Monday, February 7, 2011

स्मरण गुरूंचे





गायन वादनाचार्य कै. पं. गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने स्वरबहार या संस्थेने व्हायोलिन वादनाची मैफल पुण्याच्या स्नेहसदनच्या दालनात शनिवारी ५ फेब्रुवारी २०११ला आयोजित केली होती. दरवर्षी आपल्या गुरुंच्या स्मरणार्थ पुण्याचे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव हा कार्यक्रम आयोजित करीत असतात.

कार्यक्रमाच्या पूर्वाधात अनेक वर्ष बबनराव हळदणकरांना साथ करणारे पुणे आकाशवाणीचे निवृत्त व्हायोलिनवादक आणि पं. डी.के.दातार यांचे शिष्य रत्नाकर गोखले यांचे वादन रंगले. प्रारंभी भिमपलास रागात विलंबित एकताल आणि द्रुत तीन ताल सादर केला. पं. गजानबुवांनी बांधलेली जयताश्री रागातली एक रचनाही सादर केली. शेवटी पं. भीमसेन जोशी यांचा अधिक देखणे हा अभंग सादर करून आपल्या सुरेल आणि गायकी पध्दतीने वादनाची सांगता केली. त्यांना तबल्यावर पं. सुरेश तळवलकरांचे शिष्य मयंक बेडेकर यांनी अतीशय समर्पक साथ केली.

उत्तरार्धात भालचंद्र देव ( पं. गजाननबुवा जोशी यांचे शिष्य) आणि सौ. चारूशीला गोसावी (भालचंद्र देवांची कन्या व शिष्या) यांच्या व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगदार झाली. जुगलबंदीतून सादर केलेली मधुवंती रागातली रचना सुरेल तर होतीच पण ती तेवढीच बहारदारपणे या दोन कलावंतानी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. मधुवंतीनंतर सादर झालेला राग होता श्री. या श्री रागातली पं. गजाननबुवांची मध्यलय तीनतालातली रचना सादर करून भैरवीने मैफलीची सांगता झाली. त्यांना तबला साथ केली ती रविराज गोसावी (चारूशीला देव यांचे पुत्र) यांनी. त्यांच्या वादनकौशल्यावर खूष होऊन रसिकांनी टाळ्याची पावतीही दिली. उत्तरार्धानंतरच्या कार्यक्रमाचे आणि एकूणच मैफलीचे संचलन राजय गोसावी यांनी केले. या पितापुत्रींचे वारंवार कार्यक्रम होवोत हिच आमची इच्छा.या कार्यक्रमाला रसिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता

गुरूंचे स्मरण करताना आजोबा. भालचंद्र देव. कन्यका आणि शिष्या सौ. चारूशीला गोसावी. तबल्यावर नातू रविराज गोसावी आणि सूत्रे हाती होती ते जावई राजय गोसावी. असा हा नात्याचा सुरेख आणि सुरेल संगम स्नेहसदनाच्या मंचावर एकत्रित झाला.

No comments: