Sunday, September 13, 2009

बालकवितेत ठसा उमटविणाऱ्या डॉ. संगीता बर्वे


व्यवसायाने डॉक्‍टर; पण लहानपणापासूनच साहित्याकडे ओढा असणाऱ्या संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या कवितांची तीन पुस्तके बाजारात आली आहेत.

"गंमत झाली भारी,' "खारूताई आणि सावलीबाई'; तसेच "झाड आजोबा' ही ती तीन पुस्तके आणि "हुर्रे हुप्प' हे चौथे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मुलांच्या मनाला सुखावणाऱ्या कल्पनांना आपल्या कवितेतून साकारणाऱ्या त्यांच्या प्रतिभेला आता कुठे धार चढू लागली आहे. मुलांच्या विश्वात रममाण होता होता त्यांच्या कलाकलाने त्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांच्या स्वप्नातल्या शब्दांना कवितेत आणण्याची कामगिरी संगीता बर्वे यांनी केली. नुकत्याच "गंमत झाली भारी' आणि "सारे सारे गाऊ' या दोन गाण्यांच्या डीव्हीडीही फाउंटन म्युझिकने बाजारात आणल्या आहेत.

त्यांचे नाव बालकवितेबाबत झाले असले, तरी त्यांच्या सामाजिक वेदनांना त्यांनी आपल्या कवितेतून वाट करून दिली आहे. डॉक्‍टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.

त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे

कुठेतरी खोलवर

आत आत काही

उसळत फेकाळत

वर येऊ पाही

त्यांची प्रतिभा सतत काही तरी सांगत असते.

समाजाशी, त्यातल्या प्रश्‍नांची नोंद आणि कधी जीवनाचा अर्थही सांगून जाते. "पॉप्युलर'ने काढलेल्या "दिवसांच्या वाटेवरून' या पुस्तकात त्यांचे सामाजिक भान प्रत्येक कवितेत दिसेल.

बालपणीच्या आठवणींचा उजाळा घेताना लक्षात येते, की संगीता प्रभाकर गोंगे, मु. पो. बेलापूर, ता. श्रीरामपूरच्या. वडील शाळेत चित्रकला शिक्षक. संगीताला चवथीपासून कागदावर शब्द उमटविण्याचा छंद. पहिल्या केलेल्या कवितेच्या चार ओळी जेव्हा वर्गात सर्वांसमोर म्हणून दाखवल्या तेव्हाच बाईंनी ही मुलगी पुढे कवयित्री होईल, असे भाकीत वर्तविले होते.

शाळेच्या सुट्टीत खेळापेक्षा नव्या नव्या कल्पनांना शब्दांत बांधून स्वतःच्या हाताने कथेचे हस्तलिखित करायचा छंद लागला. वडील मुखपृष्ठ तयार करायचे. अशा तशी बाडे तयार व्हायची. त्यात कधी कविताही उमटते.शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर बीएमएस केले. आता डायटेशियनचा अभ्यासक्रमही पुरी केलाय. मराठी घेऊन एमए केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा साहित्यभूषणचा अभ्यासक्रमही पुरा केलाय. ललितलेखनाची आवड आणि संवेदनशील मन यामुळे कवितेचा छंद जोपासला गेलाय. तसे त्यांना पुरस्कारही मिळालेत.

खरे म्हणाल, तर त्यांचे सांगणे आता कवितेतून व्यक्त होते. त्यांचे मनच कविमन आहे.

आता जे सुचते ते कवितेमधून.आठवी ते दहावीतल्या पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा रसास्वाद घेणाऱ्या पुस्तकांचा संच प्रकाशित झाला आहे.

दहा वर्षांत लिहिलेल्या कवितांचा संग्रह "मृगतुष्णा'द्वारे रसिकांच्या भेटीला आला. त्याला प्रस्तावना शांता शेळके यांची आहे.

लग्नानंतर मालती पांडे-बर्वेच्या गाणाऱ्या घरात त्या सून म्हणून आल्या. दोन मुली झाल्यानंतर त्यांच्या विश्वात रमल्या आणि त्यातूनच बालकवितांचा जन्म झाला. आज त्यांच्या कवितांचा स्वप्नांचे पंख लाभलेत. छोट्यांच्या दुनियेत शब्दाने त्या वावरताहेत. त्यांना कवयित्री म्हणून मिरवायला आवडेल.

तशी त्यांची प्रतिभा सर्वत्र संचार करणारी आहे. सुजाण रसिकांच्या मनात रेंगाळणाऱ्या कविता कागदावर उमटविणाऱ्या या कवीच्या आगामी प्रवासासाठी शुभंभवतू!

सुभाष इनामदार,

पुणे


(संगीता बर्वे यांच्याशी साधलेला संवाद पाहण्यासाठी "ई-सकाळ'च्या फीचर्स लिंकवर क्‍लिक करा)

1 comment:

साहित्यसंस्कृती said...

sangita barve yanchee mulakhat ,kavitaa atishay aavadlya.
tyanchaa 'mrugtrushNa' sangrah mazyakade aahe. tumchyamule tyana baghaNyachee , ekNyachee sandhee mialee.
Dhaanyavaad.
Sonali joshi
Vienna, VA,USA.