Sunday, September 9, 2018

आपकी याद आती रही..संगीतकार जयदेव यांच्या कारकीर्दीला शोभेल असेच...

 
संगीतकार जयदेव यांच्या जन्मशताब्दीचे निमित्ताने महिनाभर त्यांच्या चित्रपट संगीताचा अभ्यास करून ..त्या गाण्यांतील राग, उच्चारण आणि गाण्यांमधल्या जागा समजून घेऊन पुण्याच्या संगीत क्षेत्रात आपले नाव कोरलेल्या अपर्णा संत, प्रज्ञा देशपांडे आणि अनुराधा कुबेर या गायिकांनी शनिवारी पुण्यात सादर करून एक अप्रतिम कार्यक्रम रसिकांना अर्पण केला...

 

 

हिंदी चित्रपटसृष्टीत तीन वेळा रेश्मा आौर शेरा, गमन आणि अनकही या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकार म्हणून राष्टीय स्तरावर पुरस्कार मिळालेले जयदेवजी यांच्या लोकप्रिय आणि काहीश्या नवीन रचना घेऊन त्यांच्या संगीतातील वैविध्य़ टिपणारा एक वेगळा आणि दर्जेदार कार्यक्रम सादर झाला.
यात प्रभु तेरो नाम पासून, रात भी है कुछ भिगी भिगी..ये दिल और उनकी, तुम्हे देखती हॅूँ..तुम्हे हो हो..तू चंदा मै चांदनी, आपकी याद आणि शेवटी माता सरस्वती शारदे..पर्यंत..गाणी तिन गायिकांनी आपल्या तरल आणि भावपूर्णरित्या उत्तम संगीताच्या साथीने सादर करून दर्दी रसिकांच्या समोर कुशलतेने मांडली.


कुणी कोणची गाणी म्हटली ते मी महत्वाचे मानत नाही..अपर्णा संत, अनुराधा कुबेर आणि प्रज्ञा देशपांडे आपापल्या परिने उत्तम संगीत गुरू आहेत..पण या तिघिंनी एकत्र येऊन असा आगळा कार्यक्रम करण्याचे धाडस दाखविले , तेही उत्तमरित्या..हे खूप महत्वाचे आणि माझ्या दृष्टीने अधिक मोेलाचे.
प्रत्येकीचा पोत वेगळा पण या कार्यक्रमातून त्यांचा आवाज एक होऊन तो स्वर जयदेवजींच्या गाण्याशी तादात्म्य पावत पसिकांपर्यत पोहोचला हे मोलाचे.


संगीतकार जयदेव यांच्या जीवनप्रवासातील चढउताराचे प्रसंग सांगत सांगत दिलेली सांगेतिक मेजवानी फारच लज्जतदार अनुभवता आली. त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न होती..पण लक्ष्मी रुसल्याचेही समजले..पण जी गाणी त्यांनी दिली त्यातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला किती उत्तम संगीताचा नजराणा बहाल केला ते यातून उमजले. 
डाॅ.मानसी अरकडी यांचे यथायोग्य , समर्पक निवेदन यातून जयदेवजी समजायला आणि त्यांच्या संगीतातील महानता समजू आली..
विवेक परांजपे, केदार परांजपे या दोघांची सिंथेसायझरच्या संगतीने गाण्यांना दिलेली संगत.  
प्रसन्न बाम यांची हार्मोनियमची साथ, राजेंद्र हसबनीस तबला संगत आणि ऋतुराज कोरे यांचे ढोलक आणि रिदम मशीनवरचे प्रभुत्व सारेच कार्यक्रमाला पोषक असेच होते.


त्यांना या क्षेत्राने थोडे हात आकसूनच दिले.. अखेरपर्यंत पेईंगगेस्ट म्हणून ते एकटेच राहिले.. पण आपली उत्तम गाणी रसिकांच्या चरणी देऊन ते कायम मनात भरून राहिले..
असा कार्यक्रम देऊन रसिकांच्या मनावर त्यांची कारकीर्द कायम कोरली गेली.

सुभाष इनामदार, पुणे


subhashinamdar@gmil.com

Thursday, August 30, 2018

तालयात्रा अनुभवताना भान हरपून जाते...
पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पुण्यातल्या धायरीमध्ये गुरूकुल पध्दतीने सुरु केलेल्या तालयोगी आश्रमाच्या सातव्या वर्धापनदिनाच्या भव्य कार्यक्रमाच्या स्मृती आजही मनात भारून राहिल्या आहेत. सुरवातीचा चार पखावाजांचा ठेका..ती लयकारी . तबल्याचे घुमत राहलेले बोल. पाश्चात्य वाद्यांची भारतीय परंपरेतली यथायोग्य मिश्रीत लयकारी. पं. सुरेश तळवलकरांचे तोंडून घुमत राहिलेले अनाहत नाद. आणि सर्वात नृत्यकलावंतांकडून त्या लयींवर केले गेलेले रेखीव नर्तन.या सर्वांचा एकत्रित परिणाम पाहताना हरखून गेलेले तृप्त रसिकजन यांच्या वाजत असेल्या टाळ्या. आणि सर्वांत महत्वाचे राज्याचे उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई यांची पंडीतजींना  मिळालेली....तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. ची शाबासकीची थाप.


श्रीकांत बडवे यांची भरघोस मोलाची मदत.भारत फोर्जच्या उपाध्यक्षा लिना देशपांडे यांनी केलेले कौतूक..सारेच तालयोगी आश्रमाचे कार्य अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी पुरेसे आहे.
बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा काही विलंबाने उघडतो..आणि तालयात्री..या भव्य कार्यक्रमाची अक्षरे मनात घर करून राहतात..आणि अगदी झपतालापासून ते त्रितालापर्य़तचा हा सुखद प्रवास अंगावर रोंमांच उभा करत पुढे सरकत जातो..गौरी स्वकूळच्या निवेदनातून कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य रसिकांसमोर येते .
अमृता गोगटे, अस्मिता ठाकूर,शितल लाळगे,इशा फडके, मृणालिनी खटावकर,श्रुती आपटे, गौरी स्वकूळ,आयुषी दिक्षित, रजत पवार..यांच्या नृत्यदर्शनाने रंगमंच उजळून निघतो. एकेक तालातला बोल डोळ्यांचे पारणे फेडतो.पंडीतजी जरी तबल्यातले बादशाह असले..तरी त्यांच्या या कार्यक्रमात..पखावाज, तबला कीबोर्ड, परदेशी वाद्ये. यांचा इतका सुंदर संगम होत असतोना ते वादन अनुभवणे हा एक वेगळा अनुभव सुंमारे दोन तास रसिक इथे घेत होता..तेही कुठलीही विश्रांती घेता.
अनिरूध्द जोशींची सतार आणि मग विनय रामदासन..नागेश अडगावकर यांचे सुंरेल आलाप , ताना स्वरातून उमलतात..आणि ठेका वाद्यातून मग नृत्यांगनांच्या पदन्यासातून उमटतो..आणि रसिकांच्या मनाचे ठाव घत रहातो.सावनी तळवलकर, आशय कुलकर्णी,सौरभ सनदी यांचा तबला वाजू लागतो. आेंकार दळवी, सुजीत लोहोर,भागवत चव्हाण , कृष्णा साळुंके..यांची पखावजवरील थाप घुमू लागते.आणि सारे वातावरण नादाने दुमदुमून उठते.
अभिषेक सिनकर, अनय गाडगीळ आणि तेजस माजगावकर यांची हार्मोनियम, कीबोर्ड आणि टाळावरील हुकुमत लक्षात येते..पण ती त्या नादात काहीशी दूर होते.
अभिषेक भुरूक, उमेश वारभुवन,ऋचुराज हिंगे, उमेश परांजपे यांची  वाद्ये तानातालात बोलू लागतात.तेव्हा ठेका अधिक तीव्र होत जातो.तालाबरोबरच लय आणि नाद वापरून..रागांचा विषय रंजक करत पंडितजींनी ही तालयात्रा लोकांसमोर सादर केली..त्यांच्या तबला बोलाने ती अधिक संपन्न होत गेली.
मान्यवरांचे आशिर्वाद आणि कलावंतांचे अनुभवसंपन्न सादरीकरण यातून ही तालयात्रा नादमय..आणि गुरुकुलाची परंपरा वृध्दींगत करत या वाद्यांकडे आकर्षीत होणारी ही तरूणाई यात आपले योगदान यापुढेही देत राहिल याची प्रचिती येते.सुभाष इनामदार,पुणे
Subhashinamdar@gmail. com