस. पण "नावा'पुरता. मुंबईकर झालास. पैशात लोळतोयस. आईची आठवण कशी येईल.''मला काही जास्त वाद घालायचा नव्हता. घालूच शकलो नसतो. एका अर्थी आईचं बोलणं बरोबर होतं. मला त्याची लाज वाटत होती. शरमेनं माझी मान खाली गेली."आला आहेस तर घर तुझ्या नावावर करून जा. पण मी एक करणार आहे, गावाबाहेर आपली बरीच जमीन पडलेली आहे. ती मी गावासाठी हॉस्पिटलला देणार आहे. तुझ्या होकाराची वाट नाही बघत. पण तुझ्या कानावर घालते. आणि मी या घरात राहणार नाही. बाजूला एक खोली आहे तेथे राहीन. ज्या घरात मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले, पण ते वाया गेले. त्या घरात मला आता रहावयाचे नाही?'ती बरंच काही बोलली. मी बोललो नाही. कारण माझ्याच चुका होत्या. शिवाय मला मुंबई गाठायची होती. मी आईच्या पाया पडलो व निघतो आता असं म्हणून मी निघालो. तेव्हा आई म्हणाली, ""बघ, पैसा जमवू नको. माणसं जमव. तुझ्या बापानी ते केलं. माझ्या हातूनसुद्धा थोडं फार सत्कार्य घडलं. म्हणून मला गाव विचारतो. मला इथे काही कमी पडत नाही. बघ प्रयत्न कर. तुला असं जमतं का?''मी घराबाहेर पडलो. समोर डॉ. अविनाश व त्याचं कुटुंब भेटलं. अविनाश माझ्या जवळ आला. त्याने वहिनी, मुलांना माझ्या पाया पडायला लावलं.ते सगळे आत निघून गेले. अविनाश आणि मी रस्त्यात बोलत थांबलो. अविनाशला राहवलं नाही. तो मला जवळ घेऊन म्हणाला - "लहानपण आठवतं? तू मला म्हणाला होतास.तुला माय कुठे? तोच प्रश्‍न आज मी तुला विचारू शकतो...'
-राजीव

1 comment:

Anonymous said...

Maazi maay Ringtone available!!!

just leave a email-id here.