Sunday, October 21, 2007

प्रसन्नतेची पखरण




सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले. शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात) तिथे टाकला गेला. दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली. आज घराला बागेचे रूप आले आहे. मी माळी न घेता बाग फुलवली. घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मिळतो. जागा किती हे महत्वाचे नाही. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.






हिरवळीने सकाळची वेळ आधिक प्रसन्न बनते. डोळे तृप्तीचे ढेकर देतात. दिवस चांगला जाणार याची खात्री पटते.कधीतरी, स्वप्नात असेल कदाचित असे घर मनात घर करून होते. पण ते साकारायला वयाची पन्नाशी यावी लागली.खाजगी नोकरी. घरच्या जबाबदाऱ्या यातून स्वतःचा कधी फ्लॅट होईल याची खात्री नव्हती. पण पत्नीचे सहकाय, मिळकतीतील काही भाग गुंतवणूक करण्याची वृत्ती, आजचे न पहाता उद्यासाठी राखून ठेवण्याची मानसिकता यातून घर झाले आणि तेही रो-हाऊस. घेताना उडी मोठी मारली. साठविलेली पुंजी दोन नंबरचे पैसे देण्यात सोडून दिली. घर ही कल्पनाच अशी आहे. तीथे कुणीही ओढ घेईल.रो-हाऊसचा घास मोठा असल्याने घर सजवायचे कसे? यापेक्षा पैसे कुठे वाचवू शकू ? याचीच यादी मनात तयार होत होती. घर तर होऊ दे, आतले फर्नीचर, सजावट-पडद्यांचे नंतर बघू, असाच विचार असायचा.






मोकळी जागा किती मिळेल याची कल्पना आधी नव्हती. पाठीमागे थोडी जागा मिळणार .त्यात भांडी घासायची जागा होणार. इतकेच वाटत होते. पाया, प्लींथ, पायऱ्या आणि स्लॅब पडत गेली.आणि घरासमोरची भिंतही झाली. गेट बसले. नेमकी जागा लक्षात आली. सुमारे साडेतीनशे चौरस फूट जागा घरासमोर बागेसाठी निर्माण झाली. मागे सव्वाशे. आता प्रश्‍न पडला बागेची हौस पुरी कशी करायची? माळी किती घेतो? माती, खते अणि रोपांसाठी किती पैसा लागेल? साराच खेळ पैशात सुरू झाला. कंजूष वृत्तीचा इथे उपयोग झाला.यासाठी एकच केले. राहण्याआधी वास्तुशांत करून घेतली. मात्र दुसरीकडे राहायची सोय असल्याने बागेची कल्पना आपणच राबवायची हे नक्की केले.






पुरती माती बिल्डकडून टाकून घेतली. अर्थात त्यात आली शेतीची माती आणि बांधकाम साहित्याचा उरलेला माल (यालाच रॅबीट म्हणतात). दोन आठवडे रोज रात्रपाळी करून दिवसा तिथेच राबलो, रॅबीट काढणे हाच एकमेव उद्योग झाला. वीटा, फरशी आणि बागेची माती आणून पुढच्या काही दिवसात रचना नक्की केली.तिरक्‍या वीटा लावणे.फरशी सफाईदार बसवणे आणि माती टाकून बागेची रचना सिध्द झाली. प्रश्‍न आली रोपे कोणती आणायची? अर्थातच फुलांच्या रोपांची निवड झाली. गुलाब, जास्वंद, मधुमालती, जाई, जुई, शेवंती आणि तगर, मोगरा यांच्याबरोवरच बोगनवेलीची रोपे व्यवस्थीत अंतरावर लावली .मार्च महिना असल्याने पाण्याची गरज होती; पण हळूहळू रोपांची वाढ होताना पाहण्यात ते श्रम वाटत नव्हते. मागे तुळस लावली; पण ती टिकत नव्हती. कारण शोधण्यासाठी एकदा परसदारी ठिय्या मारून टिकाव आणि खोरे घेऊन जमीन उकरून पाहिली; तर आत फरशांचे तुकडे, सिमेंटची मोकळी पोती खिळे, दगडांची चवड, लाईटच्या बॅटन पट्ट्या असा सांग्रसंगीत माल सापडला. रोपे यात कशी वाढणार ?रोपे पुन्हा लावली. पुन्हा मेहनत घेतली. जगवली आणि आज तिथे तगर, पांढरी जास्वंद, शेवंती, कळीचे जास्वंद आणि शोभिवंत रोपांची सावली आल्हाददायक वाटते आहे.कुणाकडे काही नवे पाहिले की त्याचे रोप घेऊन लावायचे. यात कॅंटीन मधल्या नारळाच्या रोपनेही साथ दिली. सुपारी आली. चिक्कू रूजला. मनीप्लॅंटतर सुसाट वाढला. पारिजातक, कडीपत्ता रूजला. आळी करून तण काढले गेले. माजलेले गवत काढत गेलो. तरी दर वेळी तण रहातातच. त्यातून दुर्वा मिळाल्या. तांबडी, पिवळी, गुलाबी, तपकीरी, पांढरी अशी विविध रंगी फुलांची रेलचेल झाली.आता खरंतर दाटी झाली आहे. पण स्वतःच लावलेल्या रोपांना कसे उपटायचे म्हणून ती डोलतच आहेत. मोकळ्या जागेत कोथींबीर, मेथी, पालक, टोमॅटो, मिरची घेणे सुरू केले. शोभेबरोबर घरच्या भाज्या मिळू लागल्या. दहा रुपयांची कोथिंबीर पेंडी मला विनामूल्य मिळाली.






त्यासाठीची मेहनत किती तर सव्वामहिना !



बागेचे रूप आले आहे. आम्ही घरात रहातो आणि बागेत फिरतो, पानात रमतो. आजूबाजूची मंडळी फुले नेतात. मात्र फांद्या ओढून ओरबाडून फुले नेताना कुणी दिसले की मन दुखावते. फुले झाली अनंत आता हवी फळझाडे. असे मनात आणले.मोठ्‌या-मोठ्या सिंमेटच्या कुंड्या थेट गच्चीवर थाटल्या. डाळींब, अंजीर अणि कागदी लिंबाची रोपे आणली. माती-खत आणि घरातल्या खताने उन्हात उभ्या असलेल्या रोपांना माया दिली. उद्या तीच झाडे आम्हाला फळे देणार आहेत.गच्चीवर काकडी, कारले, दुधीभोपळ्याचे वेल लावलेत. वेल वाढतील, बहरतील आणि खालच्या खोल्यांना सावलीही देतील.आज मधुमालतीचा वेल तिसऱ्या मजल्यावर फुलांनी डवरलाय. काही वर्षांनी नारळ येतील. काही दिवसांनी रामफळे येतील. चिकू खाता येतील. भाज्याचे प्रकार लावता येतील.बागेची फारशी माहिती नसताना, कुठलाही बागकामाचा अनुभव पाठीशी नसताना आपली बाग आपणच फुलवायची याच जाणीवेतून ही निर्मिती झाली. आज बाहेरून कोणेही सांगेल की, बाहेर गुलाबी जास्वंद .पारिजातक आणि जाईची फुले दिसतात ना तेच त्यांचे घर.रोपांना ठिकाण माहित नसते. पण त्यांना जाणवतो किंबहुना स्पर्श ओळखू येतो. मालकाच्या प्रेमाचा. त्याच्या जिद्दी स्वभावाचा.



मी माळी न घेता बाग फुलवली आहे. आता पैसा वाचविणे हा हेतू नाही. ती अधिक विस्तारीत करून फुलांपेक्षा फळांनी डवरलेली ठेवणे.त्यात मन रमवणे. बागेत काम म्हणजे चिंतापासून दूर.हात-पाय तंदुरूस्त राखण्याचा उपाय.वेळ कसा गेला ते कळत नाही.घरच्या लहान मुलाचे कलाकलाने वाढणे जेवढे आनंद देते ना तेवढाच आनंद बाग फुलविण्यात मीळतो.जागा किती हे महत्वाचे नाही. तुमची इच्छा हवी. बागेसाठी रो-हाउस, बंगला महत्वाचा नाही. गच्ची, पॅसेज,बोळ, खिडकीवरच्या लोखंडी बारमधूनही हिरवाई डोकवेल. घर अणि मन प्रसन्न करेल.घरात भिंतीइतकेच महत्त्व विविध कुड्यांना द्या. रासायनीक खते न वापरताही अगदी डबा किंवा बादलीतही ती तुमची सोबत करतील.

1 comment:

Tulip said...

खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं तुमचं पोस्ट वाचून इनामदार. स्वत:च्या कष्टांनी प्राप्त केलेलं हे हिरवं धन तुम्हाला अपरिमित सुख देत असेल ह्यात शंका नाही. फक्त फोटो टाकताना बाजारातल्या झेंडूंचा टाकण्या ऐवजी तुमच्या बागेचा किंवा त्यातल्या फ़ुलांचा टाकला असतात तर? जरुर टाका परत कधीतरी.
मागे एकदा मी एका दिवाळी अंकात पुण्याच्या श्रीकांत इंगळहळ्ळीकरांचा एक लेख वाचला होता. त्यात त्यांनी स्वत: असंच राबून पिकवलेला मळा, भाज्यांचे वाफ़े,छो्टं शेत ह्याबद्दल खूप छान वर्णन केलं होतं. त्या लेखाची आठवण झाली.
पूर्वी आमचाही मुंबईला छोटा का होईना पण स्वत:चा बंगला होता आणि त्यात आईने केलेली बाग होती. कुंपणावर मधुमालती होती आणि दारात लाल चाफ़्याचं अखंड फ़ुलतं झाड होतं. अनंत होता. कृष्णकमळाची, पांढर्या गुलाबांची वेल होती. बटमोगरा होता. खूप दिवसांनी त्या आठवणी मनात आल्या.

आज पहिल्यांदाच तुमचा blog पाहीला. वेळ मिळेल तसा वाचून काढीन. दरम्यान असंच प्रसन्नतेनं लिहित रहा.

नविन घरासाठी शुभेच्छा!!