शिलेदारांच्या नाटक कंपनीत आजही जे नाव कायम आहे त्यात ज्येष्ठ तबला वादक विनायक थोरात यांचे नाव येते.
संगीत नाटकाचा ठेका आणि ताल सांभाळतच त्यांना संसाराचा तोल सांभाळला आहे. गायकाच्या गायनाला मदत करत गायकाचे गायन फुलवत नेणारे त्यांचे वादन आजही त्याच पद्धतीने सुरू आहे.
जयराम शिलेदारांबरोबर संगीत नाटकाला तबला वादनाची साथ करण्याची प्रतिज्ञाच जणू त्यांनी घेतली आहे. सौभद्र, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ अशा पारंपरिक नाटकात संगीत पदांचा भरणा आहे. यात साकी, दिंडीसारखी थिरकत नेणारी नजाकतही बेफाट आहे. त्याला त्याच पद्धतीचे खास वादन थोरातांच्या बोटातून निघत असते.
नाही म्हणायला "स्वरसम्राज्ञी' या विद्याधर गोखले यांच्या नाटकातल्या एका प्रसंगात रंगमंचावर येऊन वादन करायचा प्रसंग असल्यामुळे विनायकराव प्रकाशात झळकले. अन्यथा त्यांची जागा प्रेक्षकांना पाठकरून गायकांच्या पदांना बोटांच्या नजाकतीने साथ करणे.शिलेदार मंडळीचा कुठेही कार्यक्रम करणार असली तरी तबला वादक म्हणून विनायकराव ठरलेले.
त्यांच्या पंचाहत्तर वर्षांच्या प्रवासात अनेक कलावंतांना तालमधुरता देण्याचे काम अविरत पार पाडले. मात्र ते करताना स्वतःचा बडेजाव त्यांनी कधीही मिरविला नाही. शांत आणि सहनशील स्वभावामुळेच जणू त्यांच्या साथातली संयम जाणवतो. उगाचच तबल्यावर थिरकत करून मला किती तबला येतो याचे दर्शन त्यांच्या वादनात कधीही आढळणार नाही.
गायकाला फॉलो करणे अवढेच कां ते नेटाने करीत असताना दिसतात.संगीत नाटकांची आज चलती नाही. प्रपंच मात्र पुढे न्यावाच लागतो. तशाही स्थितीत जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदारांच्या नाटकाशिवायच्या मैफली करीत आहेत. याशिवाय शिष्यांना मार्गदर्शन करून उदरनिर्वाह सुरू आहे.गेली सुमारे चाळीस वर्षे एकनिष्ठ सेवा करणारा हा ज्येष्ठ साधक पाहिला, अनुभवला की आपोआपच नतमस्तक व्हावेसे वाटते. प्रसार माध्यमांची चलती असलेल्या युगात संगीत कार्यक्रमांचे दालन खुले झाले आहे. तरी स्वतःचे स्वत्व जपून तबला वादनाचे कसब रंगदेवतेच्या चरणी अर्पण करणाऱ्या या साथीच्या कलावंतांची दखल घेण्याची गरज वाटली .म्हणूनच आज विनायकराव थोरांतावर लिहिले.
अशी शेकडो साधक मंडळी असतील. त्यांचेही मोल तेवढेच आहे. त्यांसाऱ्यांना वंदन !
सुभाष इनामदार, पुणे
No comments:
Post a Comment