Monday, November 26, 2012

गाण्यामुळे आपलं आयुष्यच बदलून जातं..





एका संगीतकाराने आपल्या गाण्यांच्या प्रवासाचा घेतलेला हे शोध आहे. त्यात काळाचे, त्यातल्या संगीतकारांचे मोल तर आहेच पण आपण संगीतकार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आजुबाजूला घडत होत्या याचे डोळस लेखन निलेश मोहरीर या तरुण संगीतकाराने इथे मांडले आहे. ते सारे त्याने आपल्या फेसबुकच्या लेखात नोंदले आहे. मी फक्त तोच धागा जुळवून इथे आपल्या वाचण्यासाठी देत आहे.
-सुभाष इनामदार.
subhashinamdar@gmail.com


आपल्याला एखादं गाणं का आवडतं? आयुष्याच्या प्रवासात काही गाण्यांशी आपलं एक अलौकिक असं नातं का बरं जुळतं? रक्ताची नाती तुटतात पण ह्या गीतांसोबत अनुभवलेले क्षण विसरता येत नाहीत आणि ते पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात. हे एक नातं मात्र कायम टिकून राहतं. दिवसेंदिवस बहरतच जातं. एखादं गाणं इतकं परिणामकारक ठरतं कि त्या गाण्यामुळे नुसतं प्रसन्न वाटणं किंवा डोळ्यात टचकन पाणी वगेरे येणं सोडा पण आपलं आयुष्यच बदलून जातं किंवा आपल्या आयुष्याला नवी दिशा मिळाली असं वाटू लागतं. हा इतका सखोल परिणाम नेमका कशामुळे होतो? शब्दांमुळे? चालीमुळे? गायकाच्या आवाजामुळे? का ह्या तीनही गोष्टींमुळे? नीट विचार केला तर असं जाणवेल कि गीताच्या शब्दातून उमटणाऱ्या "अर्थाला" स्वरबद्ध करून तो अर्थ जसा च्या तसा पोचवण्याची क्षमता असलेल्या आवाजातून व वाद्यवृन्दातून त्याचं सादरीकरण केल्यामुळे परिणाम होऊ शकतो. काव्याचा "अर्थ" किंवा "भाव" समजून जो संगीतकार त्या भावाला स्वर-भाषेत व्यक्त करण्याचा किंवा स्वर-भाषेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो तो थेट श्रोत्यांच्या हृदयात घर करतो. शब्दामधल्या फक्त अक्षरांनाच चाल लाऊन किंवा प्रत्येक अक्षरावर कुठलातरी सूर चिकटवून जे तयार होतं ते गाणं नसतं, तो स्वतःला "कलाकृती" म्हणून सिद्ध करू पाहणारा एक निर्जीव अट्टाहास असतो. अट्टाहासच म्हणावं लागेल, प्रयत्न म्हणून चालणार नाही, कारण प्रयत्नांती परमेश्वर!

वर नमूद केलेला नियम कितीही खरा असला तरी नियमांना अपवाद असतात. संगीत दिग्दर्शनाच्या मुलभूत तत्त्वांप्रमाणे बोली-भाषेतील व्याकरण स्वर-भाषेत पाळण्याचा हा मुद्दा तांत्रिक शुद्धीसाठी अतिशय महत्वाचा आहे. पण फक्त आणि फक्त तांत्रिक शुद्धी मुळेच परिणाम होतो हे समीकरण देखील चुकीचं आहे. अशी असंख्य गाणी आहेत जी वर नमूद केलेल्या नियमाचं घसघशीत उल्लंघन करतात आणि तरीही त्यांना सर्वत्र मान्यता मिळते, ती गाणी युनिव्हर्सल हिट्स ठरतात. तिथे न शब्द-लालित्य असतं न स्वर-रचनेचं नाविन्य; पण तरीही ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मनाचा ठाव घेणारं एक वेगळंच "नाद-माधुर्य" ह्या गाण्यांमध्ये असतं आणि नेमकं तेच काम करतं. अगदी कर्मठातले कर्मठ संगीत समीक्षक देखिल ह्या "नाद-माधुर्याने" मोहित होतात मग आपण तर "सामान्य" प्रेक्षक, आपण अगदी सहज घायाळ होतो. पण खरं सांगू का? कधी कधी असं वाटतं कि सामान्य आणि असामान्य असं काही नसतंच. सगळं "समान" असतं. आपला दृष्टीकोन "दर्जा" ठरवत असतो. अमुक एखादी गोष्ट चांगली किंवा अमुक एखादी गोष्ट वाईट, असे काहीसे संकेत आपल्याला सतत मिळत असतात, आपल्याच अचेतन मनाच्या गाभाऱ्यातून, आणि त्यावरून आपण आपल्या आवडी-निवडी ठरवतो. असो, उगीच गूढ अश्या विषयाला हात घालून माला तुम्हाला कन्फ्युझ करायचं नाही. हा लेख कन्फ्युझन दूर करण्यासाठी आहे, ते निर्माण करण्यासाठी नव्हे. आता तुम्ही म्हणाल कसलं कन्फ्युझन? सांगतो. आजकालच्या सुगम संगीताची स्थिती पाहुन विशेषतः फिल्म संगीताची "अवस्था" पाहुन माझ्या असं लक्षात आलं कि आपण जे ऐकतो त्यात नाद-माधुर्य आहेच असं गृहित धरतो किंवा ते गाणं ऐकवणारे आपल्याला तसं गृहित धरायला भुरळ घालतात, भाग पाडतात आणि आपण सहज बळी पडतो. आपण संगीताच्या बाबतीत इतके अरसिक का झालोय? एखाद्या पॉश हॉटेल मधे डिनर करायला गेलो कि आपण त्या हॉटेल चं मेन्यू कार्ड किती बारकाईने वाचतो, आपल्याला काय आवडतंय काय नाही, त्या हॉटेल ची स्पेशालिटी काय आहे ह्या गोष्टींचं बारीक निरीक्षण करूनच जेवण ऑरडर करतो, नाही का? मग संगीताच्या बाबतीत कुठे जातो हो आपला चोखंदळपणा? सुरांच्या हॉटेल मधे गेलो कि आपल्याला मेन्यू कार्ड वाचायचंच नसतं, आचारी जे बनवेल आणि वेटर जे वाढेल ते निमुटपणे गिळून टाकायचं. मग त्या अन्नाला चव आहे का, मुळात ते "ताजं" आहे का हे देखिल आपण पडताळून पाहत नाही. शिळं असलं तरी ताटात वाढलेलं ते सगळं जेवायचं. ताट कसं अगदी स्वछ झालं पाहिजे. सुगम संगीताची काय श्रीमंत परंपरा होती आणि आज ती रस्त्यावर आल्ये. कुठेतरी आपणंच जबाबदार आहोत का? ह्याचं एकंच करण असू शकतं; संगीत आपल्यासाठी तितकं महत्त्वाचं राहिलेलं नाही. संगीताचा दर्जा उंचावला काय किंवा खालावला काय, आपल्याला काय फरक पडतो? टाईमपास पुरतं किंवा प्रवासात विरंगुळा म्हणून काहीतरी वाद्य-गदारोळ निर्माण होतोय ना? मग बस झालं. त्याचा सखोल अभ्यास करून त्यात सौंदर्य आहे कि नाही हे तपासून पाहायला कोणाला वेळ आहे? आणि समजा त्यात सौंदर्य असलंच तर ते सौंदर्य का उभं राहणार आहे आपल्या पाठीशी ह्या कट-थ्रोट स्पर्धेने बरबटलेल्या जीवनात? अफाट पैसा कमवण्याच्या शर्यतीत हे सौंदर्य का टिकवून ठेवणार आहे आपल्याला? मग त्याला इतकं महत्त्व कशाला द्यायचं? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कलेतील सौंदर्य किंवा दर्जा आपल्या वैयक्तिक "धकाधकीच्या" जीवनात आपल्या मदतीला "प्रत्यक्षरीत्या" धाऊन येत नसेलही; पण अप्रत्यक्षरीत्या उपयोगी पडण्याची क्षमता जर त्याच्यात असेल तर???

आता तुम्ही म्हणाल "अहो जर-तर च्या गोष्टी काय करता राव? मुद्द्याचं किंवा फायद्याचं काय ते बोला" ! बोलतो, सर्वांच्या फायद्याचंच बोलतो.

कलेत अफाट शक्ती असते कारण कलेचा संबंध थेट भावनांशी असतो. कलेच्या साधनेतून आपल्या मनावर देवत्त्वाची कळा चढते. विशेषतः संगीत कलेतून प्राप्त होणाऱ्या निर्मळ आनंदाचे आपल्या इंद्रियांवर सात्विक परिणाम होतात. संगीत हे कलाकाराच्या अचेतन मनातून जन्म घेत व सर्वांच्या चेतन मनाचा ठाव घेत, माझिया माहेरा जा म्हणत, पुनःश्च त्या कलाकाराच्या व काही निवडक श्रोत्यांच्या अचेतन मनाच्या गावी घर करून जातं. आणि संगीताच्या ह्या प्रवासात ते सकारात्मकतेची असंख्य कंपने निर्माण करतं. निराशेचं मळभ दूर होऊन मनावर प्रेरणेचा अन नव चैतन्याचा पाउस बरसतो. ह्या प्रेरणेतून, नव चैतन्यातून आपल्याला जगण्याची शक्ती मिळते, चांगलं काम करण्याचं बळ मिळतं. रोजचं कंटाळवाणं वाटणारं रुटीन काम देखील सुसह्य्य होऊन जातं. स्वरातून होणारी ही शक्ती-उपासना साक्षात स्वरदेवीला म्हणजेच देवी सरस्वतीला प्रसन्न करते. आणि सरस्वती तर ज्ञान विज्ञान व कलेची अभिसारिका. ज्ञान विज्ञान कलेची साधना जो करतो त्याच्यावर "देवी लक्ष्मी" देखील प्रसन्न होते. "अभिजात" संगीताचा आनंद घेणाऱ्यांची हि एक प्रकारची पूजाच होते असं म्हणायला हरकत नाही.

खूप प्रवचनात्मक बोललो का? काय करणार, शेवटी मी स्वर-कलेचा साधक. स्वरांची बाजू उचलून धरणार. असो, मुद्दा हा आहे कि कला जोपासणं जरी प्रत्येकाला शक्य नसलं तरी कलेचा आस्वाद घेणं त्यातील सौंदर्य अनुभवणं हि देखील एक कला आहे. आनंद लुटण्याची कला. आणि त्याचे असंख्य फायदे आहेत. फक्त कुठल्या आणि कशा प्रकारच्या कलाकृतीचा आनंद घ्यावा म्हणजे फायदा होईल हे नीट ठरवता आलं पाहिजे. आपण जे ऐकतोय ते अर्थपूर्ण, भावपूर्ण किंवा कमीत कमी नाद-मधुर तरी आहे का हे ओळखण्याची क्षमता आपल्यात असायलाच हवी; नसेल तर ती डेव्हलप करायला हवी. त्यात आपलाच फायदा आहे.

तुम्ही संगीतकार कसे झालात हा प्रश्न प्रत्येक संगीतकाराला मुलाखतींमध्ये हमखास विचारला जातो. खरं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर असं एक दोन वाक्यात देणं शक्य नाही. ती एक खूप मोठी, अनेक वर्षांची प्रक्रिया असते हे आज माझ्या लक्षात आलंय. असं म्हणतात कि कलाकार हा जन्मावा लागतो. तसं असेलही. पण बालपणी आपल्या मनावर जे संस्कार होतात ते बहुदा आपला पुढचा प्रवास ठरवत असतात. किंवा "आपण ज्या गोष्टींकडे आकर्षित होतो, ज्या गोष्टी स्वीकारतो त्याचे आपोआप आपल्यावर संस्कार होतात आणि त्यातून आपण घडत जातो" हे विधान जास्त योग्य ठरेल; कारण प्रत्येक व्यक्ती हि लहानपणापासून संगीत ऐकतंच असते पण संगीत ऐकणारे सगळेच काही संगीतकार होत नाहीत. ज्यांना नव-निर्मितीची आस असते ते मात्र, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, संगीतकार होऊ शकतात.

मलाही अनेकवेळा हा प्रश्न विचारला गेलाय. उत्तर देता देता माझ्या असं लक्षात आलं कि मी ह्यावर एक लेख लिहू शकतो. त्यानिमित्तानी एखादा संगीतकार कसा घडतो हे लोकांना समजेल आणि आजवरच्या प्रवासाची उजळणी करताना माला आवडलेल्या गाण्यांच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील व कदाचित हि गाणी तुमच्यासाठी हि तितकीच खास असतील !!! माझ्या आईला सुगम-संगीत ऐकायची खूप आवड. माला आठवतंय माझ्या लहानपणी आमच्याकडे एक छानसा स्टीरिओ टू इन वन होता ज्यावर सतत मराठी हिंदी गाणी चालू असायची. मराठी गाण्यांमध्ये जुनी भावगीतं, चित्रपट-गीतं, भक्ती-गीतं, अभंग ऐकल्याचं मला आठवतंय. ८० च्या दशकातील बरीच हिंदी चित्रपट गीते देखील ऐक्ल्याच्या स्पष्ट आठवणी आहेत. अर्थात तेव्हा आपण जे ऐकतोय त्याला "गाणं" म्हणतात, ती एक कलाकृती असते व त्याचे रचनाकार असतात हे काहीच कळत नव्हतं. फक्त जे ऐकू येत होतं ते छान वाटत होतं; त्याची गम्मत वाटत होती एवढंच. मासूम चित्रपटातील "लकडी कि काठी" हे गाणं म्हणजे जीव कि प्राण झालं होतं.

दिवसभर हेच गाणं ऐकण्याचा हट्ट असायचा. बोबड्या भाषेत सतत हेच गाणं म्हणायचं. घरी येणाऱ्या पाहुण्यांचं देखील ह्याच गाण्याने स्वागत व्हायचं. तेव्हा स्टेज फियर नावाचं असं काही अस्तित्वात नव्हतं त्यामुळे मी बिनधास्तपणे मोठ-मोठ्यानि हे गाणं म्हणायचो आणि शाबासकी मिळवायचो. तेव्हा कुठे माहित होतं कि हे गाणं ज्यांनी रचलंय त्या संगीतकार-गीतकार जोडीचे, म्हणजेच "आर.डी बर्मन आणि गुलझार" ह्यांचे आपण खूप मोठे चाहते होणार आहोत व त्यांची असंख्य जुनी गाणी आपल्याला वेड लावणार आहेत. ह्या गाण्यासोबत शाळेतल्या नर्सरी र्हाइम्स देखील तितक्याच मनमोहक वाटत होत्या. ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार्स, जेंक एंड जिल , लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन आणि सगळ्यात आनंददायी "चाल" म्हणजे हेंपी बर्थडे टू यु...काय चाली आहेत ह्या, सिम्प्ली इटरनल; कोणी बदलूच शकत नाही त्यांना; मुळात ह्या चाली बदलाव्यात असं वाटणारच नाही कोणाला. दे आर जस्ट करेक्ट.
ह्या सगळ्याचे संस्कार होत होते माझ्यावर; स्वर-रचना हि शक्यतोवर "स्वप्नवत" असावी ह्या माझ्या विचारांची मूळं बहुदा ह्या नर्सरी र्हाइम्स मध्ये दडली असावीत. ह्या सोबत पी सावळाराम आणि वसंत प्रभू ह्या जोडीची गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जिथे सागरा , प्रेमा काय देऊ तुला, ह्रीदयी जागा तू अनुरागा, घट डोई वर घट कमरेवर, आली हासत पहिली रात, लेक लाडकी ह्या घराची, मानसीचा चित्रकार तो, गा रे कोकिळा गा, कल्पवृक्ष कन्येसाठी, गोड गोजिरी, हसले ग बाई हसले, मुकुंदा रुसू नको इतुका, अशी असंख्य अवीट गोडीची गाणी कानावर पडत होती. माझ्या आईला हि मराठी गाणी खूप आवडायची. तिच्यामुळे सुधीर फडक्यांची अनेक अजरामर गाणी मी ह्या लहान वयातच ऐकत होतो. पंडित हृदयनाथ मंगेशकरांची गाणी म्हणजे इतरांपेक्षा खूप वेगळी, संगीताच्या प्रस्थापित मर्यादा ओलांडून नवी क्षितिजे उलगडणारी, आणि खळे काकांचा "तुकाराम" तर केवळ अविस्मरणीय. मी पहिल्यांदा "सुंदर ते ध्यान" ऐकल्याचं मला आठवतंय. घरात रेडीओ चालू होता , अचानक एक सुरेल घंटानाद झाला, स्वर मंडलाचे तरंग उठले, पखवाज आणि टाळ दुमदुमू लागले आणि त्यानंतर एक दिव्य आवाज कानावर पडला. "लता मंगेशकर" ह्या अलौकिक आवाजाशी पहिल्यांदाच ओळख झाली ती ह्या अभंगाने. तेव्हा "अभंग" म्हणजे काय किंवा "तुकाराम" म्हणजे कोण हे काहीच कळत नव्हतं. सुधीर फडके, वसंत प्रभू, हृदयनाथ मंगेशकर,श्रीनिवास खळे, लता मंगेशकर ह्या कोण व्यक्ती आहेत हे देखील माहित नव्हतं. पण ह्या मंडळींच्या कलाकृतीतून मनावर सात्विक परिणाम होत होते. जे ऐकतोय ते काहीतरी वेगळंच आहे, ह्या आधी आपण असं काहीही ऐकलेलं नाही हे निश्चित कळत होतं. आज सुमारे २० वर्षांनंतरही सुंदर ते ध्यान ऐकल्याचं आणि त्याचा सुरेल परिणाम झाल्याचं स्पष्ट आठवतंय!

५-६ वर्षांचा झाल्यावर "सिनेमा" नावाची एक जादु चक्क दिसू लागली. आई बाबा रात्री झोपताना जी गोष्ट सांगायचे त्याच्यापेक्षा "सिनेमा" मधली गोष्ट खरोखरच दिसायची, ऐकू यायची. आणि सिनेमा मधल्या गोष्टीत "गाणी" असायची. सिनेमातील गोष्टी पेक्षा त्यातील गाणीच जास्त आवडू लागली होती. ८० च्या दशकातील मासूम, खुबसुरत, उमराओ जान, एक दुजे के लिये, हिरो, बेताब, मोहब्बत, सदमा, सनी, राम तेरी गंगा मैली, सागर, जाबाझ, मिस्टर इंडिया, खुदगर्झ अश्या काही चित्रपटांची गाणी दर्जेदार होती आणि ती गाजत होती. विशेषतः १९८७ साली आलेला मिस्टर इंडिया ह्या चित्रपटाने मनोरंजनाची एक वेगळीच उंची गाठली, मला आठवतंय मी आणि माझ्या वयाची सर्वच मुलं ह्या फिल्म ने भारावून गेलो होतो. ह्यातील "हवा-हवाई" आणि "काटे नाही कटते" हि गाणी सॉलिड गाजली होती. ह्या दशकातील सुरवातीचा काळ संगीताच्या बाबतीत थोडा उदासीनच होता. बटबटीत स्वर-रचना ७० च्या दशकातूनच सुरु झाली होती, ती पुढे अधिकाधिक खालावली, वाहियाद आणि चीप होत गेली. पण हे त्या वयात कळत नव्हतं. त्या काळातील गाणी आज ऐकताना हे जाणवतं. काही गाणी ऐकून आश्चर्य वाटतं कि हि गाणी आपल्याला किंवा इतर कोणालाही कशी काय आवडली बुवा ??? म्हणजे बघा हा, फार नावं घेत नाही पण हिम्मतवाला मधलं "नैनो में सपना", डिस्को-डान्सर मधलं "आ एम अ डिस्को डान्सर", डिस्को-दिवाने, त्रिदेव मधलं "ओये-ओये", राम-लखन मधलं "माय नेम इज लखन" हि अशी गाणी आज ऐकताना फार "विनोदी" वाटतात. पण कशीही असली तरी ह्या गाण्यांनी लोकांचं मनोरंजन केलं हे निश्चित. फक्त त्या मनोरंजनाचा दर्जा राखला गेला असता तर अजून मजा आली असती.
असो, पण १९८८ साली "कयामत से कयामात तक" (क्यू.एस.क्यू.टी) हि म्युझिकल फिल्म आली आणि फिल्म संगीताची समीकरणंच बदलली. पापा केहते है सुपर-हिट झालं पण मला अधिक आवडली ती गाणी म्हणजे गझब का है दिन आणि ए मेरे हमसफर. अफाट मेलडी होती ह्या गाण्यांमध्ये. दर्जेदार शब्द आणि तितक्याच दर्जेदार चाली. आमीर आणि जुही वर चपखल बसणारे उदित नारायण आणि अलका याग्निक ह्यांचे बहारदार आवाज. मजरूह सुलतानपुरी आणि आनंद-मिलिंद ह्या गीतकार-संगीतकार जोडीची एक उत्कृष्ट कलाकृती. पण क्यू.एस.क्यू.टी च्या हळुवार संगीतासोबत गाजत होती ती लक्ष्मी-प्यारेंची "तेजाब"ची धुमाकूळ घालणारी गाणी. "एक दो तीन" ने काय इतिहास रचला हे सांगण्याची गरजच नाही. खरं बघायला गेलं तर "चाल" म्हणून एक दो तीन हे गाणं थोडं हलकं आहे, सुमार आहे. पण त्याच्या "सादरीकरणात" सॉलिड दम होता. आणि अर्थात "माधुरी" चा टाईमलेस परफॉरमन्स.

१९८८ पासून संगीतातील "मेलडी" आणि "नाद-माधुर्य" ह्याचा नवा अध्याय सुरु झाला असं म्हणायला हरकत नाही.
१९८८ साली दूरदर्शन वर लोक सेवा संचार परिषद चं "मिले सूर मेरा तुम्हारा" हे भव्य अभियान गीत प्रदर्शित झालं आणि राग संगीताशी प्रथमच "प्रकर्षानी" ओळख झाली. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर म्हणजे कोण हे समजलं, त्यांना पहिल्यांदाच टी व्ही स्क्रीन वर पाहिलं. सिंधू भैरवी रागावर आधारित हि चाल संगीतकार अशोक पत्कींची एक अजरामर कलाकृती. तेव्हा कोणाला माहित होतं कि बरोबर वीस वर्षांनंतर ह्याच ग्रेट गाण्याचा ग्रेट संगीतकार माझ्या एका चालीसाठी माला फोन करून शाब्बासकी देईल. २००७ साली "कळत-नकळत" हे माझं पाहिलं शीर्षकगीत प्रदर्शित झालं आणि कौतुकाचा पहिला फोन आला तो पत्की काकांचा. तेव्हा त्यांच्याशी फोन वर बोलताना मला "मिले सूर मेरा तुम्हारा" ची आठवण झाली. भीमसेन जोशी जे गातात ते क्लासिकल आणि ते सुगम पेक्षा खूप कठीण असतं आणि थोडं रुक्ष देखील असतं असा एक गोड गैरसमज मी त्या लहान वयात करून घेतला जो पुढे देवाच्या कृपेने योग्य वयात दूर झाला. असो, मिले सूर प्रमाणेच पत्की काकांचंच भटियार रागावर आधारित पूरब से सूर्य उगा देखील तितकंच परिणामकारक ठरलं. बजे सरगम हर तरफ से ह्या देस रागावर आधारित गीताचा उल्लेख देखील करावाच लागेल.

८७-८८ मध्ये रविवारी सकाळी ९.३० वाजता "सीताराम चरित अति पावन" ह्या टायटल साँग ने "रामायण" ची सुरवात व्हायची. तसंच पुढे ८८-९० मध्ये संगीतकार राजकमल ह्यांनी स्वरबद्ध केलेलं महेंद्र कपूर ह्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेलं महाभारत ह्या मालिकेचं "अथ श्री महाभारत कथा" हे शीर्षक गीत देखील तितकंच प्रभावशाली. हि गाणी इतके वेळा ऐकली गेली तेव्हा कि ती आज देखील तोंड-पाठ आहेत.

१९८९ साली आलेला "मैने प्यार किया" ह्या फिल्म ने सांगीतिक उच्चांक गाठले. "दिल दिवाना" हे ऑल टाईम क्लासिक गाणं आहे असं मला वाटतं. ह्यातील इतर गाणी म्हणजे "आजा शाम होने आई", "आया मौसम दोस्ती का", "कहे तोसे सजाना" हि देखील छान जमली होती. "कबूतर जा जा जा" हे गाणं आज खूप विनोदी वाटतं पण तेव्हा मात्र ते प्रचंड आवडलं होतं. ह्यातील "आते-जाते" आणि "मेरे रंग में रंगने वाली" ह्या गीतांच्या चाली ८० तील प्रसिद्ध इंग्रजी गाण्यांवरून "इन्स्पायर्ड" होत्या पण त्या उत्तम प्रकारे हाताळल्या होत्या. चोरी करावी तर अशी. असो, मैंने प्यार किया च्या म्युझिक सोबत राम लखन, त्रिदेव , चालबाज़ अणि चाँदनी ह्या सिनेमांची गाणी देखिल तितकीच हिट ठरली. राम लखन मधलं "बडा दुख दिना" आणि चांदनी मधली "सगळीच " गाणी मला फार आवडली होती. "तेरे मेरे होटों पे मीठे मीठे गीत मितवा", "लगी आज सावन की फिर वोह झड़ी है", "आ मेरी जान" ही चांदनी मधली अधिक आवडलेली गाणी. ह्या सोबत "डैडी" नावाची एक भावनाप्रधान फिल्म आली ज्यात "आईना मुझसे मेरी पेहेली सी सुरत मांगे" हे अप्रतीम गाणं होतं. थोडक्यात १९८८-१९८९ मध्ये ९० च्या आगामी बहारदार संगीतमय दशकाची नांदी झाली असं म्हणायला हरकत नाही.

आणि मग अवतरलं ९० चं सुरेल युग. ९० च्या दशकातलं संगीत "आमचं" संगीत होतं, आमच्या "पिढीचं" संगीत होतं. ९० च्या दशकाने मला घडवलं, आधी रसिक म्हणून आणि मग एक कलाकार म्हणून. नशिबाने तेव्हा संगीतात खूप सकारात्मक बदल झाले ज्याचे परिणाम आज एक संगीतकार म्हणून काम करताना जाणवतात. तेव्हा जर हे बदल घडले नसते तर आज कदाचित आम्ही खूपच जास्त "सुमार" काम करत असतो. आजच्या तरुण संगीतकार पिढी कडून जे काही बरं काम होत असेल त्यात ९० च्या स्वर-तांत्रिक क्रांतीचा खूप मोठा वाटा आहे. ९० च्या दशकातील संगीतावर मी अक्खा ग्रंथ लिहू शकतो, इतकं भरभरून बोलण्यासारखं आहे ह्या काळातील संगीताबद्दल. घाबरू नका , मी "लेख" लिहितोय, "ग्रंथ" नव्हे; ह्याचं पुरेपूर भान आहे (अजूनतरी).

असो, ९० साली दिल, किशन कन्हैय्या, थानेदार, बाघी, सैलाब,लेकीन असे अनेक उत्तम संगीत असलेले चित्रपट आले. पण सगळ्यात म्युझिकल हिट ठरलं ते "आशिकी" चं संगीत. त्यातील नज़र के सामने जिगर के पास, मेरा दिल तेरे लिए धड़कता है, बस एक सनम चाहिए हि गाणी मला विशेष आवडली. लेकीन मधली सुनियो जी अरज म्हरियो, सुरमयी शाम हि गाणी मनाला भिडली. थानेदार मधलं तम्मा तम्मा लोगे आणि ९१ साली "हम" मधलं जुम्मा चुम्मा दे दे हि अफ्रिकन आरटिस्ट मोरी कांते च्या "तम्मा" ह्या गाण्या वरून "चोरलेली" गाणी खूप गाजली. ९१ साली साजन, सडक, सौदागर, फूल और कांटे, दिल है के मानता नहीं, हीना, लम्हे, लव्ह असे सरस म्युझिकल चित्रपट आले. पण विशेषतः साजन, हीना आणि दिल है के मानता नही मधली सगळीच गाणी मनात घर करून गेली. लम्हे आणि लव्ह मधली काही गाणी क्लासिक ठरली.

आता वळूया १९९२ कडे. हे वर्ष खूप खूप खूप जास्त "स्पेशल" आहे. का ते सांगतो. नेहमीप्रमाणेच सुरेल संगीताने नटलेल चित्रपट येतंच होते जसे बेटा, खिलाडी, राजू बन गया जेनटलमेन आणि जो जीता वोही सिकंदर . जो जीता मधलं "पेहला नशा" हे माझं सर्वात आवडणाऱ्या गाण्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेलं गाणं आहे. जतीन-ललित वेर सिम्पली फीनॉमिनल. त्यांचंच "खिलाडी" मधलं "वाद राहा सनम" हे अजून एक उत्कृष्ट गीत. पण ९२ साली एक मोठी क्रांती झाली. एक तमिळ चित्रपट हिंदीत डब करून प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने व त्याच्या संगीताने इतिहास रचला. तो चित्रपट म्हणजे मणी रत्नम चा "रोजा" . संगीतकार "ए आर रेहमान" ह्याचं दमदार पदार्पण झालं. रेहमान च्या संगीताने सगळ्यांना वेड लावलं. दिल है छोटासा, रुक्मणी रुक्मणी, रोजा जानेमन, ये हसीन वादिया, भारत हमको जान से प्यारा है हि सगळीच गाणी अफाट यशस्वी ठरली. अहेड ऑफ टाईम ची जणू व्याख्याच ह्या संगीताने मांडली. सगळंच कसं अगदी मनमोहक, रंजक, सुरेल, टेक्निकली सुपर्ब आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्रपट सृष्टीच्या भाषेत "सुप्पर हिट"!...एखाद्या सुपर-स्टार नटा प्रमाणेच रेहमान ने आपलं वलय निर्माण केलं.बीबीसी ने जाहीर केलेल्या एका एसटिमेट प्रमाणे रोजा च्या अल्बम सेल्स चा आकडा १५० मिलियन च्या पुढे गेला आणि आता तर त्याचं मोजमाप करणं देखिल कठीण आहे. रेहमान ने जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आरटिस्ट च्या यादीत आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. क्रीडा क्षेत्रात जसे रेकॉर्ड्स प्रस्थापित करता येतात ना तसे संगीत क्षेत्रात ह्या कलाकाराने नव-निर्मितीचे, यशाचे व पुरस्कारांचे नवे उच्चांक प्रस्थापित केले.

८० च्या दशकात हिंदी चित्रपट संगीताला आलेली सुमारतेची मरगळ रेहमान ने ९० च्या दशकात दमदार पदार्पण करून घालवून टाकली, संगीत दिग्दर्शन ह्या क्षेत्रा कडे लोकांना नव्या दृष्टीने पहायला भाग पाडलं. मुळात त्याने संगीत दिग्दर्शनाच्या जुनाट व रटाळ प्रथा मोडून स्वतःची अशी एक वेगळीच विचारधारा अन शैली प्रस्थापित केली. वेगळ्या साऊंड ला जन्म दिला. रेहमान चा साऊंड हा त्याच्या संगीताचा एक अविभाज्य घटक ठरला. जी किमया स्वर-रचनेतून साधता येते ती किमया स्वर-रचने सोबत रेहमान नी आपल्या साऊंड डिझाईन मधून देखील सिद्ध करून दाखवली. हिज साऊंड टू वॉज लाईक फ्रेझिंग. विशेष म्हणजे रोजा नंतर अनेक संगीतकारांनी त्याच्या साऊंडच्या जवळ-पास पोचण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, काहींनी तर त्याच्या तामिळ चित्रपटातल्या चाली हुबेहूब चोरून हिंदी गाणी देखिल बनवली. ही चोरलेली गाणी चालली ती त्यांच्या मूळ चालीच्या आणि वाद्यसंयोजनाच्या जोरावर, पण जेव्हा लोकांच्या हे लक्षात आलं कि ही गाणी मुळात मद्रास मधे स्थाईक त्या गुणी संगीतकाराच्या तामिळ गाण्यांवरून चोरलेली आहेत तेव्हा रसिकांनी डूप्लीकेट माल रिजेक्ट करून ओरीजीनल तमिळ गाणी ऐकणं पसंत केलं. कदाचित ह्यामुळेच ह्या गुणी स्वर-साधकाला मोझार्ट ऑफ मद्रास म्हटलं जाऊ लागलं कारण त्याच्या संगीताला भाषेची मर्यादा नव्हती. हिंदी गाणी एन्जॉय करणारे रसिक त्याची तामिळ गाणी ऐकू लागले. १९९२ साली रेहमान आला आणि फिल्म म्युझिक नेव्हर रिमेंड सेम आफ्टर.

१९९३ साली आईना, आखे, खलनायक, डर, बाझीगर, हम है राही प्यार के, रुदाली, फिर तेरी काहानी याद आई, साहिबान अश्या म्युझिकल फिल्म्स आल्या. "चोली के पीछे" नी धुमाकूळ घातला. ते गाणं उत्तमच होतं, मला तरी ते अश्लील वगेरे नाही वाटत. पण पंडित हृदयनाथ मंगेशकरांच संगीत लाभलेला माया मेमसाब अजून आठवतो. त्यातील प्रत्येक गाणं लक्षणीय वाटतं मला. तसंच स्वर्गीय भूपेन हझारिका ह्यांचं "रुदाली" चं संगीत देखील उत्तम होतं. दिल हूं हूं करे आठवतंय ना? डर ची गाणी पण खास होती; शिव-हरी आणि यश चोप्रा हे समीकरण म्हणजे उत्तम संगीत. जादू तेरी नझर आणि तु मेरे सामने हि त्यातील विशेष गाणी.

९४ साली प्रदर्शित झालेल्या "ये दिल्लगी" चं म्युझिक खूप आवडलं मला. पुन्हा एकदा जतीन-ललित ची जादू. ९४ साली आर.डी.बर्मन गेले पण त्यांचा शेवटच्या चित्रपटाचे संगीत मात्र अमर झाले. १९४२ अ लव्ह स्टोरी चं संगीत कोणीही विसरू शकत नाही. काय गाणी होती ती; एक लडकी को देखा तो, कुछ न कहो, रिमझिम रिमझिम, रूठ न जाना, ये सफ़र आणि "प्यार हुआ चुपकेसे"!!! ह्यासोबत मोहरा मधलं"तू चीज़ बड़ी है मस्त मस्त" सारखं आयटम सॉन्ग देखिल पॉप्युलर होत होतं. मैं खिलाडी तू अनाड़ी मधलं चुरा के दिल मेरा हे अन्नू मलिक चं गाणं मला फार आवडलं होतं. वेगळाच माहोल होता ह्या गाण्याचा. ह्या वर्षी "हम आपके हैं कौन" प्रदर्शित झाला आणि त्याने सर्व रेकॉर्डस मोडले. चित्रपटाप्रमाणेच त्याचं "निरागस" संगीत देखील तितकंच लोकप्रिय झालं. १४ गाणी होती ह्या फिल्म मध्ये. आणि सगळी सुपर-हिट. पण विशेष लक्षात राहतात ती "माई नी माई, दीदी तेरा देवर दिवाना, ये मौसम का जादू है मितवा, पेहला पेहला प्यार है आणि वाह वाह रामजी"!!!

१९९५ हे वर्ष संगीतप्रेमींसाठी खास ठरलं. एकी कडे "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" चं पंजाबी ढंगाचं रोमेंटिक संगीत तर दुसरी कडे "बॉम्बे" आणि "रंगीला" ची रेहमानी जादू. तुझे देखा तो ये जाना सनम, रुक जा ओ दिल दीवाने, हो गया है तुझको तो प्यार सजाना, मेरे ख्वाबों में जो आये, मेहँदी लगाके रखना, ज़रासा झूम लूँ मैं हि दिलवाले ची गाणी तोंड-पाठ होती, आजही आहेत. पण तरही बॉम्बे आणि रंगीला ची बात काही औरच होती. बॉम्बे मधली केहना हि क्या, हम्मा हम्मा , कुची कुची रकम्मा आणि तु हि रे हि गाणी अजरामर आहेत. आणि रंगीला चे तर क्या केहने. रंगीला चं म्युझिक खऱ्या अर्थाने पाथ-ब्रेकिंग होतं. एकाच वेळी कमर्शियल व आर्टिसटिक असण्याचं दुहेरी सामर्थ्य ह्या म्युझिक मध्ये होतं. याई रे याई रे, हाये रामा (पायलिया झंकार ह्या बंदिशीचा आधार घेत राग पुरिया धनश्री मध्ये रचलेलं हे गीत), क्या करे क्या ना करे, यारो सुन्लो जरा आणि अर्थात "तन्हा तन्हा यहा पे जीना" हि गाणी खरोखरच खूप वेगळी होती. आशाबाई आणि रेहमान चं कॉमबीनेशन अनबीटेबल होतं. हिंदी सिनेमा नी असं म्युझिक कधी ऐकलंच नव्हतं.

९६ साली फिल्म संगीताची सुसाट वेगात सुरु असलेली घौड-दौड थोडी रेंगाळली. राजा हिंदुस्तानी ची गाणी छान होती पण आज मात्र "परदेसी परदेसी जाना नही" हे गाणं जरा विचित्रच वाटतं. त्यावर्षी खरं दर्जेदार संगीत लाभलं ते दोनच चित्रपटांना. खामोशी आणि माचीस. जतीन ललित चं मला सर्वात आवडलेलं काम म्हणजे "खामोशी". प्रत्येक गाणं क्लासिक होतं. आज मै उपर, बाहों के दरमियान, मौसम के सरगम को सुन, गाती थी पहले अकेली आणि ये दिल सुन आहा है तेरे दिल की जुबान हि गाणी खूप प्रभावशाली ठरली. तसंच विशाल भारद्वाज चं हटके संगीत लाभलेला चित्रपट म्हणजे माचीस. त्यातील पानी पानी रे आणि छोड आये हम वो गलीया हि गाणी आजही तितकीच अप्रतीम वाटतात ऐकायला, टाईमलेस आहेत ती.

९७ मध्ये पुन्हा एकदा उत्तम संगीत अनुभवायला मिळालं. खूप सारे चित्रपट आले जे म्युझिकल होते. दिल तो पागल है, बॉर्डर, परदेस, गुप्त, जुडवा, हीरो नंबर वन, यस बॉस, गुप्त, और प्यार हो गया, जुदाई, कोयला, सपने, दौड़ ... सगळ्याच फिल्म्स ची गाणी एकाहून एक सरस होती . दिल तो पागल है ची सगळीच गाणी, परदेस मधली मेरी मेहबूबा, ये दिल दिवाना आणि दो दिल मिल रहे है , बॉर्डर मधलं संदेसे आते है, जुडवा आणि हीरो नंबर वन ची फंकी गाणी, कोयला चं इंटेन्स म्युझिक , और प्यार हो गया मधील नुसरत फतेह अली खान ह्याचं विलक्षण संगीत (मेरी साँसों में बसा है, कोई जाने कोई न जाने) व रेहमान चं सपने (आवारा भवरे, उह ला ला ला, चंदा रे चंदा रे) आणि दौड चं हटके म्युझिक हि सगळी मिळून एक मोठी म्युझिकल ट्रीट होती.

९८ मधे मोजकेच चित्रपट म्युझिकल ठरले. त्यात कुछ कुछ होता है, प्यार तो होना ही था , जब प्यार किसीसे होता है, घुलाम ह्यांचा आधी उल्लेख करतो. चारही चित्रपटांचे संगीतकार होते जतीन-ललित. कुछ कुछ होता है चं टायटल साँग आणि तुझे याद ना मेरी आई हि गाणी विलक्षण सुंदर वाटली मला. तसंच प्यार तो होना ही था चं अजनबी मुझको इतना बता आणि जब प्यार किसीसे होता है मधली ओ जाना, मदहोश दिल कि धडकन हि गाणी अप्रतीम होती. पण ह्या वर्षी पुन्हा बाजी मारली ती रेहमान आणि गुलझार साहेब ह्यांच्या जोडी नी. "दिल से" चं म्युझिक विलक्षण होतं. छैया छैया, जिया जले, दिल से रे, ए अजनबी, सतरंगी रे सगळीच गाणी क्लासिक ठरली. रेहमान आणि लताबाई हे पहिल्यांदा एकत्र आले आणि जिया जाले सारखं टाईमलेस क्लासिक जन्माला आलं. ह्या वर्षी सई परांजपे दिग्दर्शित "साज" नावाचा एक सुंदर चित्रपट आला ज्याचं संगीत उस्ताद झाकीर हुसेन, भूपेन हजारिका, राजकमल आणि पंडित यशवंत देव ह्या चार दिग्गज संगीतकारांनी दिलं होतं. मला साज मधल्या प्रत्येक गाण्याचा उल्लेख करावासा वाटतो इतकी सुंदर गाणी होती ह्या फिल्म ची. बादल चांदी बऱ्साये, क्या तुमने है कह दिया, निंदिया है सपना है, फिर भोर भाई, रात ढलने लगी, सुन्नेवले सून लेंगे, बादल घुमड बढ आये...प्रत्येक गाणं हिऱ्या सारखं लखलखणारं. अश्या कलाकृती आता अतिशय दुर्मिळ झाल्या आहेत. आजकाल चित्रपटातील एखादं गाणं जरी बरं असेल तर देव पावला म्हणायचं.

९९ साली रेहमान चे ताल व थकशक, जतीन ललित चा सरफरोश आणि इस्माईल दरबार चा हम दिल दे चुके सनम ह्या फिल्म्स ची गाणी गाजली. ताल चं प्रत्येक गाणं रत्नजडीत दागिन्यासारखं होतं. इश्क बिना, ताल से ताल मिलाओ, नहीं सामने, कही आग लगे, रमता जोगी, करिए ना ही गाणी सर्वगुण संपन्न होती. कलात्मकता आणि तांत्रिक आघाडी चा उत्तम संगम ताल मध्ये ऐकायला मिळतो. हम दिल दे चुके सनम चा साऊंडट्रेक देखील तितकाच दमदार. आँखों की गुस्ताखियाँ, ढोली तारो ढोल बाजे, निम्बुडा, अलबेला सजन (प्रस्थापित बंदिश), तड़प तड़प के हि गाणी उत्तम जमली होती. तसंच जतीन ललित ची सरफरोश मधली होशवालों को खबर क्या, ज़िन्दगी मौत न बन जाए, इस दीवाने लड़के को, जो हाल दिलका हि गाणी झकास होती. पण ह्या वर्षी हे ३-४ चित्रपट सोडले तर बाकी सगळा उजेडच होता. २००० च्या दशकात येणाऱ्या स्वर-दुष्काळाची नांदी झाली. . .

हे सगळं वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मी बहुतेक फक्त फिल्म संगीत ऐकत मोठा झालो. तसं अजिबात नाही. बालपणीच अभंग रचना ऐकण्याची गोडी निर्माण झाली ती ओमकार स्वरूपा मुळे. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व संगीतकार श्रीधर फडके ह्यांनी सुगम भक्ती संगीताची नवी व्याख्या मांडली. ताल वैविध्यता व स्वरप्रधान शब्दरचना असलेले अभंग निवडून त्यांना अतिशय आकर्षक चाली लावणं ही श्रीधरजींची खासियत. संत एकनाथ, संत नामदेव व संत ज्ञानेश्वर अश्या संतांच्या निवडक अभंग रचना श्रीधरजींच्या सुरेख संगीतात नटल्या व अजरामर झाल्या. त्यासोबत संत तुकाराम, ज्ञानेश्वर माउली, शिवकल्याण राजा, ह्या मराठी संगीत क्षेत्रातील माईलस्टोन कलाकृती आवडू लागल्या. पुढे ९० च्या दशकात ऋतू हिरवा ह्या अल्बम ने भाव संगीताची नवी व्याख्या मांडली.

९० च्या दशकात मी पाश्चात्य संगीत ऐकू लागलो. मेडोना आणि मायकल जेक्सन हे माझे आवडते आर्टिस्ट. मायकल जेक्सन बद्दल काय बोलू? जितकं बोलीन तितकं कमीच आहे. १९८२ साली "थ्रिलर" आणि ८७ साली "बेड" ह्या त्याच्या अल्बम्स ने जगाला वेड लावलं. पण तेव्हा त्याचं संगीत माझ्या पर्यंत पोचलच नाही कारण आमच्या घरी फक्त भारतीय संगीत ऐकलं जायचं. पण ९१ साली आलेला "डेंजरस" आणि ९५ साली आलेला "हिस्ट्री" हे दोन अल्बम्स जग-प्रसिद्ध झाले आणि ह्यावेळीस मायकल मेनिया काय ते मलाही समजलं. मी वेडा झालो. आणि मी आजही वेडा आहे. त्याचं म्युझिक टेक्निकली सुपर्ब, अहेड ऑफ टाईम, टोटली एनटरटेनिंग आणि कमप्लीटली हार्टटचिंग. थोडक्यात "परिपूर्ण" संगीत. त्याचा आवाज, त्याचा डान्स, त्याचं सादरीकरण म्हणजे सिम्पली आउट ऑफ धिस वर्ल्ड. त्याचं "हिल द वर्ल्ड" हे गाणं आजही डोळ्यात पाणी आणतं. हजारो वेळा ऐकूनही तोच परिणाम. आज तो ह्या जगात नाही पण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ हि म्हण जर खरी असेल तर तो पुन्हा येईल. आणि नाही आला तर हि म्हण पूर्णतः चुकीची ठरेल! अतिशयोक्ती नाही.

असो, पाश्चात्य पॉप संगीतामुळे भारतीय पॉप संगीताची हि प्रगती झाली. सुनिता राव, आलीशा चिनाय, बाबा सेहगल, शान-सागरिका, कलोनियल कसिंस, रेमो फर्नेन्डीस, उषा उत्थुप, लकी अली, दलेर मेहंदी ह्या कलाकारांची काही गाणी उत्तम होती. अरेबिक सिंगर खालेद चं "दीदी", पीटर आंद्रे चं "मिसटीरियस गर्ल", बोनी म आणि एनिग्मा ह्या ग्रुप ची काही गाणी हि देखील खूप भावली मनाला. ९८ साली भारतात प्रदर्शित झाला जेम्स केमेरोन चा महत्वाकांक्षी सिनेमा "टायटेनिक" जो अफाट गाजला. त्यातील जेम्स हॉरनर ने स्वरबद्ध केलेलं व सिलीन डियोन ने गायलेलं "माय हार्ट विल गो ऑन" हे गाणं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तसंच "नथिंग्स गॉंना चेंज माय लव्ह फॉर यु" किंवा अल्लादिन मधलं "अ होल न्यू वर्ल्ड" हि काही पाश्चात्य गाणी जी मनात घर करून गेली.
ह्या सगळ्याचा माझ्यावर प्रभाव होत गेला. रचनाकार होण्याच्या मार्गावर पाउले पडत होती.

२००० च्या दशकातील फिल्म संगीत खूप सुमार होतं असं माला वाटतं. पूर्वीची गाणी वर्षानुवर्ष लक्षात राहायची. पण २००० नंतर गाण्यांचा लाईफ-स्पेन त्यांच्या क्रीएटीव्हीटी इतकाच मर्यादित होऊ लागला. प्रदर्शित गाणी ३ महिन्यात विस्मरणात जाउ लागली. पण रेहमानी जादू मात्र टिकून राहिली, किंबहुना अधिकाधिक बहरतच गेली. पुकार (२०००), लगान व झुबेदा (२००१), साथिया (२००२), मीनाक्षी, स्वदेस व युवा (२००४), रंग दे बसंती (२००६), गुरु (२००७), जोधा अकबर, युवराज व जाने तू या जाने ना (२००८) आणि रॉकस्टार (२०११) ह्या सगळ्या फिल्म्स चं संगीत पाथ-ब्रेकिंग होतं. रॉकस्टार चं "कून फाया कून" ऐकून मी इतका वेडा झालो होतो कि हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन सतत ३ दिवस मी हेच गाणं ऐकत होतो. आता ह्याला वेड म्हणा किंवा पेशन पण हि रेहमान ची जादू आहे.
ह्या व्यतिरिक्त इतर संगीतकारांचे उत्तम संगीत असलेले चित्रपट अगदी मोजके होते. त्यातील काही नावं म्हणजे अन्नू मलिक चा रेफ्युजी (२०००), शंकर-एहसान- लॉय चे मिशन काश्मीर (२०००) दिल चाहता है (२००१) कल हो न हो (२००४) बंटी और बबली (२००५) व कभी अलविदा ना केहना (२००६), इस्माईल दरबार चा देवदास (२००२) आणि इलायराजांचा चीनी कम (२००७). ह्या शिवाय खूप श्रीमंत म्युझिक लाभ्लंच नाही कुठल्या फिल्म्स ना.


असो, पण ह्या सगळ्या कलाकृतींनी मला एक संगीतकार होण्यात खूप मदत केली. अर्थात माझ्या गुरुंचा व आई-वडिलांचा वाट खूप अधिक आहे ह्यात. पण ह्या सर्व गाण्यांनी मिळून मला खूप काही शिकवलं. खूप आनंद दिला. ह्या गाण्यांच्या सहवासातल्या खूप गोड आठवणी निर्माण झाल्या. कॉलेज मधून पास-आउट होतानाच पुढे संगीतकार व्हायचं असं ठरवलं होतं मी. संगीतकार कसं व्हायचं ते माहित नव्हतं पण निश्चय पक्का होता आणि नशीबंच वात दाखवेल अशी खात्र होती. २००१ साली एम.कॉम करत असताना मी मुंबई विद्यापीठाच्या चर्चगेट इथे स्थित असलेल्या संगीत विभागाला भेट दिली. तिथे स्वर्गीय.श्री.अनिल मोहिले ह्यांच्या "संगीत दिग्दर्शन व संयोजन", श्री.मनोहर कुंटे ह्यांच्या "साउंड रेकोर्डिंग" व श्री अच्युत ठाकूर ह्यांच्या "सुगम व लोकसंगीत" ह्या ३ अभ्यासक्रमांचा मी विद्यार्थी झालो व तिथून एक वादक आणि सहाय्यक संगीतकार म्हणून माझी सुरवात झाली. त्यादरम्यान माला अवधूत गुप्ते व वैशाली सामंत ह्यांच्या "पाउस" ह्या अल्बम चं संगीत संयोजन करण्याची संधी मिळाली. वैशाली सोबत एक वादक म्हणून मी काही कारेक्रम केले होते, तिनी माझं संगीत विभागातील स्टुडीओ मध्ये ध्वनिमुद्रित केलेलं काम देखील ऐकलं होतं व ह्या क्षेत्रात पुढे काम करण्यासाठी तिनीच माला हि संधी उपलब्ध करून दिली. सोबत मी पार्ल्यात श्री मनोहर जोशी ह्यांच्या कडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतंच होतो.

माझ्या कार्कीर्दीला दिशा मिळाली ती एका अद्भुत कलाकाराच्या स्वर-सहवासा मुळे . २२ नोव्हेंबर २००२ ही तारीख माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझ्या आयुष्यातला हा एक खास स्वरमयी दिवस. ह्या दिवशी मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर ह्यांचा मगन हुई मीरा नावाचा मीरा भजनांचा कॉनसर्ट झाला ज्यात ताईंना स्वर-साथ करण्याची संधी त्यांच्या इतर शिष्यांसोबत मालाही मिळाली. आजवर अनेकदा ताईंच्या राग-संगीताच्या मैफिलींना प्रेक्षकात बसून त्यांना ऐकण्याचा आनंद अनुभवला होता. पण ह्या कॉनसर्ट च्या निमित्ताने प्रथमच माला रंगमंचावर त्यांच्या मागे बसून त्यांना साथ करण्याचं भाग्य लाभलं. ह्या खास दिवसा इतकेच ह्या कॉनसर्टच्या तालमीत घालवलेले २ महिनेही माझ्यासाठी तितकेच खास होते किंबहुना कॉनसर्ट च्या दिवसा पेक्षाही अधिक महत्वाचे. कॉलेज मधून नुक्ता पास-आउट झालेल्या व संगीतकार होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या एका तरुण होतकरू कलाकाराला थेट गानसरस्वतींचा स्वर-सहवास लाभणं व त्यांच्या अद्वितीय रचना त्यांच्याच कडून शिकायला मिळणं हे त्या कलाकाराचं परम भाग्यंच म्हणायला हवं, नाही का?...ताईंनी माला त्यांचे स्वरचित असे १८ मीरा अभंग स्वतः शिकवले व तिथून माला कंपोझिंग ची एक वेगळी दृष्टी मिळाली. त्याच दरम्यान माला प्राचार्य श्री केशव परांजपे ह्यांचा सुरेल व बुद्धिवादी सहवास लाभला. केशव सरांनी माला माझ्या "फ्रेझिंग" बाबतीत वेगळा विचार करण्याचा मार्ग दाखवला आणि त्यानंतर मी खऱ्या अर्थाने एक संगीतकार म्हणून काम करू लागलो. आज काम करताना ह्या सर्व मंडळींचे व लहानपणा पासून ऐकलेल्या असंख्य गीतांचे संस्कार झाल्याचा अनुभव बरेच वेळा होतो आणि जाणवतं कि मी खरोखरच खूप भाग्यवान आहे कि माला योग्य वेळेला योग्य गुरु तर भेटलेच पण ह्या असंख्य कलाकृती हि गुरु-रूपातच भेटल्या ज्यांनी माला खूप काही शिकवलं आणि त्यातून घडवलं!!!




नीलेश मोहरीर