Saturday, June 29, 2019

पुरुषोत्तम बेर्डे यांच्या कलाजीवनाची संगीतमय वारी .. पुरूक्रमा




मुंबईच्या कामाठीपुराच्या शालेय जीवनापासून ती सुरु होते आणि एकेकाळचा कामाठीपुरातला वर्गमित्र शामाच्या आठवणीपर्यत टिपत रहाणारा हा एका कलावंताच्या आयुष्यातील कालखंड ऐकणे म्हणजे पुरूक्रमा.

पुरुषोत्तम बेर्डे यांच्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता,संगीतकार, नाटककार ,प्रकाशयोजनाकार ,वेशभूषाकार आणि चित्रकार आशा विविध भूमिकात केलेली सर्जनशील कामगीरी यातून बेर्डे फिरवून आणतात.. तुम्हाला तुमच्या आत डोकवायला भाग पाडतात. कलाकृती सादर करताना होणारी प्रसववेदना आणि त्याच्या परिपूर्णतेतून होणारा मूक आनंद व्यक्त करण्याची पुरूषोत्तम बर्डे यांची ओळख या एकपात्री प्रयोगातून अधिक रसिकांच्या मनात भारून राहते.

आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या कालखंडाची एकपात्री सफर ऐकताना सहाजिकच आपण अनेक टप्प्यावर मधुमधुन स्थिरावतो.
.. त्यांचा संगीतमय आविष्कार एकतो.. त्यावेळचे कांही किस्से सनात साठवून घेतो..

कधी निलेश पाटील यांच्या निसर्गातील कव्याचा आस्वाद घेतो. तर जाऊबाई जोरात नाटकाच्या निमित्ताने सोळा अभिनेत्रींच्या कसरतीवून तावून निघालेल्या आठवणीत रमतो. आणि निर्माता दिलिप जाधव यांनी जाऊ बाईच्या एकहजाराव्या प्रयोगाच्यावेळी पुरुषोत्तम बेर्डे यांना भेट दिलेल्या फोर्ड आयकॉनच्या अनोख्या भेटीला दाद देतो.

तर दूरदर्शनवर ग्राफिक डिझायनर म्हणून काम करताना बातम्यांच्या मागे चुकून फ्लोअरचे दार उघडे राहािल्याने बेर्डे यांच्या शिट्टीने बातमीपत्रात होणारा गोंधळ लक्षात ठेवतो.


चित्रकाराच्या दुनियेची ओळख करून देणा-या जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतल्यानंतर लिहलेल्या आणि त्याची निर्मिती केलेल्या टूरटूर या एकांकिकेपासून बेर्डेंची कला कारकार्द सुरु झाली. आणि रंगभूमिवर व्यावसायिक जबरदस्त यश दिलेल्या याच नाटकाने पुरुषोत्तम बेर्डे यांना नाव दिले. सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, प्रशांत दामले, विजय पाटकर ही नावे रंगभूमिवर स्थिरावली . याचे सारे श्रेय बेर्डे यांचेकडे जाते.

हमाल दे धमाल मधून त्यांनी चित्रपट रसिकांचे लक्ष वेधले. त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्य़ातून त्यांना अनिल कपूर यांची कशी मैत्री झाली. रजनिकांत, दिलिपकुमार यांनीही कसे स्वागत केले . आदरणीय दादामुनी अशोक कुमार यांनी दिग्दर्शक म्हणून कसे स्विकारले.. सारेच क्षण ऐकणे म्हणजे पुरुक्रमा करणे होय.

बालपणाचा काळ कामाठीपूरात कसा गेला..ते ये जीवन है..सांगणारे गाणे दाखवत त्यातून होणारे संस्कार कसे आपल्यातील गुणांना वाव देणारे ठरले ते पहाणे मजशीर आहे. गणीताच्या लोखंडे सरांचा मार टाळण्यासाठी खिडकीतून घेतलेले गाढवाचे दर्शन. हा अवघड विषय टाळण्यासाठी घेतलेला संस्कृत विषय..विविध कलांची लहानपणी झालेली ओळख.. सारेच या पुरुक्रमात ऐकता येते.

आपल्या आयुष्य़ात चुलभाऊ लक्ष्मीकांत बेर्डे याचा सल्लागार आयुष्यात झालेला उपयोग ते व्यक्त करतात.

मोजक्या लोकांच्या संगतीत आपल्या कारकीर्दीचा हा आलेख अधिक व्यापक होतो. कलेच्या सर्व प्रांतात भ्रमंती करताना पुरूषोत्तम बर्डे यांना कसे अनुभव आले. 
निर्मिती सावंत पासून मकरंद अनासपुरे यांच्या पर्य़त अनेक नवोदितांना संधी देताना त्याना आलेला अनुभव. आता ते चित्रकाराच्या भुमिकेतून कसे नेमके टिपण करतात तेही कावळयांच्या तिक्ष्म नजरेतून ते आपल्या चित्रातून समाजविदारक गाष्टी मांडतात तेव्हा त्यांची सर्जनशील कलावंताची पारखी नजर स्तिमित करते.

मंगलगाणी दंगलगाणी, झपाटा अशा वाद्यवृंदांनाही आपल्या कलेच्या नजरेचा बहाल करून त्यांनी रंगभूमिवर दिसताना कलेने कलाकाराने कसे देखणे दिसावे याचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
पारखी नजर. साहित्याची आवड. अभिनयाची जाणीव. संगीताची जाण. दिग्दर्शनाची ताकद. आणि चित्रातून उभी रहाणारी कलाकृती प्रत्यक्ष कशी असावी याचे भान असणारे पुरुषोत्तम बेर्डे यांना पुरुक्रमातून अनुभवणे एक आनंदाचा ठेवा आहे. 
पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरुक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग पाहताना या आमच्या जुन्या मित्रत्वाची आठवण जागी झाली. पुरुषोत्तम बर्डे यांच्या या आगळ्या आत्मकथेची रसिकांनी सवार्थाने दखल घेऊन त्या कालखंडाची साेनेरी पाने आपल्याही मनात साठवून ठेवावी हेच सांगणे.

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

No comments: