Friday, July 15, 2011

रसिका तुझ्याचसाठी



सो कुल : रसिका तुझ्याचसाठी


ही ‘माझी’ मैत्रिण आहे. असं हजारोंना वाटत असेल. फार गवगवा न करता शांतपणे नव्या भूमिकेत शिरणारी. आपल्याला थक्क करून सोडणारी. स्वत:चं मत असणारी. ते निर्भिडपणे मांडणारी. सूक्ष्मपणे पाहिलं तर
किंचित अलिप्त झालेली, खंत वजा केलेली. ही आपल्या सगळ्यांची मैत्रिण. ह्या वेळी फार अवघड भूमिकेत गेली आहे. आपल्याला निशब्द करून..

ओ रसिकाताई. काय. कुठे पळालात तुम्ही अचानक.? कबूल आहे की तू एक्का अ‍ॅक्टर आहेस. पॉज, लूक, डबलटेक, एंट्री याची तुझ्याइतकी मास्टरी खचितच आमच्या कोणात असेल. पण म्हणून इतकी धक्कादायक एक्झिट घेऊन दाखवायची कायमची? इतके दिवस आम्हाला वाटत होते की तू आमच्यातली आहेस. आमची सवंगडी आहेस.

लेकीन दोस्त. तुम्हारा खेल तो किसी और के साथ चल रहा था! डायरेक्ट खुदा के साथ.. पत्ताच नव्हता आम्हाला. तुझे हात खरंच वपर्यंत पोहोचले होते की.. आम्ही खुळ्यासारखे बघत बसलोय आभाळाकडे..

साधारण ४८ तास होतायत त्या गोष्टीला. म्हणजे तू आमच्यातून निघून जाणे वगैरेला.. आणि स्थळ, काळ, वय, सामंजस्य सोडून मूर्खासारखं रडू येतंय. घळाघळा पाणी गळतंय. ओठ मुडपून चेहरा वेडावाकडा होत हुंडके फुटतायत.
श्वास आणि उच्छ्वासाबरोबर तुझं नाव डोकं ते हृदय असं खालीवर होतंय. तुझा स्पर्श आठवतोय. तुझा रंग आठवतोय.. तुझं भुवया उंच करणं.. तुझं ओठ तिरके करीत हसणं. तुझं ऐकणं. तुझं खो खो हसणं.. छे.. रसिका.. हे आठवताना एक दुखरी कळ उमटतीए हृदयात ती तू सहन केलेल्या वेदनांसाठी.. आम्हाला इतका आनंद देणाऱ्या तुला-
इतक्या असह्य़ वेदना का वाटय़ाला याव्यात?

तुला भेटायचं ठरल्यापासूनच आनंदी असण्याला, हसू येण्याला सुरुवात व्हायची. भेटून काही वेळ, दिवस, आठवडे, महिने, वर्षे झाली तरी त्यातल्या मॅड किश्शांनी, तू सांगितलेल्या मजेदार गोष्टींनी खळखळून हसू यायचं.
खूप लो, लॉस्ट वाटत असताना कधीतरी झालेलं तुझ्याबरोबरचं गप्पासत्रं आठवणीत डोकं वर काढतं आणि शीणच निघून जातो यार. काय तुझी एनर्जी. काय तुझं नेमकं निरीक्षण.. काय तुझ्या टीका-टीप्पण्या. पाच मिनिटं किंवा पाच तास- कितीही वेळ भेटलो, तरी तू फ्रेश विचार करण्याचं, तरतरीत जगण्याचं इंजेक्शन देणार म्हणजे देणारच. त्याच्यावर आम्ही आजपर्यंत तगतोय. मग तुला कॅन्सरचं इंजेक्शन देवानी का दिलं? तू का त्याच्या खेळात भाग घेतलास? मी कधीच त्याला माफ करू शकणार नाही. तुला ओळखणारं कुणीच त्याला कधीही माफ करू शकणार नाही.

तुझं वर्णन करावं आणि श्रद्धांजलीचे लेख लिहावे अशी आणि एवढी नाहीएस गं तू.. तू बास आमची मैत्रीण आहेस आणि तुला आपल्या मैत्रीच्या खेळातून आऊट करणारी कोण ही नियती आणि देव वगैरे.. सब झूट है.. आत्ता चिडीनी रडू येत असताना असं वाटतंय. की बाकी सगळं खोटं असलं.. तरी तुझी वेदना तर खरी होती ना. एवढं स्वच्छ मनाचं आमचं जिंदादिल बाळ किती त्रासातनं गेलं. किती शूरपणे जगलं. किती नेटानी झुंजत राहिलं. त्या बाळाची ती दुष्ट जीवघेणी वेदना कुणीतरी थांबवली असेल. तर त्या कुणाचे तरी आणि कशाचे तरी आभार. आमच्यासाठी तू दहा वर्ष थांबलीस..

रसिका.. खूप पुढे ढकललीस तुझी एक्झिट.. पण तुझ्यासाठी तू पुढे जाणं गरजेचं होतं..

पण तू फार फार हवी आहेस. तू आहेसच. नो पास्ट टेन्स हिअर. तुझी रिंगटोन होती- लग जा गले..
के फिर ये हसी रात हो ना हो.. शायद.. अब इस जनम में मुलाकात हो ना हो.. आवडत्या गाण्यासाठी तू मृत्यूची गळाभेट घेतलीस दोस्त? व्हाईट लीलीमधे गायचीस तू त्या दोन ओळी.. किती सुरेल.. माझं अलीकडचं सगळ्यात आवडतं नाटक आणि तू माझी सगळ्यात आवडती, लाडकी अभिनेत्री!

रसिका अगं दहा दिवस पण नाही झाले. मी व्हाईट लीली- नाईट रायडरच्या पोस्टरचा फोटो काढला शिवाजी मंदीरला.. तुझ्या ग्रेट गाबरेच्या पत्त्यावर पाठवणार होते.. पण आता तुझा पत्ताच पत्ताच नाही..! माझ्या जवळच्या प्रत्येकाकडे मी तोंड फाटेस्तोवर तुझ्या व्हाईट लीलीच्या कामाबद्दल बोलले आहे अगं.. शप्पत. एक पांढऱ्या स्वस्तिकाचं झाड लावलंय मी तुझ्यासाठी पिल्लू. त्याची दोन फुलं लगेच उमलली आणि एक कळीसुद्धा आलीए. का. का. का.
तुझी आठवणसुद्धा इतकी उदार आणि आनंदी का..? आणि तू का नाहीस इथे. जिथे आहेस तिथे तुला एक घट्ट मिठी डार्लीग. छान रहा.

ता. क. गिरीश.. जागा भरून काढण्याचा प्रश्नच येत नाही. तू रसिकासाठी लावलेला सदाफुलीचा ताटवा तुझ्या मनात कायमच ताजा राहील. आपला ध्रुवतारा आकाशात जाऊन अढळपद गाठून बसलाय. पण तो दिसण्यासाठी का होईना.. आम्ही उरलेले काजव्यासारखे आहोत तुला. तू खूप काही केलंस गिरीश. खूप खूप..


सोनाली कुलकर्णी
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170161:2011-07-12-21-08-05&catid=329:2011-02-22-08-54-27&Itemid=331

No comments: