Tuesday, September 16, 2014

मन एक पाखरू..नवा मराठी अल्बम


मनाचे विविध भावरंग घेऊन लवकरच मराठी भावगीतांचा एक नवाकोरा रोमँटिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, बेल शेंडे, राहुल सक्सेना अशा प्रथितयश गायक-गायिकांबरोबरच गोव्याच्या प्रसिद्ध गायिका रचला अमोणकर यांनी या अल्बममधील गीते गायली आहेत. 

पुण्याच्या "मायक्रो क्रिएशन्स" प्रस्तुत राजेश पवार निर्मित अल्बम "मन एक पाखरू", 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' या संगीत क्षेत्रातील नामवंत कंपनीद्वारे हा अल्बम रसिकांसमोर येत आहे. कवी प्रमोद कोयंडे यांनी या अल्बमसाठी गीतलेखन केले असून मनाचे विविध रंग उलगडून दाखविणाऱ्या या गीतांना गोव्याच्या तरुण संगीतकार सुनील केरकर यांनी संगीत दिले आहे. तर आजवर अनेक अल्बम्सना संगीत संयोजन केलेल्या निरंजन जामखेडकर यांनी "मन एक पाखरू" चे संगीत संयोजन केले आहे. 

मन या विषयावर आधारित या अल्बम मध्ये एकूण नऊ गाणी असून प्रत्येक गीतामध्ये मनाचा एकेक कप्पा उलगडण्यात आला आहे. प्रेम, आनंद, दुःख, मनस्वीपणा अशा मनाच्या विविध छटा असलेली गाणी रसिकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील, विशेषतः तरुणाईला भावतील. "मन एक पाखरू" हे या अल्बममधील शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी गायले असून गीतातील शब्द आणि त्याला दिलेले संगीत याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. बेल शेंडे, महालक्ष्मी अय्यर, प्रचला अमोणकर, आणि राहुल सक्सेना यांनीही उत्तम गाणी गायला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. 

पाऊसधार कोसळत असताना आणि त्यात चिंब भिजावेसे वाटत असतानाच "मन एक पाखरू"द्वारे स्वरधारांमध्ये चिंब होण्याचा योग रसिकांना मिळणार आहे. 

No comments: