Tuesday, April 4, 2017

अत्यंत संपन्न आणि लोभस असे संगीत रूप लाभलेल्या गायिका

रागसंगीत या संज्ञेला एक पारंपरिक अर्थ आहे, मात्र पं. कुमार गंधर्व आणि विदुषी किशोरी आमोणकर या दोन कलाकारांनी ‘राग’ हे तत्त्व आणि ‘ख्याल’ हा गायनप्रकार या दोन्ही बाबतीत स्वत:च्या खास चिंतनाने काही अनोखा आयाम दिला. या दोन्ही कलाकारांचे विचार अनेक बुजुर्गांना आणि समकालीनांना पटले नाहीत, मात्र माझ्या पिढीतील कलाकार आणि रसिक या दोनही कलाकारांच्या कलाविचाराचा संस्कार घेऊनच वाटचाल करत आहेत. अनेकदा कलाकाराचे कलाप्रस्तुतीतील रूप आणि व्यक्तिगत रूप यांत प्रचंड तफावत दिसते, जी अनेकदा कलाकाराविषयी अप्रीती निर्माण करते. मात्र किशोरीताईंसारखे कलाकार इतके विलक्षण प्रभावी असतात की त्यांच्या एका स्वरोच्चाराने आपण सारे विसरतो, लीन होतो आणि त्यांच्याप्रमाणेच त्या स्वरतत्त्वाला शरण जातो. 

 


आदरणीय किशोरीताईंबद्दल ‘महाराष्ट्राचे शिल्पकार चरित्रकोश : संगीत खंड’ साठी मी २०१२ साली लिहिलेला लेख आज मुद्दाम इथे देत आहे ...    




रसिकप्रिय गायिका किशोरीताई आमोणकर

“१९५०च्या दशकानंतर महाराष्ट्रच नव्हे तर एकूण भारतीय रागसंगीताला ज्या कलाकारांनी आपल्या प्रतिभासंपन्न गायकीने प्रभावित केले अशा कलाकारांपैकी किशोरी आमोणकर या एक महत्त्वाच्या गायिका आहेत. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व वडिल माधवदास भाटिया यांच्या ज्येष्ठ कन्या असणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत झाला. 

अगदी बालवयापासूनच उस्ताद अल्लादिया खांसाहेब माईंना गायनाची जी तालीम देत असत तिचा खोल संस्कार त्या अबोध वयातही किशोरीताईंवर झाला. १९३९ साली वडिल माधवदास यांचे निधन झाल्यावर मोगूबाईंवर स्वत: अर्थार्जन करून तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. मात्र आई मोगूबाई तथा माईंनी आपल्या या कन्येस जयपूर घराण्याची शिस्तशीर तालीम दिली. १९५५ साली त्यांचा विवाह रविंद्र आमोणकर यांच्याशी झाला.


मोगूबाईंशिवाय अण्णा पर्वतकर, आग्रा घराण्याचे अन्वर हुसेन खां, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकरांचे व अगदी अल्पकाळासाठी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांचेही मार्गदर्शन त्यांनी घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीतील हुस्नलाल-भगतराम या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी हुस्नलाल यांच्याकडे त्या पंजाबी ढंगाची ठुमरी, गझल, लोकगीतेही शिकल्या. ताईंचे शालेय शिक्षण बालमोहन शाळेत झाले व नंतर जयहिंद कॉलेजच्या विज्ञान शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेतले. संत साहित्य, विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचे त्यांनी वाचन-मनन केले. उपजत अत्यंत कुशाग्र सांगीतिक व सौंदर्यबुद्धी, अपेक्षित असणारी सांगीतिक अभिव्यक्ति स्वत:च्या गळ्यातून साकारण्यासाठी अट्टाहास करण्याची ईर्ष्या यामुळे किशोरीताईंनी अल्पवयातच रागगायनात व ख्याल, ठुमरी, भजन अशा गानप्रकारात प्राविण्य मिळवले. 


१९६०च्या दशकात सुमारे ७-८ वर्षे आवाजाची अनुकूलता न राहिल्याने त्या सक्तीच्या विश्रांतीकाळात त्यांनी चिंतन करून, त्यांना वारश्याने मिळालेल्या जयपूर गायकीला एक निराळे परिमाण दिले. मूलत: बिकट तानक्रिया व अनवट, जोड रागांवर भर देणाऱ्या जयपूर गायकीत संथ आलापचारीसारख्या अन्य घटकांद्वारे या गायकीस त्यांनी अधिक विस्तृत, पसरट, भावाविष्कारजनक केले. व्याकरण व घराण्याच्या शिस्तीच्या चौकटीतून स्वत:स मोकळे करून बुद्धी व भावना दोन्हींस चालना देणारा गायकीचा घाट त्यांनी तयार केला. काही प्रसंगी ठराविक रागांत त्या विशुद्ध जयपूर गायकीचे दर्शन घडवतात, मात्र त्यांचा भर स्वनिर्मित गायकी मांडण्याकडेच राहिला. त्यांच्या एच्. एम्. व्ही.ने १९६७ साली काढलेल्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतील जौनपुरी, पटबिहाग हे राग ऐकताना त्यांना माईंकडून मिळालेल्या तालमीतील जयपूर घराण्याचे शिस्तशीर गायन दिसते. नंतर १९७१ साली प्रसिद्ध झालेली त्यांची राग भूप व बागेश्रीची ध्वनिमुद्रिका अतीव लोकप्रिय झाली. त्यात त्यांची स्वतंत्र विचाराने परिवर्तित झालेली ‘भाववादी’ गायकी दिसते. या नंतरही त्यांची अनेक व्यावसायिक ध्वनिमुद्रणे प्रसिद्ध व लोकप्रिय झाली आहेत. 


त्यांच्या गायकीच्या ढाच्यास अपेक्षित अशी अभिव्यक्ति करणाऱ्या अनेक भावपूर्ण बंदिशींची सौष्ठवयुक्त रचना त्यांनी केली. उदा. भूप (प्रथम सूर साधे, सहेला रे, मै तेरी रे), यमन (मो मन लगन लागी, तोसे नेहा लागा, सब बन प्रीत री होई, तराना), बागेश्री (बिरहा ना जरा, आज सह्यो ना जाए बिरहा, एरी माई साजन नही आये), नंद (आजा रे बालमवा), खंबावती (रे निर्मोही सजना), हंसध्वनी (गणपत विघनहरन, आज सजनसंग मिलन, तराना), ललितबिभास (चलो री सखी सौतन घर जैये), अहिरभैरव (नैनवा बरसे), खेमकल्याण (मोरा मनहर ना आयो), गौडमल्हार (बरखा बैरी भयो), इ. तसेच आनंदमल्हार (बरसत घन आयो), सावनमल्हार (रे मेघा ना बरसो) हे रागही त्यांनी निर्माण केले आहेत. 


‘गीत गाया पत्थरोंने’ (१९६४) या केवळ एकाच हिंदी चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले. त्यांनी गायलेल्या ‘हे श्यामसुंदर राजसा’ व ‘जाईन विचारित रानफुला’ (गीत शांता शेळके व संगीत हृदयनाथ मंगेशकर) या भावगीतांची एच्. एम्. व्ही.ने काढलेली ध्वनिमुद्रिका (१९६८) खूपच रसिकप्रिय झाली. तसेच त्यांनी स्वरबद्ध केलेल्या व गायलेल्या हिंदी भजन (म्हारो प्रणाम, घट घट में पंछी बोलता) व मराठी अभंगांच्या (रंगी रंगला श्रीरंग, पडिले दूर देशी) या ध्वनिफिती गाजल्या. तसेच त्यांच्या आवाजात व्यंकटेशसहस्रनाम, राघवेंद्रस्वामींची कानडी भजनेही (१९८८) ध्वनिमुद्रित झाली आहेत. 



मंगेश पाडगावकर लिखित व पु. ल. देशपांडे यांनी संगीत दिलेल्या ‘बिल्हण’ या संगीतिकेतही त्यांनी गायन केले होते. कर्नाटक संगीतातील विद्वान गायक बालमुरली कृष्णन् यांच्याबरोबर गायनाची जुगलबंदी, तसेच हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह बासरीबरोबर केलेले सहगायन असे काही वेगळे प्रयोगही त्यांनी केले. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या संत मीराबाईंच्या भजनांचा ‘मगन हुई मीरा चली’ हा कार्यक्रम तसेच मराठी संताच्या अभंगांचा ‘तोचि नादू सुस्वरू झाला’ हा कार्यक्रमही त्यांनी सादर केले. किशोरीताईंनी मराठी नाट्यसंगीतास आपल्या मैफलींत क्वचित अपवादात्मक स्थान दिले, मात्र रणजीत देसाई लिखित ‘तुझी वाट वेगळी’ (१९७८) या एकाच मराठी नाटकासाठी त्यांनी संगीत दिले होते. गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘दृष्टी’ (१९९०) या हिंदी चित्रपटास त्यांनी संगीत दिले. 


अरुण द्रविड, सुहासिनी मुळगावकर, माणिक भिडे, मीना जोशी, मीरा पणशीकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित, नंदिशी बेडेकर, विद्या भागवत, व्हायोलिनवादक मिलिंद रायकर, नात तेजश्री आमोणकर हे त्यांचे काही शिष्य; तसेच रघुनंदन पणशीकर हे शिष्योत्तम त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेत आहेत. किशोरीताईंनी निर्माण केलेल्या खास गानमुद्रेचा प्रभाव नंतरच्या सुमारे तीन पिढ्यांवर पडला असून विशेषत: गायिकांनी त्यांचे अनुकरण केले. 


एककेंद्री बुद्धीमत्ता, कलाकार म्हणून असणारी टोकाची उत्कटता व बालवयात पाहिलेली सामाजिक, आर्थिक अस्थिरता यांमुळे की काय, ताईंचा स्वभाव काहीसा हट्टी, एककल्ली व आक्रमक बनला असावा. अत्यंत मनस्वी असणाऱ्या या कलावतीच्या लहरीपणाच्या, चमत्कारीक वर्तनाच्या अनेक घटना मात्र असल्या तरी त्यांच्या या व्यक्तिगत रूपापेक्षा महत्त्वाचे असणारे त्यांचे अत्यंत संपन्न व लोभस असे सांगीत रूप डोळयासमोर ठेवणे इष्ट ठरेल ! किशोरीताईंचे वैयक्तिक आचारविचार न पटणारे लोकही त्यांच्या गायनाने मोहित होतात, हे सामर्थ्य त्यांच्या सांगीतिक कर्तुत्वात आहे.


देशविदेशांतील महत्त्वाच्या सर्व स्वरमंचांसह आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांतून किशोरीताईंचे गायन रसिकप्रिय झाले. त्यांचे सांगीतिक विचार, भरतनाट्यशास्त्रातील रससिद्धांताचा पाठपुरावा स्वत:च्या रागगायनाच्या संदर्भात करणारा ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ २००९ साली प्रसिद्ध झाला. 



संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८५), पद्मभूषण (१९८७), सनातन संगीत सन्मान (१९९७), गोदावरी गौरव (१९९८), पद्मविभूषण (२००२), आय्. टी. सी. एस्. आर्. ए. पुरस्कार (२००३), संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व (२००९), पु.ल.देशपांडे बहुरुपी पुरस्कार (२००९) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. तसेच ‘गानसरस्वती’ (१९८७), ‘संगीत सम्राज्ञी’ (१९९७), भारत गानरत्न (२००१) असे किताबही त्यांना देण्यात आले. २०११ साली अमोल पालेकर व संध्या गोखले यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर ‘भिन्नषड्ज’ हा अनुबोधपट केला." 





- चैतन्य कुंटे,
पुणे






प्रतिमेेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 2 लोक, लोकं बसली आहेत आणि आंतरिक

प्रतिमेेत याचा समावेश असू श्‍ाकतो: 3 लोक, रंगमंचावरील लोक आणि लोकं बसली आहेत

No comments: