Sunday, November 21, 2010

कलावंताने कलेशी एकनिष्ठ रहावे


कलावंताने शेवटपर्यत कलेशी एकनिष्ठ राहून सतत विद्यार्थी बनून नवे शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याला सतत नवे काहीतरी मिळत असते. हिराबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या दोन्ही भगिनिंनी नवीन पिढी , नवे श्रोते निर्माण केले. आजच्या कलाकारांनीही तसाच प्रयत्न करावा, अशी सूचना ज्येष्ठ व्हायोलिन वादक फैय्याज हुसेन खॉ यांनी आजच्या तरूण कलाकारांना केली.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सरस्वतीबाई राणे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्ताने तरूण सारंगीवादक साबीर खॉ यांना फैय्याज हुसेन खॉ यांच्या हस्ते शनिवारी सवाई गंधर्व स्मारकात पुरस्कार देण्यात आला. सरस्वती संगीत अकादमी आणि संवाद या संस्थेच्या वतीने रोख ७५०० हजार रूपये, स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. गायकाच्या मागे साथ करणा-यांना गायकांपेक्षा अधिक मेहनत करावी लागते पण त्यांचा य़थोचित सन्मान केला जात नाही. आज सारंगीए दुर्मिळ आहेत. या पुरस्काराच्या निमित्ताने सारंगीवादनाकडे तरुण कलावंत वळतील आशी आशा फैय्याज हुसेन खॉ यांना वाटते.
पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना साबीर खॉ यानी आपले वडील सुल्तान खॉ यांच्याकडून सारंगीवादनाचा हा वारसा आपणाकडे आल्याचे अभिमानाने सांगत हा पुरस्कार हा सन्मान वाकेही सपनेसे कम नही अशी भावना व्यक्त केली.
पुरस्कार समारंभानिमित्त आयोजिलेल्या संगीत मैफलीत साबीर खॉ यांनी आपल्य़ा नजाकतीने श्रोत्यांना जिंकून घेतले. राग सरस्वती सादर करून ती सरस्वतीबाईंना आदरांजलीच वाहिली. त्यांना तबला साथ केली ती अरविंदकुमार आझाद यांनी.
व्यंकटेशकुमार आणि स्ररस्वतीबाईंची नात मीना फातर्पेकर यांच्या गायनाने संगीतप्रेमी तृप्त झाले. त्यांना साथ होती हणमंत फडतरे (तबला) आणि प्रमोद मराठे(संवादिनी)यांची.
सा-याच कार्यक्रमाचे निवेदन शैलवा मुकुंद यांनी केले तर संवादच्या सुनिल महाजन यांनी आभार मानले.

No comments: